जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. तर इतर सहा जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका नागरिकाचाही यात मृत्यू झाला. जखमी जवानांना एअरलिफ्ट करुन उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.


काश्मीरच्या पूंछ-कृष्णा खोऱ्यात गुरुवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर दिले. या ताज्या घटनेची अद्याप पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

काश्मीरमधील बांदिपोरामध्ये बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना आपले दोन जवानही शहीद तर एक जवान जखमी झाला होता. बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरु होता. यामध्ये शहीद झालेला एक जवान मिलिंद खैरनार हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. नंदूरबार जिल्ह्यातील बोरळ हे मूळ गाव असलेल्या खैरनार यांचे कुटुंबिय नाशिक येथे राहत आहेत.