दुबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो तिथे दरवर्षी होणारा शॉिपग फेस्टिव्हल. पण  दुबई म्हणजे एवढंच नाही, तर तो सगळ्या   मर्यादा पार करणारा  या पृथ्वीतलावरचा मानवनिर्मित चमत्कार आहे.

साधारण ३० एक वर्षांपूर्वी जर कोणी विचार केला असता की, दुबईला फिरायला जाऊया, तर त्याला लोकांनी वेडय़ातच काढलं असतं. कारण रखरखाटी वाळवंट, जुनेपुराणे बंदर, काही मोजकी एक-दोन पाहण्यासारखी जुनी ठिकाणं सोडलं तर दुबईत काहीच नव्हतं. किंबहुना वाळवंटातील कडक उन्हाळा आणि त्याच जोडीने असणारे कडक धार्मिक र्निबध अशा शहरात पर्यटन ही कल्पनाच सहन होण्यासारखी नव्हती. पण आज याच दुबईचे पर्यटनाच्या नकाशावरचे स्थान एकदम वरच्या क्रमांकात आहे. त्याचं कारण आहे या वाळवंटात मेहनतीने जन्माला घातलेली जणू काही प्रतिसृष्टी. पण हे सारं एका दिवसात झालं नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक, ठरवून काही गोष्टी केल्या गेल्या. त्यामुळे केवळ पर्यटनच नाही तर बंदर, व्यापारी केंद्र, विविध इव्हेंटसाठीचे उत्तम ठिकाण असा चौफेर विकास या देशाने केला आहे.

एकेकाळी दुबईला पर्यटनाचे आकर्षण जसे नव्हते, तसेच तेलाचा भरपूर पैसा होता म्हणावं तर तसंदेखील नव्हतं. पण १९६० मध्ये शेख झय्यद बिन सुलतान अल नहान (अबुधाबीचे तत्कालीन राजे) आणि शेख रशिद बिन सईद अल मक्तुम यांनी सर्व अमिरातींची एक संघटना करायची संकल्पना मांडली. ती १९७१ मध्ये साकार झाली. दुबई, अबुधाबी, शारजा, अजमान, उम्म अल क्विैन, फुजैरहा आणि रास अल खैमाह एकत्र येऊन संयुक्त अरब अमिरात जन्माला आले. अबुधाबीचे शेख झय्यद यांनी अमिरातीच्या विकासासाठी अनेक धोरणं आखली. त्यांनी दुबईला एक आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून विकसित करायला सुरुवात केली. त्यासाठी स्वत: तर पैसे गुंतवलेच पण जगभरातील गुंतवणूक दुबईत आणायला सुरुवात केली. अर्थात या गुंतवणुकीचा परतावा मिळण्यास काही काळ घालवावा लागणार होता. तोच काळ आता संपला असून दुबई हे सर्व प्रकारांच्या पर्यटकांनी ओसंडून वाहत आहे.

त्याची सुरुवात झाली ती बंदर विकासाने. युरोप आणि आशिया या दोन खंडांमध्ये असणारे दुबईचे भौगोलिक स्थान हा यातला सर्वात महत्त्वाचा घटक. मुळात दुबईत नैसर्गिक असे पुरातन बंदर होतेच. प्राचीन जमाती दुबईत राहू लागल्या तेव्हादेखील बंदर हाच महत्त्वाचा घटक होता. कालांतराने ते बंदर विकसितदेखील झाले, पण अतिवापरामुळे पुढे निकामी झाले. संयुक्त अरब अमिरातीच्या नव्या धोरणांमुळे नव्याने बंदर बांधायला सुरुवात झाली. पण हे बांधताना काही गोष्टी अगदी जाणीवपूर्वक केल्या. दुबईतील नव्याने विकसित केलेल्या सर्वच गोष्टींमध्ये एक मुद्दा मध्यवर्ती राहिला आहे. तो म्हणजे जे करू ते जगातील सर्वात मोठं असेल ही ऊर्मी त्यामागे होती. मग ते बंदर असो, मॉल असो, मत्स्यालय असो की अन्य काही. या जगातील सर्वात मोठं असण्याच्या या उर्मीने एकूणच दुबईला व्यापून टाकलं आहे. न्यू दुबई पोर्ट हे १९९९ मध्ये बांधल्यानंतर ते जगातील मानवनिर्मित असं सर्वात मोठं बंदर ठरले.

