राज्यभरात होऊ घातलेल्या दहा महापालिकांच्या निवडणुकाकडे तरुणाई नेमकं कसं बघते हे पाहण्यासाठी ‘लोकप्रभा’ने राज्यभरातील १८ ते २५ वयोगटातील १०० तरुण- तरुणींशी चर्चा केली. त्या सव्‍‌र्हेक्षणातून पुढे आलेलं वास्तव..

राज्यभरातील दहा महापालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी एव्हाना अगदी चरणसीमेवर पोहचली आहे. राजकारणात सर्व क्षम्य असते असं म्हणत प्रत्येक पक्षाने त्याला जे सोयीस्कर ते करत येनकेनप्रकारेण सत्ता पदरात पाडायचा चंगच बांधला आहे. लोकसभेत भाजपाने मिळवलेलं यश, त्यापाठोपाठ राज्यात मिळालेली सत्ता त्यामुळे एकंदरीतच भाजपाचं जाणवत असलेलं वर्चस्व आणि त्यातच शिवसेनेबरोबर झालेला काडीमोड (किमान महापालिकांपुरता तरी) या सर्वाच्या पाश्र्वभूमीवर एकंदरीतच विस्कटलेलं वातावरण सध्या दिसून येते. या सर्व घडामोडींमध्ये मतदारांचा विचार कितपत आणि कसा होतोय हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे. लोकसभेच्या दरम्यान सर्वच पक्षांनी, त्यातही भाजपाने युवा मतदारांसाठी चांगलीच कंबर कसली होती. त्यावेळी देशभरातील युवा मतदारांच्या एकंदरीतच वाढत्या संख्येमुळे युवा मतदार हे जर मतदानास पूर्णार्थाने उतरले तर तेच किंगमेकर होतील असे आम्ही लोकसभा निवडणुकांदरम्यान आकडेवारीसह दाखवून दिले होते. आता राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीतील हे युवा मतदार या निवडणुकांचा नेमका कसा आणि काय विचार करतात हे पाहणं क्रमप्राप्त ठरते. सध्या तरी कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंडय़ावर थेट हा युवा मतदारांचा प्रभाव, विषय दिसत नाही. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने या दहा महापालिका क्षेत्रातील तरुणांशी संवाद साधला. त्यांना काही मूलभूत प्रश्न विचारले. त्याचबरोबर त्यांची या सर्वामध्ये काय भूमिका आहे हे देखील पडताळून पाहिले. दहा महानगरातील १८-२५ या वयोगटातील सुमारे १०० तरुण-तरुणींशी चर्चा केल्यावर समोर आलेले काही निष्कर्ष हे गंभीर आहेत, तर काही निष्कर्ष विचार करायला लावणारे आहे.

आपला वॉर्ड कोणता, नगरसेवक कोण, महापालिकेची कामं कोणती, तुम्ही महापालिकेशी निगडित काही काम केलं आहे का, नगरसेवकाकडे कधी तक्रारी केल्या आहेत का, मतदान बंधनकारक करावं का अशा प्रश्नांमधून एकूणच तरुणाईचा महापालिका निवडणुकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून आला. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मांडण्यापूर्वी प्रामुख्याने नमूद करायची बाब म्हणजे तरुणांचा एकंदरीतच या निवडणुकांच्या दृष्टीने राजकारणाकडे पाहायचा दृष्टिकोन फार खोलात जाणारा नाही. अनेकांनी तर एकदोन प्रश्नानंतर प्रश्नकर्त्यांचे नंबर थेट ब्लॉकच करून टाकले. तर फार खोलात जातोय असं वाटल्यावरदेखील सर्वेक्षणातून काढता पाय घेतला. देशातील वाढती तरुणांची संख्या, २०२२ मध्ये सर्वाधिक तरुण असणारा देश अशी आपल्या देशाची प्रतिमा असताना या तरुणाईला मात्र राजकारण आणि राजकारणी लोकांबद्दल फार स्वारस्य दिसत नाही. तरुणाई ही सकारात्मक आहे ती काही तरी बदल घडवून आणेल वगैरे अपेक्षा असताना अनेकांनी लोकसभे इतकेच महापालिका निवडणुकांना महत्त्व देणे गरजेचे आहे असे मत मांडताना महापालिका निवडणुकांचा अगदीच वरवर या निवडणुकांचा विचार केल्याचे दिसून येते.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या सुमारे पन्नास टक्क्य़ांहून अधिक तरुणांना आपण कोणत्या प्रभागात आहोत याची कसलीही माहिती नव्हती. इतकेच काय तर जवळपास ७० टक्के तरुणांना आपल्या प्रभागाचा नगरसेवक कोण आहे हेदेखील माहीत नाही. आणि पन्नास टक्के तरुणांना आपल्या महापालिकेची निवडणूक केव्हा आहे याबद्दल खात्रीशीर उत्तर देता आले नाही. एका महाभाग तरुणाने तर देवेंद्र फडणवीस हे नगरसेवक असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हा तरुण थेट फडणवीसांच्या कर्मभूमीतील म्हणजेच नागपुरातील आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा इतका प्रचंड गदारोळ सुरू असताना इतकी मूलभूत माहिती या तरुणांना नसणे हे कशाचं लक्षण म्हणायचं हा प्रश्न पडतो.

