चकाकती मुंबई ही अनेकांच्या आकर्षणाचा विषय. परंतु या भौतिक संपदेबरोबरच निसर्गसौंदर्य आणि वृक्षसंपदेची विविधताही असलेल्या जगभरातील काही मोजक्या महाशहरांमध्ये मुंबईचा समावेश करता येईल. तीन बाजूंनी समुद्र, मधे मधे टेकडय़ा, बोरीवली- गोरेगाव-मुलुंड-पवईपर्यंत पसरलेले राष्ट्रीय उद्यान, उपनगरांतील असंख्य बागा, आरे कॉलनी, फिल्म सिटी, मलबार हिल यांसारखे हिरवाईने नटलेले परिसर, तसेच रेल्वेमार्गाच्या आजूबाजूलासुद्धा वृक्षराजीचे असलेले अस्तित्व मुंबई या महानगरीचे हरितसौंदर्य वाढविणारे आहे. ‘सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची’ या प्रकाश काळे यांच्या पुस्तकात मुंबईतील या वृक्षसंपदेची विस्तृत ओळख होते. मुंबईतील विविध भागांत आढळणाऱ्या सुमारे ७० प्रकारच्या वृक्षांची इत्थंभूत माहिती यात दिलेली आहे. त्यात बहावा, कदंब, मुचकुंद, बकुळ, राळ, तामण, करंज, देवचाफा, कर्णफळ, मोह या देशी वृक्षांबरोबरच मुंबईतील अनेक परदेशी वृक्षांचाही समावेश आहे. यात प्रत्येक वृक्षाचे त्याच्या स्थानिक नावासोबत संस्कृत, इंग्रजी तसेच त्या वृक्षांची शास्त्रीय नावेही देण्यात आलेली आहेत. याशिवाय या पुस्तकात वर्णन केलेले वृक्ष मुंबईत कुठे व कसे बघता येतील याचीही सविस्तर माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे पुस्तकात या वृक्षांची रंगीत छायाचित्रेही समाविष्ट करण्यात आली आहेत. पुस्तकातील  वृक्षांची माहिती मुंबईच्या वृक्षसाम्राज्याची जाणीव करून देणारी आहे. एका बाजूला सिमेंटच्या जंगलांचा होत असलेला भीषण विस्तार, तर दुसरीकडे आक्रसत चाललेल्या हरित जमीनी अशा पाश्र्वभूमीवर मुंबईच्या वृक्षसंपदेची ही सफर नक्कीच दिलासा देणारी आहे.

‘सफर.. मुंबईच्या वृक्षतीर्थाची’- प्रकाश काळे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- १८३, मूल्य- २८० रुपये.

अधोविश्वाचे वास्तव चित्रण

07काही दिवसांपूर्वीपर्यंत राजकीय नेत्यांची- त्यातही सत्ताधारी नेत्यांची हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याची छायाचित्रे प्रसार माध्यमे तसेच समाज माध्यमांमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्ध होत होती. स्वच्छता मोहिमांना प्रतीकात्मक उपस्थिती लावण्याच्या आणि त्याचाच अवास्तव गवगवा करण्याच्या आजच्या काळात खरेखुरे सफाई कामगार मात्र दुर्लक्षितच राहिले आहेत. तसे होणे स्वाभाविकच आहे. याचे कारण- शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यासाठी पगार घेणाऱ्या सफाई कामगारांचीच आहे अशी आपल्यातील अनेकांची असलेली ठाम भावना. त्यामुळेच रस्ते साफ करणाऱ्या, मैला वाहणाऱ्या सफाई कामगारांच्या जीवनाचे वास्तव नागरी समाजाच्या ध्यानात येत नाही. साहित्यातूनही या जीवनाचे चित्रण होणे तसे विरळाच. सिद्धार्थ देवधेकर यांच्या ‘न सांगितलेली गोष्ट’ या कथासंग्रहात मात्र या अधोविश्वातील जीवनाचे चित्रण आलेले आहे. ‘बॉय’, ‘संभ्रम’, ‘गणपत आणि त्याच्या आईची गोष्ट’ आणि ‘वर्तन- परिवर्तन’ या चार कथांचा या संग्रहात समावेश आहे. अगतिकतेने, हतबलतेने व्यापलेल्या या माणसांच्या जीवनाचे थिजवून टाकणारे चित्रण या कथांतून येते. औद्योगिकपूर्व काळापासून ते औद्योगिक व आताच्या सायबर युगातही सफाई कामगारांचे जीवनवास्तव फारसे बदललेले नाही. जातिव्यवस्थेतून मिळालेली ही भळभळती जखम नागरी व्यवस्थेतही तशीच घेऊन त्यांना वावरावे लागते आहे, ही या कथेतली पात्रं मूकपणे सांगू पाहत आहेत. सफाई कामगारांच्या जीवनाचा घेतलेला हा वेध मराठी कथासाहित्यात अत्यंत मोलाची भर घालणारा आहे.

‘न सांगितलेली गोष्ट’

– सिद्धार्थ देवधेकर,

लोकवाङ्मय गृह प्रकाशन,

पृष्ठे- १६०, मूल्य- २०० रुपये.