lp10बाजीराव मस्तानी सिनेमामधलं पिंगा हे गाणं रिलिज झालं आणि चर्चा सुरू झाली ती मस्तानी आणि काशीबाई यांच्या नृत्याची. त्यासाठी त्यांनी नेसलेल्या नऊवारी साडीची. आजपर्यंत वेगवेगळ्या सिनेमांत टिपिकल पारंपरिक मराठी पेहराव असलेल्या नऊवारीला ठेंगा दाखवला गेला आहे.

‘आता माझी सटकली..’
‘मला लागली कोणाची हिचकी..’
‘चिकनी चमेली..’
‘सव्वा डॉलर..’

ही आणि अशी कित्येक गाणी आठवली की, एकच गोष्ट डोळ्यांसमोर येते- गाण्यांमधील नायिकांना नेसवलेली नऊवारी. अशा गाण्यांमधून नऊवारीचं जे काही करून ठेवलंय ते बघून सो कॉल्ड प्रयोगशील दिग्दर्शक, डिझायनर्सचं कौतुक करावं, की नऊवारीबाबत वाईट वाटून घ्यावं कळत नाही. या वरील गाण्यांची यादी खरं तर मोठी आहे. या यादीत आता आणखी एका गाण्याची भर पडतेय. ते गाणं म्हणजे ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी सिनेमातलं ‘पिंगा’ हे गाणं. सिनेमाविषयी उत्सुकता तर आहेच, पण या गाण्याविषयीही कुतूहल होतंच. हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि चर्चेला फोडणी लागली. ही फोडणी तशी जुनी असली तरी पुन्हा एकदा त्या फोडणीचा झटका लागलाच. यानिमित्ताने आठवण झाली ती हिंदी-मराठी सिनेसृष्टीतल्या नऊवारीवरील प्रयोगांची. यातल्या काही प्रयोगांनी वाहवा मिळवली, तर काहींना टीका सहन करावी लागली.

आजच्या पिढीला नऊवारी माहिती आहे ती अशी सिनेमा, कार्यक्रमांमधूनच. पन्नासेक वर्षांपूर्वी सर्रास दिसणारी नऊवारी आताच्या आज्ज्याही फारशा नेसताना दिसत नाहीत. तरीही नऊवारी अगदीच कालबाहय़ झाली, असंही म्हणता येणार नाही. त्यात अनेक प्रयोग होत गेले तरी नऊवारी कालबाहय़ नक्कीच होणार नाही. याचं कारण म्हणजे आजच्या तरुणींचा नऊवारीकडे बघण्याचा दृष्टिकोन. एरवी जीन्स किंवा इतर आधुनिक कपडय़ांमध्ये वावरणारी मुलगी आता सणासुदीला, लग्नकार्यामध्ये नऊवारीला प्राधान्य देते. अशा वेळी नऊवारी ही मुलींना ट्रेंडी वाटू लागते. मग त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज चढवत तरुण मुली नऊवारीलाही ग्लॅमरस करतात. तत्कालीन स्त्रियांच्या भाषेत लुगडं किंवा काष्टय़ाची साडी.

‘ठेंगणी ठुसकी मध्यम बांध्याची’ असं प्राचीन साहित्यात जिचं वर्णन केलं गेलं आहे, त्या मराठी स्त्रीची तत्कालीन वेशभूषा म्हणजे नऊवारी. स्त्रीच्या शरीराचे सगळे उठाव व्यवस्थित दाखवणारी, तरीही शरीराचं कसलंही प्रदर्शन न करणारी, स्त्रीचं शरीर व्यवस्थित झाकणारी कमालीची सुटसुटीत, एथनिक दिसणारी आणि आजच्या भाषेत सांगायचं तर खऱ्या अर्थाने कम्फर्टेबल आणि सेक्सी अशी नऊवारी साडी. जुन्या चित्रांमधून घोडेस्वारी करणाऱ्या स्त्रिया नऊवारी नेसलेल्या दाखवल्या जातात. म्हणजे आजच्या टू व्हीलरवरून जाण्यासाठीही नऊवारी एकदम सुटसुटीत. नऊवारी नेसलेल्या टू व्हीलरवरून फिरणाऱ्या मुलींचं चित्र ठिकठिकाणी गुढीपाडव्याला दिसतं. एकोणिसाव्या शतकात स्त्रिया शिकायला लागल्या, तेव्हाच्या भाषेत सांगायचं तर ‘सुधारल्या’ आणि नऊवारीतून सुटसुटीत पाचवारीत आल्या. नऊवारीचा बोजा सांभाळण्यापेक्षा पाचवारी नेसणं आणि शिक्षण, नोकरी ही रोजच्या जगण्यातली नव्याने सुरू झालेली धावपळ सांभाळणं त्यांना कमालीचं सोपं वाटायला लागलं. शिवाय पाचवारी नेसणं ही तत्कालीन फॅशनही होतीच. तरुणांनाही हळूहळू नऊवारी नेसणाऱ्या ‘काकूबाई’पेक्षा पाचवारी नेसणारी मॉडर्न बायको हवीहवीशी वाटायला लागली होती, पण सुरुवातीला हा बदल चटकन स्वीकारला गेला नाही. पाचवारी नेसली म्हणजे बाई भयंकर फॅशनेबल झाली असं मानलं जायचं. ही फार लांबची नाही, अगदी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अर्थात नंतर शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या रेटय़ानंतर सगळंच इतकं आणि वेगाने बदलत गेलं. आजच्या, आत्ताच्या तरुणींसाठी हीच पाचवारीसुद्धा एथनिक व्हायला लागली आहे ही गोष्ट वेगळी.

नऊ वारी रोज नेसली जायची तेव्हा ती समाजांनुसार, जातींनुसार वेगवेगळ्या पद्धतीने नेसली जायची; पण आजच्या पिढीला नऊ वारी माहीत आहे ती बऱ्याच जुन्या आणि मोजक्या नव्या सिनेमांमधून. एके काळच्या मराठी सिनेमांच्या प्रथेनुसार तमाशापटच जास्त बनवले जायचे आणि त्यामुळे आपल्याला नऊवारी जास्तीत जास्त बघून माहीत आहे ती तमाशापटांमधून बघूनच. म्हणजे तमाशापटांमधून परफॉर्मन्स करणारीने नेसलेली नऊवारी हीच आजच्या पिढीने जास्त बघितलेली आहे. नऊ वार म्हणजे जवळपास नऊ मीटर, काठापदराची साडी. दोन पायांच्या मध्ये काष्टा काढून तो मागे खोचून नेसायची साडी. गेल्या काही वर्षांत सणावाराला फॅशन म्हणून नऊवारी नेसणं आणि त्यानुसार नटणं-मुरडणं हल्लीच्या मुलींना जसं आवडायला लागलं आहे, तशीच बॉलीवूडलाही या नऊवारीची सॉलिड भुरळ पडू लागली. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत अधूनमधून आघाडीच्या नायिकासुद्धा एखाद्या गाण्याच्या परफॉर्मन्सपुरत्या आपली मिनीबिनी सोडून नऊवारीत आलेल्या दिसतात.

lp11

पडद्यावर कमीत कमी कपडे घालून सहजपणे वावरणाऱ्या, तरुणींच्या फॅशन आयकॉन असलेल्या कतरिना, करिनासारख्या हिरॉइन्स या मिनीपेक्षा किती तरी पट जास्त कापड असलेल्या नऊवारी कशा नेसतील आणि कशा दिसतील, हा खरं तर संशोधनाचा विषय असू शकतो; पण हिंदीतल्या काही फॅशन डिझायनर्सनी आपलं हे संशोधनाचं काम अगदी सोपं केलंय. राणी मुखर्जी, विद्या बालन यांसारख्या काही मोजक्या नायिकांना एकदम योग्य नऊवारी नेसवून सादर केलं, तर कतरिना, करिना आणि आता प्रियांका-दीपिका या नऊवारीत दिसल्या, पण ते बॉलीवूड स्टाइलमध्ये. इथे होत गेलं नऊवारीचं फ्यूजन. बॉलीवूड स्टाइल नऊवारी बघून मराठी प्रेक्षक जर ‘आता माझी सटकली’ असं म्हणत असतील, तर त्यात त्यांचं चुकलं तरी काय? सिनेसृष्टीतले बदल प्रेक्षकांकडून चटकन स्वीकारले जाऊ शकतात किंवा स्वीकारले जावे, अशी अपेक्षा करणंही चुकीचंच आहे. सहावारी साडय़ांमध्येही बदल होतानाचा प्रवास प्रेक्षकांनी अनुभवला आहे. सुरुवातीला तोही नाकारला असेलच; पण, कालांतराने श्रीदेवी, माधुरी दीक्षित, रविना टंडन, शिल्पा शेट्टी आणि अलीकडची कतरिना कैफ यांच्या पारदर्शी आणि तत्सम साडय़ांना प्रेक्षकांनी स्वीकारलंच. बदल स्वीकारण्यासाठी थोडा वेळ देणं हा उत्तम उपाय आहे. असंच नऊवारीचं आहे. बॉलीवूडमधील नऊवारी साडय़ांच्या बदलाचा हा काळ आहे. नऊवारीत काही पटणारे, न पटणारे, आवडणारे, नावडणारे बदल होताहेत. मुळात झगमगाटी, ग्लॅमरस बॉलीवूडला नऊवारीची भुरळ का पडावी? निव्वळ वेगळं काही तरी करण्याचा सोस म्हणून, की खरंच नऊवारी तेवढी आहेच ग्लॅमरस? की एके काळी हिंदी सिनेमा-टीव्ही मालिका आणि जाहिरातींमधून मराठी स्त्री म्हणजे नऊवारी नेसलेली मोलकरीण दाखवणाऱ्या बॉलीवूडचं हे पापक्षालन आहे? की, नव्या दिग्दर्शकांची स्थानिक संस्कृतीची असलेली जाण आहे? काहीही असो, बॉलीवूडमध्ये दाखवली जाणारी मराठमोळी(?) नऊवारी साडी हा चर्चा करण्याचा विषय आहे खरा!

