गेला काही काळ आयसिसच्या कारवाया सुरू असल्या तरी पॅरिसवरच्या दुसऱ्या हल्ल्यानंतर आता सगळ्या जगाचं लक्ष आयसिसकडे नव्याने वेधलं गेलं आहे. आयसिसचं आव्हान आणि तिचा मुकाबला कसा करायला हवा याचा गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.

ऑगस्ट २०१४

सीरिया आणि इराकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या चारजणांपैकी अरिफ फय्याझ मजीद चकमकीत ठार झाल्याचे वृत्त या महिन्याच्या अखेरीस थेट मुंबई-कल्याण परिसरात येऊन थडकले आणि महाराष्ट्र पोलिसांबरोबरच केंद्र सरकारचीही झोप उडाली. अरिफसोबत पळून गेलेल्या शाहीन फारूख टांकी याने दूरध्वनीवरून ही माहिती दिल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. हे चौघेजण घरच्यांना न सांगता २०१४ साली मे महिन्यात पळून गेले. सुरुवातीस बगदाद आणि नंतर आयसिसचा बालेकिल्ला असलेल्या फलुजा या शहरात गेले. घरून निघताना यांच्यापैकी कुणीच घरी काहीही सांगितलेले नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपण बगदादला आल्याचे आणि आता तिथेच नोकरीही मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. काही धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या एका गटासोबत आल्याचे त्यातील एकाने दूरध्वनीवरून घरी कळवले होते.

महत्त्वाचे म्हणजे यातील अरिफ आणि फाहाद शेख हे दोघेही चांगल्या घरातील होते. त्यांचे पालक पेशाने डॉक्टर आहेत. या दोघांनीही घर सोडण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही नंतर जुलै महिन्यात सापडली होती. आपल्याला या पापी लोकांच्या देशात म्हणजेच भारतात राहायचे नाही आणि अल्लाची भूमी आम्हाला साद घालते आहे. तिथे गेल्यानंतर मृत्यू अटळ आहे आणि अल्लाच्या कामासाठी आलेला मृत्यू थेट जन्नतमध्ये म्हणजेच स्वर्गात नेईल, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर अरिफच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना विनंती केली की, या मुलांना फूस लावून पळवून नेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

१६ जानेवारी २०१५

हैदराबाद येथे राहणाऱ्या सलमान मोहिउद्दीन याला दुबईमध्ये जाणाऱ्या विमानात बसत असतानाच पोलिसांनी अटक केली. तुर्कीमार्गे तो सीरियाला जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यालाही आयसिसमध्ये भरती व्हायचे होते. सीरियापर्यंत पोहोचण्याची त्याची पुढची व्यवस्था निकी नावाची महिला करणार होती, अशी माहिती सलमानच्या पोलीस चौकशीत उघड झाली.

सलमान हा कपडे व्यापाऱ्याचा मुलगा २००८ साली हैदराबादेतील एका महाविद्यालयातूनच इंजिनीअर झाला. त्यानंतर टेक्सास विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेत दाखल झाला. तिथे शिकत असतानाच त्याने काही ठिकाणी कामही केले. अमेरिकेत असतानाच फेसबुकच्या माध्यमातून तो आयसिसला पाठिंबा देणाऱ्या काही गटांच्या संपर्कात आला आणि मग त्यांच्या प्रेमातच पडला व अखेरीस सीरियाला जाण्यासाठी तयार झाल्याची धक्कादायक माहिती त्याच्याच जबानीमधून पोलिसांना मिळाली. त्याच्याच जबानीतून निकीचीही माहिती पुढे आली. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सलमानवर बारकाईने लक्ष ठेवून होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरूनच नंतर त्याला भारतात अटक झाली.

२६ फेब्रुवारी २०१५

आयसिस आणि तिच्याशी संबंधित सर्व संस्था, संघटना यांच्यावर बेकायदा कारवाया (प्रतिबंधात्मक) कायद्यन्वये संपूर्ण भारतात बंदी घालण्यात आली. त्यापूर्वीच मध्य पूर्वेतील दहशतवादी गटांवर बंदी घालण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाने घेतल्यानंतर भारतानेही त्याचे अनुकरण २०१४ सालच्या डिसेंबरमध्येच केले होते.

२१ जुलै २०१५

शस्त्रसज्ज युवकांनी भरलेल्या दोन बोटींची छायाचित्रे आयसिसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जारी केली. आणि या दोन्ही बोटींमधील सर्व मंडळी भारतीय असल्याचेही जाहीर केले. त्यातील एकजण अबू तुराब अल हिंदी हा इंडियन मुजाहिदीनचा कमांडर अलीकडेच सीरियातील धर्मयुद्धात शहीद झाल्याची माहितीही या ट्वीटमध्ये देण्यात आली होती. त्यानंतर आयसिसने काही दिवसांतच त्याचे छायाचित्रही जारी केले.

ऑगस्ट २०१५

केरळमधील पलक्कड येथे राहणारा तरुण दोन वर्षांपूर्वीच कतारमध्ये नोकरीच्या निमित्ताने गेला होता. कतारला जाण्यापूर्वी त्याने एका उर्दू वर्तमानपत्रातही काही काळ काम केले होते. त्यानंतर कतारमध्ये असतानाच तो आयसिसशी संबंधित काही गटांच्या संपर्कात आला, इंटरनेटवरील या गटांमुळे त्याचा आयसिसशी परिचय झाला आणि ऑगस्ट २०१५ उजाडेपर्यंत तो सीरियात दाखलही झाल्याची विश्वसनीय माहिती गुप्तचर खात्याला मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर खात्याने केलेल्या कारवाईत असे लक्षात आले की, मल्याळी भाषेतील आयसिसशी संबंधित गट इंटरनेटवर कार्यरत असून ते सारे आखाती देशांमधून चालविले जातात. आता या गटांवर भारत आणि आखाती देश दोघेही लक्ष ठेवून आहेत.

८ ऑगस्ट २०१५

नवी मुंबईमध्ये राहणारा झुबेर अहमद खान नवी दिल्लीमध्ये इराक वकिलातीमध्ये व्हिसाच्या अर्जासाठी गेला होता. दोन मुले, शाळेत शिक्षिका असलेली आपली बायको या सर्वाना सोडून आयसिसमध्ये भरती होण्याच्या उद्देशाने तशी पोस्ट फेसबुकवर टाकूनच तो निघून गेला होता. एका महाविद्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून तो काम पाहायचा. त्याच्याकडे जनसंपर्क अधिकाऱ्याचे काम होते. काही वर्षांपूर्वीच त्याची नोकरी सुटली आणि आता त्याला थेट आयसिस या दहशतवादी संघटनेचेच प्रवक्ता व्हायचे होते. तसा उल्लेख त्याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता. पण इराकी वकिलात आयसिसमध्ये भरती होण्यासाठी व्हिसा देणार नाही, याची त्याला कल्पना नव्हती..

सप्टेंबर २०१५

सरकारने केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत तेलंगणातील १७ व महाराष्ट्रातील ४ युवकांना सीरियामध्ये जाण्यापासून रोखण्यात सरकारला यश आले. तेलंगणातील बहुतांशजण तुर्कीमार्गे सीरियाला जाणार होते. त्यांच्या व्हिसाचे कामही झाले होते. मात्र गुप्तचर खात्याला आलेल्या संशयानंतर झालेल्या कारवाईत त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. हैदराबाद येथील एमबीए केलेल्या २६ वर्षीय युवकाने त्यानंतर नादच सोडून दिला. पण इंजिनीअरिंगचे विद्यार्थी असलेल्या विशीतील चार तरुणांनी मात्र त्यांच्या म्होरक्याशी संपर्क साधला. मग कोलकातामार्गे बांगलादेश आणि तिथून सीरिया असा त्यांचा मार्ग निश्चित करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच कोलकाता येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आता त्यांचे काउन्सेलिंग सुरू आहे.

४ सप्टेंबर २०१५

आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या ११ भारतीयांना संयुक्त अरब अमिराती सरकारने अटक केल्याची बातमी येऊन थडकली. ही सर्व मंडळी अबुधाबी आणि दुबई अशा दोन ठिकाणी वास्तव्यास होती. यूएई सरकार गेले अनेक महिने या दोन्ही गटांच्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून होते. वेळ येताच त्यांना अटक करण्यात आली.

१२ सप्टेंबर २०१५

आयसिससाठी जिहादी भारतीय तरुणांना भरती करण्याचे काम करणाऱ्या निकी जोसेफ या महिलेला हैदराबाद पोलिसांनी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या महिलेसंदर्भातील चौकशीत नंतर लक्षात आले की, ती ब्रिटिश नसून मूळची हैदराबाद येथीलच आहे. या २८ वर्षीय महिलेचे नाव अफशा जबीन असे होते. तिला अबुधाबी विमानतळावरून परत पाठविण्यात आले आणि भारतात उतरताच तिला अटक झाली. यापूर्वी अटक झालेल्या सलमान मोहिउद्दीनने दिलेल्या माहितीवरून तिच्याभोवती जाळे रचून तिला अटक करण्यात आली. यासाठी संयुक्त अरब अमिरातीचीही मदत घेण्यात आली.

१७ सप्टेंबर २०१५

भारतीयांनी आयसिसविरुद्ध लढावे आणि अमेरिकादी देशांना साथ द्यावी, असे भारत सरकारला वाटत नाही. कारण तसे झाल्यास त्याची परिणती देशांतर्गत जातीय तणाव निर्माण होण्यात होईल, अशी भारत सरकारला भीती आहे, या आशयाचे प्रतिज्ञापत्र केंदी्रय गृह मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केले.

समाजातील कोणत्याही एका गटाला सीरियामधील कारवायांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिल्यास त्याचे वाईट पडसाद भारतातच उमटतील. त्यामुळे तिथे कारवायांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांना त्यापासून परावृत्त करण्यावर सरकारचा भर राहील, असे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले होते.

२१ सप्टेंबर २०१५

या दिवशी समोर आलेल्या माहितीने तर गुप्तचर यंत्रणाही चक्रावून गेली होती. भारतीय लष्करात काम करणाऱ्या व धर्माने हिंदू असलेल्या एका लेफ्टनंट कर्नलची मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये गेली होती. पदव्युत्तर पदवी शिक्षणाच्या तिच्या तीन वर्षांच्या कालखंडात ती आयसिसशी संबंधित गटांच्या संपर्कात आली आणि ती भारतात परतली तेव्हा तिचे वागणे पूर्णपणे बदललेले होते. तिच्या देशविघातक कारवायांची भीती लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी स्वत:च राष्ट्रीय तपास यंत्रणेला या संदर्भातील माहिती दिली. आता तिचे मानसशास्त्रीय उपचार सध्या सुरू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजवर हाती आलेली सर्व माहिती आणि घटनांमध्ये मुस्लीम तरुण किंवा तरुणी सहभागी होत्या. पण प्रथमच अशी घटना घडली होती की, एका हिंदू मुलीला आयसिसमध्ये सहभागी व्हायचे होते.

