बंगळुरूकडे जाणाऱ्या रेल्वेचे अकरा डबे घसरून अनेक लोक जखमी झाले असून रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. दिल्ली येथील रेल्वेच्या प्रवक्तयाने सांगितले की, कन्याकुमारी-बंगळुरू सिटी एक्स्प्रेसचे अकरा डबे सोमनायकनपट्टी ते पाटचूर दरम्यान रुळावरून घसरले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात प्राणहानी झालेली नाही. रेल्वे प्रवक्तयाने दिल्लीत दिलेल्या माहितीनुसार बंगळुरूपासून १४० कि.मी. अंतरावर नत्रामपल्ली येथे या गाडीचे डबे रुळावरून घसरले व त्यात काही लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेकडून चेन्नई-बंगळुरू डबल डेक र एक्स्प्रेस या गाडीसह एकूण १५ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले असून अपघाताचा पूर्ण तपशील हाती येत आहे. चेन्नई-बंगळुरू मार्गावरील दोन्ही दिशांनी जाणाऱ्या अकरा गाडय़ा रद्द करण्यात आल्याचे दक्षिण रेल्वेने म्हटले आहे. त्यात चेन्नई सेंट्रल-बंगळुरू डबल डेकर एक्स्प्रेस, चेन्नई-बंगळुरू वृंदावन एक्स्प्रेस, चेन्नई सेंट्रल-बंगळुरू लालबाग एक्स्प्रेस, बंगळुरू एक्स्प्रेस, अराकोनम पॅसेंजर, जोलारपेट्टी -बंगळुरू एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. चेन्नई-म्हैसूर शताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.