अमेरिका-रशिया यांच्यात शस्त्रसंधीवर मतैक्य; आयसिसने जबाबदारी स्वीकारली

सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसपासून जवळच असलेल्या एका शिया धार्मिकस्थळानजीक आत्मघाती बॉम्बस्फोट व होम्स येथील दोन कारबॉम्बस्फोटात किमान १२७ जण ठार झाले आहेत. आयासिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान शस्त्रसंधीसाठी अमेरिका, रशिया प्रयत्नशील असल्याचे समजते.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले, की सीरियात गेली पाच वर्षे यादवी संघर्ष व रक्तपात सुरू आहे या प्रश्नावर त्यामुळे आम्ही तात्पुरता करार केला आहे. दमास्कसनजीक सयिदा झैनाब या शिया मुस्लिमांच्या धर्मस्थळाच्या ठिकाणी झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान ६८ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. आयसिस या गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सरकारी दूरचित्रवाणीच्या दृश्यफितीत होम्स येथे झालेल्या दोन मोटार बॉम्ब स्फोटाची दृश्ये दाखवण्यात आली, त्यात दुकाने, मोटारी तसेच लहान बसगाडय़ा उद्ध्वस्त अवस्थेत दिसत होत्या. अल झाहरा येथील रहिवासी हे अल्वाईट पंथाचे असून त्यांच्यावर नेहमी हल्ले होत आले आहेत. आयसिसने म्हटले आहे, की दोन जिहादींनी स्फोटकांनी भरलेल्या मोटारी उडवून दिल्या. गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट झाले. सयिदा झैनाब या धार्मिक ठिकाणी दोन जणांनी बॉम्बस्फोट केले असे सुन्नी दहशतवादी गटाने म्हटले आहे. दूरचित्रवाणीने दिलेल्या माहितीनुसार ३० जण तेथे ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. मानवी हक्क गटाने चार हल्ल्यातील मृतांची संख्या ६८ दिली आहे. धार्मिक ठिकाणापासून ४०० मीटर अंतरावर हे स्फोट झाले. प्रेषित महंमद पैगंबराच्या नातीचे ते स्मृतिस्थळ आहे.

शस्त्रसंधी चर्चेला गती

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावारोव यांच्याशी चर्चा केली व शस्त्रसंधीची अंमलबजावणी करण्याबाबत सहमती घडवून आणली. तात्पुरती उपाययोजना म्हणून हल्ले थांबवण्यात यश आले असल्याचे केरी यांनी अम्नान येथे सांगितले, याबाबत अंतिम निर्णय अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील चर्चेत होईल असे ते म्हणाले. लावरोव व केरी यांच्यात फोनवर चर्चा झाली व त्यात शस्त्रसंधीच्या अटी ठरल्या आहेत, त्या दोन्ही देशांच्या अध्यक्षांपुढे ठेवल्या जातील, असे रशियाच्या परराष्ट्र खात्याने फेसबुक पेजवर म्हटले आहे.