१० ऑक्टोबर २०१५

पालक असलेल्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला सीरियामध्ये नेण्यात आल्याची तक्रार आझमगढमध्ये एका पोलीस ठाण्यात नोंदवली. विशीतील या तरुणाने त्याच्या घरी केलेल्या दूरध्वनीनंतर त्याच्या पालकांच्या सांगण्यावरून या प्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली. बारावी अर्धवट सोडलेल्या या मुलाने काही काळ एक लहानसा व्यवसायही करून पाहिला. त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून तो आयसिसशी संबंधित काही गटांच्या संपर्कात आला आणि नंतर मूलतत्त्ववाद्यांच्या भूलथापांमध्ये अडकला. तुर्कीमार्गे तोही सीरियामध्ये पोहोचला. मात्र तिथे सामान्यांवर सुरू असलेले अनन्वित अत्याचार त्याला पाहवेनात, अखेरीस न राहवून त्याने घरी फोन केला आणि घरी परतायचे आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर आतापर्यंत भारतीय गुप्तचर खात्याने त्याला शोधण्याचे प्रयत्न जारी ठेवले आहेत.

या व अशा अनेक प्रकरणांचा शोध घेत असतानाच महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर व बंगाल आदी राज्यांतूनही मोठय़ा प्रमाणावर अशाच प्रकारे तरुणांची भरती आयसिसमध्ये सुरू असल्याच्या बातम्या येऊन थडकत होत्या. या सर्व बातम्यांनंतर केंद्र सरकारने हे सारे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. कारण आयसिस ही दहशतवादी संघटना आपल्यापासून खूप दूर सीरियात असली तरी आपल्यालाही तेवढाच धोका आहे, हे ठाऊक होते. काश्मिरी तरुण त्यांच्या भूलथापांना बळी पडतील हेही ठाऊक होते. पण थेट आपल्याच इथून इतर राज्यांतून भारतीय तरुणांना नेले जात असल्याचे लक्षात आले आणि मग हे सारे प्रकरण आपल्या घरापर्यंत पोहोचल्याचे लक्षात आले.

१३ नोव्हेंबर रोजी फ्रान्समध्ये पॅरिस येथे मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यासारखाच दुर्दैवी दहशतवादी हल्ला झाला. यात सुमारे दीडशेहून अधिक जणांचे प्राण गेले, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष आयसिसच्या कारवयांकडे गेले.

आयसिसच्या कारवायांना आळा घालायचा असेल तर त्यांची आर्थिक आणि मनुष्यबळाची रसद तोडणे हे अत्यावश्यक आहे. त्यातील आर्थिक रसद तोडणे हे तुलनेने तेवढे सोपे नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. मात्र त्यांच्याकडे जाणारी मनुष्यबळाची रसद तोडणे सर्वच देशांनी आवश्यक आहे, यावर सर्वाचेच एकमत आहे. त्यासाठी आयसिसला जिहादी मिळतात तरी कसे या विषयाच्या मुळाशी जाऊन भिडायला हवे. त्यांची मोडस ऑपरेंडी समजावून घ्यायला हवी.

सध्या एनआयएच्या पातळीवर गुप्तचर यंत्रणा याचे विश्लेषण करण्यात गुंतली आहे. त्यात त्यांना काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात आल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे या तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी आयसिसने मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्यातही खास करून फेसबुक आणि ट्वीटर. त्या खालोखाल वापर झाला आहे तो यूटय़ूब आणि ई-मेल्सचा. यामधून तरुणांना प्रक्षोभक माहिती पुरविण्यात आली. यूटय़ूबवर अतिशय प्रक्षोभक असे व्हिडीओज टाकण्यात आले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये सीरियामध्ये एका कारवाईत आयसिसच्या एका नेत्याने हत्या केलेल्या व्यक्तीचे हृदयच बाहेर काढून त्याचा काही भाग खाऊन टाकल्याचा व्हिडीओ असून त्याला मिळालेल्या लाइक्सने अब्जाच्या संख्येत प्रवेश केला आहे. शिवाय मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारांच्या व्हिडीओजचाही यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक देशात जिहादींसाठी हँडलर्स नेमले असून यात तरुणांचा विश्वास जिंकण्यासाठी महिलांनाही नेमण्यात आले आहे. महिला विश्वास चटकन जिंकू शकतात आणि त्याच वेळेस एक महिला करू शकते तर आपण का नाही, असा प्रश्न तरुण मुलांच्या मनात निर्माण केला जातो. प्रसंगी ती हँडलर महिलादेखील हा प्रश्न विचारून त्यांच्यातील अहंकाराला जागृत करण्याचे काम करते.

जिहादी तरुणांमध्ये इंजिनीअर- डॉक्टर्स यांचाही समावेश मोठय़ा संख्येने आहे. हा तसा कथित बुद्धिजीवी वर्ग म्हणायला हवा. त्यांचा बुद्धिभेद करण्यासाठी त्यांना सीरियातील मदतकार्यात योगदान देण्यात सांगून फसविण्यात आले आहे.

सर्वच्या सर्व तरुणांना कोणत्या ना कोणत्या नैराश्याने ग्रासलेले होते. मग ती समस्या नोकरी, शिक्षण किंवा नातेसंबंध या बाबतीतील होती. किंवा गरिबी हे महत्त्वाचे कारण होते.

या सर्वावर सुरुवातीच्या काळात म्हणजे भारतात असतानाच आमिष म्हणून पैसे, कपडेलत्ते, मोबाइल यांचा वर्षांव करण्यात आला आहे. खर्चासाठी बक्कळ रक्कम भारतातच देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्या बळावर त्यांना आयसिसकडे खेचण्यात आले. एकूणच आयसिसची ही मोर्चेबांधणी आणि त्यांचे धोरण लक्षात आल्यानंतर भारताने मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये आयसिसमधील भरतीपासून रोखण्यात आलेल्या कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. तर त्यांना परावृत्त करण्यासाठी मानसोपचाराचा आधार घेतला जात आहे.