अर्थात बंदराच्या जोडीने वाढला तो व्यापार उदीम. त्याला चालना देण्यासाठी डय़ूटी फ्री व्यापाराची सुविधा दिली गेली. सुरुवात सोन्याच्या बाजारपेठेने झाली. मुळातच दुबईत पूर्वापार सोन्याचा व्यापार होत होता. डय़ूटी फ्रीमुळे त्याला प्रचंड चालना मिळाली. भारतीय व्यापाऱ्यांसाठी तर ही सुवर्णसंधीच होती. पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्सची बाजारपेठ. आज आपल्या देशातील इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत तुलनेने अनेक वस्तू स्पर्धात्मक किमतीत मिळू लागल्या आहेत. पण एकेकाळी दुबईतून माल आणायचा आणि येथे कमी किमतीत विकायचा हा ट्रेण्डच झाला होता. त्यातून आपल्याकडे स्मगलिंगदेखील प्रचंड वाढले होते. असो, तो भाग सोडून देऊ. पण व्यापारावरील सारी बंधनं शिथिल केल्यामुळे दुबईच्या बाजारपेठेला प्रचंड मागणी येऊ लागली. अर्थातच व्यापार उदिमासाठी सोयीसुविधा वाढू लागल्या, तशा पायाभूत सुविधा देखील दुबईत मोठय़ा प्रमाणात विकसित होऊ लागल्या. केवळ मोठय़ा खरेदी विक्रीबरोबर किरकोळ विक्रीला चालना मिळू लागली आणि शॉपिंगसाठी का होईना पण पर्यटकांचा ओढा वाढू लागला. येथेच तेथील व्यापाऱ्यांनी एक शक्कल लढवली. युरोप-अमेरिकेत तुलनेने जुनी झालेली पण अजून जगाच्या इतर देशात नवीन असलेली अशी उत्पादनं दुबईत दाखल होऊ लागली. मग ती उत्पादनं कोणत्या तरी एखाद्या नव्या उत्पादनाच्या खरेदीवर मोफत द्यायची किंवा स्वस्तात विकायची पद्धत सुरू झाली. त्यामुळे दुबईत अशा वस्तूचा ओघ वाढतच गेला. जणू काही आंतरराष्ट्रीय डंम्पिंग सेंटरच म्हणावं लागेल. भारतच नाही तर तिसऱ्या जगातील सर्वच देशांचे व्यापारी दुबईकडे आकर्षिले गेले. पण यातून वाढणाऱ्या पर्यटनासाठी म्हणून एकेक व्यवस्था तेथे विकसित केल्या जाऊ लागल्या.

त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुबई मॉल हा १५ वर्षांपूर्वी उभा राहिलेला मॉल. हा जगातील सर्वात मोठा मॉल आहे. हा केवळ एक मॉलच नाही तर मनोरंजनासाठी तेथे जे काही विकसित केलं गेलं ते सर्वच भव्यदिव्य आहे. या मॉलमध्येच एक प्रचंड मोठी आइस रिंग आहे. कृत्रिमरित्या तयार केलेल्या बर्फाची प्रचंड मोठी अशी ही मानवनिर्मित रचना. येथे आइस हॉकी, स्केटींग सारं काही करता येते. तर मॉल ऑफ इमिरेटसमध्ये तर २८० फूट उंच व ४०० मीटर लांब अशा कृत्रिम बर्फरचनेवर चक्क आईस स्कीईंगदेखील करता येते. दुबई मॉलमधील दुसरे आकर्षण म्हणजे मत्स्यालय. हेदेखील जगातील सर्वात मोठे. काचेच्या एकाच सलग तुकडय़ात याची रचना केलेली आहे. मधोमध बोगदा करून चारही बाजूला जगभरातील मासे सोडलेले आहेत. या रचनेच्या वर जाऊन एका बंदिस्त पण जाळीदार पोलादी पिंजऱ्यातून आपणाला थेट पाण्यात उतरण्याची सुविधादेखील येथे आहे.

