devi-ogस्वकीयांचं साम्राज्य लयाला गेलेलं, परकीयांनी धुडगूस घातलेला. जुलूम आणि अत्याचारांनी प्रजा गांजलेली. अशा वेळी एकनाथांनी जगत्जननी जगदंबेला ‘दार उघड बये, दार उघड’ अशी आर्त साद घातली..

चराचराला जन्म देणारी देवता सामान्यपणे ‘शक्ती’ नावाने ओळखली जाते. शक्ती हा शब्द संस्कृत शक् म्हणजे ‘समर्थ असणे’ या धातूपासून निर्माण झाला आहे. प्रत्येक वस्तूत कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या या गुणधर्माला ‘शक्ती’ असे संबोधले जाते. सूक्ष्मरूपात सर्वत्र व्यापलेल्या या शक्तीचे स्थूल किंवा प्रकटरूप म्हणजेच विश्व. या शक्तीतून विश्व निर्माण झाले तरी या विश्वात मात्र अनेक शक्ती कार्यरत असतात. आणि या साऱ्या शक्तींना सामावून घेणाऱ्या त्या शक्तीला ‘आदिशक्ती’ म्हणतात. विष्णुपुराणात तिला ‘सर्वगा’ असे संबोधले आहे. तीच ‘योगिनी’ या नावानेही ओळखली जाते. संपूर्ण चराचराला व्यापण्याच्या तिच्या या महाशक्तीचे वर्णन देवीभागवतकार करतात, ‘‘ब्रह्मदेव या विश्वाचे निर्माते आहेत असे मानले जाते, पण ते कुठे स्वतंत्र आहेत. त्यांचा जन्म विष्णूच्या नाभीकमलांत झाला. ब्रह्मदेवांना जन्म देणाऱ्या या विष्णूलाही शेषाच्या आधाराची गरज भासते. पण विष्णूला आधार देणारा शेष क्षीरसागरात स्थित आहे. हा क्षीरसमुद्र म्हणजे रस आहे आणि रस हा पात्राशिवाय स्थिर राहात नाही. मग हा रस धारण करणारं पात्र कुठलं आहे? तर ती जगदंबा आहे!’’अशा या जगदंबेची, शक्तीची उपासना सातत्याने सुरू आहे. कोणी तिच्या सुंदर, सात्त्विक रूपाची उपासना करतात तर कोणाला रौद्र-कराल रूप भावते. अनादी सालापासून पृथ्वीवर असुर, दैत्य व दुष्टांचे प्राबल्य झाले म्हणजे तिच्या या रौद्र रूपाचे स्मरण देवा-मानवांना होत असते. इतर वेळी शांतता व अहिंसेची कास धरणारे संतसुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात अशाच एका संताने त्या आदिशक्तीचा ‘गोंधळ’ मांडला होता.

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास

ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेल्या संत संप्रदायातील एकनाथ हे ज्ञानेश्वर व रामदासांमधील दुवा होते. सूर्यनारायण व रुक्मिणीचा पुत्र एकनाथ. नाथांकडे परंपरेने चालत आलेली अध्यात्माची पुंजी होती. आंतरमन अध्यात्म साधनेत गुंतलं असलं तरी दुर्दैवाने बाहेरचं वातावरण व्यक्तिगत आध्यात्मिक उन्नत्तीला पोषक नव्हतं. देवगिरीचं वैभव लयाला जाऊन ती दौलताबाद झाली होती. हरपालदेवावरचे अनन्वित अत्याचार अंगावर शहारा उमटवत होते, महाराष्ट्राशेजारील वैभवशाली विजयनगरचे साम्राज्यही लयाला गेले होते. आता साऱ्या भारतभर परकीय, जुलमी राजसत्ता स्थिरस्थावर झाली होती. स्वधर्म, स्वराष्ट्र या संकल्पना केव्हाच मोडीत निघाल्या होत्या. जुलूम व अत्याचाराने प्रजा गांजली होती. स्त्रियांवरील अत्याचारांची गणती नव्हती. त्रस्त, कोणी वाली नाही अशी गांजलेली सामान्य प्रजा योग्य श्रद्धेपेक्षा अयोग्यश्रद्धेकडे वळते. नको ते कर्मकांड व नको त्या गोष्टीतील कर्मठपणाला जवळ करते. भारतातील परिस्थिती या नियमाला अपवाद नव्हती. अशा सगळ्या परिस्थितीत एकनाथांसारखा संत केवळ व्यक्तिगत उन्नतीचा विचार करेल हे अशक्य होते.

