अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स यांचं भारतातलं आगमन ही व्हिडीओ युद्धाची नांदी आहे. ग्राहकांची मनोरंजनाची तहान हीच या तंत्रज्ञानाच्या युद्धभूमीवर खेळल्या जाणाऱ्या युद्धाची जान असणार आहे.

मनोरंजनासाठीच्या टेलिव्हिजन, व्हीसीपी, व्हीसीआर, सीडी, डीव्हीडी या सर्वच पर्यायांना सर्वात मोठा धक्का दिला तो मोबाइल क्रांतीने. इंटरनेट क्रांतीमुळे ज्याचा कधी विचारदेखील केला नव्हता अशा सुविधा स्मार्टफोन देऊ लागला. त्यातूनच जन्माला आलेली आणि सध्या वेगाने बाजारपेठ व्यापू पाहणारी संकल्पना म्हणजे ‘व्हिडीओ ऑन डिमांड’ (व्हिओडी).

मोबाइल फोन स्मार्ट होण्यापूर्वीच अमेरिकेत १९९७ साली नेटफ्लिक्सने ऑनलाइन माध्यमातून चित्रपट भाडेतत्त्वावर दाखवण्याची सुरुवात केली होती. तेव्हा भारतात नुकतेच कुठे खासगी सॅटेलाइट वाहिन्या सुरू झाल्या होत्या. इंटरनेटचा प्रसार तर मर्यादितच होता, पण मोबाइलचा देखील आजच्यासारखा सुळसुळाट नव्हता. तर तिकडे नेटफ्लिक्सने नंतर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या (इंटरनेटच्या माध्यमातून एखादी गोष्ट तुमच्या टीव्हीवर, संगणकावर, मोबाइलवर पाहता येणे. त्यामध्ये एखादी फाइल डाऊनलोड करण्याची आवश्यकता नसते.) माध्यमातून घरातील टीव्ही किंवा मोबाइलवर मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. २००५ मध्ये यूटय़ूबची सुरुवात झाली आणि पाहता पाहता अक्षरश: लाखो व्हिडीओ पाहायची सुविधा घरबसल्या आणि फुकटात मिळू लागली. पण ही अत्यंत विसंगत अशी सरमिसळ होती. ज्याला जे वाटले ते त्याने यूटय़ूबवर टाकावे आणि पाहण्यासारखे असेल तेवढे पाहणाऱ्याने पाहावे. नेटफ्लिक्सने तोपर्यंत ऑनलाइन स्ट्रीमिंगचे तंत्र चांगलेच विकसित केले होते आणि अमेरिकेच्या बाहेर हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान २००६ मध्ये अ‍ॅमेझॉनचे प्राइम व्हिडीओ सुरू झाले. छोटय़ामोठय़ा स्वरूपात इतरही अनेक पर्याय आले, पण या दोघांनी जागतिक बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली होती. येथे बाजारपेठ काबीज करताना तंत्रज्ञान तर हाती होतेच, पण त्याशिवाय गरज होती कार्यक्रमांची (या क्षेत्रात त्यासाठी कंन्टेंट हा इंग्रजी शब्द वापरला जातो). त्या त्या देशातील लोकांच्या आवडीनुसार स्थानिक कार्यक्रम विकत घेणे, नवीन निर्माण करणे आणि लोकांना आपल्या प्रणालीवरून मनोरंजनाची सवय लावणे हे त्यांनी सुरू केले.

भारतात ही प्रक्रिया तुलनेने काहीशा उशिराच आली. इंटरनेट टीव्ही वगैरे प्रकार आपल्याकडे मध्यंतरी आले, पण व्हिडीओ ऑन डिमांडच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा बदल झाला तो २०१६ मध्ये.