या संदर्भात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जान्हवी केदारे सांगतात, असमतोल मानस असलेल्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीकडे वळविणे तुलनेने सोपे असते, असे मानसशास्त्रज्ञांना लक्षात आले आहे. दहशतवादाकडे खेचण्यासाठी ज्यांची निवड करण्यात आली, त्यातील अनेकांना नैराश्येने घेरलेले होते. प्रत्येकाला काही ना काही तणाव होता ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. कुणाचेही मतपरिवर्तन एक-दोन महिन्यांत होत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी अलीकडे समाजमाध्यमांचा वापर (सोशल मीडिया) खूप वाढला आहे. दृक्श्राव्य परिणाम सर्वाधिक खोलवर जाणारा असतो, हे पुन्हा एकदा इथे सिद्ध होते. इंजिनीअर किंवा डॉक्टर्ससारखे बुद्धिजीवी कसे काय दहशतवादी होण्यासाठी तयार होतात, असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण नैराश्य किंवा तणावामुळे ते आधीच असंतुलित होते हे इथे लक्षात घेतले पाहिजे. कल्याणच्या दोन्ही मुलांनी लिहिलेल्या चिठ्ठय़ांमध्ये त्यांचे असंतुलन स्पष्टपणे जाणवणारे आहे.

जिहादी होण्यास तयार झालेल्या अनेकांना धार्मिक आचरणाची फारशी पाश्र्वभूमी नाही, मग तरीही त्यांनी तयार का व्हावे, या प्रश्नावर डॉ. केदारे सांगतात, मूलतत्त्ववादी होण्याची त्यांची प्रक्रिया त्यासाठी आपण समजून घेतली पाहिजे. ती सातत्यपूर्ण अशी प्रक्रिया असते. त्यात एकाच वेळेस प्रक्षोभक गोष्ट तुमच्या मनावर बिंबवण्याबरोबरच दुसरीकडे समाजापासून तुम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्नही तेवढय़ाच जाणीवपूर्वक होत असतो.

ब्रेन वॉशिंग करणाऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या बैठका या अशा वेळेला असतात की, त्यावेळेस घरात एकत्र असलेल्या सर्वाना ती व्यक्ती फारशी भेटू शकत नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे रविवार संध्याकाळ ही सर्वासाठी घरी एकत्र राहण्याची वेळ असेल तर त्याच वेळेस त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर काढले जाते. एकाच वेळेस प्रक्षोभक गोष्ट मनावर िबबवणे आणि समाजापासून वेगळे काढण्याची प्रक्रिया होते त्यावेळेस जी गोष्ट िबबवण्याचा प्रयत्न होतो, त्या संदर्भातील त्या व्यक्तीची ग्रहणक्षमता वाढते. त्यातच ती व्यक्ती मुळात असंतुलित असेल तर अशी व्यक्ती बिंबवण्यात आलेल्या मुद्दय़ाला लवकर बळी पडते. प्रस्तुत प्रकरणात कुटुंबात समस्या, प्रेमभंग, पैशांची अडचण या गोष्टींमुळे त्या व्यक्तींमध्ये ताणतणाव होतात, असे दिसते.

दहशतवादाशी संबंधित सर्वच प्रकरणांमध्ये असे दिसते की, ही प्रक्रिया कुणा एकासाठी नव्हे तर तरुणांच्या गटासाठी म्हणून राबविली जाते. यातील मानसिकताही तपास यंत्रणांनी समजून घ्यायला हवी.

अनेकदा अशा प्रक्रियांमध्ये माणूस कुणाच्या तरी सोबत असतो. त्यात ‘‘चल सोबतच आहोत ना,’’ अशी भावना असते. ‘‘हा पण बरोबर आहे’’ हा दिलासा धोकादायक काम करताना विचारांवर हावी होतो. शिवाय अनेकदा चांगले काम आहे, असे सांगून त्याकडे ओढले जाते. सीरियामध्ये मदत कार्य असे कारण सांगून तिथे नेलेल्यांची संख्याही अधिक दिसते आहे, असे सांगून डॉ. केदारे म्हणतात, मग तो प्रशिक्षण छावणीत दाखल झाल्यानंतर अगदी त्याला लक्षात आले की, आपण फसवले गेलो आहोत किंवा जे करतोय ते चांगले नाही, तरीही तो बोलू शकत नाही. आजूबाजूला दहशतीचेच वातावरण असते. तो धैर्याने बोलला तर ते हसण्यावारी नेले जाते आजूबाजूला असलेल्या सर्वाकडूनच. मग धीर हरवलेल्या त्याला दुसरा पर्यायच नसतो. शिवाय ऐकले नाही तर प्राण गमावण्याची भीतीही असतेच.

प्रशिक्षण केंद्रांमधले वातावरण जिहादींना स्वत:ची ओळख विसरायला लावणारे असते. तिथे केवळ दहशतीचीच चर्चा होते आणि ते धर्मासाठी कसे चांगले आहे हे बिंबवले जाते. त्यांच्याकडून हत्या, बलात्कार घडविले जातात आणि ते सारे धर्मासाठी आहे, असे सांगून त्यांना प्रोत्साहनही दिले जाते, कौतुक केले जाते.

अशा प्रकारच्या कोणत्याही संघटनेचे अनुसरण तुम्ही करायला लागलात की, मग स्त्री- पुरुष हा भेद उरतच नाही. त्यामुळे इथे महिलाही जिहादी झालेल्या किंवा होण्याच्या प्रक्रियेत सामील झालेल्या दिसतात.

भविष्यात आपल्या देशात हे टाळायचे असेल तर पालकांचा मुलांशी असलेला सततचा संवाद महत्त्वाचा असणार आहे. सध्या हा संवाद कमी झाला आहे. म्हणूनच घरच्यांना या बाबतीत काहीही माहिती नव्हते, असे यातील जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये लक्षात आल्याच्या मुद्दय़ाकडे डॉ. जान्हवी केदारे आपले लक्ष वेधतात. तणावाखाली असलेल्या घरातील व्यक्तीला बोलू देणे, सारे त्याच्यासोबत आहेत हा फील देणे महत्त्वाचे असते. कुटुंबातील नाते घट्ट असेल तर प्रश्न कमी निर्माण होतात. गरिबी हेदेखील या मार्गाकडे वळण्याचे अनेकांचे महत्त्वाचे कारण असते. तुमचा बळी गेला तर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली जाते. हे खूप मोठे आमिष आहे. सध्या भारत सरकारने मानसोपचाराचे स्वीकारलेले धोरण चांगलेच आहे. पण ते करताना या संघटनांची आर्थिक रसद तुटेल हेही पाहिले पाहिजे, असेही डॉ. केदारे म्हणाल्या.

