क्रिकेट हाच धर्म असलेल्या आपल्या देशात सध्या लगबग सुरू आहे ती ज्युनिअर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची. हा विश्वचषक आपणजिंकू की नाही ही गोष्ट अलाहिदा, पण या स्पर्धेमुळे जगभर कमालीच्या लोकप्रिय असलेल्या फुटबॉलला भारतात नवी संजीवनी मिळणार हे नक्की.

सध्या कोची, गोवा, नवी मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटी भारतातील या शहरांमध्ये वेगळीच लगबग सुरू आहे. ढोलताशे, रोषणाई, मंडप असे या लगबगीत काहीच सापडत नाही. पण, ती नक्कीच कुठल्यातरी मोठय़ा सणाच्या आगमनाची चाहूल घेऊन आली आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या रस्त्यांवर केलेली रंगरंगोटी आणि त्यावर दिग्गज फुटबॉलपटूंची छायाचित्रे, स्टेडियमबाहेर फुटबॉलपटूंच्या प्रतिकृती, स्टेडियम्समध्ये भारतीय आणि जगाच्या फुटबॉलचा इतिहास सांगणारे भित्तिचित्र, आदी फुटबॉलमय वातावरण आहे. हे केवळ या शहरांपुरतेच मर्यादित नाही, तर राज्यांतही अशीच धावपळ सुरू आहे. अगदी देशाचे कामकाज चालवणाऱ्या लोकसभा व राज्यसभेपासून ते राज्यातील विधानसभा व विधान परिषदेतही हे वारे वाहत आहेत. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी केवळ त्यांच्याच नाही तर क्रीडा क्षेत्रात बदल करू पाहणाऱ्या सर्वाच्या मनाचा आवाज बोलून दाखवला. ‘मिशन इलेव्हन मिलियन’ असो किंवा राज्याराज्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये सध्या एकच खेळ दिसत आहे आणि तो म्हणजे फुटबॉल. हे नक्की काय चाललंय, कशासाठी चाललंय, कोण करतंय असे अनेक प्रश्न पडलेल्यांनाही हा बदल चक्रावून टाकणारा आहे. १०० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात अचानक फुटबॉल क्रांती घडत आहे, ती केवळ फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या निमित्ताने.

जवळपास ५७ वर्षांपूर्वी जागतिक फुटबॉल नकाशावरून भारत गायब झाला आणि आज त्याच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) एक महत्त्वाची स्पर्धा भारतात होत आहे. या ऐतिहासिक घटनेला ‘न भूतो न भविष्यति’ करण्यासाठी भारतीयही सज्ज झाले आहेत. विविधतेने नटलेल्या या देशात केवळ क्रिकेटच नव्हे, तर इतर खेळांनाही समान वागणूक मिळते आणि त्यांचेही तितक्याच आपुलकीने आदरातिथ्य केले जाते, हे दाखवण्याची हीच संधी आहे. या स्पध्रेच्या माध्यमातून जागतिक फुटबॉल नकाशावर आपले स्थान निर्माण करण्याची संधी, यापलीकडे हा विश्वचषक भारतातील क्रीडाक्षेत्राची भविष्याची दिशा ठरवणारा आहे. या स्पध्रेच्या निमित्ताने एक  वेगळीच सकारात्मक ऊर्जा सध्या पाहायला मिळत आहे. टाइमपास म्हणून या खेळाकडे पाहणाऱ्या युवावर्गाला कारकीर्द घडवण्याचा नवा पर्याय मिळाला आहे.

भारताच्या वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाच्या मागील दोन वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीचा या बदलात महत्त्वाचा वाटा आहे. त्याला जोड मिळाली ती आय-लीग आणि इंडियन सुपर लीगसारख्या क्लब स्पर्धानी.. रात्ररात्र जागून टीव्हीवर फुटबॉलच्या सामन्यांचा आस्वाद लुटणाऱ्या युवा पिढीला आता घरच्या मैदानांवर विश्वचषक स्पर्धा हक्काने पाहण्याची संधी मिळाली आहे.

