devi-ogसोलापूर जिल्हय़ातील करमाळा येथील श्री कमळादेवीचे वैशिष्टय़पूर्ण मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामात भारतात इतरत्र कुठेही न आढळणारी ९६ या अंकाची संकल्पना वापरण्यात आली आहे.

आपल्या देशाचा इतिहास हा सांस्कृतिकदृष्टय़ा वैभवशाली असला तरी प्राचीन कालखंडापासून झालेल्या बाहय़ आक्रमणामुळे तो लिहिताना व्यक्ती, राजघराणी व लढाया या विषयांवर अधिक प्रमाणात लिहिला गेल्याने प्राचीन परंपरा असणाऱ्या देवतांचा त्यात उल्लेख सापडत नाही. याउलट कुशाण, चंद्रगुप्त, हर्षवर्धन यांसारख्या राजांनी आपल्या चलनावर देवींची चित्रे काढलेली आढळतात. हर्षवर्धनाने तर २०० मंदिरे बांधली. त्यात देवी मंदिराचा उल्लेख आढळत नाही. मध्ययुगीन कालखंडात छत्रपती शिवरायांनी केलेल्या श्री तुळजाभवानी उपासनेमुळे पुढील कालखंडातील राजेमहाराजे वा सरदारांनी याचे अनुकरण केले. औरंगजेबानंतर मराठय़ांच्या राजकारणात काही प्रमाणात स्थिरता आली. अनेक घराणी पुढे आली व त्यातून नवनिर्मिती सुरू झाली. कर्तृत्वाला दैवत्वाची जोड मिळाली व त्यातून मुक्त होण्यासाठी मंदिराची उभारणी सुरू झाली. अशा मंदिरांची संख्या अगणित आहे, परंतु सोलापूर जिल्हय़ातील करमाळा येथील श्री कमळादेवीचे मंदिर ९६ अंकाच्या संकल्पनेवर आधारित असून निर्माणकर्त्यांने जणू ९६ कुळांचा उद्धार केल्याचा भास होतो. आपल्यावरच्या ऋणातून उतराई कशी करावी याविषयी संत कबीर म्हणतात-

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज

मेरा मुझमें कुछ नही,
जो कुछ है वो तेरा।
तेरा तुझको सौंपने,
क्या लगेगा मेरा॥

छत्रपती संभाजी राजानंतर मराठय़ांच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या, तर स्वातंत्र्यापर्यंत मराठय़ांचा शत्रू हैदराबादचा निजाम राहिला. या निजामाकडे मुख्य जहागीरदार असणाऱ्या रावरंभा निंबाळकरानेच या आगळ्यावेगळ्या वास्तूची उभारणी केलेली आहे. या घराण्याचा मूळ पुरुष रंभाजी बाजी असून ते फलटणच्या महादजी नाईक निंबाळकरांचे नातू असून निजामाने त्यांना पुणे, बारामती, श्रीगोंदा, तुळजापूर, माढा, करमाळा, भूम इत्यादी ठिकाणच्या जहागिरी दिलेल्या होत्या. शिवरायांचा वारसा असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर परिसरात बराच काळ वास्तव्यास असणाऱ्या रावरंभाला देवीभक्तीची आसक्ती लागणे स्वाभाविकच होते. त्यामुळे त्यांनी तुळजापुरातील देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराबरोबरच आपली जहागिरीची ठाणी असणाऱ्या सोलापूर जिल्हय़ातील माढा, रोपळ व करमाळा या ठिकाणी देवीची भव्य मंदिरे बांधली. माढय़ाचे माढेश्वरी व करमाळ्याचे कमळादेवी मंदिर आजही अतिशय सुस्थितीत असून गतवैभवाची साक्ष देतात. त्यातही करमाळय़ाच्या कमळादेवी मंदिराची रचना ही ९६ अंकावर आधारित असल्याने त्याची संकल्पना काही वेगळीच आहे.