२०१६च्या जूनमध्ये नेटफ्लिक्स भारतीय बाजारपेठेत उतरले. तर अ‍ॅमेझॉन डिसेंबरमध्ये. त्याआधी स्टार, झी, वायकॉम १८ अशा काही उपग्रह वाहिन्यांच्या ग्रुपनी स्वत:चेच कार्यक्रम अ‍ॅपद्वारे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची सुरुवात केली होती. हॉटस्टार या स्टार समूहाच्या अ‍ॅपने तर केवळ चाळीस दिवसांत ४० दशलक्ष डाऊनलोडचा दावा केला आहे. २०१५च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान त्यांच्या अ‍ॅपला सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभल्याचे वृत्त आहे. पण नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनच्या आगमनानंतर खरा धडाका सुरू झाला. कारण या दोन्ही कंपन्या अत्यंत आक्रमकपणे प्रचंड गुंतवणूक करू लागल्या. जानेवारीमध्ये नेटफ्लिक्सने व्होडाफोन, एअरटेल आणि व्हिडीओकॉन डीटूएच यांच्यासोबत एक करार केला, ज्यामुळे या कंपन्यांच्या ग्राहकांना सवलतीच्या दरात नेटफ्लिक्सवरील कार्यक्रम पाहता येतील. शाहरुख खानच्या रेड चिली या कंपनीसोबतदेखील नेटफ्लिक्सने त्यांच्या आजवरच्या आणि आगामी चित्रपटांसाठी करार केला आहे. तसेच अनुराग कश्यप या यशस्वी दिग्दर्शकासोबत नवीन चित्रपटच करण्याचे घाटत आहे. अ‍ॅमेझॉनने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनबरोबर आणि मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्स या निर्मितीगृहासोबत अशाच प्रकारे जुन्या आणि नव्याने येणाऱ्या चित्रपटांसाठी करार केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी उपलब्ध आणि भविष्यातील कार्यक्रमांबाबत करार तर केलेच, पण स्वत:च्या अखत्यारीतच अनेक कार्यक्रमांची निर्मिती सुरू केली. अ‍ॅमेझॉनने तर चौदा मालिका प्रदर्शित केल्या आहेत. देशातील मनोरंजनाच्या क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांच्या निर्मितीगृहांचे आजवरचे चित्रपट आणि यापुढे येणारे चित्रपटदेखील आपल्याच माध्यमातून कसे पाहता येतील हा त्यामागील अत्यंत स्पष्ट असा बाजारपेठीय हेतू. ही सगळी उलाढाल प्रामुख्याने सुरू झाली ती मागील सहा महिन्यांत. डिसेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ मध्ये त्याला प्रचंड गती आली. अत्यंत आक्रमकपणे या दोन्ही कंपन्यांनी बाजारपेठेत आपली जागा तयार करायला सुरुवात केली. हे होतानाच गेल्या चार-पाच महिन्यांत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे मोबाइल सुविधा देणाऱ्या कंपन्यादेखील यात उतरल्या. अ‍ॅमेझॉन असो की नेटफ्लिक्स या दोघांनाही बाजारपेठेतील वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइल सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांना आकृष्ट करणे गरजेचे आहे. पण मुळातच मोबाइल सुविधा वापरणारा ग्राहक हा ती सुविधा पुरवणाऱ्या कंपनीशी थेट निगडित असतो. त्यामुळे काही मोबाइल कंपन्यांनी आपल्या सुविधांचा विस्तार करत स्वत:हून आपल्या ग्राहकांना ‘व्हिडीओ ऑन डिमांड’ची सुविधा द्यायला सुरुवात केली. खरंतर मोबाइल सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या मूलभूत कामात याचा समावेश होत नाही. किंबहुना व्हिडीओ ऑन डिमांड हा पूर्णपणे स्वतंत्र प्रकार आहे. पण मोबाइलसाठी आपलीच सुविधा वापरणारा ग्राहक व्हिडीओ पाहण्यासाठी स्वतंत्र कोणती तरी व्यवस्था वापरत असेल तर तीच सुविधा आपणच द्यायला काय हरकत आहे इतका साधा असा हा व्यवहार.

