वृत्तपत्रीय स्तंभलेखनात शब्दांची मर्यादा असली तरी लिहिणाऱ्याच्या विशिष्ट दृष्टीमुळे त्या मर्यादेतही वाचकांच्या हाती बरेच काही येऊ शकते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचा ‘परिक्रमा’ हा लेखसंग्रह याचा प्रत्यय देणारा आहे. संघर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहातील २५ लेखांमधून डॉ. पानतावणे यांच्या सम्यक दृष्टीची ओळख होते. आजूबाजूला घडणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वाङ्मयीन घटनांचा अन्वयार्थ लावण्यास ही दृष्टी वाचकास साहाय्यभूत ठरू शकते. यातील एका लेखात कुराणाचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यामागील राजकारणावर भाष्य करत त्या अनुषंगाने त्यातील बाळबोधपणाही ते दाखवून देतात. तर जाणिवेकडून जागृतीकडे होणारा प्रवास एका लेखात त्यांनी उलगडून दाखवला आहे. उर्दू मुशायरे व मराठीतील कविसंमेलनांमधील फरक सांगणारा लेखही यात आहे. याशिवाय मानवी प्रज्ञा, स्वातंत्र्य, समता, मानवी मन, मृत्यू, एकटेपणा यांसारख्या विषयांवर त्यांनी ओघवत्या शैलीत केलेले लेखन अंतर्मुख करते. मोजक्या शब्दांत आशयघन विवेचन सादर करणारा हा संग्रह वेगळा वाचनानंद देणारा आहे.
‘परिक्रमा’- डॉ. गंगाधर पानतावणे,
संघर्ष प्रकाशन, पृष्ठे- ८७, मूल्य- ९० रु.

कथालेखनाचे सौष्ठव
विविध साहित्यप्रकारांत लेखन करणाऱ्या माधवी कुंटे यांनी कथात्म साहित्य अधिक जबाबदारीने हाताळले आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या आठ स्वतंत्र कादंबऱ्या व १८ कथासंग्रहांमधून हे प्रकर्षांने दिसून आले आहे. नुकतेच अक्षता प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘निवडक माधवी कुंटे’ या कथासंग्रहातही त्यांच्या कथात्म लेखनाची सर्व वैशिष्टय़े पाहावयास मिळतात. त्यांच्या वेगवेगळ्या कथासंग्रहांमधून निवडलेल्या २० कथांचा त्यात समावेश आहे. ‘महाद्वार उघडताना’ या त्यांच्या गाजलेल्या कथेबरोबरच ‘तीन अंकी’, ‘खेळ मांडियेला..’, ‘परि वेचावे लागे शरीर’, ‘वय कोवळे उन्हाचे’, ‘गोची’, ‘शेवग्याचं झाड’ यांसारख्या कथा त्यात वाचायला मिळतात. या निवडक कथांच्या संग्रहाला लेखक सुमेध (वडावाला) रिसबुड यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ‘या कथांचा शेवट ‘सकारात्मक’ असणं हे त्यांच्या ‘असण्या’शी सुसंगत आणि सुसंबंधित आहे. त्यांना बहुविध प्रकारची जगण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या एकूण कथाविश्वात अचंबित करणारं विषयवैविध्य आलं. जगण्याचे अनुभव अस्सल होते म्हणून या कथा अस्सल झाल्या..’ अशा शब्दांत रिसबुड यांनी माधवी कुंटे यांच्या कथालेखनाचा प्रवास व वैशिष्टय़े उलगडून दाखवली आहेत. विविध विषय हाताळणाऱ्या या कथा वाचकांना सकारात्मक अनुभवविश्वाची अनुभूती देतात.
‘निवडक माधवी कुंटे’- माधवी कुंटे, अक्षता प्रकाशन, पृष्ठे-३९७, मूल्य- ४५० रुपये.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

जगावेगळी व्यक्तिमत्त्वे
जगावेगळे काही करण्याचा मोह प्रत्येकालाच होत असतो. परंतु संघर्ष, संकटे, लोकनिंदेची भीती इत्यादीमुळे बहुतेकजण या वेगळेपणाच्या मोहापासून दूर हटत असतात. तरीही काही व्यक्ती मात्र संघर्ष व संकटांनाच आपली शक्ती बनवतात आणि जगावेगळे काही करून जातात. अशाच काही जगावेगळ्या व्यक्तींची व त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाची ओळख स्मिता भागवतलिखित ‘जगावेगळे!’ या पुस्तकातून करून दिलेली आहे. या पुस्तकातील ११ लेखांमधून हे जगावेगळेपण वाचकांना अंतर्मुख करते आणि जगण्याची नवी ऊर्मीही देते. कॅनडा येथे वास्तव्यास असणाऱ्या स्मिता भागवत यांनी आतापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी नोकरीनिमित्ताने वास्तव्य केले आहे. त्या कुटुंब समुपदेशनाचे कामही करतात. त्यामुळे मानवी मनाची गुंतागुंत त्यांना उत्तमरीत्या समजते आणि ती वाचकांना प्रसन्न व ओघवत्या शैलीत उलगडूनही दाखवता येते, हे या लेखांमधून प्रत्ययास येते. यात सुनील शाह व त्यांची मुलगी निशा यांच्या प्रयत्नांतून गरीब रुग्णांना मदत करण्यासाठी उभारलेला निशा राहत निधी, दि. मो. महेता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सेवाभावी कार्याचा डोंगर उभारणारे मफतलाल महेता यांच्याबरोबरच सायकलवर मधुचंद्र साजरा करणारे क्लॅरा व जेम्स हॅझल हे दाम्पत्य, लेखक जेम्स नॉर्मन हॉल यांचे जगावेगळे कर्तृत्व वाचकाला अंतर्मुख करून जाते. याशिवाय डॉ. डेथ म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या, परंतु तब्बल १३२ रोग्यांना मरणप्राय वेदनांमधून सोडवणारा डॉ. जॅक केवोर्कीअन तसेच लिंगबदलाची शस्त्रक्रिया करणारे डॉ. किम यांच्याविषयी वाचून आपण अवाक् होतो. त्यामुळे ‘शहाण्यांचे ते जगणे कैसे, जगासारखे जगती ते! मनासारखे वेडे जगती, जग हो त्यांच्यामागे वेडे!’ असा वेगळेपणाचा लोभस रंग दाखवत लेखिकेने अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची भेट या पुस्तकात घडवून आणली आहे.
जगावेगळे!’- स्मिता भागवत, ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे- १३१, मूल्य- १५०रुपये.