करमाळा कमळादेवी देऊळ
करमाळा कमळादेवी देऊळ

९६ अंकावर आधारित बांधकाम-

रावरंभा निंबाळकर घराण्यात रंभाजी, जानोजी, महाराव, बाजीराव यांच्यासारखी पराक्रमी माणसे उपजली. इ.स. १७२४ म्हणजे निजामाच्या उदयापासून ते इ.स. १८९५ म्हणजे शेवटच्या पुरुषापर्यंत या घराण्याने निजामाची चाकरी केली. जहागिरीवर येणाऱ्याचे नाव काही असो, परंतु प्रत्येकाला रावरंभा हा किताब कायम होता. पैकी करमाळ्याचे कमळादेवी मंदिर हे रंभाजीच्या कालखंडात स्थापन झाले आणि जानोजीच्या कारकीर्दीत बांधकामाच्या रूपाने पूर्णत्वास आले. याविषयी त्या परिसरातील लोकगीत बोलके आहे.

‘करमाळं शअर,
काई वाजत जाई- जाई।
तिथं नांदती अंबाबाई॥
करमाळं शअर…
रावरंबाचं वतयन।
माहादेवाचा छबीना जातो मारोतीवरयनं॥

तुळजापुरात वास्तव्यास असताना रावरंभाने देवीच्या भक्तीतून तुळजाभवानी मंदिर परिसरातील पूर्व आणि पश्चिमेकडील महाद्वार तसेच बाजूची तटभिंत बांधली म्हणून आजही तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात. तुळजापूरनंतर त्यांनी माढय़ाचे माढेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमळादेवी मंदिर बांधले. बहुतांश देवी मंदिरे ही पूर्वाभिमुख असली तरी माढय़ाचे मंदिर पश्चिमाभिमुख बांधले आहे.

माढय़ाच्या देवीला त्यांनी माढेश्वरी म्हणजे गावाचे नाव दिले, तर करमाळ्यातील देवीला कमळा म्हणजे लक्ष्मीचे नाव दिले. कमळादेवीवरून गावाला करमाळा नाव पडले असे म्हटले जात असले तरी ते संभवत नाही, कारण तत्पूर्वीच्या बहामनी साम्राज्यातही याच नावाचा उल्लेख सापडतो. पुढे करमाळा गावात रावरंभा येऊन त्या ठिकाणची जहागिरी त्यांनी सांभाळत ते तेथेच स्थिरावले हे पुढील लोकगीतावरून स्पष्ट होते.

‘करमाळं शअर किल्ला नांदती बापलेक।
त्येच्या भोतनी खंदक॥
करमाळं शअर वळकूं येतं मौळालीनं।
करतो राकण माळावरनं॥

रंभाजीचा पुत्र जानोजी जसवंतराव निंबाळकर ऊर्फ रावरंभा हा निजामाच्या पहिल्या दहा जहागीरदारांपैकी एक असून त्यांच्यामुळेच वरची सत्ता मुस्लीम असली तरी हिंदू मंदिराचा मोठय़ा प्रमाणावर जीर्णोद्धार झाला. रावरंभाला भावलेली दोन मंदिरे म्हणजे तुळजापूर आणि माढा ही किल्लेवजा धाटणीची आहेत; परंतु करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे. दरम्यान इ.स. १७४० ते १७४३ च्या दरम्यान जानोजी राव हे रघुजी भोसलेसमवेत दक्षिणेतील त्रिचनापल्लीच्या स्वारीवर गेलेले असताना तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामाची ‘गोपुरशैली’ त्यांना फार भावली.

करमाळ्याच्या पूर्वेस रावरंभानी कमळादेवीची प्रतिष्ठापना केल्याने त्या परिसराला ‘देवीचा माळ’ असे नाव पडले. जवळपास ८० एकर परिसरावर मंदिराची आखणी केलेली असून प्रत्यक्ष देवी मंदिर हे पूर्वाभिमुख असून काळ्या पाषाणातील घडीव दगडात ३२० फूट बाय २४० फूट क्षेत्रफळाचे आहे. मंदिराला एकूण पाच दरवाजे असून प्रत्येक दरवाजावर गोपुरे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात गोपुरे आणण्याचा पहिला मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो. पैकी पूर्वेकडील एका दरवाजावरील गोपुर सध्या अस्तित्वात नाही.