जानेवारी २०१७ मध्ये आयडियाने स्वत:ची अशी व्यवस्था सुरू केली. तब्बल २०० दशलक्ष ग्राहक त्यांच्याकडे असल्याने त्यांना आयताच मोठा ग्राहक मिळाला. तर जिओने सुरुवातीपासूनच ही सुविधा दिली आहे. एअरटेलदेखील यामध्ये कार्यरत झाले आहे.

थोडक्यात काय तर गेल्या चार-पाच महिन्यांत व्हिडीओ ऑन डिमांड ही सुविधा देणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक भारतीय मोबाइलधारक हा स्वत:च्या प्रणालीचा ग्राहक झालेला हवा आहे. त्यातूनच अत्यंत स्वस्त दरात (सुरुवातीला महिना तीन महिने मोफत आणि नंतर वर्षांला पाचशे रुपये) ही सुविधा दिली जाताना दिसत आहे. पण यांच्यात खरी चढाओढ सध्या सुरू आहे ती म्हणजे भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने अधिकाधिक कार्यक्रम वाढवण्याची. ज्याच्याकडे सर्वाधिक आणि पाहिले जाणारे कार्यक्रम अधिक त्यालाच ग्राहकाची पसंती मिळणार हे अगदी उघड आहे. वर उल्लेखलेले सर्व करार हे त्यादृष्टीनेच होत आहेत आणि भविष्यात होत राहणार.

तंत्रज्ञानाने मनोरंजनाच्या क्षेत्राला दिलेले हे नवे वळण आपल्याकडे भरपूर उलथापालथ करणार आहे. अशी उलथापालथ अमेरिकेत यापूर्वीच झाली आहे. ही नेमकी काय आहे आणि ती कशी होतेय यादृष्टीने या क्षेत्रातील काही धुरिणांची मतं पाहणे गरजेचे ठरेल.

मुळात आपल्या समाजाला पैसे देऊन मनोरंजन करून घ्यायची सवय नाही. आज चित्रपटाची पायरेटेड कॉपी सहजपणे एका मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये जात असते. तर जे चित्रपट आपल्याकडे पाहायला मिळत नाहीत, किंवा जे आता परत सिनेमागृहात लागणार नाहीत असे अनेक चित्रपट टोरंटसारख्या साइटचा वापर करून डाऊनलोड करणाऱ्यांमध्ये अगदी उच्च वर्गापासून, चित्रपट अभ्यासकांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वाचा समावेश होतो. असे असेल तर आपण व्हिडीओसाठी वर्षभराचे पैसे भरून चित्रपट, मालिका, विनोदी कार्यक्रम, कार्टून्स पाहणार का, लोकांची ही सवय बदलेल का असे प्रश्न निर्माण होतात. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे भारताचे प्रमुख नितेश कृपलानी याबाबतीत सांगतात की, सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरून काहीही पाहण्यासाठीचे जे काही पैसे आकारले जातात ते अगदी पाणीपुरीच्या किमती इतकेदेखील नाहीत. त्यापुढे जाऊन ते एक अत्यंत धाडसी विधान करतात. ते म्हणतात, ‘‘आम्ही लोकांना पैसे देऊन व्हिडीओ पाहण्याची सवय लावू. किंबहुना लोकांच्या सवयी बदलू.’’ आजच्या व्हिडीओ युद्धाचे नेमके सूत्र कृपलानींच्या बोलण्यातून थेट जाणवते. अ‍ॅमेझॉनसारखी एखादी कंपनी लोकांच्या सवयी बदलू असे म्हणते तेव्हा त्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. कारण ही सवय एका दिवसात बदलत नसते. त्यासाठी मार्केटिंगचा ठोस आधार अपेक्षित असतो आणि आज आपल्याकडे तेच तर होताना दिसत आहे.

