आपण आपले सगळे प्रयत्न तर करायचेच. त्यात कोणतीही कसर ठेवायची नाही. पण पाचवा भाग म्हणून जो आपल्याकडे दैव मानलेला आहे त्याची साथ मिळावी यासाठी मुहूर्त ही संकल्पना आली.

आपली भारतीय संस्कृती ही शुभाशुभ मानणारी आहे. भारतीय संस्कृतीने दैववाद नाकारलेला नाही. तो कोणत्याही कार्यातला पाचवा भाग म्हणून मान्य केलेला आहे. पण प्रयत्नवादाला कुठेही कमी लेखलेले नाही. सगळे प्रयत्न तर करायचेच, पण त्यात देवाची वा दैवाची साथ लाभावी यासाठी मुहूर्त ही संकल्पना आली.
जरा कुठे अपयश आले की आपण सहजच म्हणून जातो- ‘कोणत्या मुहूर्तावर काम सुरू केले होते कोण जाणे?’ पण यश मिळाले तर मात्र ते स्वकर्तृत्वाने! असो हा मानवी स्वभाव आहे म्हणा! म्हणजे नकळत का होईना पण आपण मुहूर्त ही संकल्पना मान्य करतोच की!
आमच्या एका मित्राकडे काही कामानिमित्त गेलो होतो. बाहेर चप्पल काढण्यापूर्वीच घरातील संवाद ऐकण्यास आला. ‘‘काय हो? कामाला जाताना शास्त्रीबुवांना मुहूर्त विचारला नसणार म्हणूनच अपयश घेऊन आलात.’’
एवढय़ात आम्ही घरात शिरलो. आम्हाला पाहून तसा प्रश्न झालाच. मग मी सांगितले, ‘‘मुहूर्त महत्त्वाच्या कामासाठी पाहावा. ऊठसूट मुहूर्त पाहण्याची गरज नसते आणि तेही महत्त्वाच्या कामाच्या आरंभासाठी पाहायचे असतात. दैनंदिन कामासाठी तर आम्हीही पाहात नाही.’’
भारतीय संस्कृतीत अनेक शास्त्रे विकसित झालेली पाहावयास मिळतात. बहुतांश शास्त्रांचा उगम वेदांमध्ये आढळतो. मुहूर्तशास्त्र हासुद्धा वेदकालापासून आपणाकडे आहे. वेदाच्या षडांगापैकी ज्योतिषशास्त्राचे अत्युच्य स्थान आहे. वेदांमध्ये सूर्य, चंद्र, नक्षत्र यांना देवत्वरूप दिलेले आढळते व त्यांच्या स्तुतिपर ऋचा उपलब्ध आहेत. यात रूप, रंग, गुण आणि प्रभाव याचा फार मोठा विचार केलेला आढळतो. ज्योतिष शास्त्रात सर्वप्रथम गणित व फलित यांचा विचार केला गेला. नंतर त्रिस्कंदांच्या माध्यमातून विशेष माहिती पुढे आली.
आजचा मुहूर्तशास्त्र हा विषय संहिता ज्योतिषामध्ये अंतर्भूत होतो. संहिता ज्योतिषात भूशोधन, दिक्शोधन, शल्योद्धार, गृहारंभ, गृहप्रवेश, मुहूर्त गणना, उल्कापात, ग्रहांचे लोप-दर्शन, ग्रहणे वगैरे गोष्टींचा समावेश आहे. खरे पाहता वेदातील ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती यज्ञाला योग्य काल सांगण्यासाठी झालेली आहे.
सूर्य, चंद्रामुळे मानव, वनस्पती यांची वाढ होत असते. कालनिर्णय करण्यासाठी सूर्य, चंद्राचा जास्त उपयोग होत असतो. चंद्राचा आणि मनाचा फार जवळचा संबंध असतो. तिथी नक्षत्रामध्ये देवतातत्त्व, अलौकिकत्व असते. चंद्र हे सोमदेवतेचे प्रतीक आहे. देवतातत्त्वानुसार, देवता स्वभावानुसार मनुष्याला स्वभाव दिसत असतो.
परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करताना प्रथम आकाश निर्माण केले. आकाशाचा शब्दगुण आहे. म्हणजेच ध्वनी आहे. आकाशध्वनी, वायू-स्पर्श, तेज-रूप, आप-रस आणि पृथ्वी-गंध अशी निर्मिती झाली आहे. आकाशतत्त्व सूक्ष्मविरल होत होत पुढील चार तत्त्वे निर्माण झालेली आहेत. पृथ्वी पंचगुणांनी युक्त आहे. या संपूर्ण विश्वात ध्वनी भरून राहिलेला आहे.
नादेन व्यज्यते वर्ण:
पदं वर्णात् पदात् वच:।
वचसो व्यवहारोयं
नादाधीनं मतोजगत्॥
विश्वाचे आदि घटकद्रव्य शब्द किंवा नाद आहे. थोडक्यात संपूर्ण विश्व हे नादमय आहे. जगातील प्रत्येक वस्तूला नाद आहे. आपले शरीरसुद्धा नादमय आहे. नक्षत्रांमध्ये सोम आहे. त्यांचासुद्धा एक नाद आहे. याचाच उपयोग करून मुहूर्तशास्त्र निर्माण झालेले आहे.
