‘शंख आणि शिंपले’ हा राजश्री बर्वे यांचा नवा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. याआधी त्यांचा ‘चांदण्याचं झाड’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. कथेचा विषय व मांडणी यांतील विविधता हे त्यांच्या कथालेखनाचे वैशिष्टय़. ते या नव्या संग्रहातील कथांमधूनही दिसून येते. या संग्रहाला ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी बर्वे यांच्या लेखनातील अलिप्तपणाकडे निर्देश केला आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना कथावस्तूचे रूप देत असतानाही त्यापासून राखलेली अलिप्तता त्यांना महत्त्वाची वाटते. लेखिकेच्या लेखनातील या तटस्थपणामुळेच या संग्रहातील कथा परिणामकारक ठरतात, असा अभिप्रायही त्यांनी दिला आहे.

या संग्रहात एकूण सतरा कथांचा समावेश आहे. अंधश्रद्धा, आत्महत्या, स्त्री-पुरुष समानता, वृद्धत्वाचे प्रश्न अशा विषयांना या कथा कवेत घेतात. आजच्या काळात कळीचे ठरत असलेल्या या विषयांचे अंत:स्तर या कथांमधून उलगडत जातात. त्यामुळे या कथा वाचकाला अस्वस्थ करून जातात; तितक्याच विचारप्रवृत्तही करतात.

लहानपणापासून एखादी खास आवडती गोष्ट, वस्तू अनेकजण आपली म्हणून शेवटपर्यंत सांभाळून ठेवतात. त्या वस्तू काही काळानंतर अडगळ होत असूनही टाकून दिल्या जात नाहीत. पण एखाद्या अपघातामध्ये स्मृती गेल्यावर पूर्वीच्या घटना किंवा एखादी आठवण त्यामध्ये शोधू पाहिली तरी ती सापडत नाही. अशा वेळी संबंधिताची आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तींची होणारी घालमेल ‘मेमरी बॉक्स’ या पहिल्या कथेत चित्रित झाली आहे. तर ‘भातुकली’ ही कथा परंपरांकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन दाखवते.

आपल्या गोंधळ्या स्वभावाने इतरांना आनंद मिळवून देणारे आणि त्यातच आपणही आनंद मानणारे गोंधळेकर नावाचे गृहस्थ ‘गोंधळेकर’ या कथेत भेटतात. उपहासाचा वापर करत लिहिलेली ही कथा वाचताना वाचकाच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटल्याखेरीज राहत नाही.

संवाद साधताना अनेकदा आपण ताळतंत्र न राखता बोलत असतो. त्यातून वाद आणि गैरसमज ओढवून घेतले जातात. बोलण्यात इतरांबद्दलची सहवेदना, ओलावा असल्यास हे सर्व टाळता येते. त्यामुळे संवाद निखळ होतोच;  आणि जगणेही सुंदर करता येते. या संग्रहातील ‘प्रेमाची भाषा’ ही कथाही हेच सांगते. ‘तडजोड’ ही कथाही त्यादृष्टीने वाचनीय आहे. याशिवाय ‘ई-मित्र’ व ‘टच्स्क्रिन’ या कथाही उल्लेखनीय आहेत.

या कथांच्या मांडणीतील प्रयोगशीलता लक्ष वेधून घेणारी आहे. निवेदनाची प्रवाही शैली कथांना आणखी वाचनीय करते. आजच्या प्रश्नांचा लेखिकेने तटस्थपणे घेतलेला हा  कथावेध आवर्जून वाचायलाच हवा.

‘शंख आणि शिंपले’- राजश्री बर्वे,

सुकृत प्रकाशन, सांगली,

पृष्ठे- १७२, मूल्य- २०० रुपये.  

कुणबी समाज-संस्कृतीची स्थितीगती

त्रिं. ना. आत्रे यांचे ‘गावगाडा’ हे पुस्तक प्रकाशित होऊन आता शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मधल्या काळात गावगाडय़ात अनेक बदल झाले. त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिमाणे होती. या सर्वाचा वेध घेणारी पुस्तके अलीकडच्या काळात लिहिली गेली आहेत. त्यातच ‘कुणब्याचा गावगाडा’ या प्रशांत डिंगणकर यांच्या पुस्तकाचा समावेश करता येईल.

बदलत्या काळात प्रत्येक जात-वर्गसमूहासमोर काही नवे प्रश्न उभे राहिले आहेत. प्रत्येक समाज आपापल्या परीने या प्रश्नांना सामोरे जात आहे. कुणबी समाज याला अपवाद कसा ठरेल? याचाच वेध लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. ते करताना कुणबी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन लेखकाने यात घडवले आहे. शेतीसंस्कृतीशी नाळ जुळलेला कुणबी समाज हा गावगाडय़ाचा महत्त्वाचा घटक. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये तो वसला आहे. लेखकाने या समाजाच्या गतकाळाचा आणि वर्तमान स्थितीचा साक्षेपी आलेख या पुस्तकातून रेखाटला आहे. यातील ‘वाडीवस्ती’, जुनी माणसे’, ‘देव-दैवते’, ‘भाषा’, ‘व्यवसाय’, ‘भाव-भावकी’, ‘खाद्यसंस्कृती’ आदी प्रकरणांतून कुणबी संस्कृतीची समृद्धता ध्यानात येते; तर ‘मुंबईतील स्थान’, ‘दैवते आता बदला’, ‘राजकीय परीघ’, ‘समाजसंघ’ या प्रकरणांतून लेखकाने कुणबी समाजाच्या आजच्या स्थितीगतीचे साद्यंत वर्णन केले आहे. कुणबी समाजाची वाटचाल, त्याचे आजचे स्थान याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.

‘कुणब्याचा गावगाडा’- प्रशांत डिंगणकर,

व्यास क्रिएशन्स,

पृष्ठे- ९६, मूल्य- १२० रुपये.