या व्हिडीओ युद्धाशी निगडित घटकांबाबत तज्ज्ञांशी चर्चा केल्यावर लक्षात येते की सर्वच कंपन्या या नव्या युद्धासाठी सज्ज आहेत. काही कंपन्या या नव्या प्रवाहाबरोबर कसे जुळवून घेऊ हे पाहताहेत, तर काही कंपन्या नव्या प्रवाहातदेखील आपलं अस्तित्व टिकून राहणार यावर ठाम आहेत.

मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत निर्माते संजय छाब्रिया सांगतात की, आज लगेच या प्रणालीच्या भविष्यावर भाष्य करणे हे घाईचे होईल. त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. पण जे लोक आज पायरेटेड कार्यक्रम पाहत आहेत ते नजीकच्या भविष्यात या माध्यमांचा वापर करण्याची शक्यता अधिक आहे. सुरक्षित, अधिकृत आणि दर्जेदार दृक्श्राव्य गुणवत्ता असेल तर अशा लोकांच्या सवयी नक्कीच बदलतील. पण त्यामुळे चित्रपटगृहांचे स्थान जाऊन थेट व्हिडीओ ऑन डिमांड प्रणालीवर चित्रपट प्रदर्शित होतील हे अशक्य आहे. त्याचबरोबर यूटय़ूब आणि व्हीओडी प्रणाली यांची तुलनादेखील आत्ता लगेचच करता येणार नाही.

हा भाग झाला चित्रपटांच्या अनुषंगाने. पण आज व्हिडीओ ऑन डिमांड प्रणालीवर चित्रपटांच्या जोडीनेच इतर अनेक कार्यक्रम पाहता येतात. त्यामध्ये परदेशी मालिकांचा समावेश अधिक आहे. त्यातच अनेक व्हिडीओ ऑन डिमांड पुरवठादारांनी स्वत:चे स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले आहेत. या सर्वामुळे लोकांच्या सवयी बदलून थेट टेलिव्हिजनलाच स्पर्धा निर्माण होऊ शकते का, हा प्रश्नदेखील उपस्थित होतो. याबद्दल वायकॉम एटीनच्या कलर्स मराठीचे चॅनल हेड अनुज पोद्दार सांगतात, सध्या तरी ही स्पर्धा टीव्हीशी नाही. सध्या व्हिडीओ ऑन डिमांड सुविधा देणाऱ्यांमध्येच ही स्पर्धा आहे. तसेच आज तरी टीव्ही आणि सिनेमागृहांच्या प्रेक्षकांपेक्षा व्हिडीओ ऑन डिमांड प्रेक्षकांची संख्या तुलनेने कमीच आहे. लोकांच्या सवयी बदलतील याबद्दल ते सकारात्मक आहेत, पण प्रेक्षक  टीव्हीच्या मोठय़ा पडद्यावरच आपल्याला हवे ते कार्यक्रम पाहणेच पसंत करतील असे ते नमूद करतात. व्हिडीओ ऑन डिमांडनुसार आपल्याला हवं तेवढंच पाहून पुन्हा रोजच्या वापरासाठी टीव्हीलाच प्राधान्य राहील असं त्यांना वाटतं. ते आणखी एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे ते लक्ष वेधतात तो म्हणजे कार्यक्रमाची गुणवत्ता. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम कोणतेही असो, जोपर्यंत तुम्ही उत्तम दर्जेदार कार्यक्रम देत आहात तोपर्यंत तुम्हाला मरण नाही, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन एक माध्यम मिळाल्याची संधी ते प्रकर्षांने नमूद करतात. या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचता येते हे अमेरिकेत दिसून आल्याचे ते दाखवून देतात. अमेरिकेत आज टीव्ही पाहण्यासाठी ५० डॉलर्स प्रतिमहिना खर्च करावा लागतो, तर नेटफ्लिक्ससाठी केवळ नऊ डॉलर. त्यामुळे नेटफ्लिक्सची केबल तेथे टीव्हीला जोडली जाते. जोपर्यंत तुम्ही दर्जेदार कार्यक्रम देत आहात तोपर्यंत ते प्रसारित करण्याचे माध्यम काय आहे हा प्रश्न बाजूला राहतो. कार्यक्रम देणारी माध्यमं म्हणजेच आत्ताचा टीव्ही जोपर्यंत स्वत:ची जागा टिकवून आहे तोपर्यंत प्रसारणाचे माध्यम हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने गौण आहे.

