श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपराही मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

lp17   श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू . संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच दत्त संप्रदायाची भूमिका lp14मांडण्यात आली आहे. श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.
श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश :
असे मानले जाते की कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण lp15करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी:
हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो. कारंजा (लाड) जि. अकोला या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे-त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
श्रीस्वामीसमर्थ :
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.  श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री :
ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.
टेंबेस्वामी :
श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
श्रीमाणिकप्रभू :
बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात.  ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर  येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.
दत्तनाथ :
उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन-विष्णू-हसकमलासन-अत्री-दत्तगोपाळ-वेडा नागनाथ-निबंजनाथ- जनार्दन – एकनाथ-दत्तभाऊ -केशवबुवा-अंतोबादादा-दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.
श्रीनवनाथ :
नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.
श्रीरामदासी आणि श्रीधर स्वामी परंपरा :
समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी lp1गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले  दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.
श्रीमहानुभव :
महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.
वारकरी :
भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष  जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम lp16महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या ‘प्रियलीला महोत्सव’ या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते.
आनंदसंप्रदाय :
सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरू केला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जनमेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून झाला होता, असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना प्रत्येकी शंभर पावले टाकल्यावर ‘श्रीदत्त’असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू-विधी-अत्री-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वाबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे.
याशिवाय नृसिंहसरस्वती (आळंदी) परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्रीदत्तसंप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावांनी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रदाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडित आहेत. श्रीदत्तात्रेयांच्या कार्याचे, शक्तीचे आणि कृपेचे आविर्भाव या विविध परंपरांच्या माध्यमातून लाखो भाविक भक्तांना होत असतात, असे सांगितले जाते. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आणि स्वतंत्र आहे. तिचा स्वभाव, जीवनपद्धती वेगळी आहे. एकाच घरातील व्यक्तींमध्येही विविधता आहे. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीचा आवाका पाहून त्याच्या रुचीप्रमाणे कोणतीही उपासना पद्धती आणि परंपरा त्याने अंगीकारली तरी तो कुठेतरी श्रीदत्तसंप्रदायाशी जोडला जातो आणि श्रीदत्तप्रभूंची कृपा प्राप्त करतो हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे सर्व उपासनापद्धती आणि परंपरांचा आदर ठेवून आपल्याला आवडेल ती, रुचेल ती साधना पद्धती स्वीकारण्याचे स्वातंत्र दत्तसंप्रदायामध्ये प्रत्येक भाविकाला आहे. हेच दत्तसंप्रदायाचे विलक्षण वैशिष्टय़ आहे.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले

प्रा. क्षितिज पाटुकले -response.lokprabha@expressindia.com