कमळाभवानी मंदिराचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे बांधकाम शैलीतील ९६ अंकाचा केलेला वापर. रावरंभाच्या करमाळ्याच्या जहागिरीतील गावाची संख्या ९६ होती. मंदिर बांधकामाची शैली हेमाडपंथी असून मुख्य देवी मंदिर हे ९६ खांबांवर उभे आहे, तर संपूर्ण मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप याप्रमाणे असून गर्भगृहातील कमळाभवानीची मूर्ती गडंकी शिळेतील पाच फूट उंचीची अष्टभुजा, विविध आयुधे धारण करणारी महिषमर्दिनी आहे. रावरंभाचे प्रेरणास्थान तुळजाभवानी असल्याने देवीच्या दागिन्याची रचनाही तुळजापूरप्रमाणेच केलेली आहे.

गर्भगृहातील देवी मूर्तीच्या वरच्या बाजूस उंच शिखर हे सहा स्तरांत असून त्यावर विविध देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. विशेष म्हणजे या शिल्पांची संख्याही ९६ आहे. शिखराच्या शेवटच्या भागात सहस्रदलाचे कमळ असून त्यावर मुस्लीम शैलीत घुमट व त्याच्या चारही बाजूला मीनार आहेत. त्यामुळे रावरंभाने मुख्य मंदिर बांधकाम शैलीतून हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये ऐक्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येतो. शिवाय ते मुस्लीम शासकाकडे चाकरीस असल्याने त्याची उतराई होणे हाही एक अर्थ अभिप्रेत होतो.

मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी फरशा असून तटभिंतीलगत भाविकांच्या सोयीसाठी ओवऱ्या काढलेल्या आहेत. विशेष म्हणजे या ओवऱ्यांची संख्याही ९६ आहे. स्वत: जानोजी निंबाळकर हे बऱ्याच वेळा याच ओवऱ्यात मुक्कामाला असत. त्यामुळे त्यांना भेटायला येणारेही याच ठिकाणी राहात असत. पेशवे दफ्तरातील ‘मुक्काम दरजागा कमलालये’ या नोंदीवरून पेशव्यांचा मुक्कामही या ओवरीत झाल्याचे स्पष्ट होते.

मुख्य मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत ८० फूट उंचीच्या तीन दीपमाळा असून त्या एवढय़ा भव्य आहेत की, त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायऱ्या आहेत. दीपमाळेतील पायऱ्यांची संख्या ९६ च आहे. मंदिरापेक्षा दीपमाळेची उंची एवढी भव्य का ठेवली ते समजत नाही. शिवाय त्या एकाच रांगेत असल्याने त्याच्या संख्येचाही बोध होत नाही. दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या ज्वाला करमाळा जहागिरीतील संपूर्ण ९६ गावांतून स्पष्टपणे दिसत होत्या अशी दंतकथा आहे. चौथ्या दीपमाळेचा फक्त चबुतरा शिल्लक असून शंभरेक वर्षांपूर्वी वीज पडून ती दीपमाळ ईशान्येकडील दरवाजावर कोसळल्याने त्यावरील गोपुरही ढासळले.

कमळादेवी मंदिर परिसरातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘हत्ती बारव’ मुख्य मंदिरासमोरील शेतामध्ये एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनविलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. षटकोनी आकाराच्या बारवाला शहाण्णवच पायऱ्या आहेत. तत्कालीन कालखंडात कुठलीही यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना एवढी विहीर खोदताना किती कष्ट उपसावे लागले असतील याचा अंदाज करता येत नाही. मंदिर बांधकामासाठी जेवढा खर्च आला त्यापेक्षा एक पैसा जास्त खर्च या बारवावर झाल्याचे मौखिक इतिहासातून सांगितले जाते.