व्हिडीओ ऑन डिमांडमध्ये स्वतंत्रपणे स्वत:चा ग्राहकवर्ग जोडणाऱ्या कंपन्या आहेत, तशाच स्वत:कडे मूलत: असलेल्या ग्राहकसंख्येचा पाया वापरून त्याआधारे व्हिडीओ ऑन डिमांड सुविधा देणाऱ्यांची सुरुवातदेखील आपल्याकडे झाली आहे. आयडियाने जानेवारी २०१७ पासून पुढील तीन महिने ही सुविधा मोफत दिली आहे. आयडियाच्या कार्यक्रम विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत शिंदे सांगतात की, त्यांच्याकडे तब्बल २०० दशलक्ष इतकी ग्राहकसंख्या आहे. नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनच्या भारतातील ग्राहकवर्गापेक्षा ही संख्या कैकपटीने मोठी आहे. त्याचा वापर मोबाइलच्या मूलभूत सुविधा देण्यापेक्षा अन्य ठिकाणी तसा कमीच होत होता. तेव्हा हा ग्राहकवर्ग वापरून व्हिडीओ सेवा सुरू न करण्यात काहीच अर्थ नव्हता. सध्या तरी आयडिया स्वत:चे कार्यक्रम तयार करत नाही. सध्या या क्षेत्रातील प्रस्थापितांकडूनच आयडिया असे कार्यक्रम खरेदी करत आहे. इरॉसशी नुकताच त्यांचा करार झाला असून आधीच्या तसंच यापुढच्या इरॉसच्या सर्व चित्रपटांचे व्हिडीओ ऑन डिमांडचे हक्क त्यांच्याकडे असतील. या माध्यमातून दर्जेदार, सुरक्षित असे काही अधिकृतपणे पाहता आलं तर नक्कीच प्रेक्षक या प्रणालीकडे वळतील असा विश्वास त्यांना आहे. किंबहुना लोकांच्या सवयी बदलतील यावर ते ठाम आहेत. बदलत्या काळात इंटरनेटच्या वाढत्या सुविधांमुळे हे शक्य होण्याची त्यांना खात्री आहे. त्याचबरोबर निर्मात्यांना येथे हक्क विकून पैसे मिळवण्याचे नवीन माध्यम निर्माण झाल्याचे ते सांगतात. मुख्यत: प्रादेशिक चित्रपटांना, कार्यक्रमांना त्यामुळे बरेच पर्याय उपलब्ध होतील अशी आशा ते व्यक्त करतात.

जागतिक पातळीवर विचार करता आज अ‍ॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स हे यशस्वी झाले आहेतच. त्याचबरोबर अनेक नवीन प्रयोगदेखील येऊ घातले आहेत. त्यासंदर्भात हेमंत शिंदे सांगतात की, भविष्यात शुक्रवारी थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होताना त्याच वेळी तो व्हिडीओ ऑन डिमांड प्रणालीवर येऊ शकेल अशी प्रारूपं आता विकसित होत आहेत. त्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी कदाचित अधिक पैसे मोजावे लागतील, पण ते थिएटरमध्ये जाऊन पाहण्यापेक्षा नक्कीच कमी असतील. त्यामुळे भविष्य हे स्ट्रिमिंगचे असणार याबाबत ते खूपच आशावादी आहेत.