सर्वेक्षणातील पुढचा प्रश्न हा तुम्ही महापालिकेशी कितपत जोडलेले आहात हे तपासणारा होता. पाणी कर, मालमत्ता कर अशी देयकं भरण्याच्या कामासाठी अनेकांचा पालिकेच्या कार्यालयाशी संबंध येत असतो. पण त्याव्यतिरिक्त आपल्या प्रभागातील समस्या, इतर परवानग्या, सामाजिक उपक्रम अशा निमित्ताने देखील अनेकांचा संबंध येतो. पण सर्वेक्षणातील जवळपास १०० टक्के तरुणाईने कधीही महापालिकेची पायरी चढलेली नाही, अगदी देयकं भरायलादेखील. इतकेच नाही तर काही सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनदेखील प्रशासनाशी जोडले जाणाऱ्यांमध्ये अगदी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढय़ांचाच समावेश करता येईल. नगरसेवकांकडे आपल्या समस्यांबाबत तक्रारी करण्याचं प्रमाण देखील तुलनेनं कमीच आहे. पण कोणत्या समस्यांचे निवारण नगरसेवक करू शकतो याची कल्पना त्यांना आहे.

सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ३० टक्केतरुण हे प्रथमच मतदान करत आहेत. त्यामुळे खरं तर यांनी आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्यासमोरील पर्यायांचा, आपल्या रचनेचा किमान अभ्यास करणे महत्त्वाचे वाटते. पण तसे चित्र काही समोर येत नाही.

ज्यांनी आजवर मतदान केलेले नाही त्यांनी मतदार यादीत आपले नाव आहे का, हे तपासणे, नसेल तर त्यासाठीची पुढील कार्यवाही करणे हे सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. पण मोजक्याच जणांनी याचा पाठपुरावा केला आहे. अनेकांनी तर चक्क आळस केला असे सांगितले, तर काहीजणांनी हे काम आईबाबांनी करायचे काम असल्याचे सांगितले. एकंदरीतच मतदानाबद्दलचा हा मूलभूत निकष पूर्ण करण्याबाबत एकंदरीतच उदास असा दृष्टिकोन दिसून आला. पण त्याच वेळी तीन वेळा मतदान न करणाऱ्यांचे नाव मतदार यादीतून काढून टाकावे का, या प्रश्नाला मात्र बहुतांश जणांनी पािठबा दिला आहे. म्हणजे एकीकडे स्वत:च्या मतदानाबाबत दुर्लक्ष आणि दुसरीकडे मतदान न करणाऱ्यांना शासन व्हावे अशी दुटप्पी भूमिकाच यातून दिसून येते. स्वत: करायचे नाही, पण दुसऱ्याने चूक केली तर मात्र त्याला शिक्षा हवी ही भूमिका गंभीर आहे.

