devi-ogदीड-एक महिना आधीपासूनच नवरात्रीत कसं तयार होऊन ऑफिस, कॉलेजला जायचं यावर चर्चा सुरू असते. या चर्चेत आता मुलंही असतात. फॅशनमध्ये नवनवीन प्रयोग करण्याकडे तरुणाईचा कल दिसतो. दरवर्षी फॅशनचा ट्रेंड बदलत जातो. यंदाच्या ट्रेंडविषयी..

‘अगं, तुझ्याकडे रंगांची यादी आली का? शेवटच्या दिवशी गडबड नको..’,

Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…

‘पहिल्या दिवशी सगळ्यांनी साडय़ाच नेसायच्या हं.. छान देवीच्या देवळात जाऊन येऊ  कॉलेजनंतर’,

‘बॉस, मी सांगतो, आजचा रंग नारंगी आहे. नारंगी कुर्ता घालूनच जा पंडालमध्ये. नऊ  दिवसांचे रंग पाळतोस हे कळल्यावर सॉलिड इम्प्रेशन पडेल तिच्यावर..’

नवरात्र तोंडाशी आली की, हे संवाद हमखास कॉलेजच्या कट्टय़ावर आणि ऑफिसमध्ये रंगायला लागतात. गणपती बाप्पाला निरोप देत असतानाच सोसायटीच्या पंडलात, मैत्रिणींसोबत देवीच्या मंदिरात जाताना, दांडिया नाइटसाठी काय घालायचं याची उजळणी सुरू होते. नऊ  दिवस मस्ती करायची असली तरी त्या दिवसांमध्ये काय घालायचंय याची तयारी आधीपासून केली नाही, तर ऐनवेळी पंचाईत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

नवरात्रीचे नऊ  दिवस म्हणजे मित्रांसोबत सकाळपासून रात्रीपर्यंत धुडगूस घालण्याची परवानगी असते. एरवी आईच्या ‘लवकर या’ या ताकिदीला या नऊ  दिवसांत गरबा, दांडियाचे कारण देत अल्पविराम मिळतो. सकाळी घरी किंवा सोसायटीमध्ये घरातल्यांच्या मनाप्रमाणे देवीची यथासांग पूजा केली, की प्रश्न मिटला. मग, रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे घरी आलं तरी चालण्यासारखं असतं. त्यात एखाद्या दिवशी पंडाल घरापासून दूर आहे, या कारणाने मैत्रिणीच्या घरी नाइटआऊट करायची परवानगीसुद्धा मिळून जाते. मुलींना या दिवसात नटूनथटून मैत्रिणींच्या गोतावळ्यात मिरवायचं असतं. मुलांना मुलींसमोर इम्प्रेशन मारण्यासाठी या नऊ  दिवसांसारखी उत्तम संधी नसते. पण या सगळ्यासाठी आपलं अपटूडेट असणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे नवरात्रीच्या खरेदीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.

यंदा नवरात्रीच्या मार्केटमध्ये एक फेरी मारल्यावर एकीकडे तुम्हाला खास गुजराती टच असलेले चनिया-चोली, घागरा, ऑक्सिडाइज दागिने पाहायला मिळतीलच. पण, त्यासोबत तुम्ही नवरात्रीमध्ये गर्दीत उठून दिसावेत म्हणून काही अनोख्या पेहरावांची रेलचेलसुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला नऊ  दिवसांमध्ये ‘काय-काय घालू?’ असा प्रश्न पडण्यासाठी मार्केट पूर्णत: सज्ज झालंय. अगदी सुरुवात करायची म्हटल्यास सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येतो तो स्कर्ट किंवा घागरा. लाल, पिवळ्या, काळा, मोरपिशी, गुलाबी अशा रंगात न्हालेला आणि मिरर वर्कमुळे लखलखणाऱ्या घागऱ्याला नवरात्रीमध्ये मुलींची पहिली पसंती असते. मल्टीकलर घागरा तर या काळात हातोहात विकले जातात. गेल्या वर्षी यामध्ये पिटावर्कची भर पडलेली. पण, यंदा प्रिंटेड घागरा किंवा स्कर्ट नक्कीच ट्राय करायला हवे. फ्लोरल प्रिंट यंदा नवरात्र गाजवणार आहे. त्यामुळे नवरात्रीच्या खरेदीच्या यादीमध्ये एक फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट असलाच पाहिजे. त्यासोबत पारंपरिक बुट्टी, कैरीप्रिंट, ग्राफिटी प्रिंटचे स्कर्ट नक्कीच ट्राय करा. अर्थात हे प्रिंट जितके बोल्ड आणि मोठे तितके उत्तम. स्कर्टवर इतर डिटेलिंग नसतील तरी काहीच हरकत नाही. पण एखादी साडीची बॉर्डर, मोठे लटकन, घुंगरू, मिरर यांमुळे तुम्हाला स्कर्टला तुमचा स्पेशल लुक देता येईल.