ध्वनीमध्ये दोन प्रकारचे ध्वनी मुख्य आहेत. आहत ध्वनी व अनाहत ध्वनी. आहत ध्वनी हा एखाद्या आघाताने निर्माण करता येतो. अनाहत ध्वनी हा कोणत्याही आघाताशिवाय निर्माण होतो. आपण वर पाहिले त्यातील संपूर्ण विश्वात असणारा ध्वनी हा अनाहत ध्वनी होय. मुहूर्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, नक्षत्र ही प्रधान आहेत. विशिष्ट कार्यासाठी कोणती नक्षत्रे घ्यावीत हे मुहूर्तशास्त्रात सांगितले आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात नक्षत्र या विषयावर विस्तृत माहिती मिळते.
मुहूर्त म्हणजे काय तर सर्व विश्वात ध्वनी भरून राहिलेला आहे. वर पाहिल्याप्रमाणे तो अनाहत आहे.
भूगोल, भगोल व खगोल या तिघांच्या नादाच्या सुसंवादित्वाचा काळ म्हणजे मुहूर्त होय. त्या नक्षत्रांप्रमाणे त्याचा सुसंवादित्त्वाचा हा काळ आपल्याला कोणत्या कार्यासाठी आपल्या जन्मनक्षत्राप्रमाणे आहे किंवा कसे ते पाहिले जाते. काही काळ किती असतो तर जास्तीत जास्त १४-१५ मिनिटे. हा काळ प्रत्येक लग्नाच्या व्याप्तीवर अवलंबून असतो. एक नवांश शुभ असतो असे ढोबळ मानाने म्हणता येईल. सर्वच नवांश म्हणजे सर्व ३ अंश २० कला शुभ असतात असे होत नाही.
पंचांगातील मुहूर्त वेळा या शुभ नवांशाच्या मध्य वेळा असतात. याचा अर्थ आधी आणि नंतर ७-८ मिनिटे किंवा कमीत कमी ५-५ मिनिटे असा होईलच असे नाही. हा काळ प्रत्येक लग्नाच्या व्याप्तीवर अवलंबून असतो. मेष लग्नातील ५० कलांचा काळ हा कमी राहाणार यात शंका नाही हे आपणास माहीत असणे जरूर आहे. तो त्यातील जाणकाराकडून समजून घेणेच योग्य असते.
हा काळ प्रधान कर्माचा असतो. उपनयनात गायत्री मंत्र प्रधान आहे म्हणून त्यावेळी गायत्रीचा उपदेश करणे जरूर आहे असे प्रत्येक मुहूर्ताला आहे हे लक्षात घ्यावे.
आपण अन्य कोणतेही कार्य करताना अनेक गोष्टी पाहात असतो. काही व्यावहारिक असतात. काही संभाव्य असतात. काही आर्थिक असतात तर काही सामाजिक असतात. त्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या असतील किंवा पटत असतील असे नाही. तरीही त्यावर आपण विचार करत असतो. त्यात आपण प्राधान्यक्रमही लावतो. अतिमहत्त्वाच्या गोष्टी स्वीकारतो व पुढे जातो.
या सगळ्या गोष्टी नाही म्हटले तरी व्यावहारिक वा भौतिक पातळीवरच्या असतात. या सगळ्या गोष्टी शंभर टक्के पूर्ण होत असतील तरी यश नक्कीच मिळेल असे सांगता येत नसते. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण हे जाणून आहे की ऐनवेळी मानवी कल्पना वा मर्यादांच्या पलीकडचे असे काहीही होऊ शकते. अशी संकटे येऊ नयेत, आलीच तर त्यावर योग्य असे उपाय लगेच मिळावेत आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी ही योजना आहे.
मात्र याचा अर्थ फक्त मुहूर्त चांगला पाहिला म्हणजे सगळे झाले असेही नक्की अभिप्रेत नाही. आपले सगळे प्रयत्न तर करायचेच. त्यात कोठेही कसूर ठेवायची नाही. सगळे नियोजन नीट करणे, पर्यायी व्यवस्था ठेवणे, आवश्यक ती साधनसामग्री जमवणे अशी व्यवस्थित तयारी करणे हे आवश्यकच आहे. फक्त पाचवा भाग म्हणून जो आपल्याकडे दैव मानलेला आहे त्याच्यासाठी जशा अनेक संकल्पना तशीच मुहूर्त संकल्पना होय.
त्यामुळे केवळ मुहूर्त चांगला घेतलेला आहे म्हणूनही पूर्ण कार्यसिद्धी नाही, तसेच केवळ स्वबळावर किंवा स्वकर्तृत्वावरही पूर्ण कार्यसिद्धी होईलच असेही खात्रीशीर सांगता येत नाही. दोघांचा योग्य मिलाफ साधणे हेच खरे!

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?