महापालिका निवडणूक ही स्थानिक पातळीवर होत असते. त्यामुळे अनेक वेळा उमेदवार हा प्रत्यक्ष भेटून किंवा अन्य ओळखीतून माहीत झालेला असतो. अशा वेळी पक्षाला महत्त्व द्याल की उमेदवाराला मत द्याल या प्रश्नावर अनेकांचा कल हा उमेदवाराकडेच झुकणारा आहे. उमेदवाराचे शिक्षण, पाश्र्वभूमीपेक्षा त्याने आजवर काय केले आहे, तो काय करू शकेल याला प्राधान्य दिसून येते. त्याच वेळी जो शिक्षणात नापास होतो तो उमेदवार असतो अशी एक टिपिकल भूमिकादेखील पुढे येताना दिसली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी पाचदहा तरुण सोडल्यास इतरांचा आजवर कोणाचाही कधीच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध आलेला नाही.

आपली विचारसरणी कोणत्या राजकीय पक्षाच्या जवळ जाते, किंवा कोणता राजकीय पक्ष जवळचा वाटतो याबाबतीत मात्र एक लक्षणीय बाब जाणवली ती म्हणजे बहुतांश तरुणांचा कल हा शिवसेना आणि भाजपामध्ये विभागला आहे. अगदीच तुरळक प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे तरुण झुकताना आढळतात. ही बाब प्रामुख्याने नोंद घ्यावी असे वाटते. त्यातही भाजपाकडे कल अधिक आहे. कदाचित लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपाने तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी केलेल्या एकूणच उपायांचा हा परिणाम असावा. तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी समाज माध्यमांपासून ते अगदी महाविद्यालयांच्या कॅम्पसपर्यंत भाजपाने व्याप्ती वाढवली होती.

तरुणाईच्या सर्वेक्षणातील समाधानाची बाब इतकीच की बहुतांशांना महापालिकेच्या कामाची व्याप्ती बऱ्यापैकी माहीत आहे. अन्यथा हल्ली अनेक सुजाणांनादेखील याची पुरेशी जाण नसते. १०० टक्के तरुणांच्या मते महापालिकेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीइतकंच महत्त्व द्यायला हे असे ठामपणे वाटते. नगरसेवकांनी महापालिकेच्या बजेटची लाज राखावी, पैसे खावेत पण किमान कामे तरी करावीत अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच उमेदवाराला महत्त्व देतानाच काम करेल तो चांगला अशी भावनादेखील दिसून येते. पण महापालिकेच्या मूलभूत कामाबरोबरच पर्यावरण, शिक्षणासारख्या प्रश्नावर कोणीही काहीही मत व्यक्त केलं नाही. खरे तर पर्यावरणासारखे काही प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटले तर ते अधिक चांगले असते. पण त्याबाबत मात्र तरुणाईचा फारसा उत्साह दिसत नाही.

आजच्या तरुणाईचा महापालिकेकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन एकंदरीत बराच गोंधळात पाडणारा. एकीकडे अपेक्षा भरपूर आहेत, पण त्याच वेळी त्यातील स्वत:चा सहभाग मात्र अगदीच काठावरचा किंवा नसल्यासारखा आहे. खरे तर सारी तरुणाई जर यात जोमाने उतरली तर भविष्य काहीतरी वेगळे घडू शकते. पण सध्यातरी एकंदरीतच वातावरण पाहिले तर राजकारणावर तरु णाईचा प्रभाव कितपत आहे यावर जरा साशंकताच दिसून येते. तरुणाईच्या अपेक्षा तर खूप आहेत, पण त्यासाठी स्वत: खपून काही करण्याची तयारी कमीच दिसत आहे. किंगमेकरची त्यांची भूमिका आजही जरतरच्याच साच्यात अडकलेली दिसते.

टीम युथफुल – संकलन : सुहास जोशी, सर्वेक्षण सहभाग : राधिका कुंटे, जयदेव भाटवडेकर, ज्योत्स्ना भाटवडेकर, कोमल आचरेकर, सानिका आठवले, योजना पळसुले देसाई, राधिका भूषण, तेजश्री गायकवाड
response.lokprabha@expressindia.com