मध्य प्रदेशातील रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. महाराजा यशवंतराव रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा मध्यरात्री ३ ते ४ दरम्यान खंडित झाला. यामागील कारण अद्याप समोर आले नसून, १५ मिनिटांसाठी खंडित झालेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे ११ रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

तब्बल ११ रुग्ण अवघ्या १५ मिनिटांच्या कालावधीत मृत पावल्याने एकच खळबळ माजली. मात्र इतक्या मोठ्या रुग्णालयात अशा घटना घडतच असतात, असा बेजबाबदार पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. विभागीय आयुक्त संजय दुबे यांनी रुग्णालयातील मृत्यू ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने किंवा निष्काळजीपणामुळे झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असेदेखील दुबे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी रुग्णालयात गेले, त्यावेळी मृत रुग्ण आणि ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती गायब करण्यात आली होती. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सर्व परिस्थिती आलबेल असल्याचे सांगितले. मात्र संबंधित फाईल्स दाखवण्यास त्यांनी नकार दिला. रुग्णालयातील काही उच्चपदस्थ सूत्रांनी मध्यरात्री ३ च्या सुमारास ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली. मात्र ऑक्सिजन पुरवठ्याबद्दलच्या नोंदी आणि तपशील उपलब्ध करुन देण्यात आला नाही. या प्रकरणाची माहिती रुग्णालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. मात्र त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे अधिकारी संजय दुबे यांनी रुग्णालय प्रशासनाकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नसल्याचे सांगितले. ‘एका स्थानिक वर्तमानपत्राने चुकीचे वृत्त दिल्यावर मी रुग्णालयातील सर्व वॉर्ड्समध्ये जाऊन आलो. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. १४०० रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयात दररोज १० ते २० रुग्ण मरण पावतात,’ असे दुबे यांनी सांगितले.