स्कर्टनंतर प्रश्न येतो चोलीचा. अर्थात क्रॉप टॉप, कॉकटेल ब्लाउज हे दरवेळीप्रमाणे यंदाही तुम्हाला सावरून घेऊ  शकतात. पण, यंदा जरा लांब उंचीच्या कुर्तीजना एक संधी देऊन तर बघा. एम्ब्रॉयडर स्कर्टवर या कुर्तीज नक्कीच शोभून दिसतील. एखाद्या दिवशी प्लेन काळा, लाल किंवा पिवळा स्कर्ट आणि त्यावर छान प्रिंटेड कुर्ता घालायला काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे हा लुक तुम्ही गरबा खेळताना तर कॅरी करू शकताच, पण देवीच्या पूजेसाठीसुद्धा चालून जाईल. मागच्या सिझनपासून पारंपरिक साडय़ांपासून तयार केलेले एथनिक ड्रेसेस चर्चेत आहेत. त्यामुळे नवरात्रीमध्ये आजीच्या स्टाइलचं लहानपणी घालायचो तसं परकर पोलकं शिवून घ्यायला हरकत नाही. मुद्दाम सांगायचं तर मिक्स मॅच करण्यापेक्षा मॅचिंग ड्रेसिंग करण्याचा सध्या ट्रेंड आहे. त्याचा इथे पुरेपूर उपयोग करून घ्या.

एरवी स्कर्टच्या झगमगाटामध्ये दुपट्टा काहीसा झाकला जातो. पण, यंदाच्या नवरात्रीमध्ये तुमचा दुपट्टा फोकसमध्ये असेल याची नक्कीच काळजी घ्या. त्यामुळे कॉन्ट्रास्ट दुपट्टा कॅरी केलाच पाहिजे. सध्या हॅण्ड प्रिंट दुपट्टा बाजारात पाहायला मिळत आहेत. या दुपट्टय़ांना फोकसमध्ये येण्यासाठी इतर कशाचीही गरज नसते. फक्त यांना खास प्लेन घागरा चोळीसोबत घ्या आणि बघा यांची कमाल. अर्थात दुपट्टय़ासोबत खेळताना एखादी सफेद रंगाची सेल्फ रंगात एम्ब्रॉयडरी केलेली चनिया चोली घ्यायलाही काहीच हरकत नाही. दुपट्टय़ाच्या मदतीने त्यात रंगाची उधळण करा.

ज्वेलरी निवडताना मात्र जरा थांबा. म्हणजे घेऊच नका असं नाही. पण, किती दिवस नेकलेस, ऑक्सिडाइज बांगडय़ा, पैंजण यावर समाधान मानणार? यंदा कुछ हटके ट्राय किया जाए. काय म्हणता? बाजूबंद, कमरपट्टा, चाबीका गुच्छा, हेड अ‍ॅक्सेसरी, मांगटिक्का, हातफुल असं काही नक्कीच वापरून पाहा. पण, त्यासोबत स्टोन नेकपीस, काचेच्या बांगडय़ा वापरून काही रंग नक्कीच भरा. अगदीच हेड अ‍ॅक्सेसरीबद्दल शंका असेल तर जुना ऑक्सिडाइज नेकपीस केसात खोवू शकता. केसांचा छान अंबाडा बांधून त्याभोवती असा नेकपीस फिरवू शकता. हातातल्या मेहंदीसोबत हातफुल नक्कीच खुलून दिसतं. टॅटूची नवरात्रीमध्ये प्रचंड मागणी असते. यंदा ग्लिटर टॅटू बाजारात आले आहेत. या टॅटूची खासियत म्हणजे हे एखाद्या ज्वेलरीचं काम करतात. त्यामुळे नेकपीस, कडय़ाला रजा देऊन हे टॅटू नक्कीच वापरता येतील.

चला मुलींच्या ड्रेसिंगबद्दल बोलून झालं, म्हणजे संपलं असं नाही हा.. यंदाची नवरात्र कपडय़ांच्या बाबतीत मुलांनाही तितकीच फळणार आहे. प्रिंटेड केडिया आणि धोती तर यंदा असणारच. पण, धोतीसोबत शॉर्ट कुर्ता घालून पाहा. सध्या बाजारामध्ये बाटिक, बांधणी किंवा लेहरिया प्रिंटचे शर्ट पाहायला मिळत आहेत. ते नवरात्रीमध्ये हिट असणार. याखेरीज दुपट्टा हा तुमच्यासाठीसुद्धा मस्ट आहे. रंगीत दुपट्टा साध्याशा लुकमध्येसुद्धा जान आणतो. लांब कुर्ता, सलवार आणि कुर्ता हे तर क्लासिक समीकरण आहे. यंदा तुम्हीही एखादी कान की बाली, मोठी चेन, कडा घालायला हरकत नाही. डोळ्यात काजळ आणि कपाळावर टिक्का विसरू नका. छान रस्टिक लुक यंदा हिट असणार.

बसं, अजून किती वाचणार.. बॅग खांद्याला लावा आणि निघा खरेदीला.. अजून डान्सचा सराव बाकी असेल ना? तो चुकवून नवरात्र कशी रंगणार? त्यामुळे उशीर करू नका..!
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com