धर्माच्या नावाखाली दहशतवादी हल्ले घडवून निष्पापांचे बळी घेणाऱ्या तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने मंगळवारी क्रौर्याची परिसीमा गाठली. या संघटनेच्या मूठभर दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या पेशावरमधील ‘आर्मी पब्लिक स्कूल’मध्ये केलेल्या हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४१ जण ठार झाले, तर सव्वाशे जण जखमी झाले. एखाद्या निष्ठूर क्रूरकम्र्यालाही लाजवेल अशा पद्धतीने एकेका वर्गात शिरून निरागस, निष्पाप विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या वाढत्या उपद्रवाची प्रचिती देणाऱ्या या घटनेने अवघ्या जगाला सुन्न केले.

पेशावरमधील वारसाक रस्त्यावरील ही शाळा पाकिस्तानी लष्करातर्फे चालवण्यात येते. या शाळेच्या परीक्षा सुरू असताना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानच्या निमलष्करी जवानांच्या गणवेशात आलेल्या आठ हल्लेखोरांनी शाळेत प्रवेश करून बेछूट गोळीबार सुरू केला, तर एकाने स्वतभोवती लपेटलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्याने भयभीत झालेले विद्यार्थी व शिक्षक वर्गात लपून बसले असताना प्रत्येक खोलीत शिरून त्यांच्यावर डोक्यात, छातीत गोळय़ा झाडण्यात आल्या. हल्ला झाला त्या वेळी शाळेत दीड हजार विद्यार्थी उपस्थित होते.
स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांनी लहान मुलांचा ढालीसारखा वापर केला. शाळेत स्फोटही घडवण्यात आले. पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांनी शाळेभोवतीच्या परिसराला वेढा दिल्यानंतर काही तास चाललेल्या चकमकीत सर्व दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला. चकमक सुरू असतानाच शाळेच्या मागील भागातून अनेक विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली, मात्र तोपर्यंत १३२ निष्पाप विद्यार्थ्यांसह १४१ जण दहशतवाद्यांच्या हिंस्रतेचे शिकार बनले होते. हल्ल्यातील १३० जखमींमध्येही विद्यार्थ्यांचा समावेश जास्त असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व हल्लेखोर अरबी भाषेत बोलणारे आणि परदेशी नागरिकांसारखे दिसणारे होते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. हे सर्व जण शाळेला लागून असलेल्या कब्रस्तानाच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरले, अशी माहिती पेशावर प्रांताचे माहिती मंत्री मुश्ताक गनी यांनी दिली. विशेष म्हणजे या शाळेच्या शेजारील सेंट मेरी शाळेवर हल्ल्याची पूर्वसूचना पाक गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.      

लष्कराच्या कारवाईचा सूड
पेशावरमधील हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे जाहीर करत ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने ‘उत्तर वझिरिस्तानात पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेल्या ‘झर्ब-ए-अज्ब’ या कारवाईचा हा सूड आहे,’ असे म्हटले. ‘आमच्या वेदना त्यांना जाणवून द्यायच्या होत्या,’ असे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले.

जगभरातून संताप, शोक
पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला. ‘आमच्या भूमीवरून दहशतवादाचा समूळ नायनाट झाल्याखेरीज सरकार स्वस्थ बसणार नाही. वझिरिस्तानातील पाक लष्कराची ‘झर्ब ए अज्ब’ मोहीम यापुढेही सुरूच राहील,’ असे ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत दहशतवादाविरोधातील लढय़ात भारताचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

पाकिस्तानातील शाळांवरील दहशतवादी हल्ले
* २७ ऑक्टोबर २०१४ : बारा येथे मुलींची शाळा स्फोटात उडवण्यात आली. कुणीही जखमी नाही.
* ९ सप्टेंबर २०१४ : बजौर भागातील मुलींची शाळा स्फोटात उद्ध्वस्त. २०१०मध्येही याच शाळेवर दहशतवादी हल्ला झाला होता.
* ९ जानेवारी २०१४ : हंगु येथे शाळेत आत्मघाती स्फोट घडवण्याचा हल्लेखोराचा प्रयत्न ऐतझाज हसन या विद्यार्थ्यांने हाणून पाडला. मात्र, या झटापटीत ऐतझाजचा मृत्यू.
* ७ जुलै २०१३ :  बन्नू येथील मुलींची शाळा स्फोटात उद्ध्वस्त.
* २१ जून २०१३ : पेशावरमध्ये शिया मदरशावर आत्मघाती हल्ला. १५ जणांचा मृत्यू.
* १६ जून २०१३ : क्वेट्टातील सरदार बहादूर खान विद्यापीठाच्या बसमध्ये आत्मघाती हल्ला. महिला हल्लेखोराने घडवलेल्या स्फोटात १५ विद्यार्थिनींचा मृत्यू.
* ९ ऑक्टोबर २०१२ : स्वात प्रांतातील शाळेत शिकणाऱ्या मलाला युसुफझई हिच्यावर शाळेतून परतत असताना बसमध्ये गोळीबार.