सहा ऑक्टोबर २०१७.. पुढील पन्नासेक वर्षे भारतीय फुटबॉलप्रेमी या तारखेचा उल्लेख ऐतिहासिक दिवस असाच करत राहतील. २०१७च्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात शुक्रवारी राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आणि नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर एकाच वेळी इतिहासाची नोंद होणार आहे. ६ ऑक्टोबरला भारतीयांच्या अफाट प्रेमासाठी आसुसलेल्या फुटबॉल या खेळाच्या विश्वचषक स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्याआधी देखील बरीच तयारी केली गेली आहे. ठिकठिकाणची स्टेडियम्स विश्वचषकासाठी कशी सज्ज झाली आहेत, याविषयी या अंकात स्वतंत्र लेख आहेच त्याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत.

फुटबॉल युवा विश्वचषकासाठी वातावरणनिर्मिती व्हायला लागली तसं ‘कर के दिखला दे गोल’ ऐकायला यायला लागलं. अशा मोठय़ा स्पर्धाच्या निमित्ताने केलं जाणारं खास गीत हा स्थानिक भाषेला अभिवादन करणारा एक महत्त्वाचा भाग असतो. फिफा युवा विश्वचषक स्पर्धाही त्याला अपवाद नाही. या स्पध्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कर के दिखला दे गोल’ या गाण्याने क्रीडा रसिकांना आकर्षित केले आहे. भारतातल्या विविध संस्कृतींचे दर्शन या गाण्यातून प्रेक्षकांना घडवण्यात आले आहे. त्यात खास मराठमोळा ढोल पथक महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या या गाण्याला प्रीतमने संगीत दिले आहे. सुनिधी चौहान, नीती मोहन, बाबुल सुप्रियो, शान, पॅपोन आणि मिका या गायकांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले असून अभिषेक बच्चनने त्यासाठी विशेष रॅिपग केले आहे.

भारतात फुटबॉल खेळला जात नाही, असे नाही. इथे  युवावर्गात फुटबॉलची प्रचंड क्रेझ आहे, परंतु त्यात कारकीर्द घडावी अशी यंत्रणाच इतकी वष्रे उभारता न आल्याने हा खेळ केवळ फॅन फॉलोअर्सपुरता मर्यादित राहिला आहे. शाळा महाविद्यालय आणि त्यापुढे एखादा क्लब इतकीच याची उंची राहिली. युवा विश्वचषक स्पध्रेमुळे या खेळाच्या विकासाबाबतच्या चर्चा रंगू लागल्या, फुटबॉलसाठीच्या मूलभूत सुविधांची उभारणी झाली. गोवा, कोलकाता आणि गुवाहाटी यांना फार जुना फुटबॉल इतिहास आहे आणि येथील युवकांनी ती परंपरा कायम राखली आहे. मुंबई व नवी दिल्ली या मेट्रोपोलिटन शहरांमध्ये विविध खेळ खेळले जातात. पण येथे फुटबॉलचा हवा तसा जम बसलेला नाही. अर्थात त्यांनाही थोडाफार का होईना फुटबॉलचा इतिहास आहे. पण कोलकाता, गोवा, गुवाहाटी, कोची येथील फुटबॉलची क्रेझ मात्र पाहण्यासारखी आहे. लहान लहान रस्त्यांपासून ते गल्लींमध्ये फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी तिथे तोबा गर्दी झालेली अनेकदा पाहायला मिळाली.  या विश्वचषक स्पध्रेनंतर भारतातील क्रीडा संस्कृतीत आणखी सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे.

अर्थात हे सगळे सोपे नाही. अनेक अडीअडचणी, खाचखळगे आहेत. आपण त्यावर मात करायला धडपडतो आहोत. पुरुष व महिला यांच्या कनिष्ठ आणि अन्य वयोगटाच्या एकूण ७७ विश्वचषक स्पर्धा आत्तापर्यंत पार पडल्या. ८७ वर्षांत भारताने यापैकी एकाही स्पध्रेत सहभाग घेतला नाही किंवा त्याचे आयोजनही केले नाही. हे सर्व काही येत्या ६ ऑक्टोबरला बदलणार आहे. या विश्वचषक स्पध्रेचे यजमान म्हणून भारत पहिल्यांदाच फिफाच्या स्पध्रेत खेळणार आहे. २०१३साली फिफाच्या कार्यकारिणी समितीने २०१७च्या विश्वचषक स्पध्रेसाठी भारताची निवड केली. त्याच वेळी भारतासमोर दोन नवीन आव्हानं उभी राहिली. पहिले म्हणजे फिफाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या स्पध्रेचे आयोजन करणे आणि दुसरे यजमान म्हणून या स्पध्रेत खेळण्याच्या मिळालेल्या संधीला साजेशी कामगिरी करण्यासाठी संघ तयार करणे. त्यामुळे आत्तापर्यंत दुर्लक्षित युवा फुटबॉलपटू अचानक केंद्रस्थानी आले. त्यांच्यासाठीची राष्ट्रीय लीग अस्तित्वात आली ती २०१५ मध्ये. त्यांच्या तयारीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवल्या जाऊ लागल्या. यजमान नसतो तर निदान पुढील पन्नास-शंभर वष्रे तरी भारताला पात्रता फेरीतून प्रवेश मिळवता आला नसता, अशी आपली यंत्रणा आहे. या स्पध्रेनिमित्ताने गंजलेल्या यंत्रणेची साफसफाई झाली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून देशातील अव्वल खेळाडूंची निवड करणे, त्यांच्यासाठी परदेशी प्रशिक्षकाची निवड करणे आणि मूलभूत सुविधा पुरवणे, हे सर्व झपाटय़ाने केले. इतकेच नाही तर देशातून निवडलेल्या खेळाडूंना अधिकाधिक सराव मिळावा म्हणून परदेश दौऱ्याचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, लक्सेम्बर्ग, फ्रान्स, नॉव्रे, इटली, हंगेरी, ब्राझील, पोर्तुगाल, रशिया आणि मेक्सिको या दौऱ्यांचा समावेश आहे. हे सगळं तुलनेत खूप उशिरा सुरू झालं. पण देरसेही सही दुरुस्त आए असं म्हणायला हरकत नाही.

वाद, गोंधळ अन् भारत…

अर्थात असं असलं तरी सगळं सहजसोपं झालं नाही. कोणत्याही गोष्टीला वादाची फोडणी द्यायची आपली परंपरा या स्पर्धाच्या आयोजनादरम्यानही सुरू राहिली. यापूर्वीही नवी दिल्ली येथे २०१० साली झालेली राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील क्रीडाचाहते कसे विसरू शकतात? या स्पध्रेसाठी खर्च करण्यात आलेल्या रकमेतील घोटाळ्यापासून ते पदक वितरण सोहळ्यापर्यंत सगळ्या घटनांमधून एक चित्र स्पष्ट झाले आणि ते म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजन करण्यात आपण बरेच पिछाडीवर आहोत. भ्रष्टाचार, कामातील दिरंगाई आणि सुविधांबाबत केलेली तडजोड हे सर्व विसरण्यासारखे नक्कीच नाही. त्यामुळेच २०१७ च्या फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेसाठी भारताची निवड करण्यात आली त्यावेळी आपल्याला हे खरंच जमेल ना, असं अनेकांना वाटून गेलं. पण राष्ट्रकुल स्पध्रेपेक्षा फिफा युवा विश्वचषक स्पध्रेसाठी चांगलीच तयारी करण्यात आली आहे. तरीही लोकशाही प्रथेनुसार वेगवेगळे वाद होणं अपरिहार्यच होतं. त्यातली पहिली घटना म्हणजे २५ जानेवारी २०१७ रोजी भारताचे प्रशिक्षक निकोलाई अ‍ॅडम यांची झालेली हकालपट्टी. त्यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला एएफसी १६ वर्षांखालील स्पध्रेत लवकर गाशा गुंडाळावा लागला आणि सॅफ अजिंक्यपद स्पध्रेत उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. मात्र, विश्वचषक स्पध्रेला काही महिन्यांचा कालावधी असताना अ‍ॅडम यांची हकालपट्टी करण्यात आली. भारतीय संघात २१ खेळाडूंनी अ‍ॅडम यांच्या वर्तनाबद्दल महासंघाकडे लेखी तक्रार केली. जर्मन प्रशिक्षक मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप खेळाडूंकडून करण्यात आला. त्यामुळे भारतीय महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाला हा निर्णय घ्यावा लागला.