समस्याग्रस्त माणसांच्या कथा
आपल्या भवतालात जीवनप्रवाह अखंड वाहत असतो. या प्रवाहाला शब्दांत पकडणे तसे कठीणच. कारण एकतर त्याचा वेग आणि दुसरे म्हणजे त्यातील गुंतागुंत. परंतु वृषाली मगदूम यांनी त्यांच्या ‘स्वल्प’ या नव्या कथासंग्रहात भवतालातील जीवनप्रवाहाला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत त्यांच्या कथांचे पाच संग्रह प्रसिद्ध झाले असून नुकताच त्यांचा हा नवा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. जगताना येणाऱ्या अनेकविध समस्यांना थेट भिडणारी माणसे या संग्रहातील कथांमध्ये भेटतात. ही माणसे सामान्य वाटत असली तरी ती एका अनामिक ऊर्मीने त्या समस्यांना धैर्याने तोंड देत असतात. हे सामान्यांच्या जीवनातील विलक्षणत्व या कथांमधील व्यक्तिरेखांच्या रूपाने समोर येत राहते. याशिवाय समाजाच्या अधोविश्वातील व्यसनाधीनता, लैंगिक शोषण अशा समस्याही काही कथांमधून लेखिकेने हाताळल्या आहेत. मानवी जीवन, नातेसंबंध, त्यातील सुख-दु:खांना सामाजिक भानासह प्रतिबिंबित करणारा हा कथासंग्रह लेखिका वृषाली मगदूम यांच्या कथालेखन प्रवासातील वैशिष्टय़पूर्ण कथाऐवज आहे.
‘स्वल्प’- वृषाली मगदूम, स्नेहवर्धन प्रकाशन, पृष्ठे- १३५, मूल्य- १३० रुपये

म्हाईंभटांची जीवनकहाणी
वारकरी संप्रदायातील संतांच्या जीवन व कार्यावर आधारित अनेक कादंबऱ्या मराठीत आहेत. परंतु महानुभाव पंथातील महत्त्वाच्या संतांवर मात्र अशा चरित्रपर कादंबऱ्या उपलब्ध नाहीत. लेखिका पद्मावती जावळे यांच्या ‘विरागी ज्ञानसूर्य- म्हाईंभट’ या चरित्रपर कादंबरीने मात्र ही उणीव भरून काढली आहे. ‘लीळाचरित्र’ लिहिणारे म्हाईंभट मराठीतील आद्य गद्यलेखक मानले जातात. महानुभावीय साहित्यात म्हाईंभटांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास लेखिकेने या कादंबरीत उलगडला आहे. बालपणापासूनची म्हाईंभटांची ज्ञानार्जनाची धडपड, ज्ञानप्राप्ती करून त्यात पारंगतता मिळवण्याची त्यांची इच्छा, चक्रधरस्वामींशी वादविवाद आणि त्यानंतर चक्रधरांच्या सर्वज्ञतेची साक्ष पटल्याने त्यांचे शिष्यत्व पत्करणे आणि पुढे ‘लीळाचरित्रा’चे लेखन करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या कादंबरीत लेखिकेने जिवंत केला आहे. बाराव्या-तेराव्या शतकातील यादवकालीन राजवट, महानुभाव पंथाचा उदय, पंथातील स्त्री-पुरुषांचे संन्यस्त, विरक्त आश्रमीय जीवन व त्यातील सुख-दु:खं, चढउतार यांचे संदर्भही कथनाच्या अनुषंगाने या कादंबरीत सूक्ष्मपणे आले आहेत. तसेच म्हाईंभट या मध्यवर्ती व्यक्तिरेखेसह महदंबा, भटोबास, देमती, आबाइसा, उमाइसा, हेमाद्रिपंडित आदी अनेक व्यक्तिरेखा कादंबरीत भेटतात. त्यामुळे हा जसा म्हाईंभटाच्या जीवनाचा ललित अंगाने घेतलेला वेध आहे, त्याचप्रमाणे महानुभाव पंथाचाही वेध आहे.
‘विरागी ज्ञानसूर्य- म्हाईंभट’- पद्मावती जावळे,
स्वरूपदीप प्रकाशन, सोलापूर,
पृष्ठे- १६८, मूल्य- २०० रुपये