नऊवारीचं फ्यूजन या विषयाला नव्याने तडका देणारं गाणं ठरलं ते ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातलं ‘पिंगा’ हे गाणं. चुकीचा इतिहास, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर, नृत्य, पेहराव या प्रमुख कारणांमुळे हे गाणं उलटसुलट चर्चेत पिंगा घालू लागलं. यातला इतिहासाचा भाग थोडा बाजूला सारू, कारण त्यातही अनेक मतभेद आहेत; पण यातल्या इतिहासानंतर लक्ष जातं ते दोन्ही नायिकांच्या पेहरावाकडे, अर्थात ‘सो कॉल्ड’ नऊवारीकडे. सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी, पण किती? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे; पण या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सहजपणे दुर्लक्ष करून सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे सिनेअभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली विविध प्रयोग केले जातात. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं पुढचं पाऊल म्हणून की काय, आता विशिष्ट प्रांतातील ऐतिहासिक कथा दाखवणाऱ्या सिनेमांमध्ये हवे ते बदल घडू लागले. ‘पिंगा’ हे गाणं त्याचं ताजं उदाहरण. या गाण्यात दोन्ही नायिकांना चक्क कमरेच्या थोडं खाली म्हणजे लो वेस्ट नऊवारी साडय़ा नेसवल्या आहेत. अतिशय बारीक पदर, ओचा नसलेली साडी नऊवारी म्हणायची का, हा प्रश्न रास्त आहे. भव्यता हे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रत्येक सिनेमाचं आकर्षण असतं. तसंच ते ‘बाजीराव मस्तानी’चंही आहे. भन्साळी हे अभ्यासू दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची चूक अपेक्षित नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेत असताना पडद्यावर रंगवत असलेला काळ त्यांनी लक्षात घ्यायला हवा. कोणत्याही ऐतिहासिक कथेतल्या पेहरावातली खात्रीलायकता जपणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. कोणताही इतिहास सिनेमात रंगवताना इतिहासातील घटना, पात्रांची वैशिष्टय़े, तत्कालीन पेहराव, रूढी-परंपरा अशा सगळ्या गोष्टी तपासून घेणं हे सिनेमाच्या संपूर्ण टीमसाठी महत्त्वाचं काम ठरतं. भन्साळींनी सिनेमा करताना ही महत्त्वाची कामगिरी कशा प्रकारे पार पाडली आहे हे सिनेमा बघितल्यावरच कळेल; पण ‘पिंगा’ या गाण्यातून मात्र त्यांनी तत्कालीन पेहरावाविषयीची माहिती करून घेतली नाही असं दिसून येतंय.

वर्षभरापूर्वी आलेला ‘रमा माधव’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांची पसंती मिळवून गेला. पेशवेकालीन या सिनेमाचं कौतुकही झालं. या सिनेमाच्या दिग्दर्शिका-अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणतात, ‘‘‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाच्या ‘पिंगा’ या गाण्यात नायिकांना नेसवलेल्या साडय़ा ब्राह्मणी पद्धतीच्या नाहीत. त्या काळी विशेषत: घरंदाज ब्राह्मण बायका ‘पिंगा’ या गाण्यात दाखवल्याप्रमाणे साडी अजिबात नेसत नसतं. गाण्यात दाखवल्याप्रमाणे नऊवारी साडी कमरेच्या इतकी खाली म्हणजे लो वेस्ट नेसली जात नाही. तसंच ओच्याशिवाय ब्राह्मणी साडय़ांना पूर्णत्व येत नाही. गाण्यात नायिकांच्या साडय़ांना ओचा दिसून येत नाहीय. ब्राह्मणी बायकांचा पदर दोन्ही खांद्यांवर असायचा. गाण्यात तो एकाच खांद्यावर दिसतोय. नाचण्यापुरता तो सोडलाय असं गृहीत धरलं तरी तो खोचलेला असायला हवा. अंगप्रदर्शनाकडे तर अजिबातच कल नसतो. गाण्यातल्या नऊवारी साडय़ांच्या कापडाबद्दलही बोललं जातंय. त्याला कल्पनेची थोडी जोड द्यावीच लागणार.’’

‘पिंगा’ गाण्यामुळे पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा समोर आला आहे. सिनेसृष्टीत वेगळं काही करू पाहण्याचा किंवा हवं ते करू पाहण्याचा परवाना म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अशी व्याख्या करायला हरकत नाही. याच मुद्दय़ावर मृणाल असं सांगतात, ‘ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सिनेअभिव्यक्तीचा वापर करता येत नाही किंबहुना तो करू नये. असे चित्रपट करताना सिनेअभिव्यक्तिस्वातंत्र्य कितपत घ्यावं हा त्या-त्या दिग्दर्शकावर अवलंबून आहे. ‘रमा माधव’ हा सिनेमा करताना मी पेशवे कालखंडावर आधारित काही पुस्तकं वाचली होती. त्यात प्रमोद ओक यांचं ‘पेशवे घराण्याचा इतिहास’ आणि श्रीराम साठे यांचं ‘पेशवे’ या पुस्तकांचा मी आवर्जून उल्लेख करीन. दोन्ही लेखकांचा पेशवे कालखंडावर बराच अभ्यास आहे. साठे यांच्या पुस्तकात फक्त इतिहास नसून पेशवेकालीन घटना, प्रसंग, रूढी, परंपरा, व्यक्तिरेखा, त्यांची स्वभाववैशिष्टय़े, गुण-दोष, वंशावळ, स्त्री व्यक्तिरेखांचं माहेर असे असंख्य बारकावे आहेत. हीच सगळी पुस्तकं मी भन्साळींनाही सुचवली होती. ‘रमा माधव’चा प्रोमो त्यांनी बघितला होता. त्यानंतर आमची चर्चाही झाली होती. त्यानंतर मात्र आम्ही भेटलो नाही. पण, भन्साळींच्या सिनेमातल्या ‘पिंगा’ या गाण्यातील पेहराव चुकीच्या पद्धतीने सादर केला असला तरी या एका गाण्यावरून संपूर्ण सिनेमाचा अंदाज बांधू नये,’ असं मृणाल या सांगतात. ‘रमा माधव’ याच सिनेमाच्या वेशभूषाकार पूिंर्णमा ओक यांचंही म्हणणं तेच आहे. ‘प्रियांका-दीपिका अशा दोघींच्याही साडय़ांना ओचा दाखवला नाही. पेशव्यांची पत्नी असल्यामुळे नऊवारी साडीला ओचा हवाच. ओच्याशिवाय ब्राह्मणी नऊवारी साडी पूर्ण होऊ शकत नाही. पदर, शेला अजिबात व्यवस्थित नाही. तसंच पेशव्यांमध्ये पदर हा दोन्ही खांद्यांवर असतो. हे गाणं बघता एक वेळ असं समजून घेता येईल की, गाण्यात सगळ्या बायकाच असल्यामुळे पदर एकाच बाजूला आहे. कमरेखाली नेसवणं हे जास्त खटकलंय’, असं त्या सांगतात. आताच्या आधुनिक लावणी करताना जो पेहराव दिसतो तशा प्रकारची नऊवारी वाटत असल्याचं त्यांचं मत आहे.

याच गाण्यावरून वर्षभरापूर्वी आलेलं ‘सिंघम रिटर्न्‍स’ या सिनेमातलं ‘आता माझी सटकली’हे गाणं हमखास आठवतं. यातल्या करीनाच्या नऊवारीची चर्चा फारशी झाली नाही, कारण हिंदीतल्या ग्लॅमरस प्रयोगांना प्रेक्षक सरावला असावा बहुधा किंवा त्या सिनेमाचा काळ आजचा असल्याने मराठी प्रेक्षकांनाही ते रुचलं असावं. थ्री-फोर्थ बाह्य़ांचं ब्लाऊज, साडीचा रंग, तिची पारदर्शकता, करीनाचा मेकअप, दागिने, आणि मुख्य म्हणजे तिची पदर घेण्याची पद्धत या प्रत्येक गोष्टीत प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने आपली क्रिएटिव्हिटी पणाला लावली आहे. काही तरी क्रिएटिव्ह करण्यासाठी नऊवारीचे नेहमीचे रंग न वापरता वेगळ्या रंगसंगतीकडे डिझायनर झुकलाय. तसंच थ्री-फोर्थ बाह्य़ांचं ब्लाऊज हाही क्रिएटिव्हिटीचाच एक भाग. अशा प्रकारच्या बाह्य़ांच्या ब्लाऊजची फॅशन अलीकडे सहावारी साडय़ांमध्येही चांगलीच रुजली आहे. मग ती नऊवारी साडीत केली तर हरकत नाही. त्यामुळे हे प्रयोग मान्य केले गेले. नऊवारीवर महत्त्वाचा ठरतो तो दागिन्यांचा साज. खरं तर डिझायनरने त्यातही क्रिएटिव्हिटी करायला हवी होती. सगळ्याच पारंपरिक दागिन्यांचा वापर करावा असा अट्टहास नाही. पण, दागिन्यांमध्ये काही प्रमाणात आधुनिक बदल करायला हवे होते. केशरचना आणि पदर घेण्याच्या पद्धतीमुळे काहींची नाकं मुरडली गेली. पण, इतर गाण्यांच्या तुलनेत या क्रिएटिव्हिटीला प्रेक्षकांनी स्वीकारलं हेही नसे थोडके.

