९० टक्के पाणीकपात झाली तरी काळजी नाही!
म्हैसूर कॉलनीतील पर्जन्यजलसंधारण प्रयोगाचे फलित
सुनील डिंगणकर
शहरात ३० टक्के पाणीकपात केल्यापासून मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मुंबईत पाऊस पडत असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पर्जन्यवृष्टी न झाल्याने पाणीकपात
वाढत जाईल की काय, या भीतीने मुंबईकरांना ग्रासले होते. चेंबूरमधील म्हैसूर कॉलनीतील रहिवासी मात्र याबाबतीत निश्चिंत आहेत. मुंबईतील पाणीकपात ९० टक्क्यापर्यंत पोहोचली तरी आमच्या कॉलनीतील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार नाही, असे या कॉलनीच्या सचिवांचे म्हणणे आहे. गेली चार वर्षे म्हैसूर कॉलनीत करण्यात आलेल्या पर्जन्य जलसंधारणाचा हा परिणाम आहे.
सुरुवातीला या कॉलनीत एक विहीर होती. त्यातील पाणी झाडांसाठी वापरले जात असे. चार वर्षापूर्वी मात्र पुरेशा पावसाअभावी ती विहीर कोरडी पडली. त्यावेळी उत्पन्न झालेल्या गरजेतून पर्जन जलसंधारणाच्या प्रयोगाची सुरुवात झाली. या प्रकल्पाबद्दल माहिती देताना म्हैसूर कॉलनीचे सचिव ई. सी. जॉन यांनी सांगितले की, एका गाडीच्या पार्किंगसाठी लागणाऱ्या जागेत पर्जन्यजलसंधारण केले जाऊ शकते. एका गाडीच्या पार्किंगसाठी जेवढी जागा लागेल तेवढय़ा जागेत खड्डा खणला जातो. विटांचे तुकडे, लाकडाचा कोळसा आणि नदीची रेती यांनी तो खड्डा भरला जातो. त्या भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी या खड्डय़ाच्या दिशेने वळविण्यात येते. म्हैसूर कॉलनीत अशा प्रकारे पाच ठिकाणी जमिनीत पाणी मुरण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आल्या आहेत. गच्चीतील पावसाचे पाणी पाइपच्या सहाय्याने काही ठिकाणी पोहोचविण्यात येते तर काही ठिकाणी जमिनीवरील पाण्याला योग्य दिशा देऊन तेथील पाणी या विशेष जागांकडे वळविण्यात येते. गेली चार वर्षे सुरू असलेल्या या जलसंधारणामुळे सदर कॉलनीत पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सर्व बंगल्यांमध्ये बोअरवेल आहे आणि त्यामुळे त्यांना २४ तास पाणीपुरवठा होऊ शकतो.
जॉन यांनी सांगितले की, दरवेळी यासाठी पालिकेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. अत्यंत कमी खर्चात ही यंत्रणा उभारता येते. डांबरी रस्ते किंवा काँक्रिटीकरण या पर्जन्य जलसंधारणास अडथळा ठरणाऱ्या बाबी आहेत. त्यामुळे जॉन यांनी डांबरी रस्ता काढून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले. पेव्हर ब्लॉकमुळे पाणी वाय न जाता ते जमिनीत मुरते. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक इमारतीने पर्जन्य जलसंधारण केले तर पाणीकपातीचे संकट निश्चित टाळता येऊ शकेल. याचे इतरही काही अप्रत्यक्ष फायदे आहेत. पर्जन्य जलसंधारणामुळे हा भाग पूर्णपणे हरित झाला आहे. जॉन यांनी सांगितले की, अनेक फुलझाडे आणि फळझाडे असलेल्या या कॉलनीत चित्रीकरणासाठीही विचारणा होऊ
लागली आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कॉलनीतील मेन्टेनन्सपोटी रहिवाशांकडून दरमहा घेतला जाणारा सव्र्हिस चार्जही अत्यंत कमी आहे. पावसाचे सर्व पाणी शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमता असते. या क्षमतेचा आपण कसा वापर करून घ्यायचा हे मात्र आपणच ठरवायचे.
|