आशियातली भटकंती करायची असेल तर हाँगकाँगसारखं बहारदार ठिकाण नाही. राहणीमानापासून प्रत्येक गोष्टीत पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा सुरेख मिलाफ इथे पाहायला मिळतो.

पर्यटन म्हटलं की लाखो पर्यटकांनी नावाजलेल्या ठिकाणी जाण्याची आणि तेथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे बघण्याची बऱ्याच भटकंतीबहाद्दरांची इच्छा असते. जसं की न्यूयॉर्कचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, लंडनचे बीग बेन (पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर येथील टॉवर आणि घडय़ाळ), मॉरिशसचा निळाशार समुद्र, दुबईची स्कायलाइन बदलून टाकणारा बुर्ज अल अरब, साऊथ आफ्रिकेचे अद्भुत द ग्रेट मायग्रेशन, चीनची भिंत, जपानचा माऊंट फुजी ही काही पर्यटनस्थळे म्हणजे जणू काही पर्यटनाचे हुकमी एक्केच! या विविध ठिकाणांनी त्या त्या देशांचं पर्यटन समृद्ध केलं आहे, त्यांच्या पर्यटनामध्ये भर घातली आहे. पण गेल्या काही वर्षांत अनटचड् किंवा कमी प्रसिद्ध अशा ऑफबीट डेस्टिनेशन्सकडे जाण्याचा पर्यटकांचा कल चांगलाच वाढला आहे. म्हणजे पर्यटनसुलभ पण एकदम वेगळ्या अशा पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी आपला मोहरा वळवला आहे. यातील एक ठिकाण म्हणजे हाँगकाँग. आजही दक्षिण पूर्व आशियातील पर्यटन म्हटले की पटकन डोळ्यांसमोर येणारे देश म्हणजे सिंगापूर- थायलंड- मलेशिया. पण या त्रिमूर्तीमध्ये गेल्या काही वर्षांत हाँगकाँगनेही आपली एक स्वतंत्र ओळख बनवली आहे.

Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
HF Deluxe Bike
देशातच नव्हे तर विदेशातील ग्राहकांना हिरोच्या ‘या’ बाईकचं लागलं वेड; झाली धडाक्यात विक्री, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ८३ किमी
Miri Regev
लाल समुद्रातील हुथींच्या संकटात भारतानं इस्रायलसाठी तयार केला नवा व्यापारी मार्ग, नेमका फायदा काय?

इतिहासकाळात सुगंधी असलेले आणि आजही पर्यटकांच्या मनात ज्याच्या भेटीच्या आठवणींचा सुगंध नेहमी दरवळत राहतो असे बेट म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील हाँगकाँग. या बेटाचे कँटोनिज भाषेतील जे नाव आहे त्याचा अर्थ ‘सुगंधी बंदर’ असा होतो. या बेटाच्या अ‍ॅबर्डिन हार्बरमध्ये इतिहासकाळात निर्यात करण्यासाठी सुगंधी द्रव्ये किंवा अगरबत्त्या साठवल्या जात असत, त्यावरून याला हे नाव मिळाले आहे. आज आधुनिक जगात आपल्या अद्ययावत आकर्षणांनी पर्यटकांचे मनोरंजन करणाऱ्या हाँगकाँगला भेट दिल्यानंतर तिथल्या सुखद वास्तव्याचा सुगंध पर्यटकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळतोच.

