devi-ogकालानुरूप सणांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. सणांचं स्वरूप बदलत असलं तरी त्याचा गाभा, उत्साह, ऊर्जा, संस्कृती-परंपरा जतन करण्याची भावना मात्र टिकून असते. गरबा आणि दांडियाच्या बदलत्या रूपाचा घेतलेला हा आढावा.

मानवाच्या उत्क्रांतीमध्ये, विकासामध्ये एकजुटीचा आणि कलेचा मोठा वाटा आहे. अत्यंत प्राचीन काळात आदिमानवाला भाषेचा शोध लागला नव्हता, बोलीभाषा विकसित झाली नव्हती तेव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी, एकत्र येऊन उत्साह वाढवण्यासाठी शारीरिक भाषेचा वापर होत असे. त्यामुळे सामूहिक नृत्य ही मानवाची मूलवृत्ती आहे असे दिसून येते. विवाहप्रसंगी, पुत्रजन्माच्या वेळी, शिकार मिळाली की अशा विविध आनंदाच्या प्रसंगी आदिमानवाने एकत्र येऊन नृत्याद्वारे आनंद व्यक्त केला. याच मानवाच्या मूलभूत हालचालीमधून ‘लोकनृत्या’चा जन्म झाला. विविध प्रदेशांत, विविध जमातींचे आगळेवेगळे लोकनृत्य पाहायला मिळते. भारतामध्ये तर अशा प्रादेशिक लोकनृत्याची परंपरा फार जुनी व समृद्ध आहे. प्रत्येक लोकनृत्याची स्वत:ची अशी खास ओळख आहे, त्याचे विशेष महत्त्व आहे! समूहाने एकत्र येऊन विविध प्रसंगी केलेल्या या नृत्यांमध्ये त्या प्रदेशाच्या, जमातीच्या संस्कृतीचे दर्शन घडते, म्हणूनच संस्कृतीच्या संवर्धनासाठीदेखील लोकनृत्यांनी मोठी कामगिरी केली आहे.

Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

भारतामधील लोकनृत्यांचा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतो, रंगीबेरंगी चनिया-चोली, घागरा घालून फेर धरून मनमोहक ‘गरबा’ नृत्य करणाऱ्या महिला. गुजरात राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य ‘गरबा’ आता सातासमुद्रापारही सुप्रसिद्ध झाला आहे. गुजराती स्त्री-पुरुषांच्या अंगात जन्मत:च गरब्याची लय असते असं आपल्याला विशेष करून नवरात्रीच्या काळात पाहायला मिळतं. गरब्याचं स्वरूप आता ग्रँड झालं आहे, त्यामुळे या पाश्र्वभूमीवर गरब्याचं पारंपरिक स्वरूप जाणून घेणंही आवश्यक ठरतं. नवरात्रीच्या विशेष अंकात आज जरा नजर टाकू या. या ‘गरब्याच्या’ उगमस्थानावर, पारंपरिक स्वरूप आणि परंपरेवर!

‘गर्भ’ या संस्कृत शब्दावरून ‘गरबा’ हा शब्द आला आहे. गर्भदीप म्हणजेच मातीच्या भांडय़ांचा दिवा जो मध्यभागी ठेवला जातो, त्यालाच गरबो किंवा गरबा असं म्हणतात. या मातीच्या मडक्याला छिद्र असतात व हे मडके मनुष्याच्या शरीराचे प्रतीक मानले जाते तर त्यात तेवत असलेला दिवा शुद्ध आत्म्याचे प्रतीक आहे. आत्मरूपी ज्योत तशीच तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना नवरात्रीत आदिशक्ती दुर्गामातेकडे केली जाते. नवरात्रीमध्ये असुरांवर विजय मिळवणाऱ्या, शक्तीचे, तेजाचे प्रतीक असणाऱ्या दुर्गा किंवा अंबेमातेला वंदन केले जाते. आश्विन महिन्यात येणारी नवरात्र बंगालमध्येही मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते, मात्र नवरात्रीत खेळला जाणारा गरबा गुजरातमध्येच मुख्यत्वे पाहायला मिळतो.