याच मुद्दय़ांच्या अनुषंगाने मराठी चित्रपट व्यवसायात अनेक प्रयोग यशस्वी करणारे झी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख निखिल साने सांगतात की, येणारा काळ हा तंत्रज्ञानाचाच असणार यात काहीच शंका नाही. आजच तंत्रज्ञानाने आपल्या अनेक सवयी बदलल्या आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत घरात असो की मित्रमंडळींमध्ये किंवा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात, आपण मोबाइलशी सतत जोडलेलो असतो. सुरुवातीच्या गप्पा झाल्यावर प्रत्येकजण मोबाइलवर गुंतून जातो. हे चित्र पूर्वी नव्हते. मोबाइल हे वैयक्तिक पातळीवर करमणुकीचे साधन झाल्याचे ते याद्वारे नमूद करतात. त्यामुळे या बदलत्या काळानुसार त्यामध्ये आमचे स्थान अबाधित राखणे किंवा त्यामध्ये यशस्वीरीत्या सामावून जाणे हे आव्हान असणार आहे असे ते सांगतात. अर्थातच यामध्ये तरुणाईची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते नमूद करतात. व्हिडीओ ऑन डिमांड प्रणालीच्या आगमनामुळे पायरसीला आळा बसू शकण्याबाबत ते आशावादी आहेत. त्याचबरोबर लोकांच्या सवयी बदलतील, नवीन प्रेक्षकवर्ग आकर्षित होईल हे सर्व फायदे आहेतच. पण येणाऱ्या काळाचे हे आव्हान मनोरंजनाशी निगडित सर्वानाचा असणार असल्याचे ते सांगतात.

एकंदरीतच भारतात सुरू झालेल्या व्हिडीओ युद्धाच्या अनुषंगाने संबंधित घटकांच्या या प्रतिक्रिया काही समान गोष्टी अधोरेखित करतात. या सर्वानीच तंत्रज्ञानाने घडवलेला बदल ठळकपणे मांडला आहे. आणि तंत्रज्ञानामध्ये तुमच्या सवयी बदलण्याची ताकद आहे हेदेखील त्यांनी नमूद केलेय. आज मोबाइल तंत्रज्ञानातील करमणुकीच्या साधनांचा वापर करण्यात तरुण पिढीच नाही तर ज्येष्ठ नागरिक वर्ग कांकणभर पुढे आहे. अशा पाश्र्वभूमीवरच हे युद्ध सुरू झालेय हेदेखील या क्षेत्रातील लोकांना मान्य आहे. भविष्यात काय होईल यावर त्यांच्यात मतभिन्नता आहे. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा सामाईक मुद्दा लक्षात घेतला तर काही गोष्टी येथे प्रकर्षांने मांडाव्या लागतील.

मनोरंजनाच्या माध्यमांची वाढ ही तंत्रज्ञानावर आधारित आहे. कलागुण, प्रतिभा या मूलभूत घटकांना तंत्रज्ञानाने दिलेल्या चालनेमुळेच ल्यूमियर बंधूंनी २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिसच्या ग्रॅण्ड कॅफेमधून सुरू केलेला हा प्रवास आज तुमच्या तळहातावर येऊन ठेपला आहे. (मोठा पडदा – छोटा पडदा – तळहातावरील पडदा) त्यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे केवळ काही स्वान्तसुखाय नाही, तर तो एक व्यवसाय आहे. त्यामुळे कलाधारित चित्रपट, मालिका किंवा अन्य काहीही तयार झाल्यानंतर त्याचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये होते. मग त्याला बाजारपेठेचे सर्व नियम लागू होतात. तेच मनोरंजन क्षेत्राबाबत आहे. त्यातून सुरू होते ती स्पर्धा. जसे आपल्याकडे व्हिडीओ युद्ध सुरू झालेय.