आयसिसकडे जिहादी म्हणून जाणाऱ्यांची सर्वच देशांतील तरुणांची संख्या सातत्याने वाढते आहे. ज्या फ्रान्समध्ये हल्ला झाला, त्याच देशातील सुमारे दीड हजार मुस्लीम तरुण आयसिसमध्ये कार्यरत आहेत. शिवाय आता उघड होत असलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांमध्येही फ्रेंच नागरिकांचा सहभाग होता. या दहशतवादी हल्लय़ाने भविष्यातील दहशतवादी हल्लय़ांसाठी त्याच देशांतील असंतुष्ट किंवा असंतुलित व्यक्तींचा वापर होणार याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे हे लक्षात घेऊन आता सर्वच देशांनी आधी आपापले घर अशा भेदींपासून सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असेल. आणि त्याचवेळेस जगातील सर्व देशांनी मतभेद विसरून दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरजही निर्माण झाली आहे. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण या दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद तोडायची असेल तर सर्व देशांमध्ये सहकार्य आणि सौहार्द असणे गरजेचे राहणार आहे. आर्थिक रसद तुटली तर त्यांच्या मुळावर घाव घालणे आणि जग दहशतवादमुक्त करण्याच्या दृष्टीने पावले टाकणे सहज शक्य होईल.

आयसिस म्हणजे काय?

bagdadiया लोकांच्या दुर्दैवाच्या कहाणीची सुरुवात झाली ती दीड वर्षांपूर्वी. २०१४ मधला जूनचा महिना. मोसूल हे इराकमधलं उत्तरेकडचं शहर. तिग्रीस नदीकाठी वसलेलं. रमझानचा महिना होता. त्या दिवशी नमाजानंतर ४४ वर्षीय अबु बाकर अल् बगदादी हे इसिसचे प्रमुख चौथऱ्यावर चढले.

त्यांनी जगभरातल्या मुस्लिमांना आवाहन केलं, इस्लामी राज्याकडे धाव घेण्याचं! आधी इराक आणि लेव्हंट (सीरिया आणि लेबनॉन या दोन देशांचा एकत्रित भाग!) या भागावर जम बसवून इस्लामी राज्य स्थापन करायचं आणि मग चहुबाजूने राज्यविस्तार करायचा, हे इसिसचं ध्येय. ते साध्य करण्यासाठीचं साधन म्हणजे दहशतवाद. त्यांनी स्वत:ला मुस्लिमांचा खलिफा घोषित केलं. त्या दिवसापासून जिवावर उदार होऊन इस्लामी राज्याच्या स्थापनेसाठी जगभरातून लोक इराक आणि सीरियाकडे धावू लागले. आणि इथले मूळ रहिवासी जीव वाचवण्यासाठी इथून पळ काढू लागले. तेव्हापासून इसिसबद्दल जगभरातल्या लोकांना प्रश्न अनेक पडू लागले.

इसिस ही मुळात अल् कैदासारखी दहशतवादी संघटना. पण तिचा हेतू केवळ दहशतवाद पसरवणं एवढाच नाही, तर त्या जोरावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचा आहे. वेगवेगळय़ा नावांनी तिची ओळख. एक नाव- ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ म्हणजेच इसिस. दुसरं नाव- ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हंट’ म्हणजे इसिल. या संघटनेला आणि तिच्या नावातल्या ‘राज्य’ या शब्दाला कडकडून विरोध करणारे अरब तिचा ‘दाईश’ असा उल्लेख करतात. फ्रान्सनेही याच नावाला मान्यता दिली आहे. ‘दाईश’ या शब्दाचा अरबीमध्ये ‘पायाखाली चिरडणं’ असा नकारात्मक अर्थही आहे. अलीकडे फक्त आयएस म्हणजे ‘इस्लामी स्टेट’ असाही तिचा उल्लेख होऊ लागलाय.

या संघटनेचा जन्म तसा पंधरा वर्षांपूर्वीचा. जॉर्डनमधला पॅलेस्टिनी निर्वासित अबु मुसाब अल् झरकावी हा या संघटनेचा संस्थापक. या दहशतवाद्याने २००० साली जॉर्डनच्या राजेशाहीविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला. इस्लामी तत्त्वात राजेशाहीला स्थान नाही, हे त्यामागचं कारण. राज्याचा प्रमुख हा धार्मिक नेता म्हणजे खलिफाच असायला हवा, हा त्याचा आग्रह. हे बंड फसलं आणि झरकावी पाकिस्तानातल्या पेशावरमाग्रे अफगाणिस्तानात पोहोचला. तेव्हा तालिबानची राजवट अशा मंडळींसाठी अफगाणी गालिचे अंथरण्यात आघाडीवर होती आणि ओसामा बिन लादेनने त्यांना दहशतवादाचे धडे देण्यासाठी तिथे बठक मारली होती. अफगाणिस्तानमध्ये त्याचा जम बसतो- न बसतो तेवढय़ात २००३ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्यानंतर कर्दाशी हातमिळवणी करून झरकावीने इराकच्या उत्तरेकडे आपला तळ ठोकला. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. पुढे तो २००६ मध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. पण त्याने स्थापन केलेली संघटना टिकली.  इराकवर अमेरिकेने केलेला हल्ला हे खरं तर ‘इसिस’ जिवंत राहण्याचं मूळ. सद्दामनंतर अमेरिकेचं सन्य इराकमध्ये शिरल्यानंतर तिथं निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा उठवत अल् कैदाने इराकमध्ये प्रवेश केला.