या गांजलेल्या प्रजेच्या नष्ट झालेल्या शक्तीला जागृत करण्यासाठी नाथ ‘गोंधळ’ मांडत होते. समाजातील निद्रिस्त शक्तीला जागं करण्यासाठी जगत् जननीला आवाहन करणे आवश्यक होते. जगत् जननी असूनही कवाडं बंद केलेल्या त्या जगदंबेला दार उघडण्याची विनंती करताना संतप्त एकनाथ कोमल शब्दांचा वापर न करता ‘बया’ अशी हाक मारत होते, म्हणत होते- बया दार उघड. अलक्ष्यपुरभवानी, माहूरलक्ष्मी, कोल्हापूरलक्ष्मी, तुळजापूरलक्ष्मी, तेलंगणलक्ष्मी, कन्नडलक्ष्मी, अष्टभुजालक्ष्मी, पाताळलक्ष्मी बया दार उघड! साऱ्या भारतभर पसरलेल्या शक्तीच्या या विविध रूपांना ते तळमळून बोलवत होते. तिचे कोणतेही रूप शिल्लक राहू नये याची काळजी वाहात होते. एकनाथ जाणून होते की प्रत्येक देवते ठिकाणी असलेली शक्ती हीच कार्याला कारण आहे. या शक्तीचे कौतुक गाताना सौंदर्यलहिरीच्या प्रारंभी शंकराचार्य म्हणतात, ‘शिव: शक्त्या युक्तो यदि भवति शक्त: प्रभवितुमं न चेदेवं तेवो न खलु कुशल: स्पन्दितुमपि।’, शिव शक्तीने युक्त असेल तरच आपला प्रभाव दाखवू शकतो. शंकराचार्याचे हेच सूत्र उचलून नाथांनी देवांतील शक्तीला हाका मारायला प्रारंभ केला. आणि मग एकनाथ पंढरपूरच्या पांडुरंगाला बोलवण्याऐवजी त्याच्यातील शक्तीला, पंढरपूर निवासिनी बयेला दार उघडायला सांगतात.

हा गोंधळ मांडताना रिपुनिर्दालनाचा आजपर्यंतचा सारा इतिहास नाथांच्या डोळ्यापुढे उभा ठाकला आहे. दैत्यकुळातील हिरण्यकश्यपूची कथा गाताना एकनाथ म्हणतात,

दैत्यकुळी हिरण्यकश्यपु जन्मला।

तेणे तुझा भक्त गांजिला।

ते न पाहवे तुजला।

त्वां उग्ररूप धरिलें।

तेव्हा क्रोधे स्तंभ फोडून।

नारसिंहरूप धरून।

देत्यासी वधून।

प्रल्हाद दिवटा रक्षिला।

बया दार उघड। बया दार उघड।

सीतेवर झालेला अन्याय तुला सहन झाला नाही तू अठरा पद्म वानरांमध्ये अवतीर्ण झालीस. त्या इवल्याशा वानरसैन्याकडून तू सागरावर शिळांचा सेतू बांधून घेतलास, या वानरांमार्फत साऱ्या लंकेभर गोंधळ घालणारी ती तूच. तूच त्या रामाच्या ठायी प्रकट झालीस आणि बघता बघता रावण-कुंभकर्णासारखे महादैत्य ठार केलेस. हा इतिहास आठवताना आजच्या आमच्या स्त्रियांची होणारी विटंबना तुला दिसत नाही का, हा अनुस्यूत प्रश्न ते जगदंबेला करत होते.

