|
|
|
 |
 |
|
क्रीडा
|
|
|
 |
|
|
जाफरचे हंगामातील पहिले त्रिशतक
सचिनचे नाबाद शतक
मुंबई ६ बाद ६३७
चेन्नई, ५ जानेवारी / वृत्तसंस्था
काल संथ फलंदाजी करणाऱ्या कर्णधार वसीम जाफरने आज मात्र आक्रमक फलंदाजी करीत येथील चिदंबरम स्डेडियमवर धुडगुस घातला आणि सौराष्ट्रच्या गोलंदाजीतली पुर्ण हवाच काढून टाकली. आजच्या खेळामध्ये जाफरने कर्णधाराला साजेसी खेळ करीत हंगामातले पहिले त्रिशतक तर झळकाविलेच, पण मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर तिसऱ्या विकेटसाठी २२७ धावांची भागी
रचून संघाला ६०० धावांचा महत्वपुर्ण टप्पासुद्धा गाठून दिला. दिवसाअखेर मुंबईने ६ गडय़ांच्या मोबदल्यात ६३७ धावांचा डोंगर उभारला असून पहिल्या डावाच्या आाघाडीच्या जोरावर सौरााष्ट्रला त्यांच्याच चालीत मात देण्याची रणनिती यावेळी त्यांनी आखली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
गेल्यावर्षी सौराष्ट्रने ‘रडीचा डाव ’ खेळत मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले होते. आज मुंबईने धावांचा डोंगर उभारलेला असला तरी डाव घोषित केला नसल्याने त्यांना त्याांच्याच भाषेत उत्तर देण्याचा मार्ग मुंबईने अवलंबलेला आहे.
दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीपासूनच कोणतेही दडपण न घेता वसीम जाफरने (३०१) गोलंदाजांवर ‘दादागिरी’ केली. काल अर्धशतक झळकावून हंगामात हजार धावा पूर्ण करणाऱ्या अजिंक्य रहाणेला (८५) मोठी खेळी साकारता आली नाही, त्याला मकवानाने सितांशू कोटककरवी झेलबाद केले. त्यानंतर तापाने फणफणलेला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (नाबाद १२२) फलंदाजीला आला आणि त्याची फलंदाजी पाहून सौराष्ट्रच्या संघ आजारी पडला. वाढत्या वयानुसार सचिनची आक्रमकता कमी होत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होत होती, पण आजची त्याची खेळी पाहून ‘तो’ पूर्वीचा सचिन परत दिसत असल्याचे बोलले जात होते. त्याने ९ चौकार आणि सामन्यात सर्वाधिक पाच गगनभेदी षटकार ठोकत शतक झळकाविले. या दोन्हीही फलंदाजांनी गोलंदाजांची पिसे काढीत मुंबईला जलद गतीने धावा पूर्ण करायला मदत केली. १५० व्या षटकात १२२ धावा झाल्यानंतर सचिनला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याने तंबूत परतण्याचा निर्णय घेतला. तंबूत परतण्यापूर्वी सचिनने जाफरबरोबर तिसऱ्या विकेटसाठी २२७ धावांची भागी रचून संघाला साडे पाचशेचा टप्पा गाठून दिला. सचिन निवृत्त झाल्यानंतर फलंदाजीला आलेला अमोल मुजुमदार (२) लवकरच तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माला साथीला घेऊन जाफरने त्रिशतक झळकाविले. त्रिशतक झळकाविल्यानंतर जाफर रणजी सामन्यातला त्याचा विक्रम मोडेल असे वाटत होते, पण राकेश ध्रुवने त्याला बाद केले आणि सौराष्ट्रला ‘बॅकफूट’ वर ढकलून तंबूत परतला. त्यानंतर रोहीत शर्मा (२८) आणि अजित आगरकर(२) यांना मोठी धावसांख्या उभारण्यात अपयशी ठरले. दिवसअखेर अष्टपैलू अभिषेक नायर (नाबाद २९) आणि रमेश पोवार (नाबाद २) खेळत होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सातशे धावा पूर्ण करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.
मुंबई पहिला डाव-: विनायक सामंत पायचीत गो. ध्रुव ४९, वसीम जाफर झे. व गो. ध्रुव ३०१, अजिंक्य रहाणे झे. कोटक गो. मकवाना ८५, सचिन तेंडुलकर निवृत्त नाबाद १२२, अमोल मुजुमदार झे. जोगीयानी गो. बी. जाडेजा २, रोहित शर्मा पायचीत गो. रविंद्र जाडेजा २८, अभिषेक नायर नाबाद २९, आजित आगरकर पायचीत गो. रविंद्र जाडेजा २, रमेश पोवार नाबाद २, एकूण १८० षटकात ६ बाद ६३७. अवांतर- ११. बाद क्रम - १-९१(सामंत), २-३३२ (रहाणे), ३-५६४ (मुजुमदार), ४-५८० (जाफर), ५-६१५ (शर्मा), ६-६१९ (आगरकर)
गोलंदाजी- जोबनपुत्र ३४-६-९९-०, बी. जाडेजा ४२-२-१५०-१, रविंद्र जाडेजा ३९-४-१००-२, ध्रुव ४२-२-१६१-२, मकवाना १२-१-८६-१, कोटक ६-१-१२-०, शाह ३-०-१४-०, पुजारा १-०-७-०. |
|
|
|
 |