सर्वसाधारणपणे एखाद्या देशाचा जागतिक क्रमवारीतला क्रमांक मोजताना त्या देशातील लोकसंख्या, त्या देशाचे क्षेत्रफळ, त्या देशाचे उत्पन्न यांचा विचार केला जातो. पण समजा या क्रमवारीत जर त्या देशातील गगनचुंबी इमारतींची संख्या हा निकष लावायचे ठरवले तर अशा उंच देशांच्या यादीत हाँगकाँग या बेटावरच्या देशाचा क्रमांक बराच वरचा लागेल. जगातील सर्वात उंच १०० निवासी इमारतींपैकी ४० हून अधिक इमारती या देशात आहेत. इतर कोणत्याही देशातील नागरिकांपेक्षा १४ किंवा त्यावरील मजल्यांवर राहाणाऱ्यांची/ काम करणाऱ्यांची संख्या इथे जास्त आहे. त्यामुळे हाँगकाँगचा उल्लेख अनेकदा जगातील सर्वात उभे शहर असा केला जातो. या देशाचे क्षेत्रफळ किती तर फक्त एक हजार १०४ चौ.कि.मी. म्हणजे आपल्या मुंबईपेक्षा जरा जास्त (मुंबईचे ६०३ चौ. कि. मी) किंवा आपल्या दिल्लीपेक्षा जरा कमीच (दिल्ली एक हजार ४८४ चौ. कि. मी.). आसपासची छोटी-छोटी बेटं मिळून ‘हाँगकाँग मेन आयलंड’ हा प्रदेश बनला आहे. मेन आयलंडवरच्या इमारती, रस्ते सगळंच नीटनेटकं आणि आकर्षक आहे. पण हाँगकाँग मेनलॅण्ड हा विभाग राहण्यासाठी महागडा असल्यामुळे येथील स्थानिक कावलुन, न्यू टेरिटरीज अशा जागी राहाणे पसंत करतात. वाहतुकीची साधने मुबलक आणि सोयीची असल्यामुळे प्रवासातील अंतर हा मुद्दा गौण ठरतो.

हाँगकाँगचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो म्हटलं तर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना अर्थात चीन या देशाचा भाग आहे आणि तरीही स्वतंत्र आहे. हे स्थान हाँगकाँगला मिळण्यामागे मोठा इतिहास आहे. इसवी सन पूर्व २२१ या काळात हा प्रदेश चीनला जोडण्यात आला. पुढे १९व्या शतकात अफूसाठी झालेल्या युद्धामध्ये हाँगकाँगचा ताबा ब्रिटिशांकडे गेला. ब्रिटिशांनी एक व्यापारी, आर्थिक केंद्र म्हणून हाँगकाँगचा मोठा विकास केला. १९९७ साली हाँगकाँगचा ताबा पुन्हा परत चीनकडे आला. तेव्हाच ‘एक देश दोन व्यवस्था’ हे तत्त्व मान्य करून, परराष्ट्रीय संबंध आणि लष्कर या दोन गोष्टी वगळता बाकी बाबतीत चीनने हाँगकाँगला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

चिनी भाषेतील सिनेमांच्या प्रवाहात हाँगकाँगच्या सिनेमांचे स्थान आगळे आहे. हाँगकाँगचा बॉलीवूड, हॉलीवूडशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. हाँगकाँगचे मार्शल आर्ट सिनेमा जगभरातले सिनेप्रेमींचे आवडते आहेत. ब्रुस ली, जॅकी चान, चौ युन फात, जेट ली हे सगळे सुपरस्टार इथूनच उदयाला आले. अनेक दशके हॉलीवूड आणि भारतीय चित्रपट उद्योगापाठोपाठ हाँगकाँग हे जगातले तिसऱ्या क्रमांकाचे चित्रपट निर्मिती केंद्र होते. १९७१ साली हाँगकाँगमध्ये चित्रित झालेल्या ‘जोहर मेहमूद इन हाँगकाँग’पासून ते ‘आवारापन’ अशा अनेक हिंदी चित्रपटांनी कधी गाण्यांसाठी तर कधी अ‍ॅक्शनसाठी हाँगकाँगचा वापर केला आहे. ब्रुस लीचा ‘एंटर द ड्रॅगन’, जेम्स बाँडचा ‘डाय अनदर डे’, व्हॅन डॅमचा ‘ब्लडस्पोर्ट’, बॅटमॅन मालिकेतील ‘द डार्क नाइट’ अशा अनेक गाजलेल्या हॉलीवूडपटांमध्ये हाँगकाँगचे दर्शन घडते.

