बाबागंज भागात एका हॉटेलला आग लागून दोन डॉक्टर्स व एका पत्रकारासह १३ जणांचा जळून मृत्यू झाला. पहाटे साडेचार वाजता गोयल रेसिडेन्सी हॉटेलमध्ये आग लागली.
आग चार मजल्यांपर्यंत पसरली त्यात १० जण जागीच ठार झाले, तर तेरा जण जखमी झाले असे पोलीस अधीक्षक बालिकरण यादव यांनी सांगितले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असता आणखी तीन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींना अलाहाबाद जिल्ह्य़ातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. प्रथमदर्शनी आग शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रतापगड हे ठिकाण लखनौपासून १७० कि.मी लांब आहे. मृतांमध्ये बसंत नरेन (३५), ओम प्रकाश (३५) (दोघेही डॉक्टर) तसेच मनोज शर्मा (वय ३०, एका हिंदी दैनिकाचा पत्रकार), सत्यव्रत (४०), ब्रिजेश कुमार (३२), दिलीप (२२), प्रियांक (२४)  खालिक किरमाणी (५०) यांचा समावेश आहे. या भीषण आगीत हॉटेलचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.