मराठी आणि बॉलीवूड यांचं नातं तसं नवं नाही. मराठी पाश्र्वभूमीवर अनेक हिंदी सिनेमे येऊन गेले. सिनेमाच्या एखाद्या गाण्यात मराठी शब्द किंवा अख्खं एक गाणंच मराठी भाषेवर आधारित असलं की तो त्या सिनेमाचा यूएसपी ठरायचा. ‘मुंगडा’, ‘हमको आज कल है’, ‘मैं कोल्हापूर से आयी हँू’ ही काही गाणी कायम सगळ्यांच्या लक्षात राहिली. संगीत, सादरीकरण, नायिका हे सगळंच देखणं होतं. हा ट्रेण्ड आता पुन्हा बॉलीवूडमध्ये दिसायला लागला आहे. अनेक सिनेमांमध्ये मराठी पाश्र्वभूमी, नायक किंवा नायिका मराठी, एखादं मराठी गाणं यापैकी काही तरी एक असतंच. त्यातही गाणं हवं असेल तर पसंती आपल्या ठसकेदार लावणीलाच. तर ही लावणी सादर करताना तिच्या कोरिओग्राफीसोबत कपडय़ांमध्येही अफाट प्रयोग केले गेले. नऊवारी साडी म्हणजे मराठी वेशभूषा हे समीकरण अमराठी लोकांना कळायला लागलं हे खरं, नऊवारीचं खरं रुपडं फार मोजक्या सिनेमांमधल्या परफॉर्मन्समधून पुढे आलं. बॉलीवूडइतकाच लोकाश्रय टीव्हीलाही मिळायला लागला तेव्हाही हिंदी मालिकांमध्ये मराठी कुटुंबं दिसू लागली. सणासुदीला त्या घरातल्या बायका नऊवारी नेसू लागल्या. काही वेळा सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनही नऊवारी दिसायला लागली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण, रिअ‍ॅलिटी शोजची सुरुवात झाली आणि मराठीची संस्कृती असणारी नऊवारी साडी वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये हरवून गेली. हाच प्रकार बॉलीवूडमध्येही सुरू झाला.

lp12

एक-दीड वर्षांपूर्वी आलेला ‘अय्या’ हा सिनेमा आठवतोय? राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांसारखे या क्षेत्रात मुरलेले लोक असले तरी तो बॉक्स ऑफिसवर फार चमक दाखवू शकला नाही. पण, या सिनेमात राणी मुखर्जीने नऊवारी साडी नेसून ‘सव्वा डॉलर’ या गाण्यावर जे नृत्य केलंय, त्यात तिच्या नऊवारी साडीला, नेसण्याच्या पद्धतीला पैकीच्या पैकी मार्क. गाण्याला कॉमेडी टच देण्याच्या नादात दिग्दर्शकाने, ड्रेस डिझायनरने नऊवारी नेसलेल्या राणीचे केस मोकळे सोडले, तिच्या डोळ्यावर एक मोठ्ठा गॉगल चढवला, तिच्या हातात मोठा रेडिओ दिला आणि पायात स्पोर्ट्स शूज.. सिनेमातलं राणी मुखर्जीची व्यक्तिरेखा बघता असा पेहराव दिला, असा युक्तिवाद इथे होऊ शकतो. असं असलं तरी, हे विनोदी फ्यूजन मात्र प्रेक्षकांच्या फारसं पचनी पडलं नाही. या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी मात्र राणीने योग्य प्रकारे नऊवारी नेसली होती.

कतरिना कैफ ‘अग्निपथ’ या चित्रपटात लावणी करणार, अशा बातम्या पसरल्या आणि तिच्या मराठी चाहत्यांचा अभिमानाने ऊर भरून आला. नऊवारी साडीत कतरिना किती सुंदर दिसेल याची स्वप्नं तिचे चाहते दिवसाढवळ्या बघू लागले; पण ‘चिकनी चमेली’ हे गाणं आलं आणि त्या स्वप्नातून तिचे चाहते खडबडून जागे झाले. खरं तर ते गाणं हिट झालं. त्या गाण्यावर कतरिना बेफाम नाचली, पण त्या ‘आयटम साँग’ला लावणी म्हणायचं असेल, तर कतरिनाच्या सो कॉल्ड नऊवारीबद्दल काही न बोलण्यातच शहाणपण आहे. ‘रिस्क’ या सिनेमात ‘मला लागली कुणाची हिचकी’ या रिमिक्स लावणीमध्ये तनुश्री दत्ताची नऊवारी, ‘जोकर’ या सिनेमामधलं ‘आय वाँट जस्ट यू’ या गाण्यात चित्रांगदाने नेसलेली(?) नऊवारी आणि ‘खिलाडी ७८६’मध्ये ‘लोनली’ या गाण्यात तथाकथित नऊवारी नेसून असीनने दिलेला परफॉर्मन्स ही अशीच उदाहरणं. असिनचा नऊवारीतला लुक खटकत नाही, पण खटकतो तो तिच्या साडीचा पुढचा भाग. या सगळ्याला अपवाद विद्या बालनची ‘मला जाऊ दे’ ही लावणी. ‘फेरारी की सवारी’मधली तिची लावणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. नृत्य, सादरीकरण, नऊवारी साडी, दागिने असं सगळं जमून आल्यामुळे या लावणीचं कौतुक झालं.

सिनेमांमधली फॅशन, भाषा, विचार अशा अनेक गोष्टींचं समाजात अनुकरण होताना दिसतं; पण ते अंधानुकरण होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. नऊवारीचं अनुकरण होताना दिसतं ते तरुणींमध्ये. करिना, कतरिना, ऐश्वर्याने काय घातलं याकडे तरुणींचं जास्त लक्ष असतं. ती फॅशन फॉलो करणं म्हणजे तरुणींसाठी ‘स्टेटस सिंबॉल’ असतं. मग ती फॅशन चांगली असो वा वाईट, शोभणारी असो वा न शोभणारी. बॉलीवूडचा फॅशन फंडा मराठीकडे वळतो आणि मग मराठी कलाकारांचेही चाहते तेच करतात. ही साखळी नवीन नाही. पूर्वीपासून फॅशनचं अनुकरण होत आलंय. म्हणूनच ती फॅशन बाजारातही आजवर दिसत आलीय. रेट्रो स्टाइल कपडे, बेल बॉटम पँट, पलाझो, पटियाला सलवार असे प्रकार बाजारपेठांमध्ये दिसू लागले ते सिनेमांमुळेच. असंच अनुकरण नऊवारीतही झालं तर विशेष आश्चर्य वाटायला नको.

तरुण पिढीमध्ये फॅशनचे ट्रेंड्स बदलताना दिसतात ते बॉलीवूडमुळेच. या ट्रेंड्सचं आयुष्य कमी असतं, पण नवं काही करू पाहण्याची इच्छा तरुणांमध्ये रुजली आहे. यात विशेषत: तरुणींची संख्या जास्त असते. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या विविध प्रयोगांमुळे नऊवारीचं ट्रेंडी आणि आधुनिक रूप आपल्यासमोर आलंय. काही तरी हटके करण्याकडे कल असलेला तरुणींचा वर्ग या ट्रेंडी नऊवारीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघतो. काहींना अशा आधुनिक नऊवारी नेसायला हरकत नाही, तर काहींचा पारंपरिक नऊवारीकडेच कल आहे. काहींना नऊवारीत होत असलेले प्रयोग चालतील, पण विशिष्ट मर्यादेपर्यंत तर काहींना कधी तरी एकदा आधुनिकतेची छटा असलेली नऊवारी नेसण्याचा प्रयत्न करायचा आहे. सिनेमांमध्ये नऊवारीचं आधुनिक रूप खटकणाऱ्या तरुणींमध्ये अर्थातच जास्त संख्या ही मराठी तरुणींची आहे, तर इतर भाषिक तरुणींना त्यात खटकण्यासारखं विशेष असं काही वाटत नाही. सिनेमाचा समाजावर होणारा प्रभाव हे कारण इथे लागू होतं. मराठी तरुणींनी काही मराठी सिनेमा, कार्यक्रमांमध्ये पारंपरिक नऊवारी बघितलेली असते. त्यामुळे खरी नऊवारी कशी असते याची त्यांना माहिती असते; पण सिनेमांमध्ये दाखवली जाणारी नऊवारी हीच बरोबर आहे, असा इतर भाषक मुलींचा समज होतो. नऊवारी नेसण्याची आता फॅशन झाली आहे. त्यामुळे ऑफिस, कॉलेज किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये इतर भाषक मुली नऊवारी नेसण्याला प्राधान्य देतात. त्यांच्या मनात असलेली नऊवारीची प्रतिमा आधुनिक असल्यामुळे प्रत्यक्षातही नऊवारीचं तसंच रूप उतरतं. ते अगदीच वाईट दिसत नाही, असा एक समज पुन्हा नव्याने मराठी मुलींमध्ये रुजू लागतो आणि काही प्रमाणात का होईना आधुनिक नऊवारी साडय़ांचं अनुकरण करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागते. कॉलेजचं  स्नेहसंमेलन, सोसायटींमधील सणांच्या निमित्ताने असलेल्या स्पर्धा, ऑफिसातले पारंपरिक दिवस अशा निमित्ताने आधुनिक नऊवारी डोकं वर काढू लागते. थोडक्यात काय, तर सिनेसृष्टीतल्या नऊवारीतल्या नव्या आणि आधुनिक प्रयोगांना विरोध होत असला तरी त्याकडे फॅशन म्हणून बघितलं जातंय आणि म्हणूनच अशा साडय़ा बाजारांमध्येही आपलं स्थान प्रस्थापित करताहेत.

