23 September 2017

News Flash

परिक्रमा कर्दळीवनाची

कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळ आहे.

प्रा. क्षितिज पाटुकले | Updated: December 18, 2015 2:00 AM

lp17देशभरातल्या दत्तभक्तांमध्ये कर्दळीवनाची परिक्रमा प्रसिद्ध आहे. काय आहे या परिक्रमेचं धार्मिक महत्त्व?
ती का केली जाते? कशी करायची असते?
कर्दळीवन या नावातच एक मंत्रगर्भ सामथ्र्य आणि गूढ कुतूहल दाटलेले आहे. श्रीगुरुचरित्र, श्री अक्कलकोट स्वामींची बखर, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र इ. दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे. गुरुचरित्राचे पारायण करणाऱ्या लाखो भाविकांना कर्दळीवन हे नाव परिचित आहे.  गुरुचरित्राच्या शेवटी अध्याय ५० आणि ५१ मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या अवतार समाधीचे संकेत दिलेले आहेत. त्यामध्ये खालील ओव्या आहेत.
समस्त शिष्याते बोलविती /
श्री गुरु त्यासी निरोपिती /
प्रगट झाली बहु ख्याती /
आता रहावे गुप्त रुपे //
(अ. ५० ओवी २५५)
यात्रा रुपे श्री पर्वतासी /
निघावे आता परियेसी /
प्रगट हेचि स्वभावेसी /
गुप्तरुपे राहू तेथे //
(अ. ५० ओवी २५६)
स्थान आपुली गाणगापुरी /
येथुनि न वचे निर्धारी /
लौकिकमते अवधारी क
बोल करितो श्रीशैल्य यात्रा  //
(अ. ५० ओवी २५७)
असे सांगितले जाते की, लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर श्री गुरु श्रीशैल्य येथे गेले. तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना ‘पुष्पाचे आसन’ करायला सांगितले. शिष्यांनी एक मोठी बांबूची बुट्टी तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले. त्यावर शेवंती, कुमुद, मालती इ. फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरू कन्या राशीत होता, बहुधान्य नाम संवत्सर होते, उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता, माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. त्या दिवशी प्रात: समयी श्रीगुरू पुष्पासनावर बसले आणि पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे निघाले. कर्दळीवनात पोहोचल्यावर आपण तेथे पोहोचल्याची खूण म्हणून ‘प्रसादपुष्पे’ पाठवतो असे त्यांनी शिष्यांना सांगितले. त्यानंतर श्रीगुरू हळूहळू दिसेनासे झाले. श्रीगुरू कर्दळीवनाकडे ज्या दिशेने गेले तेथून काही नावाडी आले. त्यांनी शिष्यांना सांगितले की आम्ही श्रीगुरूंना कर्दळीवनात जाताना पाहिले आणि त्यानंतर ते गुप्त झाले. त्यांनी त्या वेळी तुम्हाला देण्यासाठी एक निरोप आमच्याकडे दिला आहे, असे शिष्यांना सांगितले. तो निरोप असा,
आम्हास आज्ञापिती मुनी /
आपण जातो कर्दळीवनी /
सदा वसो गाणगाभुवनी /
ऐसे सांगा म्हणितले /
(अ. ५१ ओवी ४८ )
याचा अर्थ असा की श्री नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीच्या वेळी कर्दळीवनात गेले आणि तेथे गुप्त झाले. कर्दळीवनात सर्वत्र ते चैतन्य रूपाने राहत आहेत.
असे सांगितले जाते की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना कलकत्ता येथे एका पारशी गृहस्थाने ‘आपण कोठून आलात?’ असा प्रश्न विचारला. श्री स्वामी समर्थ स्वत:बद्दल कधीही आणि काहीही बोलत नसत. मात्र या वेळी स्वामींनी उत्तर दिले- ‘प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंडून कालिदेवीचे दर्शन घेतले. गंगातटाने फिरत फिरत lp02हरिद्वार, केदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो.’ याचा अर्थ श्री स्वामी समर्थ हे कर्दळीवनातून आले. श्री स्वामी समर्थाच्या प्रकट होण्याबाबत एक विलक्षण कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की, श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती हे शके १४४० मध्ये श्रीशैल्य पर्वतावर कर्दळीवनात गुप्त झाले. तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी त्यांनी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपऱ्यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की एक, दोन, दहा, वीस अशी ३५० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. काळाच्या ओघात गुहेभोवती पडझड होऊन श्री नृसिंह सरस्वती जेथे समाधीमध्ये बसले होते ते ठिकाण औदुंबर, वटवृक्ष आणि अश्वत्थ वृक्षाच्या जवळ आले होते. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून बाहेर पडले. श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे त्या वेळचे रूप विलक्षण होते. ते दाशरथी राजाप्रमाणे आजानुबाहू होते. त्यांचे हात गुडघ्यापेक्षाही खालपर्यंत होते. उंची सहा फुटांपेक्षा जास्त, विशाल छाती, रुंद खांदे, उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी अंगकांती, केळीच्या गाभांसारखे पाय, टोकदार नाक, भव्य कान आणि त्यातील तेजस्वी कुंडले, अत्यंत भेदक दृष्टी आणि कमळासारखे डोळे. हा प्रकार पाहून तो आदिवासी घाबरला आणि रडवेला होऊन पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला. स्वामींनी त्याला अभयदान दिले आणि तेथून ते बाहेर पडले. हेच श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार अक्कलकोट श्री स्वामी समर्थ असे मानतात. अशा प्रकारे कर्दळीवन हे स्वामी समर्थाचे प्रकट स्थान असून श्रीदत्तात्रेयांचे गुप्त स्थान आहे, असे मानले जाते. श्रीदत्त संप्रदायातील सर्व परंपरांचा कर्दळीवनाशी अतूट असा संबंध आहे. पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे गुरू श्रीबालमुकुंद बालावधूत महाराज हेही अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यजवळील कर्दळीवनामध्ये गेले, असा उल्लेख आहे. रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तावतार श्रीधरस्वामी यांनीही कर्दळीवनाची परिक्रमा केली होती.
कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळ आहे. हैदराबादपासून २१० किमी अंतरावर श्रीशैल्य आहे. तेथे कृष्णा नदी पाताळगंगा या नावाने ओळखली जाते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात. कर्दळीवन परिक्रमेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते. कर्दळीवनात जाण्यासाठी अवधुतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही, असे मानले जाते. भारतात दरवर्षी एक लाखातून एक व्यक्ती काशी-रामेश्वरला जाते, दहा लाखांतून एक बद्री केदारनाथला जाते, २५ लाखांतून एक नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखांतून एक कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात एक कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाऊ शकते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही. कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जुन, रत्नाकर इ. सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. कर्दळीवनात विलक्षण दैवी अनुभव येतात. वीरशैव समाजामध्येही कर्दळीवनाचे अपरंपार माहात्म्य असून कर्नाटकातील थोर संत अक्कमहादेवी यांनी कर्दळीवनामध्ये तपश्चर्या केली आणि त्या तेथेच मल्लिकार्जुनामध्ये विलीन झाल्या अशी श्रद्धा आहे. अशाप्रकारे श्रीदत्त संप्रदाय आणि इतरही आध्यात्मिक संप्रदायांमध्ये कर्दळीवनाचे विशेष माहात्म्य आहे.
कर्दळीवनामध्ये जाणे थोडे अवघड आहे, मात्र अशक्यप्राय नाही. कर्दळीवनाच्या पंच परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते. ही स्थाने म्हणजे अक्कमहादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्कमहादेवी गुहा, श्रीस्वामी प्रकट स्थान आणि बिल्ववन – मरकडेय ऋषी तपस्थळी आहेत. या परिक्रमेमध्ये एकूण ३६ कि.मी. चालावे लागते. शारीरिकदृष्टय़ा सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमा सहजतेने पूर्ण करू शकते. स्त्री- पुरुष सर्व जण ही परिक्रमा करू शकतात. आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच कर्दळीवनातील जैवविविधता, तेथील निसर्ग, गुहा, घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे. तरुणाईसाठी कर्दळीवन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे. परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्रीशैल्य येथे पोहोचून श्रीमल्लिकार्जुन स्वामी आणि श्रीभ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावी लागते. पाताळगंगेतून बोटीने साधारण २८ कि.मी. प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते. साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळीवन परिक्रमा करता येते. पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही. कलियुगातील या संक्रमणाच्या संधिकालामध्ये कोणताही पूर्वग्रह न ठेवता, कोणतीही भीती न बाळगता आणि श्रद्धायुक्त अंत:करणाने एकदा तरी कर्दळीवनाची परिक्रमा करावी आणि तेथिल विलक्षण स्पंदनांची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी.
(लेखकाने कर्दळीवनात प्रत्यक्ष जाऊन आणि तेथे मूळ स्थानी निवास केला आहे. कर्दळीवनासंदर्भातील अनेक भाषांमधील पुस्तकांचा आणि दत्त संप्रदायातील अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी ‘कर्दळीवन : एक अनुभूती’ हा ग्रंथ लिहिला आहे.)
प्रा. क्षितिज पाटुकले – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 18, 2015 2:00 am

Web Title: special issue on lord dattatreya article 1
 1. P
  Prafull Mhatre
  Dec 23, 2015 at 2:48 am
  कर्दळीवनाची उपयुक्त माहिती.
  Reply
  1. S
   sanjay
   Dec 23, 2015 at 9:06 am
   kardalivanachi mahiti far chhan aahe
   Reply
   1. S
    sanjay
    Dec 23, 2015 at 9:08 am
    कार्दालीवानाची माहिती फार आवडली
    Reply