गेल्या दोन दशकांत देशातील ग्रामीण जीवन झपाटय़ाने बदलत आहे. शेती संस्कृती ही या ग्रामीण जीवनाचा कणा होता, परंतु याच काळात शेतीला आलेली उतरती कळाही आपल्याला पाहायला मिळत आहे. शेती संस्कृतीच्या संकोचाने ग्रामीण वास्तव प्रभावित झाले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा त्याचाच परिणाम. या समस्येने सामाजिक-राजकीय क्षेत्र ढवळून निघाले. त्यावरून राजकारणही केले गेले. प्रत्यक्षात या आत्महत्या का, कशा होतात याचा विचार साकल्याने कोणी करतही नाही. शेतकऱ्यांची दु:खे ही कायम अंधारातच राहतात. डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ‘गारपीट’ या कथासंग्रहात याच ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला गेला आहे. दहा कथांमधून डॉ. चोरगे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.

यातल्या ‘जमीन’ या कथेमध्ये दोन भावांचा जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होतो. मात्र वडिलांच्या पुण्याईने त्यांच्या गावचे पाटील त्या दोन भावांमध्ये समेट घडवून आणतात आणि त्यामुळे जमीनही राहते आणि मन दुरावलेले भाऊही एकत्र येतात. गावातील काही नतद्रष्ट मंडळी जमीन विक्री करण्याचे आमिष दाखवून शहरातल्या मंडळींना कसे हातोहात फसवतात, याचे चित्रण ‘सातबारा’ या कथेतून आले आहे. लहरी निसर्गामुळे अनेकांना हाताशी आलेले पीक गमवावे लागतेच, पण प्रसंगी झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेमुळे आत्महत्या करावी लागते आहे, हे विदारक वास्तव ‘गारपीट’ कथेतून सामोरे येते. यामुळेच कर्ज चुकवता न आल्यामुळे अनेकांना आपल्या घरादारालाही मुकावे लागते, याचे परिणामकारक चित्र ‘बेपत्ता’ या कथेत आले आहे.

जनावरांवर प्रेम करावे आणि त्यांना सांभाळले तर ते जीव लावतात, पण दुखावले तर मात्र जीव घेतल्याशिवाय राहात नाहीत हे ‘डूख’ या कथेतून दाखविण्यात आले आहे. या कथासंग्रहातील सर्व कथांचा शेवट दु:खात झाला असला तरी शेवटची कथा मात्र वाचकांना आत्मिक बळ देण्याचे काम करते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये केवळ पुरुष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, एकाही महिलेने आत्महत्या केलेली नाही. कुटुंब आणि शेतीचा रहाटगाडा ग्रामीण स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे हाकत असते. ‘आभाळ कोसळते तेव्हा’ या कथेतूनही अशाच जिगरबाज शेतकरी महिलेचे चित्र लेखकाने रेखाटले आहे.

‘गारपीट’

– डॉ. तानाजीराव चोरगे,

 दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे,

 पृष्ठे – १५८, मूल्य – १८० रुपये