‘मैत्री’ हे इतर नात्यांहून निराळे नाते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे नाते कधी ठरवून तर कधी आपसूक जोडले जात असते. आपले राग, लोभ, प्रेम, ममता, सुख, दु:ख हे सारे व्यक्त करण्यासाठी हक्काची जागा म्हणजे आपले मित्र-मैत्रिणी. त्यातून या नात्यात एक प्रकारची मैत्रभावना तयार होत असते. कोणत्याही नातेसंबंधांपेक्षा ही मैत्रभावना अधिक गहिरी व उदात्त असते. ‘मैत्र जीवाचे’ हे डॉ. दीपा क्षीरसागर यांनी संपादित केलेले पुस्तक या मैत्रभावनेचे विविध कंगोरे उलगडून दाखवते. यात राजकारण, समाजकारण, साहित्य, कला आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या मैत्रीविषयी केलेले लेखन वाचायला मिळते. या प्रत्येकाच्या मैत्रीविषयक कल्पना, त्यांचे मैत्रीतील अनुभव, अविस्मरणीय घटना, आठवणी यांचे चित्रण यातील लेखांमधून येते. यातील विठ्ठल मणियार यांचा शरद पवारांवरील लेख असो किंवा उल्हास पवार यांचा विलासराव देशमुखांवरील लेख असो, राजकीय जीवनाचा व्याप सांभाळत असतानाही मैत्री जपण्याची या मान्यवरांमधील असोशी आपल्याला त्यातून जाणवते. धकाधकीच्या सार्वजनिक जीवनात वावरूनही मैत्री जपण्याविषयी, एकमेकांच्या सुखाबरोबरच दु:खातही सहभागी होण्याबाबत हे राजकीय नेते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या मित्रांनी जागवलेल्या या आठवणींमधून त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील या वेगळ्या पैलूची ओळख होते. हीच बाब भाई वैद्य यांच्या ग. प्र. प्रधानांवरील लेखाची. याशिवाय सुधीर गाडगीळ यांचा विनय आपटेंवरील लेखही आपटेंच्या व्यक्तीमत्त्वातील रोखठोकपणाचे दर्शन घडवतो. तर गंगाधर पानतावणे यांच्या नामदेव ढसाळांवरील लेखातून ढसाळांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनोखे चित्रण येते. आपले कवी तसेच राजकीय नेतेपण बाजूला सारून ढसाळ मैत्रीचा ओलावा कसा जपत होते, ते पानतावणे यांच्या लेखातून कळते. चंद्रकांत कुलकर्णी यांचा नाटककार प्रशांत दळवींवरील लेखही वाचनीय आहे. तसेच भारत सासणे,

अजित वाडेकर, मंगेश तेंडुलकर, नीरजा, अरुणा ढेरे, प्रभा गणोरकर, इंद्रजीत भालेराव, मकरंद अनासपुरे आदींचेही लेख या संग्रहात आहेत. विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या या मान्यवरांनी साधेपणाने व प्रांजळपणे व्यक्त केलेली ही मैत्रभावना नक्कीच आस्वादीय आहे.

मैत्र जीवाचे

संपादन – डॉ. दीपा क्षीरसागर,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे -२०७, मूल्य -२५० रुपये

 

महाकाव्यांतील ऋतूवर्णन

निसर्गचक्रात विशिष्ट काळात काही विशिष्ट बदल होत असतात. कधी प्रखर ऊन, तर कधी मुसळधार वर्षां किंवा कधी बोचरी थंडी असणारा शिशिर, नाही तर सुगंधित वसंत ऋतू, असे हे सतत बदलत राहणारे सृष्टिचक्र मानवी मनाला आवाहन करत असते अन् तेही त्याला कळत-नकळत प्रतिसाद देत असते. मानवी जीवनाचा, भावविश्वाचा मोठा भाग या ऋतुचक्राने व्यापलेला आहे. साहजिकच त्याचे प्रतिबिंब साहित्यातूनही उमटत असते. इंग्रजीतील रोमँटिक कवी असोत किंवा भारतीय महाकाव्यांचे कर्ते असोत, त्यांच्या काव्यात निसर्गाला अनन्यसाधारण स्थान आहे. ‘संस्कृत पंचमहाकाव्यातील ऋतु’ हे चारुलता जुननकर यांचे पुस्तकही महाकाव्यांतील निसर्गाचा वेध घेणारे आहे. ‘कुमारसंभव’, ‘रघुवंश’, ‘किरातार्जुनीय’, ‘शिशुपालवध’, ‘नैषधीयचरित’ या पाच महाकाव्यांतील निसर्गचित्रणाची आस्वादपर समीक्षा या पुस्तकात करण्यात आली आहे. भवतालच्या निसर्गाशी आपले काव्य जोडण्याची किंवा ऋतुचक्राला काव्यात पकडण्याची ऊर्मी हे या साऱ्या कवींमधील समानत्व. एकांतात असणाऱ्या कवीची निसर्गाशी एकतानता कशी निर्माण होते, हे या महाकाव्यांचा आस्वाद घेतल्यावर ध्यानात येते. कल्पनाशक्तीला आवाहन करणारा निसर्ग हाच या कवींच्या काव्याची स्फूर्तिदेवता असल्याचे या पुस्तकातील विश्लेषणातून स्पष्ट होते. महाकाव्यांतील मनाला हळवे, अल्लड, अवखळ बनवणाऱ्या ऋतूंचा हा वेध नक्कीच आस्वादावा असा आहे.

संस्कृत पंचमहाकाव्यातील ऋतु

– चारुलता जुननकर, संधिकाल प्रकाशन,

पृष्ठे- १३२, मूल्य- १२५ रुपये