जया दडकर, इसाक मुजावर, बापू वाटवे आदी अभ्यासकांनी लिहिलेली दादासाहेब फाळके यांच्यावरील चरित्रपर पुस्तके अनेकांना ठाऊक असतील. या यादीत ‘ध्येयस्थ श्वास – दादासाहेब फाळके’ हे ज्योती निसळ लिखित पुस्तकही आता जोडले गेले आहे. दादासाहेब फाळके यांच्या धाकटी कन्या मालती फाळके यांचे सुपुत्र चंद्रशेखर पुसाळकर व सून मृदुला पुसाळकर यांना ज्ञात असलेल्या कौटुंबिक आठवणींच्या साहाय्याने हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यामुळे यात दादासाहेबांच्या व्यावसायिक वाटचालीची माहिती तर येतेच; शिवाय त्यांच्या कौटुंबिक भावविश्वाचेही चित्रण येते. ध्येयपूर्तीसाठी अखंड प्रयत्नरत असलेल्या दादासाहेबांना अनेक हालअपेष्टांना, अवहेलनेला सामोरे जावे लागले. पण तरीही त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले. दादासाहेबांचा हा सारा प्रवास आठवणींच्या अनुषंगाने या पुस्तकात आला आहे. अत्यंत प्रांजळपणे व ओघवत्या शैलीत लिहिल्या गेलेल्या या आठवणी त्यामुळेच वाचनीय ठरतात.

‘ध्येयस्थ श्वास – दादासाहेब फाळके’ – ज्योती निसळ,

डिंपल पब्लिकेशन,

पृष्ठे – ११६, मूल्य – १२० रुपये