नऊवारी नेसून लावणीचा परफॉर्मन्स देणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना बॉलीवूडमध्ये दाखवल्या जाणाऱ्या नऊवारी साडीचं रूपडे खटकतं. ‘‘नऊवारी साडीचं सौंदर्य नवनव्या प्रयोगांमुळे कुठे तरी हरवत चाललंय. बॉलीवूडमध्ये नऊवारी साडी कशी नेसतात हे शिकवणारं आणि सांगणारंही कोणी नाही. आजच्या नायिकांना त्यांची फिगर दिसायला हवी असते. त्यामुळे त्या नऊवारी साडी शिवून घेणं पसंत करतात. वास्तविक शिवलेल्या साडीपेक्षा नेसलेल्या साडीत बांधा जास्त चांगला दिसतो हे त्यांना पटत नाही,’’ असं त्या सांगतात. आज मनोरंजन क्षेत्रात नऊवारी साडीत बदल होताना दिसतात. ब्लाऊजच्या बाह्य़ा, पदर घेण्याची पद्धत, कापड अशा साऱ्यांत बदल होताना दिसतात. या बदलांविषयी सुरेखा सांगतात, ‘‘नऊवारीमध्ये होत असलेल्या बदलांना बऱ्याच अंशी आजच्या नायिका कारणीभूत आहेत. त्यांना हवं तसे पोशाख बनवून घेण्यासाठी त्या आग्रही असतात. शिवलेल्या साडीच्या पायांजवळचा भाग पँटसारखा दिसतो. खरं तर शिवलेल्या साडीपेक्षा नेसलेली नऊवारी साडी केव्हाही चांगली; पण नऊवारीचं वजन खूप असल्याने आताच्या मुलींना ती साडी झेपत नाही. नेसलेली नऊवारी पेलवण्यासाठी दणकट शरीर आणि ताकद हवी असते. परफॉर्मन्स करताना साडी सुटू नये, काष्टा सुटू नये, सुटसुटीत वाटावं, फ्लेक्जिबल वाटावं म्हणून साडी शिवून घेण्याचा नायिकांचा आग्रह असतो; पण नऊवारी साडी नेसताना काष्टा कमी-जास्त करणं हे आपल्या हातात असतं. साडी पायात येऊ नये म्हणून किती पायघोळ करावी हेही आपल्याला ठरवता येतं. इतक्या सोयी असताना साडी सुटणं शक्यच नाही.’’ मोरपंखी, राखाडी, लाल, आकाशी, पिवळा, मोतिया हे नऊवारीचे मूळ रंगही आजकाल कमी बघायला मिळतात, याची खंत वाटत असल्याचं त्या नमूद करतात.

मनोरंजन क्षेत्रात सिनेमा, टीव्ही याबरोबरच आता स्पर्धेत उतरलीय ती फॅशन इंडस्ट्री. ही इंडस्ट्री आता केवळ रॅम्पवर चालणाऱ्या शून्य हावभाव असणाऱ्या मॉडेल्सपुरती मर्यादित राहिली नाही, तर यात आता बॉलीवूडचे बडे स्टार्स, खेळाडू, बिझनेसमन-वुमन असे सगळेच उडी मारू लागलेत. म्हणजेच ही इंडस्ट्री आता सिनेमा-टीव्हीच्या हातात हात घालून चालू लागली आहे. फॅशन इंडस्ट्रीचं इतर माध्यमांकडे बारीक लक्ष असतं. यात प्रादेशिक पेहरावही आलेच. विविध प्रांतातील पारंपरिक वेशभूषेकडे या इंडस्ट्रीचं विशेष लक्ष असतं. म्हणून विविध फॅशन शोजमध्ये राजस्थानी घागरा, बंगाली साडी, दक्षिणेकडील पेहराव अशांमध्ये प्रयोग दिसून आले. यात आपली पैठणीही मागे नाही. कोणत्याही फॅशन शोजच्या रॅम्पवर पारंपरिक वेशभूषेला स्थान मिळालं की त्याची एक वेगळी ओळख प्रस्थापित होते. अनेक शोजमध्ये पैठणीवर प्रयोग झालेले आहेत. फॅशन शोजमध्ये होत असलेले प्रयोगशील कपडे नंतर विशिष्ट बडय़ा बाजारपेठांमध्ये विकले जातात. त्यामुळे विविध प्रयोग करत असताना फॅशन डिझायनर्स काळजी घेतात. या कारणामुळेच आजवर फॅशन शोजमध्ये नऊवारी साडीवर होणारे प्रयोग मोजकेच आहेत किंबहुना नाहीयेत. नऊवारी साडीवर फॅशन शोजच्या दर्जाचे प्रयोग केले गेले तर ते विकण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच फॅशन डिझायनर नऊवारीवर प्रयोग करण्याची इच्छा बॉलीवूडमध्ये पुरी करून घेतात.

नऊवारी साडीत होत असलेल्या प्रयोगांविषयी फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे सांगतात, ‘पारंपरिक मराठी कपडे आत्ताची पिढी फारसं वापरत नाही. त्यामुळे नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी नवनवे प्रयोग करावे लागतात. मराठी संस्कृतीच्या अनेक जुन्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हव्यात. त्यामुळे त्यात प्रयोग करत त्या नव्या रूपात त्यांच्यासमोर मांडल्या की त्या स्वीकारल्या जातात. अशा प्रयोगांकडे लोकांचं चटकन लक्ष जातं. त्यामुळे त्यात प्रयोग करणं आवश्यक असतं. प्रयोग करताना मराठी संस्कृतीला कुठेही धक्का लागणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी. मराठी परंपरेचा आणि संस्कृतीचा विचार करूनच आधुनिक टच देत नऊवारी डिझाइन करायला हवी. काही जुन्या डिझाइन ही मराठी परंपरेची ओळख आहे. त्यामुळे त्याच्या मूळ रूपात बदल करणं, त्याची जागा बदलणं हे व्यक्तिश: मला पटत नाही. त्याचं तेच मूळ रूप ठेवून त्यात प्रयोग करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. बॉलीवूडमध्ये काळानुरूप बदल होणारच. नवनवे ट्रेंड आणण्याची इंडस्ट्रीची मागणी असल्यामुळे वेगवेगळे प्रयोग करणं स्वाभाविक आहे. आपल्याकडे लोकांवर बॉलीवूडचा प्रभाव आहे. शिवाय लोकांना सतत काहीतरी वेगळं हवं असतं. मार्केटची तशी गरजच असते. म्हणून नऊवारी साडीत प्रयोग केले जातात. शिवलेली नऊवारी साडी या प्रकाराला मात्र माझा ठाम विरोध आहे.’

अलीकडे रिअ‍ॅलिटी शोजमध्येही नऊवारी साडय़ांवरचे प्रयोग बघून ‘कुठे नेऊन ठेवलीय नऊवारी आमची’ असं म्हणावंसं वाटतं. एका रिअ‍ॅलिटी शोने अमुक केलं की दुसरा शो लगेच तसं करायला सज्जच असतो. हल्ली सगळ्याच रिअ‍ॅलिटी शोजमध्ये प्रादेशिक नृत्यप्रकारांची एक फेरी असतेच. त्यात लावणी सादर होतेच. लावणी करण्यासाठी स्पर्धक मंडळी उत्सुक असतात, पण नऊवारी नेसण्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र सगळेच दोन पावलं मागे सरकतात. एरवी नऊवारीची सवय नसल्यामुळे विशेषत डान्स परफॉर्मन्समध्ये नाचताना नऊवारी साडी सुटेल, फाटेल, सुटसुटीत वाटणार नाही अशा शंका निर्माण होतात. मग शेवटी, शिवलेल्या नऊवारी साडीचा पर्याय निवडला जातो. पण शिवलेली साडी नेसलेल्या नऊवारी साडीचं सौंदर्य घालवते. दुसरा मुद्दा असतो ‘क्रिएटिव्हिटी’चा. चॅनेलची ‘काहीतरी क्रिएटिव्ह करा’ अशी मागणी असते. त्यामुळे क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली अति प्रयोग केले जातात. सध्या फ्युजनचाही जमाना आहे. त्यामुळे नऊवारी नेसून पाश्चिमात्य गाण्यांवर किंवा वेगवेगळ्या नृत्यप्रकारांवर नाचणं हा प्रकारही रिअ‍ॅलिटी शोमध्ये रुजलाय. अनेक नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये लावणी हा नृत्यप्रकार करताना नऊवारी साडी ही शिवून घेतली जाते. मूळ रूपातली नऊवारी अपवादानेच दिसते. त्या अपवादांपैकी एक म्हणजे ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ या शोमधली स्पर्धक आणि मराठी सिनेक्षेत्रातली प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर. फुलवाने ‘दिल चीज क्या है’ या गाण्यावर सादर केलेली बैठकीच्या लावणीच्या उत्तम सादरीकरणाबरोबरच बघण्यासारखी होती तिची नऊवारी. अशाप्रकारच्या फ्युजनला लोक नावं न ठेवता त्याची वाहवाच करतात. यामध्ये गाणं आणि नृत्य यात फ्युजन होतं. म्हणजे गाणं मुजरा नृत्यप्रकारातलं आणि नृत्यप्रकार लावणी असं होतं. इथे गाणं आणि नृत्यप्रकार या दोन्हीलाही धक्का लागला नाही. पर्यायाने नऊवारीचंही मूळ रूप दिसलं.