एक-दीड मिनिटाच्या चलतचित्रांपासून ते आजच्या मोबाइलपर्यंत तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि तंत्रज्ञानाचे एक मूलभूत सूत्र म्हणजे जसा त्याचा वापर वाढतो तसा त्याचा आकार कमी होतो, वेग वाढतो आणि किंमत कमी होते. किंबहुना करमणुकीच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर ते अगदी ठळकपणे दिसून येते. नासकॉमच्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत देशातील स्मार्टफोनधारकांची संख्या ७०० दशलक्ष असणार आहे. तर दुसऱ्या एका अहवालानुसार इंटरनेटवरील व्हिडीओ ऑन डिमांड प्रणालीच्या वापरात २०१९ पर्यंत ७४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. आज या बहुराष्ट्रीय कंपन्या जेव्हा शड्डू ठोकून मैदानात उतरतात तेव्हा त्यांच्यापुढे तंत्रज्ञानावरील खर्च हा मुद्दा तुलनेने कमी असतो. त्याऐवजी मनोरंजनाचे कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावीपणे, सर्वप्रथम जनसामान्यांपर्यंत आपणच कसे लवकर पोहोचवू हा मुद्दा महत्त्वाचा असतो. मग त्यासाठी कोटय़वधींची गुंतवणूक करायलादेखील हरकत नसते. तशी ती आताच होत आहे. एका प्रथितयश मराठी निर्मात्यांना त्यांच्या आजवरच्या चित्रपटांसाठी दोन कोटी रुपये स्ट्रिमिंगच्या हक्कापोटी मिळाल्याचे सांगितले जाते. आणि यशस्वी मराठी सिनेमाला पन्नासेक लाख रुपये मिळत आहेत. त्यामुळेच तंत्रज्ञानाधारित अशी एक नवीन स्पर्धा आज अनुभवायला मिळत आहे. पण येथेच तंत्रज्ञानाचे आणखी एक मूलभूत तत्त्व नमूद करावे लागेल. तंत्रज्ञान विशेषज्ज्ञांच्या मते गेल्या पाचेक वर्षांत तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा प्रचंड आहे. त्यामुळेच एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी विशिष्ट तंत्रज्ञान विकसित होताना दिसत आहे. मर्यादित इंटरनेट स्पीडचा यशस्वी वापर करणारे स्काइप लाइटसारखे प्रयोग केवळ भारतासाठीच केले जात आहेत. गुगलने नुकताच दुर्गम भागांसाठी हॉट एअर बलूनच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. मायक्रोसॉफ्टने स्पेक्ट्रममधील (विविध लहरी वाहून नेण्याची क्षमता असणारे जाळे) न वापरल्या जाणाऱ्या व्हाइट स्पेसचा वापर करण्याचा यशस्वी प्रयोग सहा महिन्यांपूर्वी केला आहे. हे बदल भविष्यात आणखीनच वेगाने होताना दिसत आहेत. हे प्रयोग करणाऱ्यांमध्ये जागतिक पातळीवरील कंपन्यांचा समावेश आहे. अर्थातच पूर्वी एखादे तंत्रज्ञान रुळायला जितका वेळ मिळायचा तितका आता कदाचित मिळणारदेखील नाही. किंबहुना दीड-एक मिनिटाची चलचित्रफीत ते टीव्ही ते मोबाइलचा प्रवास हा तुलनेत संथ होता. पण गेल्या चार वर्षांत हा वेग इतका वाढलाय की, या व्हिडीओ युद्धामध्ये तगून राहतानाच आणखी एखादे नवीन तंत्र जन्माला येईल का याची कसलीही खात्री देता येत नाही. त्यातच विकसित केलेले नवीन तंत्र पाश्चात्त्यांकडून आपल्याकडे पोहोचायला आता फार वाट पाहावी लागली नाही. करमणुकीचे क्षेत्र हे अशा सर्वच बदलांना अत्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणात स्वीकारते हे जगात सर्वत्रच दिसून येते आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराची राक्षसी गती आपण पाहतोच आहोत. हे सर्व पाहता उपलब्ध वेळेत सर्वाधिक ग्राहकसंख्या कोण ओढतो हेच यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातूनच या व्हिडीओ युद्धाची ठिणगी पडली असे नक्कीच म्हणता येईल. यात कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2