अशोक रघुनाथ कुळकर्णी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास मांडणारे अशोक शेवडे लिखित ‘अवलिया’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. नाटक-सिनेमा क्षेत्रात मुशाफिरी करणारा अभिनेता आणि संघटक आणि सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारा निष्ठावंत कार्यकर्ता अशी अशोक कुळकर्णी यांची बहुपेडी ओळख. पुस्तकाचे लेखक अशोक शेवडे यांनी कुळकर्णीविषयी लिहिले आहे, ‘माणसं जोडणं हा याचा आवडता छंद.. दोस्ती करताना हा कधीच फायदा- तोटय़ाचा विचार करत नाही. एखाद्या विचाराने किंवा कल्पनेने हा झपाटला की खिशाचा विचार नाही की शरीरयष्टीचा.. याच्या सुपीक डोक्यात कायम गगनाला गवसणी घालण्याचे विचार धुमाकूळ घालत असतात.. म्हणूनच हा अवलिया आहे!’ हे पुस्तक वाचताना शेवडे यांच्या या म्हणण्याची प्रचीती येते.

पोवाडा या लोककलाप्रकाराने आपल्या कलेची सुरुवात करणाऱ्या अशोक कुळकर्णी यांनी सुरुवातीच्या काळात आचार्य अत्रे यांच्या काही नाटकांतून कामही केले. नंतर भूदान आंदोलनात सक्रिय सहभाग तर त्यांनी घेतलाच, परंतु या आंदोलनासाठी ते लोकगीतांचा कार्यक्रमही ते करीत असत. एअर इंडियात नोकरी करत असताना त्यांनी तेथील सहकाऱ्यांचा एक कलागट स्थापन केला. त्याद्वारे देश-विदेशात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या, ‘ह्य़ोच नवरा पाहिजे’ आदी चित्रपटांमध्ये भूमिका, तसेच ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘सखी शेजारीण’ यांसारख्या काही नाटकांचे परदेश दौरेही त्यांनी केले.

हे करतानाच सामाजिक कार्यातही त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांचे निरलस वृत्तीने दुसऱ्याच्या मदतीसाठी तत्पर असण्याचे अनेक दाखले या पुस्तकात मिळतात. एका रसिक-कार्यकर्त्यांचा हा जीवनप्रवास त्यामुळेच प्रेरणादायी, तितकाच वाचनीयही आहे.

‘अवलिया’- अशोक शेवडे,

पृष्ठे- ११४, मूल्य- २५० रुपये.