‘झलक दिखला जा’ या शोमध्ये माधुरी दीक्षितने एका सीझनमध्ये लावणी सादर केली होती. त्यातही तिची नऊवारी, पेहराव, दागिने, दिसणं अगदी देखणं होतं. पण, याच शोमध्ये काही परफॉर्मन्ससाठी इतर स्पर्धकांनी शिवलेल्या नऊवारीला प्राधान्य दिलं होतं. रिअ‍ॅलिटी शोजमध्ये इतर कोणताही नृत्यप्रकार सादर केला की तो झाल्यावर त्या नृत्यप्रकारात किंवा त्यांच्या पेहरावात काही चूक झाली असो वा नसो माफी मागितली जाते. तसं लावणी सादर केल्यानंतर नऊवारीबाबत कोणी बोललेलं फारसं बघितलेलं आठवतही नाही. कथकली हा लोकप्रिय नृत्यप्रकार अनेक रिअ‍ॅलिटी शोजमध्ये अनेकांनी केला. तो हास्य, शृंगार, क्रोध अशा विविध रसांमधून सादर केला आहे. पण त्याच्या पेहरावात कधीच क्रिएटिव्हिटी केली नाही. म्हणजेच नऊवारी या मराठी पेहरावाला गृहीत धरलं जातंय असं चित्र दिसून येतं.

‘झलक..’च्या एका सीझनमध्ये मेघना मलिक ही सेलिब्रेटी स्पर्धक होती. एका भागात तिने लावणी आणि चा चा चा असं फ्यूजन केलं होतं. चा चा चा हा परदेशी नृत्य प्रकार आहे. सध्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये हा प्रकार अनेकदा बघायला मिळतो. त्यात तिने नऊवारी साडी नेसली होती आणि तिच्या ब्लाऊजचा एका हात पूर्ण बाहय़ांचा आणि दुसरा बिनबाहय़ांचा होता. ‘क्रिएटिव्हिटी’ म्हणून हेही स्वीकारलं गेलं. याच शोमध्ये तारा पोपोविच ही परदेशी सेलिब्रेटी स्पर्धक. एका एपिसोडमध्ये ग्रुप अ‍ॅक्टमध्ये ती घरातली कामवाली बाई झाली होती. कामवाली बाई म्हटलं की, ती नऊवारीतच असली पाहिजे हा समज इंडस्ट्रीत अजूनही तसाच आहे. तिची नऊवारी म्हणजे गुडघ्याच्या जेमतेम वर एवढीच उंची असलेली एक घट्ट स्लॅक्स, काठापदराचं नऊवारीसदृश कापड कमरेभोवती गुंडाळून कसाबसा खोचलेला काष्टा, त्या कापडाचा फक्त काठ एवढाच पुढून घेतलेला पदर आणि स्पोर्ट्स शूज. फ्यूजन प्रकारही प्रेक्षक आता हळूहळू स्वीकारतोय; पण या परफॉर्मन्सने फ्यूजनचं टोक गाठलं होतं. सब टीव्हीवरच्या ‘तू मेरे अगल बगल है’ या एका शोमधल्या कामवाल्या बाईचा नव्वारीतला अवतारही बघण्यासारखा आहे. तुलनेने मराठी सिनेमांमध्ये असे प्रकार फारसे बघायला मिळत नाहीत. तशी अपेक्षाही नाही, पण मराठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये मात्र नऊवारीचे प्रयोग सर्रास बघायला मिळतात. ‘एकापेक्षा एक’, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’, ‘ढोलकीच्या तालावर’ अशा कार्यक्रमांमधून याचा प्रत्यय येतो. इथे हिंदीचं अनुकरण दिसून येतं. मराठी पुरस्कार सोहळ्यांची तर संख्या अलीकडे वेगाने वाढतेय. हिंदी-मराठी गाणी एकत्र करून त्याच त्या नायिका परफॉर्मन्स देतात. या परफॉर्मन्सेसमध्ये त्यांचा ठरलेला पेहराव म्हणजे आधुनिक नऊवारी; पण लाइव्ह कार्यक्रम असतो तेव्हा नऊवारी सुटू नये म्हणून ती शिवून घेण्याचा सुवर्णमध्य गाठतात. बटबटीत रंग वापरून अक्षरश: नऊवारीला पँटसदृश स्वरूप दिलं जातं. तरी अशा कार्यक्रमांना मोठय़ा संख्येने प्रेक्षकवर्ग मिळतो.

नऊवारी नेसून नीट परफॉर्मन्स देता येणार नाही, असं अनेकींना वाटत असतं. त्यामुळे त्या शिवलेली नऊवारी नेसतात किंवा डिझायनरही वेगळा लुक द्यायचा म्हणून नऊवारीमध्ये फ्यूजन करतात. कोरिओग्राफर फुलवा खामकर एक वेगळा मुद्दा मांडतात, ‘‘एखादा पोशाख मॉडिफाय करायला हरकत नाही, पण त्याला एक विशिष्ट मर्यादा हवी. मुळात एखाद्या गाण्यातली नऊवारी नायिकेने नीट कॅरी केली नसेल तरच खटकते. ‘सैलाब’मधलं ‘हमको आजकल है’ या गाण्यातली माधुरीची नऊवारी हे उत्तम उदाहरण आहे. माधुरीने नेसलेली साडी खटकली नाही, पण तसाच पोशाख ‘अग्निपथ’मध्ये ‘चिकनी चमेली’ या गाण्यात कतरिना कैफने केला आहे, तो मात्र अनेकांना खटकला. याचं मुख्य कारण म्हणजे ते नृत्य एखादी नायिका किती नजाकतीने करते हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे नायिकेच्या सादरीकरणावरही तिचा पोशाख खटकणं, न खटकणं हे अवलंबून असतं. तसंच विद्या बालनचं ‘मला जाऊ दे’ हे गाणं. तिने नऊवारी साडी चांगल्या प्रकारे नेसली होती, पण तिच्यात इतकी ग्रेस नसल्यामुळे ते थोडंसं खटकलं. गाण्यांनुसार कपडय़ांमध्येही प्रयोग करत राहण्याला माझा विरोध नाही. घागरा-चोलीवर अनेक प्रयोग केले जातात. मग नऊवारीमध्ये करायला काय हरकत आहे?’’

नऊवारी साडीमध्ये प्रयोग करायला किंवा ती फ्यूजन स्टाइलने सादर करायला काहीच हरकत नाही. मनोरंजन क्षेत्र हे क्रिएटिव्हिटीचं क्षेत्र आहे. इथे नवनवीन प्रयोग होणारच. त्यांना स्थानही मिळणार. ‘आऊट ऑफ द बॉक्स’ गोष्टी बघण्यासाठी उत्सुक असलेला प्रेक्षकही अशा गोष्टींना प्रतिसाद देतो. हे फक्त कपडय़ांबाबतच नाही, तर संगीत, कथा, सिनेमाटोग्राफी, दिग्दर्शन, नृत्य अशा सगळ्याच माध्यमांमध्ये प्रयोग होत असतात. प्रयोग, नावीन्य हे तर जिवंतपणाचं लक्षण. म्हणून ते हवंच; पण एखाद्या न आवडलेल्या प्रयोगावर, बदलावर प्रतिक्रिया देणं हेही तितकंच जिवंतपणाचं लक्षणच. म्हणूनच मराठी संस्कृतीचं प्रतीक असलेली नऊवारी साडी फ्यूजनच्या नावाखाली भलत्याच पद्धतीने दाखवली जाते तेव्हा ते खटकणार. त्याहीपेक्षा जास्त नऊवारी साडीला गृहीत धरलं जातंय आणि त्यावर कोणीही काहीही विशेष बोलत नसल्यामुळे अशा प्रयोगांचं पेव फुटतंय; पण मनोरंजनसृष्टीतल्या बदलांची सवय होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. प्रेक्षकही सिनेसृष्टीत होत असलेले बदल, प्रयोग स्वीकारतो, किंबहुना स्वीकारायला हरकत नाही.

lp13साडीचे बदलत गेलेले ट्रेंड

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. या गरजा पूर्ण कशा केल्या जातील याचा सतत विचार केला जायचा. पण, काळानुसार या मूलभूत गरजांमध्ये बदल होत गेला, किंबहुना त्यांच्या संख्येत वाढ होत गेली. अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी, पैसा, गाडी अशी ही यादी वाढत गेली. वास्तविक आपल्या खऱ्या मूळ गरजांमधली वस्त्र ही गरज अंग झाकण्यासाठी होती. पण, आता नेमकं त्याविरुद्ध होतंय. भारतीय समाजावर मोठा प्रभाव आहे तो सिने इंडस्ट्रीचा. तिथे जे घडतं, घडवलं जातं त्याचं प्रतिबिंब समाजावर उमटतं. मूलभूत गरजा आणि भारतीय सिने इंडस्ट्री यांचा एकमेकांशी जोडल्या गेलेल्या संबंधाला एक कारण आहे. मनोरंजन विश्वात साडीमध्ये होत असलेला लाक्षणिक बदल. पूर्वी अंग झाकण्यासाठी साडीचा वापर केला जायचा. आता नेमकं याउलट चित्र बघायला मिळतंय. आता सुंदर नाही तर ‘सेक्सी’ दिसण्यासाठी सिनेमांमध्ये नायिकांभोवती साडी गुंडाळली जाते. ‘सेक्सी’ दाखवण्यामुळे तिचं सौंदर्य  हरवून जातंय. हा ट्रेंड अंग प्रदर्शनाकडेच अधिक झुकतोय. पुरुषांच्या दृष्टिकोनातून एखादी बाई सेक्सी दिसणं म्हणजे नेमकी कशी दिसायला हवी याचा रीतसर अभ्यास करून सिनेमातील मंडळींनी अशा सो कॉल्ड साडय़ांचा शोध लावला. आणि हा ट्रेंड सुरू झाला तो झालाच. आता त्याला पूर्णविराम नाही. उलट एखादी साडी नेसल्यावर नायिका जास्तीत जास्ती किती एक्सपोझ होईल याकडे बारीक लक्ष ठेवलं जातंय.