त्यानंतरची महत्त्वाची घडामोड म्हणजे कोची येथील स्टेडियमच्या तयारीवर फिफाची नाराजी. सहा यजमान शहरातील कामाचा आढावा घेण्यासाठी फिफाचे २१ सदस्य आणि स्थानिक आयोजन समितीने मार्च महिन्यात पाहणी दौरा केला. फिफाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार येथील स्टेडियम्सचे काम झाले आहे की नाही, याचा आढावा या दौऱ्यात घेण्यात आला. यावेळी कोचीच्या कामाबाबत आयोजन समितीचे प्रमुख झेव्हीयर सेप्पी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोचीकडून यजमानपद काढून घेण्यात येईल अशा चर्चाही रंगू लागल्या. मात्र, मे महिन्यापर्यंत कोचीतील आयोजकांनी जवळपास सर्व काम पूर्ण केले. दरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ६० हजार क्षमता असलेल्या या स्टेडियमची प्रेक्षकमर्यादा ४१ हजार ७४८ इतकी ठेवण्यात आली.

हे कमी होतं म्हणून की काय १५ मे २०१७ रोजी आपल्या क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंच्या नावाचा चुकीचा उच्चार करून आपले फुटबॉलचे अज्ञान जगाला दाखूवन दिले. बार्सिलोना क्लबचा माजी कर्णधार, स्पेनच्या विश्वविजेत्या आणि युरोपियन चषक विजेत्या संघाचा सदस्य कार्लोस प्युयोल याला विश्वचषक स्पध्रेच्या तिकीट अनावरण सोहळ्यासाठी पाचारण करण्यात आले. तत्कालीन क्रीडामंत्री विजय गोयल यांना भाषणात प्युयोलच्या नावाचा उच्चार करताच आला नाही. काहीतरी पुटपुटून त्यांनी भाषण आवरले. इतकेच नव्हे गोयल यांना अँद्रेस इनिऐस्टा याचेही नाव उच्चारता आले नाही. गोयल यांनी आपल्या भाषणात प्युयोलने २००६ आणि २०१०मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकल्याचा उल्लेख केला. परंतु प्युयोलने २००६, २००९ आणि २०११ मध्ये हा चषक उंचावला आहे.

यावर कडी झाली ती भारताकडून इटलीला नमवण्याचा दावा करण्यात आला तेव्हा. विश्वचषक स्पध्रेच्या तयारीसाठी परदेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने इटलीच्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय संघाला २-० असे नमवल्याचा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून करण्यात आला. मात्र, भारताने पराभूत केलेला इटलीचा तो संघ ‘क’ श्रेणीतील होता आणि त्यात लेगा प्रो आणि लेगा प्रो २ या तिसऱ्या आणि चौथ्या विभागातील स्पर्धामधील खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे महासंघाकडून दिशाभूल करण्यात आल्याचे अखेरीस स्पष्ट झाले.

भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या फिफाच्या स्पध्रेचा डंका जगभरात व्हावा यासाठी भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्याचा मानस भारतीय महासंघाने व्यक्त केला होता. तसा प्रस्ताव त्यांनी पाठवला होता आणि स्पध्रेच्या आदल्या दिवशी किंवा पहिल्या लढतीच्या एक तासापूर्वी हा उद्घाटन सोहळा उरकण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र, फिफाच्या नियमानुसार असा सोहळा भूतकाळात कधीच करण्यात आला नव्हता आणि यापुढेही तसेच सुरू राहील, असे फिफाने स्पष्ट केले आणि महासंघाची नाचक्की झाली.

अर्थात हे सगळं घडून गेलं आहे. आता क्रीडा रसिकांना प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष सामने सुरू होण्याची. या स्पध्रेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघातीत प्रत्येक खेळाडू आयुष्यातील पहिल्या वहिल्या विश्वचषक सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हा संघ निवडण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेतून भारताला नमित देशपांडे आणि सन्नी धलीवाल हे दोन चांगले परदेशात स्थायिक झालेले खेळाडू सापडले. नमित आणि सन्नी अनुक्रमे अमेरिका आणि कॅनडाचे रहिवासी आहेत. नमितकडे भारताचे पारपत्र आहे आणि सन्नीने त्याचे कॅनडाचे पारपत्र जमा करून भारताचे पारपत्र बनवले आहे. या संघातील अशा प्रत्येक खेळाडूची एक वेगळी कथा आहे. मणिपूरचा बोरीस सिंग थांगजॅम, मोहम्मद रकिप व पश्चिम बंगालचा जितेंद्र सिंग यांनी लहानपणापासून फुटबॉलवर केलेल्या प्रेमाचे फलित त्यांना आता मिळते आहे. जितेंद्रचे वडील वॉचमन आहेत आणि आई शिवणकाम करून घरचा गाडा हाकण्यात मदत करते. रकिप आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतो आहे. कर्नाटकचा संजीव स्टॅलीनही वडिलांकडून प्रेरणा घेत फुटबॉलकडे वळला आणि त्याची परतफेड करण्यासाठी तोही आतुर झाला आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची कथा प्रेरणादायी आहे. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार, वेन रूनी आदी अव्वल फुटबॉलपटूंना फॉलो करणाऱ्या या युवा पिढीला भविष्यात स्वत:चा फॅन फॉलोअर असणार आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमुळे हे सर्व शक्य होणार आहे.

क्रिकेटवेडय़ा भारतात फुटबॉलप्रेमीही आहेत, पण क्रिकेटपुढे कुणाचाच आवाज ऐकू येत नाही, अशा वातावरणात युवा विश्वचषकाचा हा जो घाट घातला गेला आहे, त्याचा परिणाम इथल्या क्रीडा संस्कृतीवर होणं अपेक्षित आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये फुटबॉलचं वेड बऱ्यापैकी रुजतं आहे. अशा मोठय़ा स्पर्धामुळे त्याला खतपाणी मिळू शकतं. १९८२ च्या एशियाडनं देशभरातलं वातावरण कसं भारून टाकलं होतं, याचे अनेक साक्षीदार आहेत. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांकडे भारतीय वळायला तिथून सुरूवात झाली. या विश्वचषकानंतर क्रिकेटमध्ये प्रतिस्पध्र्याची विकेट घेऊ इच्छिणारे फुटबॉलमध्ये प्रतिस्पध्र्यावर गोल करायला लागतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

  • भारतात होणाऱ्या फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे पहिले तिकीट दिग्गज फुटबॉलपटू कार्लोस प्युयोलच्या हस्ते शिबदास भदुरी यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. भदुरी यांच्या नेतृत्वाखाली १९११ मध्ये मोहन बगान क्लबने आयएफए शिल्ड स्पर्धा जिंकली होती.
  • ऑस्ट्रेलियाने १९८५ ते २००६ या कालावधीत ओशिनिया फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व केले, परंतु २००७ नंतर ते आशिया फुटबॉल महासंघाकडून विश्वचषक स्पध्रेत सहभाग घेत आहेत.
  • विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभण्याचा मान मेक्सिको आणि उरुग्वे यांच्या लढतीला मिळाला. २०११च्या अंतिम फेरीत मेक्सिको शहराच्या अझटेका स्टेडियमवर ९८९४३ प्रेक्षक उपस्थित होते.
  • संयुक्त अरब अमिराती येथे २०१३ मध्ये झालेल्या स्पध्रेत सर्वाधिक १७२ गोल्सची नोंद झाली.
  • १९८७, १९८९, १९९९ आणि २००७ च्या विश्वचषक स्पध्रेतील जेतेपदाची लढत पेनल्टी शुटआऊटमध्ये खेळवण्यात आली आणि दुसऱ्याच उपखंडातील संघाला जेतेपद मिळवता आले आहे.
  • कॉफीच्या उत्पादकांमुळे कोलंबियाच्या संघाला ‘लॉस कॅफेटेरस’ किंवा ‘कॉफी ग्रोवर्स’ या टोपण नावाने ओळखले जाते.
  • फिफा युवा फुटबॉल स्पध्रेत प्रतिनिधित्व केलेल्या १२ खेळाडूंनी फिफाच्या वरिष्ठ विश्वचषक स्पध्रेत आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • १९८५ ते २००५ या कालावधीत फिफा विश्वचषक स्पध्रेत १६ संघांचा समावेश होता आणि त्यांची प्रत्येकी चार अशा चार गटांत विभागणी करण्यात आली होती. मात्र २००७ नंतर ही संघसंख्या २४ पर्यंत वाढवण्यात आली.