बारवाचा आकारमान मोठा असल्याने त्यावर चालणारी मोटसुद्धा हत्तीची होती. हत्तीचा वापर करून मोटेच्या साहाय्याने पाणी काढून ते शेजारच्या शेताला दिले जायचे. देवीच्या पूजेसाठी लागणारी बाग त्या ठिकाणी होती. आजही ‘हत्ती बारव’ हा पूर्णपणे सुस्थितीत असून पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटेचे अवशेष त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. बारवाच्याच बाजूला एक छोटीशी समाधी असून ती मोटेकरिता वापरण्यात येणाऱ्या हत्तीची असल्याचे सांगितले जाते.

अशा रीतीने एखाद्या मंदिराची उभारणी करताना जागोजागी ९६ अंकांचा वापर केल्याने करमाळय़ातील कमळादेवी मंदिर हे वैशिष्टय़पूर्ण ठरते. मंदिर आणि बारवाकरिता लागणारा दगड आणि चुना कुठून आणला हे अद्याप स्पष्ट होत नाही. अठराव्या शतकातील रावरंभाचा वावर पाहता त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नव्हती. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सर्वात कर्तृत्ववान पुरुष म्हणून ख्याती लाभलेल्या रावरंभाला मात्र पाहिजे त्या प्रमाणात आपलेपण लाभले नाही. याकरिता पहिल्या रावरंभाचा इतिहास पाहावा लागतो.

रावरंभा घराण्याचा परिचय-

या घराण्याचा मूळ पुरुष हा फलटणच्या महादजी नाईक-निंबाळकरांचा नातू असून तो रंभाजीबाजीचा दासीपुत्र असल्याचे बहुतेक सर्वच इतिहासकारांनी स्पष्ट केले आहे. महादजीला छत्रपती शिवरायांच्या कन्या व छत्रपती संभाजीराजांच्या बहीण सखुबाई दिलेल्या होत्या. काही काळ मराठय़ांकडे राहिल्यानंतर रंभाजी हे हैदराबादच्या निजामाकडे गेल्यानंतर त्याला रावरंभा पदवी देण्यात आली. ती पुढे सर्वच वंशजांनी वापरल्याने रावरंभा निंबाळकर घराण्याचा अभ्यास करताना बरीच गफलत होते.

रावरंभा घराण्यातील सर्वात पराक्रमी आणि कलासक्त जहागीरदार म्हणजे जानोजी निंबाळकर. एका बाजूला रावरंभा निंबाळकर घराण्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी जानोजीने तत्कालीन कालखंडातील सरदार घराण्याशी वैवाहिक संबंध साधताना आपल्या महाराव नावाच्या मुलास ग्वाल्हेरच्या महादजी शिंदेची बहीण केलेली होती. तर आपली मुलगी सेनापती धनाजी जाधवाचा नातू चंद्रसेनच्या मुलास दिली होती, तर अगदी अलीकडे शेवटच्या रावरंभाच्या कन्या तथा भूमच्या आमदार राहिलेल्या राणी ताराराणी यांचा विवाह राजश्री शाहू महाराजांचे मेव्हणे मानसिंगराव शिंदे यांच्याशी झालेला होता. सत्ता-संपत्ती, वैभव अशा सर्वच गोष्टींनी सज्ज असणाऱ्या रावरंभा घराण्याला निजाम असो की, मराठे दोन्ही सत्तेमध्ये मोठा सन्मान मिळाला.