‘प्यार हुआ इकरार हुआ है’ हे गाणं आजच्या पिढीच्याही ओठांवर असतं. याचं मुख्य कारण म्हणजे हे गाणं. तर दुसरं कारण म्हणजे याचं सादरीकरणं. खरं तर सादरीकरण फार आकर्षक किंवा वेगळं नाही. पण, तरी त्यातला साधेपणा हा मन जिंकून जातो. त्यात नर्गिसने नेसलेली साडी साधी-सुंदर होती. अर्थात त्या काळी हे ‘सेक्सी’, ‘एक्सपोझ’ फॅक्र्ट्स रूढ झाले नव्हते. त्यामुळे तेव्हा आतासारख्या चित्राची अपेक्षा करणंही तसं चुकीचंच. तर, त्या गाण्यातली नर्गिस पावसाने चिंब झालेली असली तरी साडीत ती पूर्ण झाकलेली होती. आता पावसातलं एखादं गाणं शूट करायचं असेल तर मुद्दाम त्या नायिकेला साडी नेसवली जाते. कारण एकच- ती सेक्सी दिसायला हवी. मग रंगांपासून ते ती साडी नेसवण्याच्या पद्धतीपर्यंत एक ना हजार प्रयोग केले जातात. जुन्या काळातल्याच मधुबाला, वैजयंतीमाला, मीना कुमारी, माला सिन्हा या नायिकांनी अनेक सिनेमांमध्ये साडय़ा नेसल्या होत्या. पण, त्यांचं सौंदर्य खुलून दिसत होतं. थोडं आणखी पुढे जाऊ या. शर्मिला टागोर, आशा पारेख, सायरा बानू, मुमताज या नायिकाही वेगवेगळ्या सिनेमांमध्ये साडय़ांमध्ये दिसल्या. त्यांची गाणीही गाजली. मुमताजचं ‘जय जय शिव शंकर’ हे गाणं, शर्मिला टागोरचे ‘आराधना’, ‘अमर प्रेम’ हे सिनेमे, आशा पारेख यांच्या ‘लव्ह इन टोकियो’ या सिनेमातल्या साडय़ा हे सगळं काही देखणं होतं. आशा पारेख आणि नंतर रेखा यांनी स्लीव्हलेस ब्लाऊजचा ट्रेंड सुरू केला.

पुढे सेव्हंटीच्या काळापासून नवनवे प्रयोग करण्याला हळूहळू सुरुवात होऊ लागली. स्मिता पाटील, रेखा, हेमा मालिनी, नीतू सिंग, शबाना आझमी, जया बच्चन, जीनत अमान यांचे साडी नेसण्याचे वेगवेगळे प्रकार प्रेक्षकांना दिसू लागले. तेव्हापासून ‘सेव्हंटीची साडी’ असा जणू एक ब्रँड तयार झाला. इथून डिझायनर साडय़ांना सुरुवात झाली. पण, या ट्रेंडचा वेग कमी होता. तो श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, रती अग्निहोत्री, माधुरी दीक्षित, जुही चावला यांच्या काळात आणखी दोन पावलं पुढे गेला. साडय़ांच्या रंगांमध्ये तसंच प्रकारांमध्येही बदल होऊ लागले. श्रीदेवीचं ‘मिस्टर इंडिया’मधलं ‘काटे नहीं कटते’ हे गाणं आलं आणि पारदर्शी आणि प्लेन साडय़ांचा ट्रेंड आला. पुढे करिश्मा कपूर, रविना टंडन, काजोल, शिल्पा शेट्टी, तबू यांच्या जमान्यात थोडं आणखी पुढे जाऊन साडय़ांमध्ये वैविध्य येत गेलं. आता जमाना आला तो ट्रेंडी साडय़ांचा. हे खरं तर वेगळं सांगायला नकोच. पण, ट्रेंडी साडय़ांपेक्षा अंग प्रदर्शन करण्याचा ट्रेंड असं म्हणावं लागेल.

हिंदी सिनेमा किंवा मालिका, रिअ‍ॅलिटी शोजमध्ये आता साडी ही अंगप्रदर्शनाचं माध्यम म्हणून वापरली जाते. क्रिएटिव्हिटी, प्रयोग, नावीन्य देण्याच्या नादात बॉलीवूड नगरी अंगप्रदर्शनाकडे झुकतेय. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून आलेल्या साडय़ांच्या परंपरेचं सौंदर्य हरवत चाललंय. काळानुसार बदल करणं हे अगदीच स्वाभाविक आहे. पण, अंगप्रदर्शन करता प्रयोग नक्कीच केले जाऊ शकतात. बॉलीवूड आणि पाऊस हे अतूट नातं आहे. एखाद्या सिनेमात एखादं पावसाचं गाणं असलंच तर ते जास्तीत जास्त आकर्षक करण्याचा सिनेमावाल्यांचा आटापिटा असतो. आकर्षक दिसण्यासाठी सिनेमाच्या नायिकेशिवाय दुसरा पर्याय नसतो. तसंच साडीत स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यामुळे साडी, पाऊस आणि हिंदी सिनेमा हेही गणित इथे फिट्ट बसतं. म्हणूनच अशा गाण्यांमध्ये नायिकांना साडी नेसवली (खरं तर गुंडाळली) जाते. रविना टंडनची ‘मेहरा’ मधल्या ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यातली साडी गाजली. श्रीदेवीच्या ‘काटे नहीं कटते’ या साडीपासून पारदर्शी साडय़ांचा ट्रेंड आला. रविनाच्या गाण्यापासून त्यात वाढ झाली. हळूहळू करिना, प्रियंका, कतरिना यांची यादीत भर पडली. करिनाचं ‘थ्री इडियट्स’मधल्या ‘झुबी डूबी’ गाण्यातली तिची नारंगी साडी हे त्याचं उदाहरण. ‘कुछ कुछ होता है’ मधल्या काजोलनेही सिनेमाच्या उत्तरार्धात अशा पारदर्शी साडय़ा नेसल्या आहेत.

‘मैंने प्यार क्यू किया’ आणि ‘मैं हू ना’ या सिनेमांमधल्या सुश्मिता सेनच्या चर्चेचा विषय बनल्या. पारदर्शी साडय़ांपर्यंत ठीक होतं. पुढे ट्रेंड आला तो स्लीव्हलेस, स्ट्रीप्स, बॅकलेस, वन शोल्डर ब्लाऊजचा. यात लो वेस्ट साडीचा ट्रेंड लक्षवेधी ठरला. जीन्समध्ये लो वेस्ट प्रकार रुजू होताच त्याने साडी या प्रकारातही चांगली जागा मिळवली. साडीतही लो वेस्ट हा प्रकार सुरू झाला. मग लो वेस्ट पारदर्शी साडय़ांची रांगच रांग लागली. पूर्वी साडी नेसली की पोट झाकलं जायचं. पण, आता लो वेस्ट हे फॅशन स्टेटमेंट असल्याचं म्हणत साडी एक्सपोझ करण्याचं माध्यम झाली. ‘डर्टी पिक्चर’ हा सिनेमा विद्या बालनच्या साडय़ांमुळे विशेष लक्षात राहीला. सिनेमाच्या विषयाला अनुसरून तिचा लुक ठरवलेला असला तरी त्यात एक्सपोझरच जास्त होतं.

फॅशन डिझायनर शामली अरोरा सांगतात, ‘बॉलीवूडमध्ये सेक्सी दिसणं चुकीचं नाही.  साडी लपवण्यासाठीही उत्तम आणि दाखवण्यासाठीही उत्तमच. साडीला ‘पारंपरिक’ म्हणून जुनाट असा टॅग लावला तर तरुण पिढी त्याकडे फारशी बघत नाही. त्यात काळानुसार बदल  केले तर नवी पिढी आकर्षिली जाते. साडीत वेगवेगळे प्रयोग केल्यावर ते वल्गर दिसते असं नाही. साडीमध्ये वैविध्य दाखवण्याचा वाव आहे. अशाने साडीची वेगवेगळी सुंदर रूपं दिसतात. साडी नेसवण्याच्या पद्धतीवरही टीका केली जाते. साधीच साडी केवळ नेसवण्याच्या अनोख्या प्रकारामुळे उठून दिसते.’

कतरिना कैफच्या ‘दे दना दन’मधल्या ‘गले लग जा’ आणि ‘सिंग इज किंग’मधल्या ‘तेरी ओर’ या गाण्यामधली साडी, दीपिका पदुकोणची ‘ये जवानी है दिवानी’मधल्या ‘बत्तमीज दिल’ या गाण्यातली साडी ही उदाहरणं ट्रेंडी, फॅशनेबल गटात मोडणारी असली तरी त्यात क्रिएटिव्हिटी म्हणून अनेक प्रयोग केले गेले. साडीचा पदर काठाइतकाच असेल याची खबरदारी त्या गाण्याच्या फॅशन डिझायनरने घेतलेले होती बहुधा. बॅकलेस ब्लाऊज, मोठय़ा गळ्यांचा ब्लाऊज हे आता फारच बेसिक वाटायला लागलंय. ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ या दोन्ही सिनेमांमध्ये सोनाक्षी साडी खटकणारी नाही. पण, ब्लाऊजमध्ये क्रिएटिव्हिटी करून सगळ्या साडय़ांवर मोठे गळे शिवले आहेत. साडी नेसवण्याच्या पद्धतीत, ब्लाऊजमध्ये प्रयोग होतातच. असाच प्रकार ‘बॉम्बे टॉकीज’च्या एका शॉर्टफिल्ममध्ये राणी मुखर्जीच्या बाबतीत बघायला मिळतो. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या ऑफिसात काम करणारी राणी दिसली खूप ग्लॅमरस. पण, तिच्याही ब्लाऊजचा सोनाक्षीसारखाच प्रकार केला गेलाय. ‘आशिकी २’मधली श्रद्धा कपूरची साडीही एक्सपोझ करणारीच आहे.

