‘लोकरंग’मधील (१२ फेब्रुवारी) अभिजीत ताम्हणे यांचा ‘इतिहासाचा अरुंद आरसा’ हा ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’ या संस्थेने भरवलेल्या प्रदर्शनासंबंधीचा लेख वाचला. आजवर या संस्थेच्या माध्यमातून अनेकांनी पारितोषिकं प्राप्त केलेली असली तरी याचा पाठपुरावा महाविद्यालयांतूनही सतत करायला हवा. इतिहासाच्या अरुंद असलेल्या या आरशात विद्यार्थ्यांना पाहावयास लावणे आवश्यक आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहित करता येईल आणि हा आरसा अधिक रुंद करणे शक्य होईल.

– कीर्तिकुमार वर्तक, वसई

सकारात्मक भावनांचा उगम

‘लोकरंग’मधील सचिन कुंडलकर यांच्या ‘करंट’ या सदरातील ‘सर्जनशील अहंभाव’ हा लेख (५ फेब्रुवारी) भावला. अहंभाव म्हणजे गर्व नसून अभिमान म्हणजे मीच कर्ता असणे ही भावना होय. या अहंभावातून सकारात्मक भावनांचा उगम होतो हे लेखकाने उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. ‘मी हे केले, मी ते केले,’ असे वारंवार म्हणणे किंवा आपल्या पूर्वायुष्याची शेखी मिरवणे हा झगझगीत व भव्य वेश धारण केलेला क्षुद्र अहंकार आहे. ज्येष्ठ म्हणून घरात, समाजात वावरताना तरुणांप्रति दाखविलेल्या सौजन्यशील स्पर्शात खरे सुख सामावले आहे. ‘मी मोठा आहे हे वाटू न देणे हाच मोठेपणा आहे,’ हा विनोबा भावे यांचा विचार आत्मसात केला तर आपण कोण आहोत हे सांगण्याची गरज भासणार नाही. इतरांना रस नसेल तर स्वत:चे तर्क, विचार, मते, सल्ले न देता आपल्या जाणिवांसकट स्वत:ला स्वीकारणे ही जीवनाची मूलभूत गरज आहे. तरच जीवनाच्या प्रवाहामध्ये प्रत्येकाची स्वतंत्र अभिव्यक्ती चिरकाल टिकून राहील. अन्यथा वृथा अहंभावापोटी स्वत:ला वगळून विश्वाचे कोडे सोडविण्यातच उभे आयुष्य अकारण संपून जाईल.

– सूर्यकांत भोसले, मुंबई</strong>