चंदीगडमध्ये गुरूवारी १० वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीने बाळाला जन्म दिला. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या मुलीची गर्भपाताच्या परवानगीसाठीची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर या मुलीने आज चंदीगडच्या सेक्टर क्रमांक ३२ येथील सरकारी रूग्णालयात बाळाला जन्म दिला. या प्रसुतीनंतर मुलगी सुखरूप असून बाळाला सध्या रूग्णालयाच्या विशेष दक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. या मुलीवर तिच्या एका नातेवाईकाकडून अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर ही मुलगी गरोदर राहिली होती.

गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर या मुलीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात तिच्या गर्भपातासाठी परवानगी मागितली होती. मात्र, गर्भधारणेला ३२ आठवडे उलटल्यानंतर गर्भपात करण्यात धोका होण्याची शक्यता आहे, असा वैद्यकीय अहवाल डॉक्टरांनी सादर केला. त्याच आधारावर न्यायालयाने गर्भपात करण्याची विनंती करणारी याचिका फेटाळली होती.

पीडित मुलीचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. तर आई घरकाम करते. मुलगी घरी असताना तिच्या मामानेच तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. पोटात दुखत असल्याचे तिने आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा मामानेच आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने आई-वडिलांना सांगितले. मुलीच्या आई-वडिलांनी यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.