पार्टीला जाण्यासाठी आईने ५०० रुपये दिले नाहीत म्हणून एका १५ वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील पालम परिसरात ही घटना घडली आहे. पूजा असे या मुलीचे नाव असून, तिची आई घरकाम करते.

पोलिसांच्या माहितीनुसार, पूजाची आई गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतली. त्यावेळी मुलीने आतून दरवाजा लावल्याचे तिच्या लक्षात आले. अनेकदा हाका मारूनही मुलीने दरवाजा उघडला नाही. अखेर तिने आरडाओरडा सुरू केला. ते ऐकून शेजारपाजारी धावत आले. त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी पूजाने गळफास घेतल्याचे दिसले. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला खाली उतरवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पूजाच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी तात्काळ घटनेचा तपास सुरू केला असून, घरातून कोणते पुरावे मिळतात का, यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनानंतर पूजाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मित्रांसोबत पार्टीत जाण्यासाठी पूजाने तिच्या आईकडे ५०० रुपये मागितले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पूजा घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजता शाळेतून घरी आली होती. साधारण सव्वाचार वाजता पूजाला शेवटचे पाहिले होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. सध्याकाळी सहाच्या सुमारास तिच्या आईच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर आम्ही धावून गेलो, अशी माहितीही त्यांनी दिली. पूजाची आई घरकाम करण्यासाठी गेली होती. ती वेळेत घरी येऊ शकली नाही. त्यामुळे पूजाला पैसे देऊ शकली नाही, अशी माहिती आईने आम्हाला दिली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पोलीस पूजाच्या शाळेतील मित्रांकडे तसेच नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. पूजाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण शोधण्यासाठी पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.