|
|
|
 |
 |
|
क्रीडा
|
|
|
 |
|
|
ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० स्पर्धेत प्रथमच ‘डबल’ बॅट
मेलबर्न, ५ जानेवारी / पी. टी. आय.
क्रिकेटच्या स्वरूपात झपाटय़ाने बदल होत असताना आता ऑस्ट्रेलियातील स्थानिक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमच दोन्ही बाजूंनी सपाट अशा बॅटचा उदय होणार आहे. न्यू साऊथ वेल्सचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि व्हिक्टोरियाचा एडन ब्लिझार्ड हे अशा नवीन प्रकारच्या बॅटचा वापर करणार आहेत. झटपट क्रिकेटच्या या नव्या अवतारात ही बॅट फलंदाजांसाठी अधिक
लाभदायी ठरेल यात मात्र शंका नाही. वॉर्नरने काल सिडनी क्रिकेट मैदानावर सरावादरम्यान, नवीन बॅटने फलंदाजी केली. त्यानंतर बोलताना तो म्हणाला, की रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना आपल्याला क्रिकेटच्या नियमित बॅटच्या स्वरूपामुळे हात पूर्णपणे उलटय़ा दिशेने वळवावे लागतात. मात्र आता दोन्ही बाजूंनी सपाट असणाऱ्या बॅटमुळे हात पूर्णपणे न वळवताही रिव्हर्स स्वीपचा फटका खेळणे शक्य होईल. शिवाय हात वळविण्याची गरज नसल्याने मिळणाऱ्या काही सेकंदांचा लाभ फलंदाजांना होईल. वॉर्नरने नुकताच इंडियन प्रीमिअर लीगसाठी दिल्ली डेअर डेव्हीस संघाशी अडीच लाख अमेरिकन डॉलर्सचा करार केला आहे. न्यू साऊथ वेल्सकडून खेळणारा वॉर्नर उद्या अॅडलेड ओव्हल येथील साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० लढतीत या बॅटचा प्रयोग करणार आहे. ब्लिझार्ड हादेखील व्हीक्टोरियातर्फे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी मेलबर्नवर या बॅटचा प्रथमच वापर करणार आहे. |
|
|
|
 |