मराठी साहित्यात विविध सशक्त वाङ्मयीन प्रवाह आहेत. लोकसाहित्य आणि ग्रामीण साहित्य हे त्यापैकीच. लोकसाहित्य म्हणजे केवळ मौखिक परंपरेने चालत आलेले वाङ्मय नव्हे, तर त्यात मौखिक आशय श्राव्य व दृश्य प्रयोगांद्वारे सादर केला जातो. त्यामुळे लोकसाहित्य ही एक प्रकारे प्रयोगात्मक कला आहे. त्यात लोकवाङ्मयाबरोबरच परंपरेने चालत आलेल्या रूढी, समजुती, विचार, नृत्य, नाटय़ आदींचा समावेश होत असतो. तर ग्रामीण संस्कृतीचे, तिच्यातील साऱ्या घटितांचे प्रतिबिंब ग्रामीण साहित्यात उमटत असते. त्यामुळे हे दोन्ही प्रवाह लोकजीवनाशी अधिक जोडलेले असतात. या दोन्ही प्रवाहांच्या स्वरूपाची चिकित्सा डॉ. नलिनी महाडिक लिखित ‘लोकसाहित्य आणि ग्रामीण साहित्य यांचे स्वरूप’ या पुस्तकात वाचायला मिळते. यात विविध चर्चासत्रे, परिषदांत सादर केलेले दहा शोधनिबंध समाविष्ट करण्यात आले आहेत.

‘लोकगीतांचा रसास्वाद’ या पहिल्याच लेखात सातारा जिल्ह्यात आढळणाऱ्या लोकसाहित्यातील ओवीगीते, स्त्रीगीते आणि पुरुषगीतांची विविधता वाचायला मिळते. तर ‘कथागीतां’च्या संदर्भातील लेखात कथागायन या पारंपरिक वाङ्मयप्रकाराविषयी कळते. त्यात विविध जाती व त्यांच्या दैवतांनुसार कथागायनाच्या विविध प्रकारांची माहिती आली आहे.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

याशिवाय ‘१९७५ नंतरची ग्रामीण कथा’ या लेखात ग्रामीण साहित्याचा चिकित्सक वेध घेतानाच  स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या  सामाजिक स्थित्यंतरांनी या काळातील ग्रामीण कथा प्रभावित झाल्याचे लेखिकेने सूचित केले आहे. ‘१९८० नंतरच्या स्त्रियांच्या कथाविश्वातील स्त्रीदर्शन’ या लेखात मराठी साहित्यातील स्त्रीचित्रण स्त्रीवादी विचारधारेतून जाणीवपूर्वक झाल्याचा निष्कर्ष लेखिकेने मांडला आहे. तर ‘ग्रामीण मराठी साहित्यातील स्त्रीप्रतिमा’या लेखात बहिणाबाई, आनंद यादव, ना. घ. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, गो. नि. दांडेकर, भालचंद्र नेमाडे आदींच्या साहित्यातील स्त्रीप्रतिमेचा विस्तृत आढावा घेतला आहे. तर शेवटच्या लेखात ग्रामीण व प्रादेशिक साहित्यातील साम्यभेदांची चर्चा करण्यात आली आहे. एकूणच हे पुस्तक तसे समीक्षापर असले तरी लोकसाहित्य आणि ग्रामीण साहित्याच्या चिकित्सक वाचकांसाठी त्यातून नक्कीच दिशा मिळू शकते.

‘लोकसाहित्य आणि ग्रामीण साहित्य यांचे स्वरूप’

– डॉ. नलिनी महाडिक,

स्नेहवर्धन प्रकाशन,

पृष्ठे – १२८, मूल्य – १३० रुपये