झारखंडमध्ये देवगड जिल्ह्य़ात सोमवारी सकाळी बैद्यनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ भाविक ठार झाले असून इतर ५० जण जखमी झाले आहेत. मंदिर उघडण्यासाठी भाविक पहाटे साडेचारपासून वाट पाहात होते. मंदिर खुले करताच भाविकांनी एकमेकांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, घटनास्थळी जलद कृती दलाचे जवान पाठवण्यात येत आहेत. मृतांच्या नातेवाइकांना २ लाख, तर जखमींना ५० हजार रूपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
पोलीस प्रवक्ते एस.एन प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार १० जणांचा मृत्यू झाला असून त्यात नऊ पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. इतर पन्नास जण जखमी झाले आहेत, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते ११ भाविक मृत्युमुखी पडले आहेत. मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलबाग येथून दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती पण सकाळी रांगेची शिस्त बिघडली. रांगेत पाच हजार भाविक होते, रात्रीपासून ते आले होते व वाट पाहून दमलेले होते, काही जण झोपले होते. सकाळी त्यांना मंदिरात लवकर जायचे होते. सूत्रांनी सांगितले की, नेपाळ, बिहार, उत्तर प्रदेश व झारखंडच्या काही भागातून यात्रेकरू आले होते. अजून मृतांची नावे समजलेली नाहीत. देवघरचे उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितले, की दर सोमवारी १ लाखावर भाविक मंदिरास भेट देतात. श्रावण महिन्यात दर्शनासाठी जास्त गर्दी होत आहे. देशातून भाविक येथे दर्शनासाठी येतात, सोमवारी गर्दी जास्त झाल्याने ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून चांगली वैद्यकीय सेवा पुरवण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून दुर्घटनेची माहिती दिली.