11-lp-droughtदुष्काळ पाण्याचा आणि सरकारी दूरदृष्टीचा
पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन केलेली पायपीट, विहिरींचा तळ शोधताना गमावलेले जीव, कोरडी  पडलेली तळी- नद्या- धरणं, तहानलेली माणसं-गुरं-ढोरं, करपलेली जमीन.. जीवघेण्या दुष्काळाने राज्याची कशी दैना उडालेली आहे, याचे ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी टिपलेले जळजळीत वास्तव-
सुहास सरदेशमुख, एजाजहुसेन मुजावर, दयानंद लिपारे, अविनाश पाटील, चंद्रशेखर बोबडे

पाणीटंचाईचे एकमेव उत्तर म्हणजे टँकर या अभिनिवेशात सरकारी यंत्रणा वावरत असेल तर जे होऊ शकते, तेच उत्तर महाराष्ट्राचे झाले आहे. त्यामुळे इथली जनता डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहत आहे.

What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
ram kadam rohit pawar
Video: फडणवीसांना संपवण्याची धमकी, रोहित पवारांचा फोन आणि बारामती कनेक्शन; सत्ताधाऱ्यांचे विधानसभेत गंभीर आरोप!
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
crop damage in vidarbha marathwada and north maharashtra due to unseasonal rain hailstorm
अवकाळी, गारपिटीमुळे पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान

अल्प पर्जन्यमानामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे या तीन जिल्ह्य़ांमध्ये टंचाईची स्थिती अतिशय बिकट असून पावसाळा वेळेवर सुरू न झाल्यास मनमाडमध्ये तर लातूरप्रमाणे रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. विभागात सध्या ८३१ टँकर सुरू असून यावरूनच टंचाईची भीषणता स्पष्ट होऊ शकेल. नाशिक, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्य़ांमधील गावे तहानेने व्याकूळ झाली असताना नंदुरबार जिल्हा मात्र सुदैवी म्हटला पाहिजे. डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या जिल्ह्य़ावर निसर्गाने कृपा केली असून पर्यावरण संवर्धन केले तर टंचाईला रोखता येणे शक्य असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.

नाशिक महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुका लक्षात घेत पाण्याचे राजकारणही एकीकडे सुरू झाले आहे. मराठवाडय़ाला गंगापूर धरणातून पाणी सोडण्यामुळे भाजपचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात कोणत्याच पक्षाने हयगय केली नाही. नाशिक तहानलेले असताना जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करत भाजपला घेरण्यात आले होते. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या तीन हजार, तर दारणा धरणात ५०० दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. या संपूर्ण पाण्याचा उपयोग केल्यास ३१ जुलैनंतरही २१ दिवस अधिक सहज निघू शकतील असा हा जलसाठा आहे, परंतु यात गंमत अशी की दारणा धरणात नाशिकसाठी आरक्षित पाणी उचलण्याकरिता सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे या धरणातून २०० दलघफूपेक्षा अधिक पाणी उचलताच येत नाही. नाशिक शहरात सध्या आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. जायकवाडीला पिण्यासाठी ३.९३ टीएमसी पाण्याची आवश्यकता असताना १०.१३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. म्हणजेच कितीतरी अधिक पाण्याचा अपव्यय झाला. हा मुद्दाही आता टंचाईच्या पाश्र्वभूमीवर चर्चेत आला आहे.