थोडक्यात काय तर, साडीत स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं असं नेहमी म्हटलं जातं. पण, मोठय़ा पडद्यासाठी सुंदर दिसण्याबरोबरच सेक्सी, एक्सपोझिव्ह दिसणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे अंगप्रदर्शन करण्याचा प्रकार बोकाळला आहे. या सगळ्यामुळे साडीचे नवनवे ट्रेंड, फॅशन, डिझाइन्स असं सगळं प्रेक्षकांच्या माहितीचं होतंय हे खरंय पण, अगंप्रदर्शनाचं हक्काचं साधन म्हणजे साडी असं व्हायला नको म्हणजे मिळवलं.. !!

दीपिका-प्रियंकाच्या ‘पिंगा’ या गाण्यामुळे पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील नऊवारी साडय़ांवर केल्या जाणाऱ्या प्रयोगांबद्दल चर्चा होऊ लागली आहे

lp78सुटसुटीतपणा नेसलेल्या नऊवारीतच

नऊवारी साडीचं महत्त्व पूर्वीच्या काळात फार होतं. आजसारखं बाहेर फिरणं, शिक्षण, मित्रमैत्रिणी असं नव्हतं. कुठे बाहेर जायचं असेल तर कोणी सोबत असेल तरच जाण्याची परवानगी असे. मुलीची पाळी सुरू झाली म्हणजे खऱ्या अर्थाने ती मोठी झाली की, नऊवारी साडी तिची सोबतीण झालीच म्हणून समजा. तेव्हाच्या काळात मुलींना १३-१४ वर्षांपासूनच नऊवारी नेसावी लागे. मीही वयाच्या तेराव्या वर्षांपासून नऊवारी नेसतेय ती आज ७४ वर्षांपर्यंत. नऊवारी केवळ नेसायला लागून चालत नव्हतं. तर ती प्रत्येक मुलीला आपली आपण नेसताही यावी लागे. माझ्या आईने मला ती नेसवायला शिकवली. आजही मी चापूनचोपून, व्यवस्थित नेसते. नऊवारी साडी म्हटली की आजच्या मुलींच्या कपाळावर आठय़ा पडतात. तर काही मुलींना नऊवारी साडी नेसायला आवडते. पण, नऊवारी साडी सुटेल की काय याची चिंता असते. म्हणून त्या नऊवारी साडी शिवून घेतात. पण, वास्तविक शिवलेल्या साडीपेक्षा नेसलेली साडी कधीच सुटत नाही. तसंच ती दिसायलाही वेगळी दिसते. शिवलेल्या साडीचा पदर हा नेसलेल्या साडीपेक्षा कमी असतो. तसंच पुढच्या बाजूचा ओचाही व्यवस्थित मिळत नाही. मिळाला तर तो नीट दिसेलच याची खात्री नाही. त्यामुळे नऊवारी साडीचं सौंदर्य लपून जातं. नेसलेल्या नऊवारी साडीचा पुढच्या बाजूचा ओचा खोचला, की ती बाई वेगाने ऊठबस करत काम करू शकते. पण, हे आजच्या मुलींना फारसं पटत नाही. आज आपल्या या पारंपरिक पोशाखात अनेक बदल होताना दिसतात. जग फार पुढे जातंय पण, किती पुढे जावं याचाही विचार झाला पाहिजे.
निर्मला गाडगीळ, ठाणे

 

lp14लो वेस्ट हा ट्रेंड

‘पिंगा’ हे गाणं आणि त्या दोघींचं नृत्य मला आवडलं. प्रश्न उरला त्यांच्या वेशभूषेचा. त्या काळात साडय़ा कशा नेसल्या जायचा याची मला माहिती नाही. पण खूप दिवसांनी अशा दोन अभिनेत्री एकत्र सुंदर नाचताना दिसताहेत हे किती छान आहे. ऐतिहासिक सिनेमे बनवले की लोक त्याकडे नकारात्मक दृष्टीनेच जास्त बघतात. ‘लो वेस्ट नऊवारी’ याकडे मी ट्रेंड आणि प्रयोग म्हणून बघते. सध्या मुली सहावारी साडी नेसतानाही लो वेस्टच नेसतात. लो वेस्ट नऊवारी नेसण्याचा प्रयोग करायला मलाही आवडेल.
जेसिका डिसूजा, मुंबई

मी नाही करणार प्रयोग

मी संजय लीला भन्साळी, प्रियंका आणि दीपिका यांची चाहती आहे. त्यामुळे माझ्यावर तरी त्या गाण्याचा खूपच चांगला प्रभाव पडला. कोणत्याही पारंपरिक पेहरावाची परंपरा जपूनच तो घालावा असं  मला वाटतं. केवळ नऊवारीच नाही तर इतरही साडय़ांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसतातच. तेही काहीवेळा खटकतात. पण, तरी ते तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत. नऊवारीमध्ये होत असलेले प्रयोग मला खटकणारे वाटत नसले तरी प्रत्यक्षात मी अशा प्रकारची नऊवारी नेसणार नाही.
आरती तोमर, मुंबई

lp15नऊवारी पारंपरिकच खरी

‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमासाठी बरंच संशोधन, अभ्यास झाला असेल असं वाटलं होतं. पण, हे गाणं बघितलं आणि अपेक्षाभंग झाला. ऐतिहासिक सिनेमांमध्ये प्रयोग करताना पेहरावांमध्ये प्रयोग करू नये. कारण ऐतिहासिक सिनेमांमध्ये विशिष्ट काळातील विशिष्ट व्यक्तिरेखा प्रस्थापित होत असते. दुसरं म्हणजे सिनेमांमध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टींचं अनुकरण होत असतं. ‘पिंगा’, ‘आता माझी सटकली’ अशा अनेक गाण्यांमधून लो वेस्ट नऊवारीचा ट्रेंडही मुलींकडून फॉलो केला जाईल. मला मात्र नऊवारी पारंपरिक पद्धतीनेच नेसायला आवडते.
कल्पिता जोशी, मुंबई

लोकांची नाराजी समजून घ्या

‘पिंगा’ या गाण्याबद्दल मराठी प्रेक्षकांच्या मनात असलेली नाराजी मी समजू शकते. कारण ‘चेन्नई एक्स्प्रेस’या सिनेमाच्या वेळीही असंच झालं होतं. केरळचा पेहराव चेन्नईमध्ये दाखवला होता. मी तिकडीची असल्यामुळे मलाही त्यावेळी वाईट वाटलं होतं. त्यामुळे नऊवारी साडय़ांमध्ये होत असलेल्या प्रयोगांबद्दलची हरकत मी समजू शकते. तसंच ऐतिहासिक किंवा विशिष्ट काळातला सिनेमा असेल तर त्यांच्या पेहरावातील खात्रीलायकता जपलीच गेली पाहिजे. तसंच, त्याकडे एक मनोरंजनाचं माध्यम म्हणून बघावं, असंही सांगेन. सिनेमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या नऊवारी साडय़ा बाजारात येणार यात शंका नाही.
पूजा नायर, मुंबई

lp16सारासार विचार हवा

मुळात लो वेस्ट नऊवारी हा प्रकारच मला पटत नाही. नऊवारीच्या पारंपरिक रूपात जे सौंदर्य आहे ते इतर रूपांमध्ये नक्कीच नाही. ‘सिनेमाच आहे. बघून सोडून देऊ’ असं म्हणून चालत नाही. पारंपरिक नऊवारी साडी अलीकडच्या काळात काही अपवाद वगळता सिनेमांमध्ये दिसत नाही. नऊवारी साडय़ांचं अनुकरण मुली करतात. पण, अनुकरण करताना सारासारविचार केला जावा.
जुईली म्हात्रे, मुंबई

lp17पारंपरिकता जपायला हवी 

कोणत्याही पारंपरिक गाण्यांच्या पेहरावामध्ये प्रयोग करायचाच असेल तर त्या-त्या पारंपरिक पद्धतीला धक्का न लावता केला पाहिजे. ‘पिंगा’ गाण्यात नेमकं हेच चुकलं. पारंपरिक प्रकारच्या साडय़ांमध्ये असे प्रयोग करायला हरकत नव्हती. पण, पिंगा गाण्यात चुकीच्या पद्धतीने साडय़ा सादर केल्यामुळे चर्चा सुरू झाली. सिनेमात दाखवली जाणारी नऊवारी तशीच असते असं इतर भाषकांना असं वाटू शकतं. असंच मराठी भाषकांना इतर प्रांतातल्या पारंपरिक गोष्टींबद्दल वाटू शकतं. त्यामुळे प्रेक्षकांनाही कळायला हवं की सिनेमांमध्ये दाखवलं जातं ते पूर्ण बरोबरच असतं असं नाही. मला पारंपरिक नऊवारी साडीच नेसायला आवडतं. पण, मुली अशा प्रकारचा ट्रेंड फॉलो करतात. ‘कधीतरी नेसतो तर काही तरी वेगळ्या प्रकारे नऊवारी नेसूया नऊवारी’ असं म्हणण्याकडेही मुलींचा कल असतो.
मंजिरी साटम

