Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९
क्रीडा

(सविस्तर वृत्त)

श्रीलंकेकडे ४७२ धावांची आघाडी
चितगाव, ५ जानेवारी / एएफपी

तिलकरत्ने दिलशान आणि थिलान समरवीरा यांनी नाबाद अर्धशतके झळकावत श्रीलंकेला बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला भक्कम आघाडी मिळवून दिली. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला
 
त्यावेळी श्रीलंकेने दुसऱ्या डावात ४ बाद २९६ धावांची मजल मारली होती. दोन दिवस शिल्लक असलेल्या या कसोटी सामन्यात श्रीलंकेकडे एकूण ४७२ धावांची आघाडी असून त्यांचे ६ फलंदाज शिल्लक आहेत. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी पहिल्या डावात शतक झळकावणारा दिलशान (८१) आणि समरवीरा (७२) खेळपट्टीवर होते.
श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ३८४ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात यजमान बांगलादेशने पहिल्या डावात २०८ धावांची मजल मारली होती. आज अखेरच्या सत्रात श्रीलंकेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवताना त्यांनी १०९ धावा जोडल्या. ५५ धावावर असताना मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत दिलशानने समरवीरासोबत पाचव्या गडय़ासाठी १३१ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्याआधी, संगकाराने अर्धशतक झळकावत श्रीलंकेला मोठय़ा धावसंख्येचा पाया रचून दिला. संगकाराने कर्णधार महेला जयवर्धनेसोबत तिसऱ्या गडय़ासाठी ६८ धावा जोडल्या.
कारकिर्दीत शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या महेला जयवर्धनेला (२२) मोठी खेळी करण्यात अपयश आले. पहिल्या डावातही त्याला विशेष चमक दाखवता आली नाही.