पर्यटकांसाठीचे दुसरे आकर्षण म्हणजे जगातील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन. नोव्हेंबर ते मार्च या काळातच सुरू असणाऱ्या या बगिच्यात तब्बल ४५ लाख कुंडय़ामध्ये यच्चयावत रोपं लावलेली असतात. विशेष म्हणजे यांची रचना दरवर्षी बदलली जाते. इतक्या मोठय़ा प्रमाणात झाडाच्या कुंडय़ा सांभाळणे आणि दरवर्षी त्यांची नवनवीन आकर्षक रचना करणे हे सारंच अनाकलनीय म्हणावे लागेल. त्यामुळेच हे मिरॅकल गार्डन म्हणूनही ओळखले जाते.

दुबईतील व्यापार उदिमाला वेग आल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांनादेखील त्याचे आकर्षण निर्माण व्हावे यासाठी खास दुबई शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन १९९६ पासून करण्यात येऊ लागले. दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळात हा फेस्टिव्हल सुरू झाला आणि थेट शॉपिंगसाठीच्या पर्यटकांनीच दुबई गजबजून जाऊ लागली. त्याला जोड मिळाली ती ग्लोबल व्हिलेज या आणखीन एका संकल्पनेची. फेस्टिव्हलच्या काळातच हे ग्लोबल व्हिलेज उभे करण्यात येऊ लागले. त्यामध्ये विविध देशांचे स्टॉल्स उभारले जाऊ लागले. मुख्यत: त्या देशाच्या पारंपरिक वस्तू, खाद्यपदार्थ, दागिने यासाठी यांचा वापर केला जाऊ लागला. याच स्टॉलच्या बाजूला एक व्यासपीठ तयार करून त्यावर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. या ग्लोबल व्हिलेजचा पसाराच इतका मोठा आहे की पूर्ण पायी फिरायचे तर पायाचे तुकडेच पडतील. त्यामुळे कृत्रिम जलप्रवाह खेळवून त्यातून छोटय़ा बोटींनी फिरण्याची सोय करण्यात आली. ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना सुपरडुपर हिट झाली. इतकी की एकेकाळी शॉपिंग फेस्टिव्हलशी जोडलेले हे व्हिलेज आता डिसेंबर ते एप्रिल हे पाचही महिने स्वतंत्रपणे सुरू असते. गेल्या वर्षी या व्हिलेजमध्ये तब्बल ४५ देशांनी भाग घेतला होता.

केवळ व्यापार उदीम इतेकच मर्यादित लक्ष्य दुबईने कधीच ठेवले नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा तर विकसित झाल्याच पण रिअल इस्टेटच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी लक्षणीय आहे. जगभरातून गुंतवणूकदारांना दुबईचे आकर्षण निर्माण करण्यात आले. कोणत्याही देशाचे नागरिक आज दुबईत मालमत्ता खरेदी करू शकतात, पण त्यांना दुबईचे नागरिकत्व मिळत नाही. तरीदेखील पाम विला, द वर्ल्डसारखे महाकाय मालमत्ता प्रकल्प पूर्णपणे विकले गेले आहेत. पाम विलाची रचना तर आवर्जून पाहण्यासारखी आहे. समुद्रात भराव टाकून पाम वृक्षाच्या पानांची रचना तयार करण्यात आली. पानाच्या कडांवर खास, स्वतंत्र विला बांधले गेले. समोरच कृत्रिमरित्या तयार केलेला बीच. या प्रकल्पातील सर्वच्या सर्व विला विकले गेले आहेत. त्याच्या जाहिरातीसाठी जगभरातील अनेक देशांमध्ये खास ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर नेमण्यात आले होते. भारतात शाहरुख खान पाम विलाचा ब्रॅण्डअ‍ॅम्बेसिडर होता. त्याला एक खास विलादेखील देण्यात आला आहे. आता याच पाम विलाच्या प्रेरणेतून ‘द वर्ल्ड’ हा नवा प्रकल्प साकार होत आहे. जगाच्या नकाशाप्रमाणे रचना असणारा हा प्रकल्प सध्या वेगाने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. जगाच्या म्हणाल त्या कोपऱ्यात विला विकत घेता येणार आहे; पण तो दुबईच्या समुद्रात भराव टाकून निर्माण केलेल्या या प्रकल्पात. सारं काही जगातील सर्वात मोठं किंवा एकमेव अशा आकांक्षेतून १९९९ मध्ये येथे एक दिमाखदार हॉटेल उभं राहिलंय, बुर्ज अल अरब. हे जगातील एकमेव सप्ततारांकित असं  हॉटेल आहे.

दुबईत हे सारं होत असतानाच पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अशी वाहतूक व्यवस्थादेखील अतिशय कौशल्यपूर्णपणे विकसित केली आहे. हेलिकॉप्टरचा वापर हा तेथे अगदी सर्रास केला जातो. प्रत्येक उंच इमारतीच्या छतावर हेलिपॅडची सुविधा आहे. अगदी उबरवरदेखील तुम्ही हेलिकॉप्टर बुक करू शकता. तर सी प्लेन्सचा वापरदेखील अगदी सहजपणे होतो. सर्वसामान्यांसाठी मोनो, मेट्रो, टॅक्सी अशी सर्व सुविधा समांतरपणे विकसित होत गेली आहे. तर इमिरेटस ही हवाई वाहतूक करणारी यंत्रणा जगभरात प्रतिष्ठेची समजली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात इमिरेस्ट एअर लाइन्सची सुविधा देण्यात आली आहे.

दुबईत आजवर जे काही जे काही झाले ते अगदी ठरवून. ज्या ज्या क्षेत्राला वाव आहे त्या त्या प्रत्येक क्षेत्रासाठी काही ना काही तरी योजना तेथे आहेच. अगदी क्रिकेटसाठी ठरवून शारजा कप सुरू करण्यात आला. शारजा हा दुबईला अगदी लागून असलेला अमिरातीतील एक देश. पर्यटनाशी, व्यापाराशी निगडित सुविधा, व्यवस्था दुबईत, तर शारजा मुख्यत: निवासी आणि कार्यालयांचे शहर. क्रिकेटमुळे शारजालादेखील चालना मिळाली. बॉलीवूडच्या चित्रीकरणासाठी तर दुबईत पायघडय़ाच घातल्या जातात. अनेक सुविधा अगदी स्वस्तात उपलब्ध करून दिल्या जातात. पाठोपाठ अनेक इव्हेंटसाठी दुबई हा फेवरेट स्पॉट झाला आहे. आणि मोठमोठय़ा कॉर्पोरेटसच्या माइस टूर यादेखील दुबईसाठी महत्त्वाच्या आहेत.

पर्यटनाचा आणि व्यापाराचा हा झपाटा प्रामुख्याने केंद्रित झाला तो दुबईच्या उत्तर भागात. बऱ्याच ठिकाणी समुद्रात भराव टाकून. हा भाग बुर दुबई नावाने ओळखला जातो. तर जुनं दुबई हे डेरा या नावाने. या जुन्या दुबईत आजही बराच भाग हा जुनाच आहे. येथे आवर्जून पाहावे असे एक चांगले संग्रहालयदेखील आहे. सोन्याची मूळ बाजारपेठ याच भागात होती. तीदेखील पाहता येते. कृष्णाचे एक पुरातन मंदिरदेखील जतन केले आहे. पण पर्यटनाच्या दृष्टीने साऱ्या सोयी आहेत त्या बुर दुबईतच.

