‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ अशी मराठीत म्हण आहे. तिचा प्रत्यय रोजच्या जगण्यात प्रत्येकालाच येत असतो. मराठीतील अनेक साहित्यिकांनी अशा व्यक्ती व त्यांच्या विशिष्ट (की विचित्र?) प्रवृत्तींना आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये स्थान दिले आहे. असे लेखन वाचकांनाही आवडते. आपल्या वर्तनातून अनाहूतपणे विनोदनिर्मिती करणाऱ्या वा ज्यांचे आचारविचार उपहासाचा भाग बनावेत अशी पात्रं मराठी साहित्यात अनेकांनी रंगवली आहेत. त्यात ‘गुलाबराव पारनेरकर’ हे आणखी एक नवे पात्र नुकतेच जोडले गेले आहे. लेखक

सचिन जगदाळे यांनी केलेल्या या पात्रविशिष्ट विनोदी कथनातून ते वाचकांसमोर आले आहे.

मुंबईतील चाळीत राहणारे गुलाबराव आपल्या वागण्या-बोलण्यामुळे सहजगत्या विनोदाचा भाग बनतात. त्यांची झोपेत चालण्याची सवय, स्वत:चे वजन कमी करण्याचा त्यांना लागलेला ध्यास, त्यांची अभिनयाची आवड, चाळकऱ्यांच्या उपक्रमांतून भाग घेण्याचा त्यांचा अतिउत्साह यांतून आपसूक होणारी विनोदनिर्मिती हास्याची लकेर फुलवणारी आहे. आपल्या चाळीत स्वच्छ भारत अभियान राबवण्याचा गुलाबरावांचा प्रयत्न, स्थानिक आमदारांची जाहीर मुलाखत घेण्याची त्यांनी स्वत:हून घेतलेली जबाबदारी, चाळकऱ्यांना घडवून आणलेली गोवा सफर.. या प्रसंगांचे पुस्तकात आलेले विनोदी वर्णन आवर्जून वाचावे असे आहे. आपल्या वर्तनाने स्वत:ची व इतरांचीही भंबेरी उडवणारे, चाळकरी जीवनात समरसून गेलेले, निरागस स्वभावाचे गुलाबराव या पुस्तकातून वाचकांना भेटतात.

‘गुलाबराव पारनेरकर – सचिन जगदाळे,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे- ८७, मूल्य- १०० रुपये.