तरीपण जानोजीच्या मनात आपल्या घराण्याचे काही शल्य असावे का अशी शंका उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी आपल्या बांधकामशैलीत ९६ अंकांचा वापर केल्याचे दिसून येते. मराठा घराण्यात जी ९६ कुळे आहेत, त्यापैकी एक निंबाळकर असून या ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने आपल्या कुळाचा उद्धार करणे ही संकल्पना संभवते. पाळखेड, खर्डा, राक्षसभुवन यांसारख्या महत्त्वपूर्ण लढायांत रावरंभाने स्वत: भाग घेत केला होता. अशा या ९६ कुळांचा उद्धार करणारी बांधकामशैली निर्माण करणाऱ्या अर्जुनबहाद्दर जानोजी ऊर्फ रावरंभा निंबाळकरांनी सहा ऑगस्ट १७६३ रोजी राक्षसभुवनस्थळी गोदावरीकाठी आपले देह ठेवला. ९६ हा अंक मराठा कुळाशी निगडित आहे. त्यानुसार अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून याचे अवलोकन केल्यास नऊ हा अंक परिपूर्ण जीवनाचे तर सहा हा अंक स्वत:च्या वैभवातून समाजाचा उत्कर्ष साधण्याचे द्योतक आहे. त्यामुळे रावरंभा निंबाळकराने करमाळ्याचे मंदिर बांधताना आपल्या वैभवसंपन्न जीवनाचा फायदा सर्वसामान्यांसाठी व्हावा व याकरिता कमळादेवी अथवा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, ही भावना मनाशी बाळगली असेल, अशी शक्यता आहे.

तुळजाभवानीशी साधर्म्य

माढा, करमाळा या ठिकाणी जहागीरदार असणाऱ्या रावरंभाची तुळजाभवानीवर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे करमाळ्यातील मंदिराची सर्व व्यवस्था तुळजापूरप्रमाणेच ठेवण्यात आलेली आहे. मूर्तीच्या बनावटीपासून ते देवीला तयार करण्यात आलेले दागिने सर्वकाही तुळजाभवानी देवीची प्रतिकृती आहे. तुळजाभवानीला छत्रपती शिवरायांनी अर्पण केलेली १०१ मोहोरांची माळ असून त्याचीच आवृत्ती करमाळ्यात केलेली आहे. तुळजापूरप्रमाणेच येथेही देवीचा पुजारी जातीने मराठा समाजातील आहे. तर इतर सेवेकऱ्यांची संख्या जवळपास २८ आहे. विशेष म्हणजे या सर्वाना रावरंभाने त्या काळी ज्या जमिनी दान दिलेल्या आहेत त्या आजतागायत कायम आहेत.

इतर देवी मंदिरांप्रमाणेच कमळादेवीचा नवरात्र महोत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा होत असतो. परंतु कमळादेवीची मुख्य यात्रा भरते ती म्हणजे कार्तिक पौर्णिमेपासून चतुर्थीपर्यंत. या दिवशी रोज छबिना निघतो, परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्टय़पूर्ण असतो. रात्री १२ वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी, मानकरी मोठी गर्दी करतात. ‘बडी जे महेरबान’, ‘बडी सवारी आ रही है’ अशा हिंदीतील घोषणेबरोबरच आई राजा उदोऽऽ उदोऽऽचा जयघोष सुरू असतो.

कमळादेवीच्या या छबिन्याचे वैशिष्टय़ म्हणजे  रात्रभर चालणाऱ्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकीचे नृत्य सुरू असते. रावरंभाचे हैदराबादमधील महालिका नावाच्या नर्तकीवर मनापासून प्रेम होते. त्याचे प्रतीक म्हणून कमळादेवीच्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकी नृत्य सादर करीत असते. करमाळ्यातील मुस्लीम समाजातील जी नर्तकी म्हणून छबिन्याचा मान घेणार आहे, तिला रीतसर लग्न करता येत नाही. या नर्तकीला काही रावरंभाने जी जमीन दान दिली आहे ती आजतागायत रुजू आहे. रात्री बारा वाजता वाजतगाजत निघालेला छबिना देवी मंदिराच्या बाजूला असणाऱ्या खंडोबाच्या मंदिराकडे जाऊन तेथे देवीच्या वतीने खंडोबाला भर पेहरावाचा आहेर केला जातो. पहाटे पाच वाजता छबिना परत येतो. खंडोबा म्हणजे शंकराच्या गणापैकी एक असून तो देवीचा रक्षणकर्ता आहे. चंपाषष्ठीला खंडोबाच्या वतीने देवीला साडी-चोळीचा आहेर दिला जातो. अशा रीतीने करमाळय़ातील ९६ कुळी देवीचे मंदिर म्हणजे तुळजाभवानीची प्रतिकृती म्हणावी लागेल, परंतु फक्त बांधकामाचा विचार केल्यास ते तुळजापूरपेक्षा वरचढ आहे म्हटल्यास वावगे होणार नाही.