गरबा किंवा गरबोच्या पारंपरिक स्वरूपामध्ये केवळ स्त्रिया मध्यभागी गडवी (गरबा-दीप) ठेवून त्याभोवती गोलाकार आकारात फेर धरून गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत नृत्य करीत. तर ‘गरबी’ या प्रकारात केवळ पुरुष भरपूर ऊर्जा व जोशपूर्ण नृत्य करतात. तर हातात दांडिया घेऊन खेळले जाते, त्याला ‘दांडिया किंवा दांडिया रास’ असे म्हटले जाते. गरब्याची गाणी प्रामुख्याने लोकसंगीताचा वापर करून बनवली जातात, ज्यामध्ये देवीचे वर्णन किंवा प्रार्थना केली जाते. तसेच रासमध्ये कृष्णभक्तीवर आधारित शब्दरचना आढळून येते. दांडिया रास श्रीकृष्णाच्या ‘रासलीले’तून उदयास आला असावा, असे मानले जाते. ‘रस’ या संस्कृत शब्दाचा अर्थ चव अथवा भावना (नवरस) असा होतो तर ‘लीला’ म्हणजे भगवान श्रीकृष्णच्या नटखट लीला किंवा क्रिया, यावरूनच ‘रासलीला’ हा शब्द बनला. रास म्हणजे ‘समूह नृत्य’ जे कृष्णभक्त आराध्य दैवत कृष्णासाठी, त्याच्या कथा, लीला यांचा प्रसार करण्यासाठी नृत्यनाटय़ाचा आधार घेऊन करत. दांडिया राससाठी समसंख्येत नर्तक किंवा नर्तिका असतात तर गरब्यामध्ये असे संख्येचे बंधन नसते.

गरब्यामध्ये नृत्य व संगीताबरोबर पोशाखही फार आकर्षक असतात. स्त्रिया रंगीबेरंगी गुजराती साडी किंवा घेरदार लेहंगा (चनिया-चोली) घालतात. काठियावाडी पोशाखही त्याला म्हटले जाते. या पोशाखावर सुंदर आरशांनी नक्षीकाम केलेले असते. गुजरातमधील सौराष्ट्र येथील संस्कृतीने समृद्ध अशा ‘काठियावाड’ या प्रदेशावरून हे नाव प्रचलित झाले आहे. गरबी नृत्यात पुरुषही छोटा कुडता व पायजमा घालतात व डोक्यावर फेटा बांधतात. महिलांचे घेरदार पोशाख गोलाकार पद्धतीने केलेल्या नृत्याची अधिकच शान वाढवतात. पारंपरिक दागिनेदेखील घातले जातात, बिंदी, झुमके, कडे, कंबरपट्टा, माळ, पैंजण अशा दागिन्यांनी महिला नटतात व नवरात्री दरम्यान त्यांच्या सौंदर्यात विशेष भर पडते, हे मात्र मान्य करावंच लागेल!

गरबा हे नृत्य नेत्रदीपक नृत्य आहे. गरब्याची गाणी चालू झाली की, आपोआपच शरीर ठेका धरतं आणि त्या जोशपूर्ण संगीताने उत्साह वाढतो आणि याची प्रचीती भरपूर ऊर्जा असलेल्या गरबा नृत्यातून दिसून येते. गाण्याच्या ठेक्यावर स्त्री-पुरुष गोलाकार आकारामध्ये आकाश भ्रमरी करतात, तेव्हा तर त्यांची ऊर्जा बघून थक्क व्हायला होते! दांडिया रासमध्ये दोन्ही हातात एकेक दांडिया घेतली जाते व त्यांचा आघात गाण्याच्या लयीबरोबर केला जातो, बरेचदा एक वर्तुळात अजून एक वर्तुळ केले जाते. बाहेरील व आतील वर्तुळातील लोकांना एकमेकांबरोबर खेळता येते. दांडियाप्रमाणेच टिपणी, ओढनी, मंजिरा, झांज हातात घेऊनही रासनृत्य केले जाते. गरब्याच्या गाण्याची लयदेखील मध्य किंवा द्रुत (जलद) असते. त्यामुळे गरबा खेळताना उत्साहात अधिकच भर पडते. कधीकधी मांडवली (माताजीची असलेली लाकडी चौकट) डोक्यावर ठेवूनही नृत्य केले जाते. पारंपरिक गरबा नृत्याच्या गाण्यांना ढोल, बासरी, झांज, मंजिरा, शहनाई अशा वाद्यांची साथ देत असत. आता ड्रम्स, सिंथेसाईजरही गरब्याच्या गाण्यांसाठी वापरले जातात.

