भारतात होणाऱ्या पहिल्याच फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सहभागी संघांविषयी काही महत्त्वाच्या आकडेवारी…

भारत

५७     आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) स्पर्धेत भारताने ५७ वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. १९४८ ते १९६० अशा सलग चार ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धामध्ये भारताने सहभाग घेतला होता.

१८     फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत सहभागी होणारा भारत हा १८ वा आशियाई देश आहे.

०५     आशियाई देशाला फिफा युवा विश्वचषक स्पध्रेचे मिळालेले हे पाचवे यजमानपद. याआधी चीन (१९८५), जपान (१९९३), कोरिया प्रजासत्ताक (२००७) आणि संयुक्त अरब अमिराती (२०१३) यांनी या स्पध्रेचे यजमानपद भूषविले आहे.

अमेरिका

१६     फिफा युवा विश्वचषक स्पध्रेत अमेरिका सोळाव्यांदा सहभागी होत आहे. याचबरोबर सर्वाधिक १६ वेळा सहभाग घेणाऱ्या ब्राझीलच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केली. २०१३च्या विश्वचषक स्पध्रेत त्यांना सहभागापासून वंचित रहावे लागले होते. तत्पूर्वी, त्यांनी सलग १४ वेळा या स्पध्रेत सहभाग घेतला आणि १९९९ च्या स्पध्रेतील चौथे स्थान ही त्यांची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

२८     या विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक २८ पराभव अमेरिकेच्या नावावर आहेत. तसेच सर्वाधिक ९६ गोल्सही त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला करू दिले आहेत.

१००० अमेरिकेच्या रायन सोरोकाने विश्वचषक स्पध्रेतील १०००वा गोल केला. आत्तरयत या स्पध्रेत १८५९ गोल्स झाले आहेत आणि २०१७ च्या या स्पध्रेत २००० गोल्सचा पल्ला पार होण्याची अपेक्षा आहे.

कोलंबिया

०८     कोलंबिया ८ वर्षांनंतर युवा फुटबॉल विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे. २००९ च्या स्पध्रेत ते अखेरचे खेळले होते आणि त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. २००३ मध्ये त्यांनी चौथे स्थान पटकावले होते.

९-१    कोलंबियाने २००३च्या विश्वचषक स्पध्रेत फिनलँडवर ९-१ असा मोठा विजय मिळवला होता. इतक्या मोठय़ा फरकाने विजय मिळवणारा तो दुसरा संघ ठरला. यापूर्वी स्पेनने १९९७ मध्ये न्यूझीलंडवर १३-० अशी मात केली होती.

०४     फिफा युवा विश्वचषक स्पध्रेत हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या चार खेळाडूंमध्ये कोलंबियाच्या कार्लोस हिडाल्गोचा समावेश आहे. त्याने २००३ मध्ये फिनलँडविरुद्धच्या ९-१ अशा विजयात चार गोल्स केले होते. स्पेनचा डेव्हिड (१९९७), आयव्हरी कोस्टाचा सौलीमॅन कॉलीबॅली (२०११) आणि नायजेरियाचा केलेची आयहीनाचो (२०१३) यांनी अनुक्रमे न्यूझीलंड, डेन्मार्क आणि मेक्सिकोविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली होती.

घाना

१०    घानाने २००७ मध्ये कोरिया येथे झालेल्या विश्वचषक स्पध्रेत अखेरचा सहभाग घेतला होता. १० वर्षांनंतर त्यांनी विश्वचषक स्पध्रेत पुनरागमन केले आहे.

२१     विश्वचषक स्पध्रेतील मागील २१ सामन्यांत घानाने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गोल करण्याचा विक्रम केला आहे. जर्मनीने २००८ ते २०१५ या कालावधीत हा विक्रम नोंदवला. भारतात होणाऱ्या स्पध्रेतील पहिल्याच सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्धीविरुद्ध गोल केल्यास, ते या विक्रमात आघाडी घेतील.