खेळाडूंविषयी मजेदार माहिती

  • फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिला गोल करण्याचा मान ब्राझीलच्या बिस्मार्कने मिळवला.
  • ब्राझीलचा रोनाल्डिन्हो हा फिफा युवा (१९९७) आणि वरिष्ठ विश्वचषक (२००२) जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.
  • गोल्डन बुट आणि गोल्डन बॉल हे दोन्ही पुरस्कार जिंकणारा फ्लोरेन्ट सिनामा पोंगोल्ले हा एकमेव खेळाडू आहे. फ्रान्सच्या या खेळाडूला २००१ मध्ये या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
  • १४ वर्षीय फ्रेडी अ‍ॅडू याने २०१३ च्या विश्वचषक स्पध्रेत हॅट्ट्रिक नोंदवली आणि त्यानंतर २० वर्षांखालील विश्वचषक स्पध्रेतही २००७ मध्ये सलग तीन गोल केले. दोन्ही वयोगटांतील विश्वचषक स्पध्रेत हॅट्ट्रिक नोंदवणारा तो पहिलाच खेळाडू आहे.
  • नायजेरियाच्या चार खेळाडूंनी गोल्डन बॉलचा पुरस्कार जिंकला आहे. एकाच संघातील खेळाडूंनी जिंकलेले सर्वाधिक पुरस्कार आहेत. या पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये केलेची व्ॉकाली (२०१५), केलेची आयहीनाचो (२०१३), सॅनी इमॅन्युएल (२००९) आणि फिलिप ओसूंडो (१९८७) यांचा समावेश आहे.
  • सुलेमान कॉलीबॅली (आयव्हरी कोस्टा), फ्लोरेंट पोंगोले (फ्रान्स) आणि मार्सेल विटेस्जेक (जर्मनी) या तीन खेळाडूंनी युवा विश्वचषक स्पध्रेत प्रत्येकी दोन हॅट्ट्रिक नोंदवण्याचा पराक्रम केला आहे.

संघांची आकडेवारी

  • फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेची पाच जेतेपद पटकावणाऱ्या नायजेरियाच्या नावे चार (१९९३, २००१, २००९, २०१३) ‘फिफा फेअर प्ले’ पुरस्कारही आहेत.
  • प्रतिस्पर्धी संघाकडून सर्वाधिक काळ एकही गोल न खाण्याचा विक्रम नायजेरियाच्या नावावर आहे. त्यांनी १९८७ ते १९९३ अशा विश्वचषक स्पर्धामध्ये ८३० मिनिटे प्रतिस्पर्धी संघाला गोल करू दिलेला नाही.
  • ब्राझील आणि नायजेरिया या दोनच संघांना आपापले जेतेपद कायम राखण्यात यश आले आहे. ब्राझीलने १९९७ आणि १९९९ साली, तर नायजेरियाने २०१३ आणि २०१३ साली सलग दोन जेतेपद पटकावली होती.
  • यंदाच्या स्पध्रेत भारतासह, नायजेर आणि न्यू कॅलेडोनिया हे तीन संघ पदार्पण करत आहेत.

संभाव्य भारतीय संघ

गोलरक्षक : धीरज सिंग मोईरांगथेम, मोहम्मद नवाज (मणिपूर), प्रभसुखन सिंग गिल (पंजाब), तमाल नस्कार (पश्चिम बंगाल); बचावपटू : बोरीस सिंग थांगजॅम, मोहम्मद रकिप (मणिपूर), अनवर अली (पंजाब), संजीव स्टॅलीन, हेंड्री अँटोनी (कर्नाटक), जितेंद्र सिंग (पश्चिम बंगाल), नरेंदर गेहलोत (दिल्ली), नमित देशपांडे (महाराष्ट्र); मध्यरक्षक : सुरेश सिंग वांगजॅम (कर्णधार), खुमांथेम निंथोईंगंबा मिताई, अमरजीत सिंग कियाम, जॅक्सन सिंग (सर्व मणिपूर), कोमल थाटम (सिक्कीम), अनिकेत जाधव, सौरभ मेहेर (महाराष्ट्र), अभिजित सरकार (पश्चिम बंगाल); आघाडीपटू : अमन छेत्री (आसाम), राहुल प्रवीण (केरळ), नोंगडांबा नाओरेम (मणिपूर), नेहल पिल्लई (महाराष्ट्र), सौरभ सारंगी (दिल्ली).

सोनी सिक्सला प्रक्षेपणाचे हक्क

फिफाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या भारतातील प्रक्षेपणाचे हक्क पाच वर्षांसाठी सोनी सिक्स वाहिनीने खरेदी केले. यामध्ये २०१४ आणि २०१८ च्या विश्वचषक स्पर्धाचाही समावेश आहे. २०१६ ची युरो स्पर्धा, युरो पात्रता स्पर्धा आणि विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या प्रक्षेपणाच्या हक्कांचाही समावेश आहे.

(छायाचित्र सौजन्य : फिफा डॉट कॉम)

स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com