‘नावाला’ भुलून चित्रपट पाहणे सोडून द्यायला हवे का हो?  ‘सिगारेट की तरह’ पाहताना सतत तसेच वाटत होते हो.  प्रमुख कलाकार अनोळखी वा थोडेसे ओळखीचे असोत वा नसोत. ‘सिनेमाच्या गोष्टी’त काही सांगण्यासारखे असेल नि दिग्दर्शकाच्या मांडणीत सामथ्र्य असेल तर चित्रपट पाहणे सुसह्य़ होते. अन्यथा समोसा-पॉपकॉर्नवर जास्त लक्ष राहते.. ‘सिगारेट की तरह’चा आशय काय? माणसाचे आयुष्य सिगारेटप्रमाणे थोडं थोडं राख होत जाते नि त्याचे थोटूक अखेर पायाखाली तुडवले जाते..  अरे हा एका पटकथाकार- दिग्दर्शकाचा दृष्टिकोन झाला. त्यासाठी काही कोटी रुपयांची राख का करावी? कानपूरचा युवक नोकरीनिमित्ताने गोव्यात मैत्रिणीकडे राहत असताना एका युवतीच्या प्रेमात पडतो, आपल्या ‘बॉक्स’च्या हत्येचा आरोप या युवकावर येतो, यापेक्षा आपली प्रेयसी त्याची पत्नी असल्याचे समजल्याने तो हादरतो. स्वत:ला निर्दोष सिद्ध करणे व आपली प्रेयसी आपल्याशी अशी का बरे वागली याचा नायकाचा शोध-बोध म्हणजे हा चित्रपट. उत्तरार्धात रहस्याचा चकमा बसतो. पण एकूणच मामला यथातथाच! चित्रपटातून गोवा दर्शन नवीन राहिले आहे का सांगा? तेवढय़ासाठी ‘सिगारेट की तरह’ जळत का जायचे..