जगातील सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’च्या इतिहासात आणि गिर्यारोहण जगात शुक्रवारचा दिवस ‘सगळ्यात वाईट’ ठरला. या शिखराच्या मार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या एका भीषण हिमप्रपातात १५ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला तर १२ जण बेपत्ता झाले आहेत. मृतांमध्ये नेपाळमधील शेर्पा आणि काही विदेशी गिर्यारोहकांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती असल्याची माहिती ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ येथून ‘लोकसत्ता’ला दिली.
एव्हरेस्टवरील चढाईसाठी दरवर्षी एप्रिलच्या सुमारास जगभरातील गिर्यारोहक या सर्वोच्च शिखराच्या तळाशी जमा होतात. एप्रिलच्या मध्यावर हे गिर्यारोहक ‘एव्हरेस्ट’ शिखराकडे जाण्यासाठी रस्ता तयार (रूट ओपन) करतात. तो तयार करण्यासाठी २५ गिर्यारोहक निघालेले असतानाच शुक्रवारी पहाटे काळाने त्यांच्यावर झडप घातली. वाटेतील ‘खुम्बु आइस फॉल’चा अवघड टप्पा पार करत पुढे जात असतानाच शिखराच्या ऐन धारेवरून आलेल्या हिमप्रपाताने त्यांना कवेत घेतले. मदतकार्य सुरू असून आतापर्यंत चार जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्यापही १२ ते १५ गिर्यारोहक बेपत्ता असल्याची माहिती ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’वरून देण्यात आली.
इतिहासातील मोठा अपघात
‘एव्हरेस्ट’च्या इतिहासातील हा एक मोठा अपघात समजला जातो. यापूर्वी १९९६ मध्ये झालेल्या अपघातात १५ जणांचा तर २००६ मधील अपघातात १२ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता.