मराठीत निवडक कथालेखकांच्या कथांचे संपादित-संकलित संग्रह प्रकाशित होणे तसे नवीन नाही. आतापर्यंत असे अनेक संकलित संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. विशिष्ट काळातील किंवा कथापरंपरेतील अथवा विविध बाजाच्या कथालेखकांच्या कथा अशा संग्रहांतून एकत्रितपणे वाचायला मिळत असतात. त्यातून या लेखनाचा वाचकाला एकत्रित विचारही करता येतो, आणि मुख्य म्हणजे साहित्यप्रवाहांच्या विविधतेशी त्याचा परिचयही करून दिला जातो. ज्येष्ठ लेखक पंढरीनाथ रेडकर यांनी संपादित केलेला ‘गगन’ हा कथासंग्रह हे त्याचेच उदाहरण ठरावे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

मराठीतील विविध काळातील निवडक १७ कथालेखकांच्या कथांचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. त्यात मधु मंगेश कर्णिक, डॉ. नागनाथ कोतापल्ले, गुरुनाथ तेंडुलकर, शि. भा. नाडकर्णी, वामन होवाळ, ऊर्मिला पवार, जयंत पवार, प्रतिमा जोशी, डॉ. आशा बगे, सुकन्या आगाशे, बाबा भांड, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, अशोक कौतिक कोळी, प्रकाश जोशी, अशोक गुप्ते व या संग्रहाचे संपादक पंढरीनाथ रेडकर यांच्या कथांचा समावेश आहे. थोडक्यात, मराठीतील गेल्या तीन पिढय़ांतील कथालेखकांच्या कथा या संग्रहात वाचायला मिळतात. विविध रूपबंधाच्या व मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या कथांतून वाचकांना मराठी कथालेखनाचे विविध प्रवाह समजून घेण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. साठोत्तरी काळापासून आजपर्यंत मराठी कथेची झालेली वाटचाल, तुटक आणि निवडक स्वरूपात का होईना, या संग्रहातून जाणून घेता येते. मात्र या संग्रहाला संपादकांनी लिहिलेली प्रस्तावना जिज्ञासू वाचकांचा हिरमोड करणारी ठरू शकते. याचे कारण या प्रस्तावनेतून फारसे भरीव हाती लागत नाही. ही बाब सोडली तर निवडक कथांचा हा ऐवज नक्कीच वाचनीय व संग्राह्य़ आहे.

गगन

  • संपादक- पंढरीनाथ रेडकर, इन्दू शुक्लेन्दू प्रकाशन,
  • पृष्ठे- ४३२, मूल्य- ४०० रुपये.

 

प्रांजळ आत्मकथा

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. मगनलाल माणकचंद जैन यांचे ‘द व्हाइट एप्रन’ हे आत्मचरित्र नुकतेच उत्कर्ष प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. बालपण, शिक्षण व पुढे वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतरचे जीवनानुभव डॉ. जैन यांनी या आत्मचरित्रातून प्रांजळपणे उलगडून दाखविले आहेत.

अकोल्यातील अत्यंत कर्मठ जैन कुटुंबात जन्म झालेल्या डॉ. जैन यांचे बालपण बंदिस्त चौकटीत गेले. एकमार्गी वातावरणात वाढलेले डॉ. जैन अभ्यासात मात्र हुशार होते. त्यांनी शाळेमध्ये कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. त्यामुळेच पुढे वडिलोपार्जित व्यवसायात न पडता ते वैद्यकीय क्षेत्राकडे वळले. यासाठी घरच्यांशी काही प्रमाणात संघर्ष करावा लागला, तरी त्यांनी पुण्यातून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे डॉ. जैन यांनी नगर जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यास सुरुवात केली. चांगला जम बसल्यावर त्यांनी तेथे इस्पितळ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यातही ते यशस्वी झाले, पण त्या इस्पितळाचा विस्तार करण्यासाठी घेतलेला त्यांचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. झालेले कर्ज फेडण्यासाठी त्यांना इस्पितळ आणि त्यातील अद्ययावत सामग्रीही विकावी लागली. या संकटजनक परिस्थितीनंतर ते पुन्हा पुण्याला आले. डॉ. जैन यांनी या काळातील ही संघर्षकथा प्रांजळपणे मांडली आहे.

डॉक्टर म्हटले की सफेद कोट- व्हाइट एप्रन परिधान केलेल्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर येते. डॉ. जैन यांच्या या आत्मचरित्रातून एप्रन परिधान केलेली व्यक्ती तर दिसतेच, पण मुख्य म्हणजे एप्रनच्या आतील व्यक्तीचेही दर्शन होते. त्यामुळे डॉ. जैन यांची ही कहाणी वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांस नक्कीच प्रेरणादायी व उद्बोधक ठरेल.

द व्हाइट एप्रन’- डॉ. एम. एम. जैन,

  • उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
  • पृष्ठे- १७५, मूल्य- २५० रुपये