०४     पश्चिम अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांपैकी सलग चार विश्वचषक स्पर्धाच्या (१९९१ ते १९९७) अंतिम फेरीत खेळणारा घाना हा एकमेव संघ आहे. त्यांनी १९९१ आणि १९९५ मध्ये जेतेपदाला गवसणी घातली.

पॅराग्वे

०४     पॅराग्वे चौथ्यांदा विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत असून १९९९च्या स्पध्रेत पदार्पणातच त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता आणि ती त्यांची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

०५     पॅराग्वेने १९९९ च्या विश्वचषक स्पध्रेत जमैकावर ५-० असा मिळवलेला विजय ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.

माली

०३     उपविजेत्या माली संघाने विश्वचषक स्पध्रेत चार वेळा सहभाग घेतला आणि त्यापैकी तीन वेळा त्यांनी बाद फेरीपर्यंत मजल मारली. १९९९ च्या विश्वचषक स्पध्रेत त्यांना गट साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता.

२४     विश्वचषक स्पध्रेच्या १८ सामन्यांत मालीने केवळ २४ गोल केले. ०.६१ या सरासरीने गोल त्यांच्या नावावर आहेत आणि ही स्पध्रेतील निच्चांक गोलसरासरी आहे.

०२     मालीने सलग दुसऱ्यांदा युवा आफ्रिका चषक उंचावला. २०१७ च्या अंतिम फेरीत त्यांनी घानावर विजय मिळवला.

न्यूझीलंड

०६     सलग सहाव्यांदा न्यूझीलंड विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत आहे आणि त्यांनी एकूण ८ वेळा या स्पध्रेत सहभाग घेतला आहे. २००९, २०११ आणि २०१५ मध्ये त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

०७     ओशियानीक फुटबॉल कॉन्फडरेशनची सात जेतेपद न्यूझीलंडच्या नावावर आहेत आणि यापैकी सहा जेतेपद त्यांनी सलग जिंकलेली आहेत. मागील सहा हंगामात न्यूझीलंडने २८ पैकी २७ सामन्यांत विजय मिळवले, तर एक लढत अनिर्णीत राहिली. त्यांनी ४.१४ च्या सरासरीने ११६ गोल्सचा पाऊस पाडला, तर केवळ १५ गोल खाल्ले.

टर्की

०८     टर्की संघ आठ वर्षांनी विश्वचषक स्पध्रेसाठी पात्र ठरला आहे. याआधीच्या दोन स्पर्धामध्ये त्यांनी सन्मानजनक कामगिरी केली. त्यांनी २००५मध्ये चौथे स्थान पटकावले, तर २००९ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

०५     गट साखळीत टर्कीने अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी पाच विजय मिळवले, तर एक लढत अनिर्णीत राहिली.

युएफा युरोपियन युवा स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या अँद्रास स्कोंकाच्या स्वयंगोलने टर्कीचा विश्वचषक स्पध्रेतील प्रवेश निश्चित केला.

इराण

०२     इराणने २००९ आणि २०१३ मध्ये गट साखळीचा अडथळा सहज पार केला. मात्र, त्यांना दोन्ही वेळेला उपउपांत्यंपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. २००९ मध्ये उरुग्वेने त्यांना भरपाई वेळेत २-१ असा, तर २०१३ मध्ये नायजेरियाने ४-१ अशा फरकाने विजय मिळवला.

०१     आशियाई खंडातून २०१७ च्या विश्वचषक स्पध्रेसाठी पात्र ठरणारा इराण हा पहिला देश आहे. त्यांनी एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धा जिंकून विश्वचषक स्पध्रेतील स्थान निश्चित केले. त्यानंतर अवघ्या काही तासांत जपानने विश्वचषक स्पध्रेतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

०५     इराणच्या मोस्ताफा हशेमीने २०१३च्या विश्वचषक स्पध्रेत अर्जेटिनाविरुद्ध ५५व्या सेकंदाला गोल केला होता. युवा विश्वचषक स्पध्रेतील तो पाचवा जलद गोल ठरला.

