अवघ्या ४८ तासांत १० मजली इमारत बांधण्याचा विक्रम शनिवारी सायंकाळी पूर्ण झाला. अर्थात हा इमारतीचा सांगाडा असून वातानुकूलन यंत्रणा, वीजजोडणी, प्रसाधनगृहबांधणी आदी सदनिकेतील आवश्यक गोष्टींची पूर्ती कालांतराने होणार आहे. केवळ तळमजल्यावरील सदनिका सर्व सोयींनी युक्त करण्यात ४८ तासांत यश आले आहे. अन्य सदनिकांमधील या सोयींच्या पूर्ततेसाठी मात्र कोणतीही कालमर्यादा निश्चित केली गेलेली नाही.
२५ हजार चौरसमीटर क्षेत्रावर ही इमारत उभी ठाकली आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि शनिवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंत ते पूर्ण होत आहे. तीन क्रेन, २०० बांधकाम मजूर तसेच तंत्रज्ञ व अभियंते यांनी अहोरात्र काम करीत विक्रमी काळात ही इमारत पूर्ण केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रत्यक्ष ठिकाणी ऐनवेळी जोडणी तंत्राद्वारे इमारत कशी वेगाने उभी राहू शकते, याचा प्रत्ययच आम्ही दिला आहे, असे या प्रकल्पाच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले.  हे बांधकाम वेगाने झाले असले तरी ते सर्व अभियांत्रिकी निकषांनुसार आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.