हाँगकाँगचे स्वरूप अनेक वर्षे मूळ चिनी प्रदेशातील ब्रिटिश वसाहत असेच असल्याने या देशात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. येथील सामाजिक जीवनाचे आयामही आर्थिक सुबत्तेमुळे पाश्चिमात्यांप्रमाणे झाले आहेत. लग्नसंस्था आणि कुटुंबसंस्थेचं महत्त्व कमी होऊ लागलंय. कमवायला लागले की मुलं वेगळी राहातात आणि वीकेण्डला ते आई-वडिलांना भेटायला येतात. एकूणच आयुष्याबाबतीत ‘योलो’ हा येथील परवलीचा शब्द झाला आहे. योलो म्हणजे (यू ओन्ली लिव्ह वन्स) म्हणून बहुतांशी तरुण-तरुणींना लग्नबंधनात अडकण्याची इच्छा नसते. अगदी ४०व्या वर्षांपर्यंत लग्न न केलेले तरुण/तरुणी इथे तुम्हाला भरपूर सापडतील. एकच आयुष्य आहे तर ते अगदी मजेत जगावं हा त्यांचा बाणा व त्यातूनच योलोसारखी निर्माण झालेली ‘डिंक’ संस्कृती. डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड्स. कुठल्याही प्रकारची जबाबदारी नको, बेदम पैसा कमवा आणि एकच आयुष्य आहे ते मजेत जगा ही येथील तरुणाईची लाइफस्टाइल झाली आहे.

हाँगकाँगच्या संस्कृतीमध्ये खाद्यपदार्थाना विशेष स्थान आहे. इथे कँटोनिज पदार्थाबरोबरच चीनच्या इतर भागातील पदार्थ, जपानी पदार्थ, पाश्चिमात्य पदार्थ सहज मिळतात, त्यामुळे हाँगकाँगचे वर्णन ‘जागतिक खाद्य जत्रा’ असे केले जाते. हाँगकाँगवासीयांना फॅशनचा अतोनात शौक. ही मंडळी साधारण दर सहा महिन्यांनी आपले वॉर्डरोब बदलत असावेत असं इथल्या कपडय़ांच्या दुकानातल्या गर्दीकडे पाहून नेहमी वाटतं! इथले मॉल्स अतिभव्य आणि देखणे आहेत. शिवाय चांगल्या हवामानामुळे उत्तमोत्तम कपडे घालायची, नटायची एक वेगळीच मजा येथील स्थानिक घेत असतात. हवामानात जरा गारवा आला की हे अंगावर वुलन मिरवायला तयार. महिला तर विचारू नका. मोठे गुडघ्यापर्यंतचे बूट, दोन-तीन वेगेवेगळे स्वेटर्स असं मस्त चित्र असतं! जसं कपडय़ांचं तसंच इथे सौंदर्यप्रसाधनांचंही प्रचंड वेड. सौंदर्यप्रसाधनांची मोठमोठी दुकानं आणि एकाहून एक ब्रॅण्ड इथे पाहायला मिळतात! प्रत्येक दुकानात गर्दी अशी की दिवाळी, ख्रिसमसचा सण जवळ आला आहे असं वाटावं! एकूणच चांगलं राहाणं-दिसणं हे इथल्या लोकांच्या रक्तात आहे.