इसिसच्या प्रश्नाचं कूळ-मूळ समजून घेण्यासाठी इराक आणि सीरिया या दोन देशांचं राजकारण समजून घेणं आवश्यक ठरतं.

इराकचा पट हा धर्म, पंथ, वंश यांच्या गोतावळय़ाने भरलेला. इराकच्या पश्चिमेकडचा अनबार प्रांत हा सुन्नींचा बालेकिल्ला. जॉर्डन आणि सीरियाला लागून असलेला हा भाग. सद्दाम हुसेन यांचा पाडाव झाल्यावर इथं अल् कैदाने आपली ठाणी उघडली. अल् कैदाचा बीमोड करण्यासाठी तेव्हा अमेरिकेने स्थानिक सुन्नींनाच लष्करी प्रशिक्षण देऊन फौज उभी केली. या फौजेचं नाव होतं- ‘इराकपुत्र’! इराक सरकारला ही डोकेदुखी बहाल करून २०११ मध्ये अमेरिकेने या वाळवंटातून आपला पाय काढला. इसिसला आयतीच ही प्रशिक्षित फौज लाभली.

२००६ मध्ये झालेल्या निवडणुकांपासून इराक धुमसतोय. इराकमध्ये शिया बहुसंख्याक; त्यामुळे निवडणुकीनंतर शिया पंथीयांच्या हातात सत्ता गेली. शतकानुशतके सत्ता उपभोगणारे सुन्नीपंथीय बाजूला फेकले गेले. सुन्नीपंथीयांचा सरकारविरुद्ध रोष वाढला. दोन पंथांमधली ही दरी बुजवण्यात इराकचं सरकार अपयशी ठरलं.  त्यात इसिसचं फावलं. त्यात शेजारच्या सीरियात क्रांतीचं वादळ उठल्यावर तिथलंही वाळवंट तिला आपसूकच मिळालं.

सीरियावर असाद घराण्याची पकड १९७१ पासूनची. गेल्या चाळीस वर्षांपासून जनतेचा उठाव यशस्वीपणे चिरडण्याचा असाद घराण्याला दांडगा अनुभव आहे. सीरिया हा सुन्नीबहुल देश. पण राज्यकत्रे असाद मात्र अल्पसंख्याक असलेल्या शिया पंथातल्या अलवीत या उपपंथाचे. सीरियाच्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम दहा टक्के अलवीत पंथीय. असाद यांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी सीरियन जनता अनेकदा प्रयत्न करून थकली होती. बशर अल् असाद यांना बंड चिरडण्याचा वारसा पिता हाफीज अल् असाद यांच्याकडून मिळालेला. १९८२ ची घटना.. हाफीज अल् असाद अध्यक्ष असताना सीरियातल्या हमा या शहरात उठाव झाला. त्यांनी शहरवासीयांना महिनाभर कोंडून ठेवलं. सगळं शहर नेस्तनाबूत केलं. नंतर त्यावर बुलडोझर फिरवला. एका अंदाजानुसार, त्यांनी दहा हजारांच्या आसपास लोक मारले. तेव्हापासून सीरियन जनतेने उठावाची धास्तीच घेतली. पण २०११ मध्ये आजूबाजूच्या देशांमधल्या हुकूमशहांना पळता भुई थोडी झाली हे बघून सीरियन जनता पुढे सरसावली. यावेळी तरी आपल्याला यश मिळेल अशी तिला मोठी आशा होती. पण..

सुरुवातीला सीरियन क्रांतिकारक एका वेगळ्याच भ्रमात वावरत होते. लिबियाच्या मुहम्मर गद्दाफींना ठेचण्यासाठी धावलेले पाश्चात्त्य आपल्यालाही मदत करतील, अशी त्यांना आशा होती. त्या आशेवरच तर पूर्वानुभव विसरून ते धाडसाने रस्त्यावर आले. परंतु आपल्या भूमीत लिबियासारखं उत्तम प्रतीचं तेल नाही, याचा या सामान्य लोकांना विसर पडला. आपल्याला मदत करून पाश्चात्त्यांना काय बरं लाभ होणार आहे? हा साधा विचारही त्यांच्या मनात आला नाही. शिवाय, बुश यांच्या युद्धखोरीनंतर अमेरिका आíथक विवंचनेत सापडलेली. त्यामुळे बराक ओबामा यांनी पुन्हा युद्धाच्या भानगडीत पडण्याचं टाळलं. त्यात भरीला हुकूमशहा असाद यांच्या पाठीवर इराण आणि रशियाने हात ठेवलेला. पाश्चात्त्य देशांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत असादांच्या विरोधात पाऊल उचलायची तयारी केली की रशियाने त्यात अडथळा आणायचा, हे ठरलेलंच. असंच चित्र अरबजगतातलं. इराणची असाद यांना भरभरून मदत, तर सुन्नी राजवटींची उठावकर्त्यांना! जागतिक राजकारणातल्या ताणतणावांचं प्रतििबब सीरियाच्या क्रांतीत पडलं.