आजकाल गरब्याचा ट्रेण्ड मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो व या पारंपरिक लोकनृत्याला व्यावसायिक, ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झालं आहे. नवरात्रीच्या आधी गरबा शिकण्याचे वर्ग घेतले जातात व लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सगळेच जण या वर्गाचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेताना दिसत आहेत. गुजराथी समाजापुरता हा सण मर्यादित राहिला नसून बहुभाषिक, आंतरदेशीय लोकसुद्धा उत्साहाने या सोहळ्यात सामील होताना दिसत आहेत. समाजातील एकजुटीसाठी लोकसंस्कृती कशी पोषक ठरते, याचा हा जणू दाखलाच आहे. मोठय़ा पटांगणावर होणाऱ्या ‘गरबा डीजे’चं प्रमाण झपाटय़ाने वाढू लागलंय. काही ठिकाणी तर प्रतिदिवशी १०००-२००० रु. भरूनही गरबा खेळायला जाणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडत आहे. गरब्याच्या पारंपरिक गाण्यांबरोबर बॉलीवूड नंबरही गरब्यात वापरले जाऊ  लागलेत. गरब्याची गाणीदेखील बॉलीवूडमध्ये हिट झाली आहेत, ‘ढोली तारो ढोल बाजे’, ‘नगाडा संग ढोल बाजे’ इ. बॉलीवूडमधील गरब्याची आधुनिक गाणीसुद्धा खूप लोकप्रिय आहेत. तसेच ‘गरबा’ हा सर्वसाधारण शब्द म्हणून वापरला जातो. मात्र यात स्त्री-पुरुष एकत्र खेळतात. दांडियाचाही समावेश केला जातो. पारंपरिक व नवीन गुजराथी गाण्यांबरोबर काही ठिकाणी मराठी गाण्यांवर ‘मराठी गरबा’ खेळला जातो. काही ठिकाणी डीजे असतो तर काही ठिकाणी लाइव्ह गाणी सादर केली जातात. नवरात्रीचे नऊ  दिवस जोशात रात्री, मध्यरात्रीपर्यंत खेळला जाणार गरबा नक्कीच ऊर्जेचं, उत्साहाचं आणि नवचैतन्याचं प्रतीक आहे. तरुणाईचा तर हा ‘फेवरेट’ सण आहे, जिथे बरेचदा तरुण-तरुणी प्रेमात पडतात, जोडय़ा जमतात. (हादेखील गरब्याच्या परंपरेचा भाग आहे.) असे बघायला मिळते.

आधुनिक युगामध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी गरब्यासारख्या लोकनृत्यांचा मोठा वाटा आहे. त्याचं रूप कालानुरूप बदलत गेलं असलं तरी त्याचा गाभा, मनातील उत्साह, ऊर्जा मात्र टिकून आहे. गरबा हे ‘लोकनृत्य’ एक ‘ग्लोबलनृत्य’ बनले आहे. आपल्या संस्कृतीचा दर्जा सांभाळून संवर्धन करणे ही नवीन पिढीचीच जबाबदारी आहे. काय मग? तुम्ही या वर्षी गरब्यासाठी आहात की नाही तयार?
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com