प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱया संचलनासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा एक तास ४८ मिनिटे तिथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे ओबामा खुल्या जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त ४५ मिनिटेच उपस्थित राहतात. मात्र, प्रजासत्ताक दिनाची परंपरा विचारात घेऊन ते पूर्णवेळ या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत राजपथावर उपस्थित राहणार असल्याचे समजते. एवढावेळ ओबामा राजपथावर उपस्थित राहणार असल्यामुळे भारतासह अमेरिकेच्या सुरक्षाव्यवस्थेकडून कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी ओबामा यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले एक पथक सध्या भारतात दाखल झाले आहे. या पथकाकडून दिल्लीसह आग्र्यातीलही सुरक्षेची पाहणी करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनी ओबामा राजपथावर येण्यापासून ते राष्ट्रपती भवनात परतेपर्यंतच्या प्रत्येक मिनिटाच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, ते सर्व मंत्रालयांकडे पाठविण्यात आले आहे. त्या वेळापत्रकानुसारच ओबामा मुखर्जी यांच्यासोबत सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी राजपथावर येतील आणि ११ वाजून ४५ मिनिटांनी संचलन संपल्यावर राष्ट्रपतींसोबतच परततील.
ओबामा इतक्यावेळ राजपथावर उपस्थित राहणार असल्याबद्दल त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील अधिकाऱयांनी याआधीच काळजी व्यक्त केली होती आणि संचलनाच्या कार्यक्रमात काही कपात करता येईल का, अशीही विचारणा केली होती. मात्र, संरक्षण दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी ओबामा देशाचे पाहुणे म्हणून येणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या कार्यक्रमातून निम्म्यातून परत गेल्याची घटना कधीही घडलेली नाही आणि पाहुण्याच्या सुरक्षेसाठी या कार्यक्रमात कधीही कपात करण्यात आलेली नाही, अशी भूमिका अमेरिकी अधिकाऱयांपुढे मांडण्यात आली आहे.