पण परिस्थिती सुधारण्याची शक्यता तर दूरच राहिली; उलट सीरियातल्या या गोंधळाचा लाभ इसिसने घेतला. तिचे लढवय्ये इराकमधून इकडे वळले. त्यांचा मार्ग सोपा होता- आपल्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना आणि संघटनांना ठेचून काढायचं. दहशतीचं राज्य आलं. ‘विलायत अल् रक्का’ हा सीरियातला तुर्कस्तानला लागून असलेला प्रांत. सीरियन लष्कराकडून हा भाग बळकावल्यापासून रक्का हे इसिसचं राजधानीचं शहर झालंय. इसिसचा काळा झेंडा इथे जागोजागी फडकतोय. स्त्रिया बुरख्यात गुंडाळून घरात बंदिस्त झाल्या आहेत. पुरुषांना दाढी ठेवणं बंधनकारक झालंय. रस्त्यारस्त्यांवर इसिसची फौज करडी नजर ठेवून उभी. शाळांमधून विज्ञान, कला, इतिहास हे विषय बाद झालेत. शहरातल्या ख्रिश्चनांवर जिझिया कर लादला गेलाय. विरोध केला, कायदा मोडला तर भर चौकात मृत्युदंडाची शिक्षा ठरलेली. – विशाखा पाटील‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील ‘भय इथले संपत नाही’ या लेखाचा संपादित अंश

२६/११ ची पुनरावृत्ती

lp09पॅरिसमधील ‘शार्ली हेब्दो’ या विविध मुद्दय़ांवर उपरोधिकपणे भाष्य करणाऱ्या साप्ताहिकावर दहशतवादी हल्ला होऊन अकरा महिने पूर्ण होत नाहीत तोच त्याच पॅरिसमध्ये अतिरेकी हल्ले करून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना वेठीला धरले. पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरू झालेली ही हल्ल्यांची साखळी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या साधारण चारेक तासांच्या हल्ल्याने मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची आठवण मात्र करून दिली. ‘अतिरेकी हल्ला’ हे एवढेच आठवणीचे कारण नसून पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याचे स्वरूपही मुंबईच्या हल्ल्याप्रमाणे असल्याचे अनेक तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.

पॅरिसमधील हल्ल्याचे स्वरूप बघता हा हल्ला निश्चितच २६/११ ची आठवण करून देणारा आहे. मुंबईप्रमाणेच पॅरिसमध्येही रात्री ९ च्या सुमारास हल्ल्यांना सुरुवात झाली. सात वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला नोव्हेंबरमध्येच दिवाळी झाल्यानंतर झाला होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ९च्या सुमारास दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ले सुरू केले, तर पॅरिसमध्ये रात्री दहा वाजता हल्ले सुरू झाले. दहशतवादांनी मुंबईतील लिओपोल्ड कॅफेतील लोकांना ओलीस धरले होते. तिथेच त्यांनी गोळीबारालाही सुरुवात केली होती. पॅरिसमध्ये बॅटाक्लान कॉन्सर्ट हॉलमध्ये संगीताचा एक कार्यक्रम सुरू होता. तिथे आलेल्यांची संख्या १५०० च्या आसपास होती. तिथे घुसून दहशतवाद्यांनी तिथल्या प्रेक्षकांना ओलीस धरत बेछूट गोळीबार केला.

एकाच वेळी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करणे हेही मुंबई आणि पॅरिस हल्ल्यांतील एक साम्य म्हणता येईल. मुंबईतही काही मिनिटांच्या फरकाने एकाच वेळी ताज हॉटेल, ट्रायडेंड हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल अशा ठिकाणी हल्ले होत होते. त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात घबराट पसरवण्यात दहशतवाद्यांना यश मिळाले होते. तसेच चित्र पॅरिसमध्येही बघायला मिळाले. बॅटाक्लान कॉन्सर्ट हॉल, नॅशनल स्पोर्ट स्टेडिअम, कॉफी शॉप, काही हॉटेल्सच्या बाहेरील भाग अशा विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार आणि बॉम्बहल्ले केले. हल्ले झालेली दोन्हीकडची ठिकाणे पाहिली तर असे लक्षात येईल की, लोकप्रिय आणि गर्दीच्या ठिकाणांची दहशतवाद्यांनी निवड केली आहे. मुंबईतले ताज, ट्रायडेंट हॉटेल किंवा पॅरिसमधील बॅटाक्लान कॉन्सर्ट हॉल म्हणजे भरपूर लोक असण्याची खात्री. बॅटाक्लान हॉलमध्ये एक सांगीतिक कार्यक्रम सुरू असल्यामुळे तिथे पंधराशेच्या आसपास लोक असण्याची खात्री असल्यामुळेच तिथल्या काहींना दहशतवाद्यांनी ओलीस धरले. लोकांना ओलीस धरण्याचा प्रकार मुंबईतील ताज हॉटेलमध्येही घडला होता.

lp10पॅरिसमधील अतिरेक्यांची दोन गटांमध्ये विभागणी हे मुंबईवरील हल्ल्यांप्रमाणेच दिसून आले. यामुळेच त्यांनीही एकाच वेळी अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बहल्ले घडवून आणले. लोकांना ओलीस ठेवण्याचा प्रकारही मुंबईप्रमाणेच पॅरिसमध्ये दिसला. जास्तीत जास्त लोकांना ओलीस ठेवण्याच्या हेतूने लोकप्रिय आणि गर्दीच्या ठिकाणांना दोन्हीकडच्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. मुंबईतला अतिरेकी हल्ला तीन दिवस सुरू होता, तर पॅरिसमध्ये जवळपास तीनेक तासांत हा हल्ला थांबला; पण मृतांची संख्या साधारणपणे सारखीच आहे. तसेच कमीत कमी साधने वापरून जास्तीत जास्त परिणामकारक दहशत पसरवणे हेही दोन्ही हल्ल्यांतील साधम्र्य आहे. अनेक वरिष्ठ आणि तज्ज्ञ मंडळींनीही मुंबई आणि पॅरिस हल्ल्यांत साधम्र्य असल्याचे नमूद केले आहे. न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख जॉन मिलर यांनी ‘सीएनए’ या वाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये २६/११ चा मुंबईवरील हल्ला आणि पॅरिसवरील हल्ला यात साधम्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जॉर्जटाऊन विद्यापीठातील राष्ट्रीय सुरक्षाविषयक कार्यक्रमाचे प्रमुख ब्रुस हॉफमन यांनीही मुंबई आणि पॅरिस हल्ल्याचा संदर्भ जोडला.