lp18पोशाखाचं वैभव टिकवा

नऊवारी साडी ही आपली संस्कृती आहे. बॉलीवूडमध्ये एखाद्या गाण्यात मराठी टच द्यायचा झाला तर त्यासाठी लावणी आणि पर्यायाने नऊवारी साडीच दाखवली जाते. हे मला पटत नाही. मनोरंजन क्षेत्रात एक्सपोझर नवं नाही. पण, एक्सपोझरसाठी नऊवारी साडीमध्ये मर्यादेपलीकडे प्रयोग केले जातात. पण प्रत्येक पोशाखाचं एक वैभव असतं. ते तसंच टिकून राहायला हवं. ‘आजच्या तरुण पिढीला हेच आवडतं’ या नावाखाली तरुणांना आकर्षित करण्यासाठी असे प्रकार घडतात. पण, सगळ्या तरुणाईला हे आवडतच असं नाही. बॉलीवूडमध्ये या ना त्या कारणाने नऊवारी साडी लोकांपर्यंत पोहोचतेय या समजाला मी पाठिंबा देत नाही. कोणत्याही पोशाखाचं मूळ रूप टिकून राहिलंच पाहिजे. इथे प्रयोग करता करता त्याचं मूळ रूपच कुठेतरी हरवत चाललं आहे. नऊवारी साडी जशी आहे तशी स्वीकारा, नाही तर वापरू नका. नऊवारी ‘कॅरी’ करता यावी म्हणून तिची रेडीमेड साडी झाली. त्यावर केस मोकळे सोडून तिला स्टायलिश बनवलं गेलं. पण, वन पीस ‘कॅरी’ करता तसं अंबाडा, बुगडी वगैरे घालून नऊवारी का ‘कॅरी’ करत नाही?
ऐश्वर्या शेवाळे, अहमदनगर</strong>

lp19फ्युजन करा, पण…

बॉलीवूडमध्ये होत असलेले नऊवारी साडीच्या प्रदर्शनातले बदल काळानुरूप आहेत. पण, त्यालाही काही मर्यादा आहेत. त्या ओलांडल्या की, संस्कृतीचं ओंगळवाणं प्रदर्शन दिसतं. जुन्या काळातल्या नायिकांमधली सोज्वळता, शालीनता आजच्या नायिकांमध्ये हरवलेली दिसते. बदल करताना थोडंसं आधुनिकीकरण केलेलं अगदीच चालू शकतं. पण, तेही सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून. लावणी आणि दुसरा एखादा नृत्यप्रकार यांचं फ्युजन दाखवताना दोन्हीतला इसेन्स टिकून राहिला पाहिजे. पण, दुर्दैवाने तसं होत नाही. अशा प्रयोगांना तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळतो असा इंडस्ट्रीचा समज आहे. पण, तरुणाई एखादी गोष्ट डोक्यावर घेते, तेवढाच त्याचा विरोधही करू शकते.
मुग्धा जोशी, नाशिक

सौंदर्य जपलं पाहिजे

नऊवारीत आता रेडीमेड साडय़ांचा जमाना आला. त्यातही विविध प्रयोग होत असतात. तेही काळानुरुप स्वीकारायला हवेत. हे प्रयोग आधुनिकीकरणच्या नावाखाली वाट्टेल ते बदल करु लागले तर मात्र त्याला माझं समर्थन नाही. आज वेळ नसल्यामुळे मुली शिवलेल्या साडय़ांना प्राधान्य देतात. नऊवारीचं पारंपरिक सौंदर्य जपून प्रयोग केले तर दोन्ही गोष्टी जमून येतील.
अनिता जाधव, कोल्हापूर

lp20स्वीकारायला हवं

आजकाल फॅशन दर आठवडय़ाला बदलते. एखादा नवा ट्रेण्ड सुरू झाला की त्याची हवा फार तर दोन आठवडे राहते. नंतर दुसरी नवी फॅशन त्यावर येऊन धडकते.  तसंच नऊवारीचं आहे. नऊवारी साडी बॉलीवूडमध्ये दाखवणं तसं नवं नाही. आता त्यात ते आधुनिक बदल केले जातायत ते स्वीकारायला हवं. मला वाटतं, बॉलीवूड हे असं माध्यम आहे की ज्यामध्ये लहानातली लहान गोष्टही ठळकपणे दिसते. त्यामुळे या माध्यमातून काही गोष्टी समोर येत असतील तर त्या चांगल्याच आहेत. बॉलीवूडमध्ये नऊवारी साडी वेगवेगळे प्रयोग करून दाखवली जात असल्यामुळे तरुणांना तसंच इतर भाषिक लोकांना नऊवारी साडीचं महत्त्व, माहिती कळतेय. त्यामुळे त्यात होणाऱ्या बदलांकडे आपण सकारात्मकदृष्टय़ा बघितलं पाहिजे. काही वेळा या प्रयोगांमध्ये अतिरेक केला जातो हे मान्य असलं तरी ते स्वीकारण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.
ऋत्विज आपटे, पेण

lp21क्रिएटिव्हिटी येणारच

बॉलीवूडमध्ये होत असलेल्या नऊवारी साडीच्या प्रयोगांमुळे तिचा रुबाब हरवलाय असं मला अजिबात वाटत नाही किंवा आपल्या पारंपरिक पोशाखाचा अपमान होतोय असं त्यातून होत नाही. असं असतं तर ‘लुंगी डान्स’ या गाण्यानंतर दक्षिणेकडची लोकं त्यांच्या पारंपरिक पोशाखाबद्दल बोलली असती. त्यामुळे बॉलीवूडमध्ये इतर अनेक पारंपरिक पोशाखांमध्ये वेगवेगळे प्रयोग होत असतात. या इंडस्ट्रीत प्रयोग होणं हे अगदीच स्वाभाविक आहे. त्यामुळे हे स्वीकारायलाच हवं. क्रिएटिव्ह क्षेत्रात क्रिएटिव्हिटी ही होणारच. त्यात आधुनिक व्हायला काय हरकत आहे? मर्यादा सांभाळून क्रिएटिव्हिटी करावी हे मला पटत नाही. मर्यादा आल्या की ती क्रिएटिव्हिटी राहत नाही. त्यामुळे मर्यादा असायला हवी, असं मला वाटत नाही. मराठी अस्मितेचा मुद्दा म्हणून याकडे बघू नये.
भूषण राऊत, पुणे

lp22केवळ प्रदर्शन नको…

नऊवारी साडीमध्ये काही प्रयोग स्वागतार्ह आहेत. पण,  खटकते ती साडीची पारदर्शकता. प्रयोग करायचेच आहेत तर ते रंगांमध्ये करता येऊ शकतात. तसंच नऊवारी साडीचं महत्त्व, माहिती या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचते हा समज मला योग्य वाटत नाही. केवळ नऊवारी साडी दाखवून, तिच्या वेगवेगळे प्रयोग करून सिनेमांतून ती दाखवणं म्हणजे मराठी परंपरा दाखवणं असं होत नाही.
हर्षल खाडिलकर, नाशिक

lp23पण, अतिरेक नको

मुळात नऊवारी म्हणजे नऊ मीटर लांब साडी. पण, सोयीस्कररीत्या त्या लांबीतही बदल केला गेला आहे. असे बदल बॉलीवूडमध्ये होत राहणारच आहेत. कारण तो मनोरंजनाचा एक भाग आहे. बॉलीवूडमध्ये होत असलेल्या एक्सपोझरला मर्यादा निश्चितच हव्यात. अति प्रयोगांच्या नावाखाली एक्सपोझरचा कहर केला जाऊ नये हे खरंय. पण, त्यांच्या मनोरंजनाचा आणि बिझनेसचा एक भाग असल्यामुळे असे प्रयोग होत राहणार. नऊवारी साडी मुळातच खूप सुटसुटीत आणि कम्फर्टेबल असते हे कितीही खरं असलं तरी प्रत्यक्ष परफॉर्म करताना मात्र काही अडचणी येतात. तेव्हा शिवून किंवा अन्य काही पर्यायांनी ती नेसावी लागते हेही तितकंच खरंय.
इशा वडनेरकर, मुंबई

lp24दीर्घकाळ टिकत नाहीत

नऊवारी हा आपला पारंपरिक पोशाख आहे. हिंदी सिनेमा, शोजमध्ये त्याचं जे रूप दिसतं ते त्याची खिल्ली उडवल्यासारखं वाटतं. अशा शोज किंवा सिनेमांमध्ये अनेकदा गाणं वेगळं आणि त्यावर नऊवारी हे कॉम्बिनेशन पटत नाही. असं व्हायला नको.  हिंदी सिनेमा, शोजमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकदा असे प्रयोग केले जातात. पण, असं केलं तर ती फॅशन जितक्या लवकर लोकप्रिय होते, तितक्या लवकर काळाच्या मागेही जाते.
गौरी डोळस, नागपूर

ही तर फॅशनच

‘काहीतरी वेगळं’ देण्याच्या इंडस्ट्रीतल्या वृत्तीमुळे जी नऊवारी दाखवतात तिला वेगळं नाव द्यायला पाहिजे. मी या सगळ्याकडे फॅन्सी ड्रेस म्हणूनच बघते. बॅकलेस, स्लीव्हलेस ब्लाऊज हे प्रकार नऊवारी साडीमध्ये बघायला आवडत नाहीत. नऊवारी साडीकडे बघण्याचा गंभीर दृष्टिकोनच हरवलाय. त्याच्याकडे फॅशन म्हणूनच बघितले जाते. पण, ही फॅशन आली तशी जाईलही.
निलांबरी कुलकर्णी, कोल्हापूर

चैताली जोशी response.lokprabha@expressindia.com
Twitter : @chaijoshi11