गिनी

०६     पहिल्या विश्वचषक स्पध्रेत (१९८५) सहभागी झालेल्या सहा संघापैकी भारतात खेळणाऱ्या संघामध्ये गिनीचा समावेश आहे. या यादीत ब्राझील, जर्मनी, मेक्सिको, अमेरिका आणि कोस्टा रिका यांचा समावेश आहे. पदार्पणाच्या स्पध्रेत गिनीने चौथे स्थान पटकावले होते आणि ती त्यांची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

०१     युवा विश्वचषक स्पध्रेच्या इतिहासात पेनल्टी शूटआऊटवर विजय मिळवणारा गिनी हा पहिलाच संघ आहे. त्यांनी १९८५च्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.

०३     सीएएफ (आफ्रिका महासंघ) युवा आफ्रिका चषक स्पध्रेत तिसरे स्थान पटकावून गिनीने विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली.

जर्मनी

१०     जर्मनीचा संघ दहाव्यांदा युवा विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत आहे. युरोपियन देशांमधून विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक सहभाग घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहेत. तसेच त्यांनी चार वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि युरोपियन देशांतील हा एक विक्रमच आहे. १९८५मध्ये त्यांना उपविजेतेपद मिळाले होते. २००७ आणि २०११मध्ये त्यांना तिसऱ्या, तर १९९७ मध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

०४     फिफा युवा विश्वचषक स्पध्रेत प्रतिनिधित्व केलेल्या चार खेळाडूंचा २०१४ च्या विश्वविजेत्या जर्मनी संघात सहभाग होता. त्यामध्ये रोमन वेइनेन्फेलर (१९९७), टोनी क्रूस (२००७), मारियो गोत्झे आणि श्कोड्रान मुस्ताफी (२००९) यांचा समावेश आहे.

१४     जर्मनीला युवा फुटबॉल स्पध्रेतील मागील १४ सामन्यांत एकदाही अनिर्णीत निकाल नोंदवता आलेला नाही. त्यांनी ९ सामन्यांत विजय, तर ४ पराभव स्वीकारले आहेत. २००९मध्ये कोलंबियाविरुद्ध त्यांनी अखेरचा ३-३ असा अनिर्णीत निकालाची नोंद केली होती.

कोस्टा रिका

०८     युवा विश्वचषक स्पध्रेत दहाव्यांदा सहभागी होणाऱ्या आठ देशांमध्ये कोस्टा रिकाचा समावेश आहे.

०४     कोस्टा रिकाने चार वेळा विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. २००१  ते २००५ अशा सलग तीन स्पर्धामध्ये त्यांनी ही कामगिरी केली, तर २०१३ मध्येही त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला.

उत्तर कोरिया

०३     उत्तर कोरियाने पदार्पणाच्या

विश्वचषक स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी तीनदा या स्पध्रेत सहभाग घेतला.

०५     उत्तर कोरियाने विश्वचषक स्पध्रेतील १५ सामन्यांपैकी ५ लढती १-१ अशा बरोबरीत सोडवल्या आहेत.

०४     आत्तापर्यंत चारही विश्वचषक स्पर्धामध्ये कोरियाला पहिल्या लढतीत विजय मिळवण्यात अपयश आले आहे. त्यात तीन पराभव आणि एका अनिर्णित निकालाची नोंद आहे.

नायजर

०३     भारत आणि न्यू कॅलेडोनिया यांच्यासह विश्वचषक स्पध्रेत पदार्पण करणारा नायजर हा तिसरा संघ आहे. तसेच आफ्रिकन खंडातून या स्पध्रेत खेळणाऱ्या २०व्या संघाचा मान त्यांनी पटकावला. आत्तापर्यंत युरोपियन खंडातून २२ संघांनी विश्वचषक स्पध्रेत सहभाग घेतले आहेत.

०४     मालीसह विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित करणारा नायजर हा अखेरचा संघ आहे. त्यांनी आफ्रिका चषक स्पध्रेत तंझानियावर १-० असा विजय मिळवून चौथे स्थान पटकावत ही कामगिरी केली.

०२     आफ्रिका चषक स्पध्रेच्या दुसऱ्या पात्रता फेरीत नायजरने गतविजेत्या नायजेरियाला नमवून धक्कादायक निकालाची नोंद केली. पहिल्या लढतीत ०-१ अशा पिछाडीवरून नायजरने परतीच्या लढतीत ३-१ असा निकाल नोंदवला आणि गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात आणले.

ब्राझील

७५     फिफा युवा विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक ७५ सामने ब्राझीलच्या नावावर आहेत. त्यात सर्वाधिक ४७ विजय आणि सर्वाधिक १६६ गोल्सचा विक्रम ब्राझीलने केला आहे. त्यात तीन जेतेपदांचा समावेश आहे.

०१     फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या इतिहासात पहिला गोल नोंदवण्याचा मान ब्राझीलला मिळाला आहे. १९८५ च्या पदार्पणीय लढतीत ब्राझीलच्या बिसमार्कने कतारविरुद्ध गोल केला.

१२     दक्षिण अमेरिकन युवा अजिंक्यपद स्पध्रेचे जेतेपद पटकावून ब्राझीलने विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली. त्यांनी १७ पैकी १२ वेळा दक्षिण अमेरिकन स्पध्रेचे जेतेपद पटकावले आहे.

स्पेन

०३     एकही जेतेपद न पटकावता सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा स्पेन हा पहिलाच संघ. त्यांना १९९१, २००३ आणि २००७ मध्ये अनुक्रमे घाना, ब्राझील आणि नायजेरियाकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

१३-० विश्वचषक स्पध्रेच्या इतिहासात मोठय़ा फरकाने विजय मिळवण्याचा विक्रम स्पेनच्या नावावर आहे. त्यांनी १९९७ मध्ये न्यूझीलंडवर १३-० असा विजय मिळवला होता.

१००    विश्वचषक स्पध्रेत शंभरहून अधिक गोल करण्याचा मान ब्राझील (१६६) आणि नायजेरिया (१४९) यांच्या नावावर आहे. स्पेनला या यादीत स्थान मिळवण्यासाठी अवघ्या तीन गोलची आवश्यकता आहे. त्यांच्यासोबत मेक्सिको (९७), जर्मनी (९२) आणि घाना (८६) यांनाही हा विक्रम खुणावत आहे.

होंडुरास

०५     होंडुरासने २००७ मध्ये विश्वचषक स्पध्रेत पदार्पण केले होते. त्यानंतर २०११ ची स्पर्धा वगळता या संघाने तीन विश्वचषक स्पध्रेत सहभाग घेतला असून यंदा ते पाचव्यांदा आपली छाप पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. २०१३ च्या स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची मजल ही त्यांनी सर्वोत्तम कामगिरी आहे.

०२     चार वेळा या स्पध्रेत खेळूनही होंडुरासला १४ पैकी केवळ दोनच लढती जिंकण्यात यश आले आहे. त्यांनी हे विजय संयुक्त अरब अमिराती (२-१) आणि उजबेकिस्तान (१-०) या आशियाई संघांविरुद्ध मिळवले आहेत.

०४     विश्वचषक स्पध्रेतील मागील चारही सामन्यांत होंडुरासला पराभव पत्करावा लागला आहे.

जपान

०८     आशियाई खंडातील जपान हा संघ आठव्यांदा विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत आहे. १९९३ आणि २०११ च्या स्पर्धामधील उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची मजल ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.

४६     जपानने एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून विश्वचषक स्पध्रेची पात्रता मिळवली. त्यांनी या स्पध्रेत ४६ गोल्सचा पाऊस पाडला आणि त्यात मंगोलियाविरुद्धचा १७-० हा सर्वात मोठा विजय ठरला.

६-०    जपानने २०११ च्या स्पध्रेत न्यूझीलंडवर ६-० असा विजय मिळवला. हा त्यांचा आणि आशियाई संघाने विश्वचषक स्पध्रेत मिळवलेला मोठा विजय आहे.

न्यू कॅलेडोनिया

०३     न्यू कॅलेडोनिया विश्वचषक स्पध्रेत पदार्पण करत आहे. ओशियानिक फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व करणारा हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतरचा तिसरा संघ आहे. परंतु आता ऑस्ट्रेलिया आशियाई फुटबॉल महासंघाकडून प्रतिनिधित्व करत आहे.

२०     बरोबर २० वर्षांपूर्वी ओशिनियन उपखंडातून विश्वचषक स्पध्रेत पहिल्यांदाच खेळण्याचा मान न्यूझीलंडने पटकावला आहे.

०२     भारतात होणाऱ्या या स्पध्रेत पहिल्यांदाच दोन ओशियानिक संघ सहभागी झाले आहेत. याआधी १९९९ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी सहभाग घेतला होता.

फ्रान्स

०१     विश्वचषक स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या तीन युरोपियन देशांमध्ये फ्रान्सचा समावेश आहे आणि २०१७ च्या स्पध्रेत सहभागी होणारा तो एकमेव संघ आहे. २००१ मध्ये फ्रान्सने विश्वचषक उंचावला होता. युरोपियन उपखंडातील सोव्हियट युनियन (१९८७) आणि स्वित्र्झलड (२००९) यांना ही स्पर्धा जिंकता आली आहे.

इराक  

०६     विश्वचषक स्पध्रेत एकही विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या सहा संघांपैकी इराक हा एक संघ आहे आणि २०१७ च्या स्पध्रेत सहभागी होणारा एकमेव संघ आहे.

०२     इराकला २०१३ च्या सत्रात गट साखळीत नायजेरिया आणि मेक्सिको या माजी विजेत्यांचा सामना करावा लागला होता.

०१     इराकने पहिल्यांदाच एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धा जिंकून विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली.

मेक्सिको

०२     मेक्सिकोने (२००५ व २०११) दोन वेळा विश्वचषक उंचावला आहे आणि विश्वचषक स्पध्रेत ते १३ वेळा सहभागी होत आहेत. त्यांनी विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक सहभाग नोंदवणाऱ्या संघांमध्ये अर्जेटिनासह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत ब्राझील,  अमेरिका (प्रत्येकी १६) आघाडीवर आहेत.

०७     विश्वचषक स्पध्रेत सलग सात विजय नोंदवणाऱ्या ब्राझील, नायजेरिया आणि स्वित्र्झलड या यादीत मेक्सिकोचाही समावेश आहे. त्यांनी २०११च्या स्पध्रेत ही कामगिरी केली.

२१     विश्वचषक स्पध्रेच्या २०१३ च्या हंगामात उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलचा पाऊस अनुभवायला मिळाला. ब्राझील आणि मेक्सिको यांच्यातील या लढतीत पेनल्टी शूटआऊटच्या २४ प्रयत्नांत २१ गोल करण्यात आले आणि मेक्सिकोने ११-१० असा विजय मिळवला.

चिली

०४     चिली सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत आहे. १९९३ च्या स्पध्रेतील तिसरे स्थान ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.

१३     विश्वचषक स्पध्रेतील १३ सामन्यांत चिलीला केवळ एकदाच प्रतिस्पर्धी संघाकडून गोल पत्करावा लागलेला नाही. १९९३ च्या विश्वचषक स्पध्रेत त्यांनी टय़ुनिसियावर २-० असा विजय मिळवला.

०२     चिलीने दक्षिण अमेरिकन अजिंक्यपद स्पध्रेत दुसरे स्थान पटकावून विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली.

इंग्लंड

०४     इंग्लंड चौथ्यांदा विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पध्रेत त्यांना पहिल्यांदाच पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता.

संकलन : स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com