युद्धभूमीवरच्या दुसऱ्याही रूपाचे स्मरण तिला करून देताना नाथ म्हणतात,

अर्जुनाच्या रथाचे वाणीरूपी दोर तुझ्या हातात होते म्हणून तर तो रथ तुला हवा तसा तू वळवत होतीस. अन्यथा किंकर्तव्यमूढ अर्जुन द्रौपदीचे चिरहरण करणाऱ्या दुयरेधनाला ठार मारण्याऐवजी स्वत:च वनात निघून गेला असता. या साऱ्या जुन्या इतिहासाचे स्मरण करून देऊनसुद्धा काही फरक पडत नव्हता, जगदंबेला पाझर फुटत नव्हता.

साध्या शब्दांनी जगज्जननीला जाग येत नाही असे पाहून ते तिला युद्धभूमीवरच्या रणवाद्यांचा आवाज ऐकवतात, ‘गणवाद्य भम् भम् भम् दण्, दण्, दण्, कडक् कडक्’. जणू काही तिची रौद्रशक्ती जागी करून नाथ म्हणताहेत, बघ अंबे तोच रणरागिणीचा अवतार घे तू पुन्हा ये. आमच्या मुलांवरील, स्त्रियांवरील अत्याचाराचा पुन्हा एकदा बदला घे. बये तुला झालयं तरी काय म्हणून तू आज मौन धरून बसली आहेस, विटेवरती पाय जुळवून तू शांत राहू कशी शकतेस?

आणि मग एकनाथांच्या लक्षात आले, ‘अरे आपण त्या अविनाशी, अव्यक्त, सर्वव्यापी महाशक्तीला काही विशेषणांत गुंतवून ठेवलं आहे. त्या अनंत रूपाला सान्त करून टाकले आहे’. हे लक्षात येताच ते तिच्या त्या अनंत रूपाला आवाहन करू लागले. एकवीस स्वर्गात तिचा मुकुट आणि अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल  अशा सप्त पातालात तिचे पाऊल गेले आहे. म्हणजे सारे स्वर्ग आणि सारे पाताल अशी तिची व्याप्ती आहे. तिचे हे विशाल रूप डोळ्यापुढे आल्यावर एकनाथ कल्पना करू लागले ते तिच्या चोळीची. एखाद्या स्त्रिच्या चोळीला असं कितीसं कापड लागणार? पण नाथ म्हणतात, नवखंड तुझी चोळी, सर्व विश्व व्यापणाऱ्या नाथांच्या आदिशक्तीची चोळी नवखंडात गेली आहे, शंख-चR  साऱ्या आयुधांनी तू शोभून दिसतेस, इतर देवतांकडे एक चंद्र किंवा एक सूर्य असेल, पण तू तर कोटि चंद्रसूर्यप्रभेने शोभत आहेस, बये, तू एवढी विशाल आहेस.

प्रारंभी जगज्जननीवर रागावणारे, संतापणारे, तिच्याशी आक्रस्ताळेपणा करणारे एकनाथ एखादे मूल जेव्हा थकूनभागून आईच्या कुशीत शिरले म्हणजे आई सगळा राग सोडून त्याला जवळ घेते त्याच भावनेने तिच्या कुशीत शिरत तिला  विनवतात, ‘‘एका जनार्दनी माउली। करी कृपेची साउली बया दार उघड! बया दार उघड! बया दार उघड!’’ तू आम्हा सगळ्यांची माउली आहेस. आणि माता आपल्या बालकाची वंचना कधी करत नाही म्हणून माते तुझ्या कृपेची सावली आम्हा बालकांवर धर, बये, दुष्टांचं निर्दालन कर, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड.
आसावरी बापट – response.lokprabha@expressindia.com