Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९
क्रीडा

(सविस्तर वृत्त)

हिल्डिच यांच्यावर ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांचे शरसंधान
मेलबर्न, ५ जानेवारी / वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे वादात सापडलेले ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अ‍ॅंड्रय़ू हिल्डिच यांच्यावर टीका करण्याची आणखी एक संधी प्रसिद्धीमाध्यमांना मिळाली आहे. हिल्डिच हे सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उपस्थित राहण्याऐवजी अ‍ॅडिलेडच्या समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेत असल्याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी त्यांना धारेवर धरले आहे.
 
हिल्डिच हे आपल्या कुटुंबीयांसमवेत आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याबरोबर अ‍ॅडिलेडच्या सेलिस्क समुद्रकिनाऱ्यावर फिरत असल्याचे छायाचित्र येथील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. खरे तर हिल्डिच यांनी तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणे अपेक्षित नव्हते. कारण निवड समितीचे दुसरे सदस्य डेव्हिड बून हे सामना पाहण्यास उपस्थित आहेत. तरीही येथील प्रसारमाध्यमांनी हिल्डिच यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. सतत अपयशी ठरूनही संघातील स्थान टिकविण्यात यशस्वी ठरलेल्या मॅथ्यू हेडनची फलंदाजी दूरचित्रवाणीवर पाहण्याऐवजी हिल्डिच यांनी सुट्टी घेणे पसंत करावे हे संतापजनक आहे, असे येथील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
‘कुरियर मेल’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, पाळीव प्राण्यांबद्दल सर्वानाच प्रेम असते. मात्र पाळीव प्राण्यांबरोबर तुम्ह्ी भोजनाच्या सुटीतही वेळ घालवू शकता. तसे न करता हिल्डिच यांनी अशा महत्वाच्या क्षणी विश्रांतीसाठी समुद्रकिनारा गाठावा हे धक्कादायक आहे.