चित्रा वाघ यांचा ‘अथांग’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. हा त्यांच्या कथांचा पहिलाच संग्रह. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून कथाबीज फुलवणे हे चित्रा वाघ यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ या कथासंग्रहातून समोर येते. २० कथांचा हा संग्रह सामान्य माणसांच्या कौटुंबिक जगण्याला कवेत घेतो. कुटुंब, त्यातील माणसं, नातेसंबंधांचे तरल चित्रण या कथांमधून वाचायला मिळते. तसेच बदलती जीवनमूल्ये, तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनात झालेला प्रवेश, अधिकाधिक व्यक्तिवादी बनत जाणारा समकाल यांचा कुटुंबसंस्थेवर होत असलेला, किंबहुना झालेला परिणाम या कथा दाखवून देतात.

कौटुंबिक नातेसंबंधामंध्ये सर्वात जास्त ताणतणाव सहन करावे लागत असतील तर ते स्त्रीला. तिलाही बदल, स्वातंत्र्य हवे असते हेच समाज विसरून जातो आणि मग तिची होणारी घालमेल कोणत्याही स्तरावर जाऊ शकते. ‘राँग नंबर’ किंवा ‘नो इमोशन्स बेबी’ यांसारख्या कथांमधून याचे चित्रण आले आहे. ‘लव्ह यू, मिस यू’ किंवा ‘तिच्या डायरीतील पाने’ या कथांतील नायिकेच्या मनाची घालमेल वाचताना वाचकही त्यात गुंतून जातो. याशिवाय ‘अथांग’, ‘बोचरे वारे’, ‘कौल’ या कथाही स्त्रीचे भावविश्व मांडणाऱ्या आहेत.

तसेच, अभावाच्या जगण्यावर जिद्द व मेहनतीच्या जोरावर मात करता येते हा आशावाद जागी करणारी ‘झुळूक’ ही कथा असेल किंवा मुलीच्या आत्महत्येनंतर स्वत:ला बालसमुपदेशनाच्या कामात झोकून देणाऱ्या नायिकेचे अनुभवविश्व रंगवणारी ‘कुणास्तव कुणीतरी’ ही कथा असो वा ‘झाकोळ’ ही बालकामगारांविषयी सामाजिक कार्य करणाऱ्या नायकाच्या मनाची चलबिचल अवस्था रेखाटणारी कथा असो, या साऱ्या कथा वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करतात.

आजच्या जगण्यातील ताणेबाणे या संग्रहातील कथांमधून आपल्या समोर नकळतपणे येत जातात. लेखिकेचा हा पहिलाच कथासंग्रह असल्याने यातील बहुतांश कथांमध्ये नवखेपणाच्या खुणा दिसून येतीलच, परंतु कथाविषयाच्या बाबतीत मात्र यातील अनेक कथा निराळ्या ठरतात, त्यासाठी त्या नक्कीच वाचाव्या अशा आहेत.

‘अथांग’ – चित्रा वाघ,

सुकृत प्रकाशन, सांगली,

पृष्ठे – १५२, मूल्य – १७५ रुपये