महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही एक स्वतंत्र आणि विविधरंगी भावनांचे कथानक आहे. यातल्या काही व्यक्तिरेखा सतत आपल्यासमोर येत असतात. त्याही एकाच अंगाने. द्रौपदी ही व्यक्तिरेखाही त्यापैकी एक. पण पाच पांडवांची पत्नी म्हणून महाभारतात येणारी ही व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे, तिचा एक स्त्री म्हणून कितपत विचार केला गेला, याचा शोध वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न ‘द्रौपदी’ या पुस्तकाद्वारे मधुवंती सप्रे यांनी केला आहे. त्या म्हणतात, भारतातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये द्रौपदी अंशरूपाने वावरत असते. परिस्थितीने केलेला अन्याय व अत्याचार ती कधी मुकाटय़ाने सोसते, कधी वनवास भोगते, कधी उभा जन्म उन्हात काढते. पण मर्यादेपलीकडे तिची सहनशीलता गेली की ती न्याय मागण्यासाठी टोकाचा संघर्ष करते. अनेक जखमा उरी बाळगून, पदोपदी अपमान सहन करत ती न्यायासाठी झगडते. द्रौपदी नेमकी कशी होती याचा शोध महाभारताचा अभ्यास करणाऱ्या अनेकांनी घेतला आहे. तिची जितकी नावे, तितक्या तिच्या आयुष्याच्या छटा होत्या. ती केवळ गप्प बसून अपमान सहन करणारी स्त्री नव्हती. तिने अनेकदा आपलं मन उघड केलं आहे.

महाभारतातील या व्यक्तिरेखेचा लेखिकेने वेगळ्या प्रकारे शोध घेतला आहे. तिने कधीतरी आपल्यावरील अन्यायासाठी आपल्या सख्याला.. कृष्णाला प्रतिशोधाचं आवाहन केलं असेल ना, हा विचार लेखिकेने केला आहे.

तसे पाहायला गेले तर द्रौपदीच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांतून (तिचे स्वयंवर, मयसभा, द्यूतप्रसंग- अर्थात तिचं वस्त्रहरण, जयद्रथाने तिला जंगलात असताना पळवून नेणे, अज्ञातवासात असताना किचकाने केलेला अतिप्रसंग आणि महायुद्धानंतर घटोत्कचाने केलेल्या अन्यायाला तिने दिलेली शिक्षा) तिचा स्वभाव अधोरेखित होतो. या सर्व प्रसंगांमध्ये एक स्त्री म्हणून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कृष्ण जेव्हा तिला भेटायला येतो तेव्हा ती त्याच्याजवळ आपले मन मोकळे करते. प्रत्येक प्रसंगामध्ये केवळ आपल्यावर अन्याय झाला म्हणून ती हे सांगत नाही, तर आपल्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते कोणीही आपल्या मदतीला आले नाही, हे ती स्पष्ट करते. अगदी कृष्णालाही ती आपल्या मदतीला आला नाहीस हे सुनावते. आणि या सगळ्याचा सूड घेणे आवश्यक आहे, हेही ती बजावते.

ती पांडवांतील पाच भावांमध्ये केवळ अर्जुनावर सर्वाधिक प्रेम करत होती, आणि भीम तिच्यावर जास्त जीव लावत होता, हे वास्तव या पुस्तकात लेखिकेने मांडले आहे. म्हणूनच शेवटी स्वर्गारोहणाच्या वेळी ती भीमाला ‘थोरला हो’ असे म्हणते. द्रौपदीचे आपल्या पाचही पतींशी असलेले नाते वेगवेगळ्या पातळीवरचे होते. या नात्यातील कंगोरे हे पुस्तक उलगडत जाते. याशिवाय गांधारी, कुंती, सुभद्रा या तिच्या नातलग स्त्रियांच्या तुलनेत द्रौपदीचे जीवन कसे निराळे होते, हे लेखिका दाखवून देते. एकूण नऊ प्रकरणांच्या या पुस्तकाला ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांची   विवेचक प्रस्तावना लाभली आहे. द्रौपदी या व्यक्तीरेखेचा एक स्त्री म्हणून घेतलेला हा शोध वाचकांना नक्कीच विचार करायला लावणारा आहे.

‘द्रौपदी’- मधुवंती सप्रे,

 श्रीशब्दरत्न प्रकाशन,

पृष्ठे – १४८, मूल्य – २०० रुपये  

‘दत्तक’ संकल्पना सांगोपांग!

काळाबरोबर दत्तकविधान अधिक पारदर्शी व बालककेंद्री होत चाललं आहे. दत्तक घेण्यामागच्या प्रेरणाही बदलताना दिसताहेत. वंशसातत्य, म्हातारपणाचा आधार, संपत्तीला वारस म्हणून दत्तक घेण्याची प्रथा निर्माण झाली खरी; परंतु आता मूल वाढवण्यातला आनंद मिळवण्यासाठी दत्तक घेण्याची मानसिकता वाढते आहे. मूल दत्तक घेण्यामागची कारणे काहीही असोत, परंतु दत्तक मुलाचे संगोपन ही त्याच्या पालकांसाठी नक्कीच अवघड बाब. अशा वेळी डॉ. कौमुदी गोडबोले यांचे ‘दत्तक मूल वाढताना, वाढवताना’ हे पुस्तक पालकांना दिशा देणारे ठरेल.

पुस्तकाच्या पहिल्या भागात ‘दत्तक’ संकल्पना, त्यातील सामाजिक-कौटुंबिक-भावनिक गुंतागुंत आणि त्यामागची मानसिकता यांचा वेध घेतला आहे. दत्तक संकल्पनेकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून कसे पाहावे, मुलांच्या वाढीवर जनुकांचा प्रभाव किती अन् भोवतीच्या परिस्थितीचा किती, दत्तक मुलाचा अज्ञात भूतकाळ अशा मुद्दय़ांची चर्चा यात आली आहे. तर दुसरा भाग हा दत्तकविधानातील तांत्रिक व कायदेशीर बाबी, दत्तक संस्था यांच्याविषयी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात माहिती देणारा आहे. शेवटच्या भागात मूल दत्तक घेण्यातील, त्याला वाढवण्यातील विविध अनुभव कथारूपात मांडले आहेत. एकूणात हे पुस्तक दत्तक संकल्पनेविषयी नवी दृष्टी देणारे आहे.

‘दत्तक मूल वाढताना, वाढवताना’

 डॉ. कौमुदी गोडबोले, 

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- १४१, मूल्य- १८० रुपये