आत्मविश्वासी तरुण पिढी ही कोणत्याही राष्ट्राचे शक्तिस्थान असते. परंतु तरुणाईत असा आत्मविश्वास आणि आशावाद निर्माण होण्यासाठी व्यक्तिगत तसेच संस्थात्मक पातळीवर प्रयत्न व्हावे लागतात. असे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये अग्रक्रमानं घ्यावं असं नाव म्हणजे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम. भारताच्या भविष्यातील विकासाची दिशा, त्यासाठी तरुणाईमध्ये सकारात्मकतेचा प्रसार व प्रत्यक्ष विधायक कृती करण्यास प्रेरणा देणारं चिंतन त्यांनी नेहमीच केलं. अशा स्वरूपाचं चिंतन त्यांच्या ‘मिशन इंडिया’ या १९९८ साली तामिळ व इंग्रजीत प्रकाशित झालेल्या पुस्तकात आलं होतं. भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी कृतीच्या पातळीवर काय करायला हवे, याची दिशा या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. या पुस्तकाचा ‘मिशन इंडिया- तरुणांसाठी.. विकसित भारत एक ध्येय’ हा अनुवाद प्रकाशित झाला आहे. ‘भारत विकसित देश होऊ शकतो का?’ या प्रश्नार्थक शीर्षकाच्या प्रकरणाने या पुस्तकाची सुरुवात होते. यात विकसित देश म्हणजे काय, याची चर्चा करून कलाम यांनी जागतिकीकरणाची प्रक्रिया कार्यक्षमतेला आवाहन करणारी असल्याचे म्हटले आहे. विकसित भारताचं ध्येय गाठायचं असल्यास आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. याच प्रकरणाच्या शेवटी ते ‘मिशन २०२०’चे ध्येय सांगतात. हे मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष द्यावे लागेल, हे या पुस्तकातील पुढील प्रकरणांमध्ये तपशीलवारपणे येते. शेती व अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योग, मटेरिअल्स व भविष्यकालीन उद्योग, रासायनिक उद्योग व जैवतंत्रज्ञान, भविष्याच्या दृष्टीने उत्पादन निर्मिती आणि संरक्षण उद्योग ही ती क्षेत्रं. या क्षेत्रांमध्ये भारताकडे असणाऱ्या मूलभूत क्षमता व संधी यांची माहिती देत या क्षेत्रांमध्ये सुरू असलेले संशोधन, बदल, आपल्याला त्यात गती मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यांची दिशा यांच्याविषयीची चर्चा या प्रकरणांमध्ये येते.

यापुढील प्रकरणे ही सेवाक्षेत्र आणि भारतीय शिक्षणव्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पायाभूत सेवांचा विकास यांच्यासंबंधीची आहेत. यात कलाम यांनी भारतात सेवाक्षेत्राचा विस्तार होत असताना त्याचा शिक्षणक्षेत्राशी सांधा जुळवण्यावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. नव्या युगात संशोधन, सर्जनशीलता आणि उद्यमशीलता यांच्या वाढीसाठी, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे कलाम सांगतात. याशिवाय वैद्यकीय व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा विकास साधता येईल, हेही ते दाखवून देतात. तर शेवटच्या प्रकरणात भारताच्या विकासाचे हे मिशन पार पाडण्यासाठी सामूहिक प्रयत्न व नावीन्याचा वेध घेण्याची आवश्यकता असल्याचे ते स्पष्ट करतात. जागतिकीकरणाचे पाव शतक ओलांडल्यानंतर आजच्या तरुण पिढीसमोरील आव्हाने जशी वाढली आहेत, तशीच त्यांच्यासाठीच्या संधींमध्येही वाढ झाली आहे. या उपलब्ध संधींचा उपयोग देशाच्या विकासासाठी कसा करता येईल याचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक तरुणाईला सकारात्मकतेबरोबरच नव्या दिशेचे भान देणारे आहे.

‘मिशन इंडिया- तरुणांसाठी.. विकसित भारत एक ध्येय’-  ए. पी. जे. अब्दुल कलाम,

सहलेखन- वाय. एस. राजन,

अनुवाद- प्रणव सखदेव,

रोहन प्रकाशन,

पृष्ठे- ११५, मूल्य- १०० रुपये