पॅरिस हल्ल्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात वापरलेल्या एके-४७. खरे तर फ्रान्समध्ये एके-४७ ला बंदी आहे; पण या हल्ल्यात प्रामुख्याने एके-४७ चा वापर झालेला दिसतो. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातही याच शस्त्राचा प्रामुख्याने वापर करण्यात आला होता. एके-४७ चा वापर करत अंदाधुंद गोळीबार करण्याची पद्धतही मुंबई-पॅरिस हल्ल्यांमध्ये सारखी होती. हॉटेल्स, कॉफी शॉप, थिएटर्स, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रेक्षागृह यांसारख्या ठिकाणांना लक्ष्य करत तेथील लोकांना ओलीस धरणे, एकामागे एक वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, बॉम्बस्फोट करणे, दहशत पसरवणे, गोळीबारासाठी रात्रीची वेळ गाठणे ही सगळी प्रक्रिया पाहता पॅरिसमधील हल्ला हा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यासारखाच असल्याचे दिसून येते. मुंबईतील हल्ल्यासाठीचा शस्त्रसाठा समुद्रमार्गे मुंबईत आणला गेला होता. पॅरिसच्या हल्ल्यासाठी लागलेला शस्त्रसाठा कोणत्या मार्गाने आला हे अद्याप कळले नाही. मुंबईतील याआधीचे दहशतवादी हल्ले, पॅरिसमधील जानेवारी महिन्यात झालेला ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकावरील हल्ला, पॅरिसवरील नुकताच झालेला हल्ला अशा जगातल्या अनेक महत्त्वाच्या हल्ल्यांमुळे दहशतवाद ही जागतिक समस्या ठरली आहे हे स्पष्ट दिसून येते.

संकलन : चैताली जोशी

मुस्लीम समाजाकडे झालेले दुर्लक्षच कारणीभूत!

कल्याणमधून चार युवक बेपत्ता झाले आणि इराक-सीरियातील ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे स्पष्ट होण्याआधीच धर्माधानुकरणाची समस्या महाराष्ट्रातील काही भागांना पोखरून काढत असल्याचे स्पष्ट झाले होते. कल्याणची घटना उघड झाली; परंतु उघड न झालेल्या घटना किती असतील, याचा पोलीस यंत्रणेलाही अंदाज नाही. मात्र या घटनेनंतर राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने आयसिसशी संबंधित वा जिहादी चॅटरूमवर करडी नजर ठेवली. परंतु आक्षेपार्ह काहीही न आढळल्याने फक्त लक्ष ठेवणेच त्यांच्या हाती राहिले.

राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पोलीसप्रमुख बनल्यापासून धर्माधानुकरण हा विषय किती संवेदनक्षम आहे, याचे वेळोवेळी विवेचन केले. आपल्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी या प्रश्नावर मात करण्यासाठी येनकेनप्रकारेण प्रयत्न केले. मुस्लीम समाजाकडे आतापर्यंत सर्वच थरांवर झालेले दुर्लक्षच धर्माधानुकरणाला खतपाती घालीत असतात, असे दयाळ यांचे ठाम मत आहे. पोलीस दलात अधिकाधिक मुस्लीम तरुण भरती होणे गरजेचे आहे,  सरकारी गृहप्रकल्पात अल्पसंख्याकांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देणे तसेच शिक्षण आणि प्रशासन पातळीवर अल्पसंख्याकांना विशेषत: मुस्लीम समाजाला आपण मुख्य प्रवाहात आहोत, असे वाटले पाहिजे, याकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी सर्वसमावेशक योजना तयार करून राज्य शासनाला पाठविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेत स्वारस्य दाखविल्याचे दयाळ यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आयोजित केलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सांगितले होते.

मुस्लीम तरुणांना पोलीस दलात सामावून घेण्याबाबत अधिक स्पष्ट करताना दयाळ म्हणतात : पोलीस दलात अधिकाधिक मुस्लीम तरुणांची भरती झाली तर पोलिसांबद्दल असलेला गैरसमज दूर होण्यास मदत होईल. पोलीस भरतीच्या वेळी शेकडोने मुस्लीम तरुण शिपाई होण्यासाठी येतात. मैदानी चाचण्यांमध्ये ते सरस ठरतात; परंतु लेखी परीक्षेत केवळ मराठी नीट येत नसल्यामुळे मार खातात. वास्तविक त्यासाठी मुस्लीम तरुणांना शाळेच्या पातळीवर वा मदरशात मराठीचे आवश्यक ते प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. अंजुमान इस्लामसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, यासाठी आपण प्रयत्नही केले. मदरशातही मराठी शिकविले गेले तर केवळ पोलीसच नव्हे तर सरकारी नोकरीतही मोठय़ा प्रमाणात मुस्लीम तरुणांना संधी मिळेल. शासन नेमके कसे वागते आहे याबाबतचा जो जिहादी संकेतस्थळांच्या माध्यमातून अपप्रचार केला जात आहे तो दूर करण्यास त्यामुळे हातभार लागेल.

औरंगाबाद, यवतमाळ आदी परिसरांत धर्माधानुकरणाचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. किंबहुना गुप्तचर यंत्रणांची तशी माहिती आहे. या परिसरात शालेय स्तरावरच मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस दलाने युथ पार्लमेंटसारखे कार्यक्रम राबविले. अशा कार्यक्रमांतून डाव्या विचारांतील दहशतवाद, जातीय सलोखा, दहशतवादी कारवाया आणि जातिभेद आदी विषयांवर मुलांना बोलते केले. त्यातून त्यांच्या मनात असलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली गेली. या विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन लाभले तर नक्कीच त्यात फरक पडू शकतो, असे दयाळ यांना वाटते.

– निशांत सरवणकर

विनायक परब / सुहास जोशी –
response.lokprabha@expressindia.com
Twitter: @vinayakparab / @joshisuhas2