खडर्य़ाच्या लढाईनंतर करमाळ्यातील रावरंभाची जहागीर मराठय़ांकडे आल्याने रावरंभाला भूमकडे प्रयाण करावे लागले. आजच्या घडीला बार्शीजवळील शेंद्री, माढा तालुक्यातील रोपळे व भूम येथील थोरात घराणे हे रावरंभाचे वारसदार असून त्यांनी बांधलेल्या गढय़ांची मोठी पडझड झालेली असली तरी करमाळय़ातील कमळादेवी मंदिर आजही अतिशय सुव्यवस्थित आहे हे विशेष आहे.

करमाळ्यावर पुढे इंग्रजांचा अंमल सुरू झाल्याने मंदिर प्रशासनात त्यांनी सुसूत्रता आणली. प्रत्येक सेवकाला सनदा देऊन त्यांचे हक्क कायम केले. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत सामाजिक ट्रस्टची स्थापना करून लोकांचे एक मंडळ नेमण्यात येऊन याचा प्रमुख म्हणून करमाळय़ाचे तहसीलदार काम करीत असतात. रावरंभाच्या रूपाने करमाळा गावाला एक ओळख झाली. तर कमळादेवी मंदिराच्या रूपाने नवीन बांधकामशैलीत भर पडली.

ऐतिहासिक कालखंडात वास्तूच्या बांधकामशैलीत मराठा, रजपूत, मुघल, हेमांडपंथी अशा विविध शैली सर्वानाच परिचित असल्या तरी करमाळ्यातील ९६ अंकाची बांधकामशैली एकमेव आहे. त्याचे वर्णन करावे तेवढे कमीच आहे कारण…

‘देवा तुझी अद्भुत कीर्ती।
जैसी वर्णिली पूर्वी संती
तैसीच सांगितली रायाप्रति॥
साक्ष पहावयासी येत असे।
वर्णिले क्षेत्र न देखता दृष्टी।

मजलागी दंडील॥

  • भारतात कुठेही न सापडणारी ९६ अंकाची एक अद्भुत संकल्पना मंदिर बांधकामात वापरण्यात आल्याने मंदिराच्या खांबांची संख्या ९६ , मंदिरावरील शिखराला ९६  शिल्प, मंदिर परिसरातील ओवऱ्यांची संख्या ९६ , मंदिरासमोरील तीनही दीपमाळेला पायऱ्या ९६ , तर मंदिर परिसरातील बारवाला पायऱ्याही ९६ च आहेत.
  • कमळादेवीच्या मंदिर बांधकामशैलीत महाराष्ट्रात प्रथमच दाक्षिणात्य शैलीतील गोपुरांचा वापर करून मंदिराची प्रवेशद्वारे सज्ज करण्यात आली आहेत.
  • ९६ हा अंक मराठी कुळाशी संबंधित असला तरी तो अंकशास्त्राच्या दृष्टीने विश्वास आणि परोपकाराशी नाते जोडणारा आहे.
  • देवीची मूर्ती तुळजापूरप्रमाणे अष्टभुजा तर आहेच, शिवाय तुळजाभवानीप्रमाणे सर्व दागिने तयार करून घेतलेले आहेत.
  • कमळादेवी मंदिराचे पुजारी परंपरेने मराठा समाजातील आहेत.
  • छबिनापुढे नृत्य सादर करणारी नर्तकी ही मुस्लीम समाजातील असून तिला आजन्म अविवाहित राहावे लागते. रावरंभापासून मिळालेली इनाम जमीन अद्यापि कायम आहे.
    प्रा. डॉ. सतीश कदम – response.lokprabha@expressindia.com