हाँगकाँगला ७३३ कि.मी.चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यामुळे इथे अनेक खाडय़ा, बीचेस तयार झाले आहेत. हाँगकाँग बेटाच्या दक्षिण भागात ‘रिपल्स बे’ आहे. हाँगकाँगमधील सर्वात महाग निवासी जागांमध्ये रिपल्स बेचा समावेश होतो. हाँगकाँग बेटाच्या उत्तरेला कोवालुन पेनिन्सुला आहे. या नावाचा अर्थ आहे ‘नाइन ड्रॅगन्स.’ या भागातील आठ डोंगर हे आठ ड्रॅगन्स, तर त्यांना मोजणारा सम्राट हा नववा ड्रॅगन मानला जातो. हाँगकाँग बेटाच्या किनाऱ्याचा आणि क्षितिज रेषेचा झकास नजारा कोवालुनच्या किनाऱ्यावरून पाहायला मिळतो. ‘अ‍ॅव्हेन्यू ऑफ स्टार्स’ हे पर्यटक आकर्षण याच भागात आहे. अमेरिकेतील हॉलीवूडमधील वॉक ऑफ फेमच्या धर्तीवर, हाँगकाँगच्या सिनेसृष्टीचा गौरव करणारा हा रस्ता तयार करण्यात आला आहे. समुद्राकाठच्या या ४४० मीटर लांबीच्या रस्त्यावर फेरफटका मारताना हाँगकाँगच्या सिनेमाचा शंभर वर्षांचा इतिहास इथल्या लाल रंगाच्या नऊ खांबांवर वाचायला मिळतो. हाँगकाँगचे आणखी एक आकर्षण म्हणजे मादाम तुस्सा वॅक्स म्युझियम. लंडनमधील जगप्रसिद्ध वॅक्स म्युझियमची आशियात उघडलेली ही पहिलीच शाखा. शाहरुख खानपासून ते ब्रॅड पीटपर्यंत आणि ब्रुस लीपासून ते बराक ओबामापर्यंत जगभरातील सेलिब्रेटींच्या मेणाच्या पुतळ्यांबरोबर फोटो काढण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळते. हाँगकाँगच्या आकर्षणांवर चारचाँद लागले ते डिस्ने        वर्ल्डमुळे. डिस्ने कंपनीने हे डिस्ने लॅण्ड उभारताना चिनी फेंगशुई तत्त्वांचे आचरण केले आहे. मेन स्ट्रीट, फॅण्टसी लॅण्ड, अ‍ॅडव्हेंचर लॅण्ड, टुमारो लॅण्ड असे या मायानगरीचे विभाग आहेत. या पार्कला भेट देणारे पर्यटक खूश होतात ते दिवसा होणारी फ्लाइटस ऑफ फॅण्टसी ही परेड आणि रात्री होणारी डिस्ने इन द स्टार्स ही फटाक्यांची आतषबाजी पाहून.

हाँगकाँगचं नाइटलाइफ ज्या एका शब्दात सुरू होतं आणि संपतं तो शब्द म्हणजे एलकेएफ  अर्थात लाँगक्वॉई फाँग! शहराच्या अगदी मध्यात ही जागा आहे. इथे चांगले क्लब-पब्ज आहेत. रात्री प्रचंड रोषणाईने नटलेले एलकेएफ बघणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. इथल्या गर्दीतला उत्साह मात्र वाखाणण्याजोगा. बहुतांशी गोऱ्यांची चहल-पहल असली तरीही भारतीयही इथे मोठय़ा प्रमाणावर दिसतात. वीकेण्डला तर जणू इथे उत्सव असतो.

थोडक्यात हाँगकाँगमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. पर्यटक इथे अजिबात कंटाळत नाही. कारण हाँगकाँग मे हर बार कुछ नया मिलता है..

वीकेण्ड डेस्टिनेशन- एशियाचे लासवेगास : मकाऊ

हाँगकाँगला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या यादीत मकाऊ हे नाव असतेच. हाँगकाँगहून दर १५ मिनिटाला सुटणाऱ्या स्पीड बोट एका तासात तुम्हाला मकाऊला आणून सोडतात. इमिग्रेशनला साधारण १५-२० मिनिटे आणि मग तुम्ही इथे भटकायला मोकळे. इथले जुगाराचे अड्डे हे एक आकर्षण तर आहेच पण इथले ‘वेनेशियन’ नावाचं थीम हॉटेलही बघण्यासारखं आहे. काही वर्षांपूर्वी आपलं बॉलीवूड इथे आयफा अ‍ॅवॉर्ड्ससाठी जमलं होतं तेव्हापासून हे ठिकाण भारतात बरंच लोकप्रिय झालं आहे. इथे दिवस घालवणं हा एक संस्मरणीय अनुभव आहे आणि तो घ्यायलाच हवा.
स्मृती कुळकर्णी-आंबेरकर – response.lokprabha@expressindia.com