नाशिक विभागातील १९ प्रकल्पांमध्ये सध्या ५५३ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच दिवसात २०१५ मध्ये तो ११९९ दशलक्ष घनमीटर होता. या आकडेवारीत असलेली तफावत बरेच काही स्पष्ट करते. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात टंचाईची सर्वाधिक झळ बसणारे शहर म्हणून मनमाडची ओळख आहे. सुमारे ३० वर्षांपासून टंचाईने मनमाडचा पिच्छा पुरविला असून सध्या मनमाडला ३५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आता तर मनमाडला रेल्वे जंक्शन असल्यामुळे लातूरच्या धर्तीवर रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य आहे काय, अशी विचारणाच उच्च न्यायालयाने भुसावळ विभागाच्या मंडळ रेल्वे प्रबंधकांना केली आहे. त्यासाठी त्यांना म्हणणे मांडण्यास ५ मे ही तारीख देण्यात आली आहे. मनमाडला नाशिकहून पाणी देता येणे शक्य असल्याचे मनमाडचे वकील सागर कासार यांनी जनहित याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. नाशिकच्या विविध धरणांमधून जायकवाडीसह मराठवाडा तसेच जळगाव व नगर भागात पाणीपुरवठा केला जात असेल तर मनमाडला नाशिकहून पाणी देणे सहज शक्य असल्याचे म्हणणेही कासार यांनी मांडल्याने नवीन वाद उद्भवण्याचा धोका आहे. शहराला सध्या होत असलेल्या ३५ दिवसांआड पाण्याऐवजी यापुढे किमान १० ते १५ दिवसांआड नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे हमीपत्र मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी न्यायालयापुढे दिले. पालखेड कालव्याच्या शेवटच्या आवर्तनातून मनमाडसाठी पाटोदा साठवणूक तलावात १६, तर वाघदर्डी धरणात सहा असे २२ दलघफू पाणी आले. त्यातील तीन दलघफू पाणी आठवडय़ातच संपले असून सध्याच्या उपलब्ध साठय़ात १० ते १५ दिवसांआड पाणी पुरविल्यास ते जेमतेम मेअखेपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. मनमाडच्या पाणीप्रश्नावर अ‍ॅड. कासारसह इतरांनी २०१३ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. तेव्हापासून शासनाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत तसेच नगरपालिकेमार्फत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. केवळ कागदपत्रे रंगवली जात आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने राज्य शासन व नगरपालिका यांना धारेवर धरले. तीन वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती, त्यात आजही कोणताही फरक पडलेला नाही. शहरात ३५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याबद्दल उच्च न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केले आहे. आठवडय़ातून किमान एकदा पाणीपुरवठा करण्याची मागणी अ‍ॅड. सागर यांनी केली. त्यावर सध्या पाणीसाठा असून १० दिवसांआड पाणी नगरपालिका देऊ शकते, अशी बाजू मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांनी मांडली. २०१३ मध्ये राज्य शासनाने ११ उच्चस्तरीय व राज्यपातळीवरील प्रमुख अधिकाऱ्यांची मनमाड शहराच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने आतापर्यंत फक्त अहवाल देण्याचे काम केले. प्रत्यक्ष कोणतीही ठोस कार्यवाही आजपर्यंत केलेली नाही. नियमित बैठकाही घेतल्या नाहीत. त्यामुळे ही समिती फक्त दिखाऊ आहे, त्याऐवजी प्रत्यक्ष काम करणाऱ्या हिवरे बाजार तसेच जलतज्ज्ञ खानापुरे यांसारख्या तज्ज्ञांची समिती नेमून मनमाडच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी पाणीटंचाईच्या समस्येवर आपल्या पद्धतीने उपाय शोधला असून कूपनलिका खोदण्याच्या धडाक्यामुळे शहरात सर्वत्र कूपनलिकांचे साम्राज्य दिसते, परंतु भूगर्भातील पाणीसाठा खोलवर गेल्याने त्यापैकी बहुतांश कोरडय़ा पडल्या आहेत. येवल्यातही सात दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्य़ात दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये टंचाईची विशेष समस्या नाही. इतरत्र मात्र कमी-अधिक प्रमाणात टंचाई आहे.

खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ात सध्या ४१ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून टंचाईला तोंड देण्यासाठी शासनाकडून विहिरी ताब्यात घेण्याच्या आकडेवारीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाचोऱ्यात १० दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने टंचाईवर उपाययोजनांसाठी १९ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.     (पान २७ वर)

तीव्र टंचाईग्रस्त गावांसाठी नव्याने ३२ टँकर जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहेत. तसेच २१४ गावांसाठी ४८२ नवीन विंधन विहिरी, कूपनलिकांचे खोदकाम करण्यात आले आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२ टँकर सुरू असून अमळनेर नऊ, पारोळा पाच, भुसावळ दोन, याप्रमाणे त्यांचे स्वरूप आहे. पावसाने दगा दिल्याने जिल्ह्य़ातील धरणांमधील जलसाठा मार्चमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला होता. सध्या हतनूर, वाघूर, तोंडापूर, अग्नावती, अभोरा, हिवरा, मंगरूळ, बोरी, बहुळा, अंजनी, सुकी, मोर अशा सर्वच धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.

धुळे शहर वगळता जिल्ह्य़ात टंचाईची स्थिती तीव्र आहे. शहरात दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी तापी योजनेशिवाय नकाण आणि डेडरगाव या दोन तलावांतील जलसाठय़ाचा उपयोग होत आहे. पैकी नकाणे तलावात २० तर डेडरगाव तलावात २५ टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्य़ातील साक्री येथे तब्बल १५ दिवसांनंतर, शिंदखेडय़ात आठ दिवसांनंतर, तर दोंडाईचात दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्य़ात िशदखेडा तालुक्यात वारुळ आणि धुळे तालुक्यांत कुंडाणे-वेल्हाणे, अजंग येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. विविध भागांतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ६३ पेक्षा अधिक विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यात िशदखेडा तालुक्यात सर्वाधिक ४१ विहिरींचा समावेश आहे. डॉ. सुरेश खानापुरे यांच्यामुळे गवगवा झालेल्या सिंचनाच्या शिरपूर पद्धतीमुळे शिरपूर तालुक्यात केवळ दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असल्याने जनावरांचे हाल तर विचारायलाच नको. टंचाईने ठिकठिकाणी ‘टँकर माफिया’ तयार केले आहेत. धुळ्यात तर ४०० ते ५०० रुपयांना टँकर विकले जात आहेत. या सर्व समस्यांमधून सोडविण्यासाठी वरुणराजाने वेळेवर बरसावे अशीच प्रार्थना ग्रामस्थ करत आहेत.
अविनाश पाटील – response.lokprabha@expressindia.com