तस्करांचा पाठलाग करताना अनवधानाने सीमा ओलांडणाऱ्या सशस्त्र सीमा दलाच्या १३ जवानांना नेपाळने ताब्यात घेतले. नेपाळच्या नव्या राज्यघटनेवरून उभय देशांतील संबंध ताणल्याच्या पाश्र्वभूमीवर नेपाळने ही आक्रमक कृती करून भारताला संदेश दिल्याचे मानले जात आहे. दरम्यान दोन्ही देशांच्या उच्चाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जवानांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या बिहारच्या किशनगंज जिल्ह्य़ात सशस्त्र सीमा दलाची १२वी बटालियन तैनात आहे. कॉन्स्टेबल रामप्रसाद व रोशन यांच्या नेतृत्वाखाली डिझेल तस्करी करणाऱ्यांना पकडण्याच्या मोहिमेवर या बटालियनचे १३ जवान होते. त्यावेळी नेपाळच्या हद्दीत घुसल्याचा दावा करत सुनसारी येथील ग्रामस्थांनी या जवानांना पकडून नेपाळी पोलिसांच्या ताब्यात दिले. या जवानांना पुन्हा भारताच्या स्वाधीन करण्याचे आश्वासन नेपाळी सीमा पोलीस प्रमुख केशराज ओन्ता यांनी दिल्याचे सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक बी. डी. शर्मा यांनी सांगितले.
हे संशयित खरोखरच तस्कर होते वा जीवनावश्यक वस्तूंच्या शोधात असणारे गरजू होते, याची शहानिशा अद्याप झालेली नाही. सीमेवरील नाकेबंदीमुळे नेपाळमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया देत नेपाळचे भारतातील राजदूत दीपकुमार उपाध्याय यांनी अप्रत्यक्षरीत्या भारतावर शरसंधान साधले. सीमा सुरक्षा दलांचे जवान एकमेकांच्या हद्दीत येऊ शकतात. परंतु, त्यांनी आपली शस्त्रे सीमा चौकीवर जमा करणे बंधनकारक आहे. भारतीय जवानांनी ते केले नाही, असाही दावा त्यांनी केला. तसेच, या जवानांनी चार नागरिकांवर गोळीबार केल्याचा आरोप नेपाळने केला आहे. त्याचे खंडन करत तस्करांनी केलेल्या गोळीबारामुळे स्वसंरक्षणार्थ भारतीय जवानांना गोळीबार करावा लागल्याचे भारताचे म्हणणे आहे.