आपण रोज इंटरनेट वापरतो त्यावर बरीच माहिती असते, पण त्यावरची माहिती  कागदावर छापायची म्हटली तर ८ बाय ११ इंच आकाराचे १३६ अब्ज कागद लागतील, असा हिशेब इंग्लंडमधील वैज्ञानिकांनी मांडला आहे. इंग्लंडमधील लिसेस्टरशायर विद्यापीठाचे विद्यार्थी जॉर्ज हारवूड व एव्हँजेलिन वॉकर यांनी विकिपीडियाच्या इंग्रजी आवृत्तीचा वापर उदाहरणादाखल केला आहे. विकीपीडिया हे असे संकेतस्थळ आहे ज्यावर सर्वात जास्त माहिती उपलब्ध असते. या दोघा विद्यार्थ्यांनी १० लेखांची यादृच्छिक नमुन्यांदाखल निवड केली व एक लेख छापण्यासाठी त्यांना १५ कागद लागले. या हिशेबाने विकिपीडियावरील ४७२३९९१ इतकी पाने कागदावर छापण्यास ७०८५९८६५ कागद लागतील असा निष्कर्ष काढण्यात आला असे ‘टेक टाईम्स’ ने म्हटले आहे.
त्यांनी नंतर इंटरनेटवर असलेल्या सगळ्या वेबपेजेसचा अंदाज घेतला असता ती ४.५ अब्ज असल्याचे दिसून आले व वेगवेगळ्या संकेतस्थळांचा आकार किती असेल याचा अंदाज केला. त्यांच्या मते ही पाने छापायची म्हटली तर अ‍ॅमेझॉन खोऱ्यातील सगळी झाडे कापून त्याचे कागद वापरावे लागतील. अ‍ॅमेझॉनमध्ये ७०९०९ झाडे दर चौरस किलोमीटरला आहेत. एका झाडापासून १७ रिम कागद तयार करता येतो व एका रिममध्ये ५०० कागद असतात. अ‍ॅमेझॉनमधील एका झाडापासून ८५०० कागद तयार करता येतील. ७०८५९८६५ इतके कागद विकिपीडियावर आहेत. ५०० कागदांचा एक रिम म्हटले तर विकिपीडिया छापण्यास १४१७२० रिम लागतील; म्हणजेच ८३३७ झाडे लागतील व इंटरनेट छापण्यासाठी ८ बाय ५ चे १३६ अब्ज कागद लागतील.