खरं तर हा साराच वाळवंटी रखरखाटी प्रदेश. समुद्रकिनाऱ्याचा खुबीने वापर करून पर्यटनाच्याच नाहीतर इतर व्यवसायाच्या असंख्य संधी निर्माण करण्यात आल्या. पण केवळ समुद्रावर भर टाकण्यातच धन्यता न मानता येथे चक्क वाळवंटाचा वापरदेखील पर्यटनात करण्यात आला. त्यातील एक मुख्य आकर्षण म्हणजे आलिशान अशा लॅण्ड क्रुझर, हॅमर गाडय़ांमधून केली जाणारी डेझर्ट सफारी आणि त्यानंतर तेथील प्रसिद्ध बेली नृत्याचा आनंद. हा प्रकार तेथे सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. तर त्याचबरोबर समुद्रात धाऊ म्हणजेच पारंपरिक सागरभ्रमंतीच्या बोटीचा वापर सध्या क्रूझप्रमाणे केला जातो. या क्रूझवर बसून दुबईचा रात्रीचा झगमगाट पाहत भोजनाचा आनंद देणाऱ्या सफरीचा हा येथील आणखीन एक आकर्षणचा भाग.

खरं तर आखातातील सर्वच देश हे कट्टर धार्मिकता जोपासणारे. नियमांची अनेक बंधनं. पण दुबईने हे दूर सारत स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. कट्टरतावादापासून फारकत घेतल्यामुळे पर्यटकांवर येथे कोणत्याही प्रकारची तथाकथित बंधने नाहीत. कायद्याची कट्टरता मात्र अजून टिकून असल्यामुळे गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी तर आहेच, पण तेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

अबूधाबीच्या राजाने दुबईच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, सारे नियम शिथिल केले. अबूधाबीत मात्र आजही धार्मिक बंधनं आहेत. तेथील राजाने अबुधाबीत एकच मोठं बांधकाम केलं. ते म्हणजे शेख झायेद मॉस्क. हीदेखील जगातील सर्वात मोठी मशीद आहे. तेथील गालिचा, झुंबर हे सारंच्या सारं जगातील सर्वाधिक मोठं या वर्गात मोडणार आहे. याच राजाने दुबई आणि अबुधाबीमध्ये वाळवंटात फेरारी पार्क तयार केलाय. अगदी ग्रॅण्ड प्रिक्सदेखील तेथे आयोजित होते.

पर्यटनाच्या सर्वच अंगांना दुबईने येनकेनप्रकारेण आपल्यात सामावून घेतले आहे. त्यासाठी तेथे जी काही अफाट अशी निर्मिती केली आहे, ती पाहता २० वर्षांपूर्वीची दुबई कशी होती हे पाहायला मिळाले तर आपला विश्वासच बसणार नाही. बूर्ज खलिफा ही दुबईतील २०१० साली पूर्ण झालेली इमारत. अर्थातच जगातील सर्वात उंच. या इमारतीच्या लिफ्टने १२४ व्या मजल्यावर जाण्यासाठी केवळ ५९ मिनिटे लागतात. या इमारतीच्या छतावरून दुबई आणि अमिरातीतील अनेक देश दिसतात. येथे विशेष असे काही स्क्रीन लावले आहेत. हा स्क्रीन ज्या दिशेला असेल तेथील दुबईचा भाग स्क्रीनवर दिसतो. पण महत्त्वाचे म्हणजे त्याचबरोबर १०-२०-३० वर्षांपूर्वी तेथे काय परिस्थिती होती याची छायाचित्रंदेखील स्क्रीनवर दिसतात.

दुबईची ही सारी प्रगती पाहून थक्क व्हायला होतं. तीन हजार ८८५ चौरस किलोमीटरचा हा खरं तर टिचभर देश. एका दिवसात या टोकापासून त्या टोकापर्यंत पार करता येणारा. पण या देशात मानवाने जे काही निर्माण केलंय ते पाहायचे असेल तर चारपाच दिवस तरी हवेतच. खरं तर मी स्वत: वन्यजीव पर्यटन, ऑफबीट पर्यटन स्थळांचा भोक्ता आहे. पण बूर्ज खलिफाच्या छतावरून दुबईचा हा सारा विकास अनुभवताना वाळवंटात उभ्या केलेल्या या साऱ्या विश्वाबाबत ‘केवळ शॉपिंगसाठीचं दुबइर्’ हे टिपिकल पर्यटनप्रिय समीकरणदेखील विसरून गेलो. माझ्यासमोर होता तो केवळ आणि केवळ त्या मरुभूमीत मानवनिर्मित चमत्काराचा एक जिताजागता देश..!
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com